प्रवेशोत्सव माझेरी पुनर्वसन
जिल्हा परिषद मॉडेल स्कूल, माझेरी पुनर्वसन (ता. फलटण, जि. सातारा) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी शाळेचा पहिला दिवस व शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षण संचालनालय, पुणे येथील शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ (योजना विभाग), भाऊसाहेब सरक आणि संभाजी देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी आदरणीय डॉ. वंदना वाहूळ यांनी प्रवेशोत्सवातील विविध उपक्रमांची माहिती घेत इयत्ता पहिलीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास विनोद शिंदे, मा. सरपंच ज्ञानेश्वर दिघे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू दिघे, उपसरपंच प्रवीण दिघे तसेच व्यवस्थापन समिती सदस्य बशीर शेख व वैभव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या शुभहस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सेल्फी पॉइंट, फुलांचा वर्षाव, पहिल्या पावलांचे ठसे उमटवून स्वागत, भेटवस्तू व पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच मिष्ठान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले.
याच दिवसाचे औचित्य साधून ‘शाळापूर्व तयारी अभियान’ अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, भावनिक, सामाजिक व शारीरिक विकासासोबतच भाषा व गणनपूर्व तयारीची प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी सहा मार्गदर्शन केंद्रे (टेबल्स) उभारण्यात आली होती. याचबरोबर माता-पालक मेळाव्याचे आयोजन करून पालकांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी शाळेतील स्पर्धा परीक्षा व इतर उपक्रमांचे तसेच विद्यार्थीकेंद्रित वातावरणाचे विशेष कौतुक केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक रवींद्रकुमार लटिंगे आणि शिक्षकवृंद
सौ सरस्वती भोईटे, श्रीमती भारती शेळके,श्री संतोष जगताप,श्री गणेश पोमणे आणि सौ प्रिया निंबाळकर
यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, माझेरी गावातील ग्रामस्थ, इयत्ता पहिलीसह इतर वर्गांचे पालक आणि संपूर्ण ‘माझेरियन परिवार’ मोठ्या संख्येने उपस्थित होता.








Comments
Post a Comment