पुस्तक परिचय क्रमांक:२०४ रामाचा शेला
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२०४
पुस्तकाचे नांव-रामाचा शेला
लेखक: साने गुरुजी
प्रकाशन-रिया पब्लिकेशन, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-
प्रथमावृत्ती-१५ऑगस्ट, २०११
पृष्ठे संख्या–२१६
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--२१०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२०४||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-रामाचा शेला
लेखक:साने गुरुजी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
निर्मळ पवित्र सकस अजरामर साहित्य
सर्जनशील संस्कारक्षम संस्कृतीचे दर्शन
संस्कारक्षम धडे अन् अमृतमय वाणी
मुलांची हृदये जिंकली साने गुरुजींनी|
अध्यापन कार्य,समाजसेवा, स्वातंत्र्ययुद्ध अशा बहुविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी.
संवेदनशील हृदयमनाचे समाज शिक्षक आणि साहित्यिक साने गुरुजी यांच्या अक्षरधनातील एक अनमोल ठेवा‘रामाचा शेला’ही कादंबरी अतिशय संवेदनशीलतेने
गुरूजींनी या कादंबरीचे लेखक केले आहे.
गरीब कुटूंबातील उदय आणि सरला यांच्या प्रेमाची कादंबरी.सरलाच्या पाठीवर एकही मूल जन्मले नाही म्हणून तिचा बाप विश्वासराव नेहमी पाणउतारा करायचा. त्यामुळे ती सतत नाराज असायची.तिला फार मैत्रिणी नसल्याने तिचा स्वभाव घुमा होता.दहावीनंतर तिला पुढे शिकायची इच्छा असुनही वडिलांनी तिचे शिक्षण थांबवले. तदनंतर तिचे वडिलांनी ठरविलेल्या मुलाबरोबर लग्न झाले.अन् लग्नाला पंधरा दिवस झाले नाहीत तोच तिचा पती आजारी पडला अन् अचानक देवाघरी गेला.अभागी सरलावर दु:खाचा डोंगर कोसळला शोकाकुल झाली.
दु:खातून सावरल्यावर तिनं पुण्यातील कर्वे कॉलेजात शिकायला सुरुवात केली. फिरायला गेल्यावर कालव्याच्या काठावर उदासपणे पाण्यातील तरंग न्याहाळत बसायची.तेंव्हा
तिथंच एक तरुण झाडाखाली बसलेला असायचा. सरलेचे दु:खी अश्रु तो पाहात असतो.त्याचवेळी तिथल्या दगडावर सरला डोके आपटते.ती पुन्हा डोके आपटणार तोच तो तरुण धावत येऊन तिचं डोकं धरतो.स्व:ताच्या खिशातील रुमालाने जखमेवर पट्टी बांधतो.
या प्रसंगाने ते जवळ येतात.त्यांच्यातील प्रेमाला उकळी फुटते.मनात गुलाबी तरंग येतात.तन आणि मनाने ते एकत्र येतात.अभागिनी,बाळ तू मोठा हो!,प्रेमाची सृष्टी, आईचे निधन, पंढरपूर,आशा -निराशा, कुंटणखाना,उदय,गब्बूशेट, आजोबा व नातू,सनातनींची सभा,भेट आणि समारोप अशा तेरा विभागात ही कादंबरी रेखाटली आहे.दु:ख, निराशा अवहेलना,अपमान आणि दारिद्रय सहन करत,सुखी संसारासाठी हातभार लावायला संघर्ष कसा करावा लागतो. त्याची ही कादंबरी ‘रामाचा शेला’
सौंदर्य केवळ अनुभवाचे असते. सुखासाठी दु:खाची किंमत द्यावी लागते. या जगात आशेने जगणारा क्वचितच कोणी असेल? आशा नसती तर कोट्यवधी माणसे कशी जगती?सारे जग आशेवर जगत आहे. आशा जगाचा प्राण आहे.उद्याची आशा ठेवून मनुष्य आजचे दु:ख सहन करतो.उद्याचीच आशा ठेवून आम्ही अभ्यास करतो.व्यापारी व्यापार करतात.शेतकरी जमीन पेरतात, क्रांती करु पाहणारे क्रांती घडवून आणतात. तुमच्या मनातही आशा असेल.
प्रेमाचा सुगंध हृदयात सदैव ठेवा आणि जगाची सेवा करा.संतांच्या डोळ्यासमोर सदैव मरणाची स्मृती असते.म्हणूनच ते अधिक संग्राहक असतात.अशी विचार आणि चिंतन करायला उद्युक्त करणारे कोटस् पानोपानी वाचायला मिळतात.
अतिशय हृदयद्रावक आणि काळजाला स्पर्शून जाणारी कादंबरी.मनात अस्वस्थता पसरवाणारी कादंबरी ‘रामाचा शेला’...
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:१५फेब्रुवारी २०२५
Comments
Post a Comment