पुस्तक परिचय क्रमांक:२०३ आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध

 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२०३
पुस्तकाचे नांव-आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध 
लेखक: डॉ.जयसिंगराव पवार 
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीयावृत्ती मार्च २०१८
पृष्ठे संख्या–७६
वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक लेख
किंमत /स्वागत मूल्य--१००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२०३||पुस्तक परिचय 
            आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध 
       लेखक: डॉ.जयसिंगराव पवार 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 इतिहास अभ्यासक आणि संशोधक‘शाहू चरित्रकार’डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी पंचवीस पेक्षा अधिक ऐतिहासिक ग्रंथांचे लेखन केले आहे.त्यापैकीच एक ‘आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध’,हा छोटेखानी ग्रंथ इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले होते.तेंव्हा केलेल्या अध्यक्षीय अगर प्रमुख अतिथी म्हणून केलेल्या भाषणांचे लेख एकसंघ संपादित करुन ग्रंथ स्वरुपात प्रकाशित केले आहे.या ग्रंथाचा उपयोग जे इतिहासप्रेमी आणि नवं अभ्यासक आहेत त्यांना मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल असे नऊ लेख या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.
 इतिहासाच्या पाऊलखुणा अधोरेखित करणारे मुखपृष्ठ पाहूनच आपणास पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते.तमाम महाराष्ट्राच्या हृदयसिंहासनावर विराजमान होणारे रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीतील पुतळा.शिलालेख,किल्ला, शिवकालीन नाणी आणि प्राचीन काळातील मुर्तींची रंगीत छायाचित्रे समाविष्ट आहेत.आकर्षक आणि समर्पक मुखपृष्ठ आहे.
इतिहास अभ्यासक आणि लेखक डॉ. जयसिंगराव पवार  यांनी हा ग्रंथ गुरुवर्य शिवाजी विद्यापीठाच्या मराठा इतिहास विभागाचे प्रमुख तथा अमेरिकेतील फिस्क विद्यापीठातील अभ्यागत प्राध्यापक डॉ.व. दी.राव यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित केला आहे. प्रस्तावनेत ते प्रतिपादन करताना, म्हणतात की “यातील लेख ही भाषणे असून आपल्या ऐतिहासिक वारशाचा शोध घेणारी आणि वारसा जतन करण्यासाठी आपण काय उपाय करायला पाहिजेत याचे विवेचन आणि विश्लेषण करणारी आहेत.” ते ऐतिहासिक वास्तव आणि मनातील खंत केंद्रस्थानी ठेवून या लेखातून विचारप्रदर्शन केले आहे.
 आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण शोधावा,तो जतन करून ठेवावा.त्यासाठी कोणकोणत्या ऐतिहासिक साधनांचा शोध घेऊन ती पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी जतन करून ठेवणे का गरजेचे आहे?याचा ऊहापोह त्यांनी लेखात केलेला दिसून येतो.त्या काळातील सत्ताधिशांची कारकीर्द तसेच सणावळ्यांची माहिती घेऊन त्याकाळातील सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा धांडोळा घेणं महत्त्वाचं आणि आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासाची बहुविध असंख्य साधने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून आणि आडवळणी गावागावांतून विखुरलेली आहेत.सह्याद्रीच्या माथ्यावरील बुलंद किल्ले, गावातील वाडे,गावाचे कोट,मंदिरे, समाध्या,शिल्पे, ताम्रपट,नाणी, शिलालेख आणि कागदपत्रांची दप्तरे हीच इतिहासाची भौतिक आणि लिखित स्वरूपात साधने आहेत.
इतिहास हे देशाभिमान आणि अस्मिता उत्पन्न करणारे एक प्रभावशाली साधन आहे.याची खात्री पटल्यावर स्वदेशाच्या इतिहासाची शोध घेणारी चळवळ उदय पावली.या चळवळीचे नेतृत्व संशोधन व अभ्यासक ग.ह.खरे, राव बहादुर पारसनीस, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे 
यांच्यापासून वा.सी.बेंद्रे, सेतुमाधवराव पगडी आणि अप्पासाहेब पवार यांच्या पर्यंत अनेक संशोधकांनी व इतिहासकारांनी केले आहे.
या ग्रंथात नऊ लेख आहेत.महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाटचाल,इतिहासाच्या अभ्यासाची अनास्था, इतिहास संशोधनामागील भूमिका, आमच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, महाराष्ट्रातील इतिहास संशोधनाची दुरावस्था :एक मीमांसा, सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाची पुनर्रचना, स्थानिक इतिहासाचे महत्त्व, इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आणि आधुनिक युगाची बीजे आमच्याकडे होती काय? या लेखातून आपणाला इतिहासाचा मागोवा घेणं आवश्यक का आहे.यांचे विवेचन आणि विश्लेषण समर्पक शब्दात व्यक्त केले आहे.इतिहास अभ्यासकांना उपयोगी पडेल असे मार्गदर्शक पुस्तक आहे.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक ३०जानेवारी २०२५



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड