पुस्तक परिचय क्रमांक:१५३ विखुरलेले स्वप्नचांदणे



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१५३

पुस्तकाचे नांव-विखुरलेले स्वप्नचांदणे

लेखकाचे नांव-मीनल येवले 

प्रकाशक-ज्ञानपथ पब्लिकेशन, अमरावती   

प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०२३

प्रथम

पृष्ठे संख्या–९७

वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह

किंमत /स्वागत मूल्य--२००₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१५३||पुस्तक परिचय

         विखुरलेले स्वप्नचांदणे 

लेखक: मीनल येवले 

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

  असंख्य विचारांचे काहूर कवयित्री सख्याच्या अनुपस्थितीत विरह साहते अन् भावभावनांच्या कल्लोळातून कवितेच्या परिघावर स्वतःला मोकळं करते.मनोकुंभातून दाटलेल्या भावना, अनावर झालेल्या भावनांना घटनेत बध्द करून काळीजकप्पातल्या प्रिय सहचराच्या स्मृतींना शब्दात लयबध्द बांधून वेदनेचं आभाळ रितं करणारा काव्यसंग्रह “विखुरलेले स्वप्नचांदणे”

 कवयित्री मीनल येवले यांनी नियतीने एकाएकी केलेल्या ताटातुटीच्या आकांताचे गाणे या काव्यपुष्यात गुंफलय.अन् हे अक्षर नक्षत्र प्रिय सख्याला अर्पण केलेय.

आपली प्रिय व्यक्ती नसताना होणाऱ्या मनाच्या घालमेलीला, सैरभैरीला,वेदनेला ,अस्वस्थतेला, ओगळणाऱ्या आसवांना भावस्पर्शी शब्दात रेखाटलं आहे.डॉक्टर शोभा रोकडे यांचा मलपृष्ठावरील ब्लर्ब कवितासंग्रहाची आशयघनता अधोरेखित करतो.तर वेदनेचा अनोखा साज हा प्रस्तावनेचा लेख काव्यसंग्रहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. कवितांचे अंतरंग उलगडून दाखविणारा अप्रतिम लेख आहे.कवितांचे रसग्रहण करायला उद्युक्त करतो.

  कपोलकल्पित आणि रम्यकल्पना विलासांना दूर सारून जीवनाभुतीचे दर्शन घडविणारी काव्य मालिका आहे. अचानक कोसळलेल्या या दु:खाचा पहाडावर अल्पावधीतच कवितांचे अंकुरणे सुरू झाले.मन पोकळी शब्दांच्या अमृतधारेने मोहरुन आली.

८१काव्यपंक्तींचा हा संग्रह आहे.खरोखरीच भावविव्हळता दर्शविणारी रचना वाचताना आपणाला अस्वस्थता निर्माण करणारी आहे.भावस्पर्शी रचना वाचताना अंगावर अनेकदा शहारे उमटतात.तर कधी नेत्रात अश्रु येतात.या कविता संग्रहातील रचना सम्यक विचारांचे दर्शन घडवितात.प्रेरणा देतात. निराशेला आशा दाखवितात.अर्थबंधांचे शब्दार्थ पेरुन नवनवीन शब्दांचे सौंदर्य खुलवतात.

कवयित्री मीनल येवले यांनी ‘आकांताचे देणे’या मनोगतपर लेखात समजून घेणाऱ्या गोतावळ्यात कविता कशी सुचत फुलत बहरत आणि उमलत गेली याचे विश्लेषण अलवार शैलीत करतात. स्नेहप्रेमाच्या उबदार स्पर्शाने आधाराचा भक्कम दिलासा मिळतो.जे कुणाजवळ सांगता येत नाही; ते ही कवितेने ऐकून घेतले.दु:खरं जिणं,आकांताचं देणं अन् समर्थपणे जगणं.या काव्यसंग्रहातील रचना मनपटलावर विचारांचे काहूर निर्माण करतात. आपोआप हळहळता व्यक्त होते.काव्यांचे शिर्षक आशयाची खोली दाखवितात.

         उरीपोटी आठवांचा

येतो दाटुनिया 

             पुन्हा कसा बहरावा 

सुखस्वस्थतेचा मळा?

   झाड गेले कोमेजून या काव्यातील वरील रचना किती यथार्थता दाखविते.

         होते अनावर कधी

तुझे नसणे सोबत

           गहीवर काळजाचा

देते आसवांना वाट…..

   आपल्या माणसाची आठवण आली की काळजातील संवेदना डोळ्यातील आसवं गळताना मूकसंवाद होतो. ' नि:शब्दाचा पान्हा' या कवितेतील वेदनेला फुटे नि:शब्दाचा पान्हा,भास पुन्हा पुन्हा जीवघेणे..' नाही कुठला सांगावा कवितेतील शेवटच्या ओळी तर वेदनेचा गहिवर घालतात. 'किती ऐकावे झाडाने,दु:ख व्यथांचे गाऱ्हाणे| जीव लावून पणाला, घरासाठी हे जगणे||

काही रचना तर मनाला पीळ पाडतात. यातील  काव्यरचनातून आकांत ते आक्रोश अन् वेदना ते विरह यांची जाणीव करून देतात.

 वेदनेला फुटे पान्हा या रचनेतून ईश्वराकडे मी कोणता गुन्हा केला म्हणून तु माझ्यातला आनंद वजा करून वेदनेला पान्हा फोडलास.हे व्यक्त करणारी कविता ‘वेदनेला फुटे पान्हा ‘भावस्पर्शी रचना.

         ''क्षणोक्षणी आठवती

          दातृत्वाचे दोन हात 

           सयसांजेचे एकाकी

            झाले प्रहर अशांत''

 अशांत प्रहर काव्यातील या ओळी सहचराचे ऋणानुबंधातील गोतावळ्याला केलेल्या  मदतीची ओळख करून देतात.

वास्तवतेच्या हिंदोळ्यावर

भावस्वप्न झुलत होते

शब्दार्थांचे हिरवे वैभव

पानोपानी खुलत होते..

माझे जग या कवितेच्या किती भावार्थ जपणाऱ्या ओळी.निसर्गायनातील सृष्टीचे विलोभनीय दर्शन घडविणारे हा शब्दसाज फारच सुंदर आहे.

   अप्रतिम मनस्पर्शी रचना आहेत.एका वेगळ्या अविष्कारात सादर केलेल्या रचना भारावून टाकतात.’विखुरलेले स्वप्नचांदणे ’ हा काव्यसंग्रह  साहित्यिका मीनल येवले यांनी अलवार भावस्पर्शी शब्दात व्यक्त होऊन हा काव्यबंध साकारला आहे. आपल्या लेखणीस त्रिवार वंदन!!!


परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई










Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी