पुस्तक परिचय क्रमांक:१५२ चढाई-उतराई




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१५२

पुस्तकाचे नांव-चढाई-उतराई सह्याद्रीतील घाटवाटांची 

लेखकाचे नांव- आनंद पाळंदे 

प्रकाशक-प्रफुल्लता प्रकाशन, पुणे   

प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०१७

तृतीयावृत्ती

पृष्ठे संख्या–२७२

वाड़्मय प्रकार-प्रवासवर्णन

किंमत /स्वागत मूल्य--४५०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१५२||पुस्तक परिचय

         चढाई -उतराई 

लेखक: आनंद पाळंदे 

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

मला आवडते वाट वळणाची

अशी भुलकावणीची हुलकावणीची

निसर्गवेळूच्या भर रानीची

मला आवडते वाट वळणाची.. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे आमचा श्वास.भटकंतीत कुतूहल निर्माण करून तनमनाला आनंदीत करणारा अमृतझारांच्या नयनरम्य सौंदर्याचा जादूगार….


            सह्याद्री स्तोत्र

 सह्याद्री नामा ने हा प्रचंड

हा दक्षिणेचा अभिमान दंड

ज्वालामुखींनी जरि निर्मियेला

पवित्र तो रामपदे जाहला….

सदाशिव आत्माराम जोगळेकर यांनी ‘सह्याद्री’पुस्तकात १९५२साली लिहिलेले हे स्तोत्र आहे.

कवी अनिल यांची सह्याद्रीच्या घाटवाटांना शब्दरुप देणारी कविता अनवट घाटवाटा पालथा घालण्याची ओढ लावतात. 

    सह्याद्रीचा पर्वत म्हणजे महाराष्ट्राचा कणखर पाठीराखा.महाराष्ट्राचे राकट अन् कातळ सौंदर्य.माथ्यावर घनदाट वृक्षवेलींचे वैभव नजरेत भरते.महाराष्ट्राचा पराक्रम आणि स्वातंत्र्यनिष्ठा याच पर्वतराजीत दुर्गमदुर्ग आणि त्यांचे अधिपती श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच प्रगट झाली आहे.या घाटवाटा पालथ्या घालताना तेथील ऐतिहासिक संदर्भ आणि दंतकथा यांची माहिती आपणाला रसग्रहण करताना समजून येते.विशेषत: इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी केलेले कागदपत्रांचे संदर्भ दाखले दिले आहेत.तसेच पुस्तकात सह्यप्रेमींनी ,गिरीभ्रमकांनी अनवटवाटेने केलेल्या भ्रमंतीचे लेख ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते. त्यातील निवडक लेखांचा समावेश केला आहे.

सह्याद्रीचे घाट दमवतात,पण सुखावतात म्हणूनच आडवळण असले तरी पुनः पुन्हा वाटांचा मागोवा घ्यायला खुणावतात.

   ही भटकंती आहे, अवलिया डोंगरयात्रींची,डोंगरवेड्या गिर्यारोहकांची. निसर्गप्रेमींची अन् डोळस निरीक्षकांची.

सह्यपर्वतातील गड, किल्ले आणि रोमांचकारी घाटवाटांच्या भटकंतीचा ‘आँखो देखा’रिपोर्ताज पानोपानी वाचायला मिळतोय. कडेकपारीतून, घाटवाटांतून,मावळ-कोकणातून केलेल्या डोंगरयात्रांचा आलेख;रानवा,दरी,पायथा, माथा, घाट,कडे,ओढे आणि अनवटवाटांची ‘’चढाई-उतराई’’ या ऐतिहासिक ग्रंथात धांडोळा सादर केला आहे.

  गार वाऱ्याची सुखद फुंकर अनुभवत,आडवळणी घाटातील असीम एकांत, रौद्र अनुभव आणि हिरवागार रानवा पाहून समाधान लाभते.डोंगरयात्री, निसर्गशिल्प, रोचक दृश्य पाहताना आपण स्तिमित होतो.मनावर तरंग उमटतात. इतिहास आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा मनावर ठसतात.

सह्याद्रीचा नाणेघाट म्हणजे शालिवाहन राजाने निर्मिलेले लोकोपयोगी कार्य केले आहे.हा घाटमार्ग गेलीदोन हजार वर्षे अव्याहतपणे उपयोगात आहे.या घाटवाटांना आजही आधुनिकतेचा स्पर्शही झालेला नाही.घाटवाटा धुंडाळताना त्यांची भटकंतीही रौद्र कड्यांच्या संगतीने, निबिड अरण्यातून लाल वाटेने तर कधी पुष्पमंडित पठार तथा सडे बघत तर कधी भन्नाट रानवारा झेलत जलप्रपातांच्या धारेने खड्या वाटेने चढत नितळ पाण्याचे डोह अन् पावसातील कोसळधारांचा अनुभव घेत भ्रमंती केली आहे.हे पुस्तक आपल्याला आपले बोट धरून सह्याद्री पर्वताच्या दक्षिणोत्तर धार फिरवून आणणारे आहे. कोकणातून देशावर येणाऱ्या अन् जाणाऱ्या घाटवाटेच्या रस्ते नसणाऱ्या अनवट पायवाटा आपणाला सफर घडवितात.

 या भटकंतीचा मानव अन् निसर्ग अनुबंधाविषयी सविस्तरपणे डोंगरयात्री आनंद पाळंदे यांची भटकंती दिलीप निंबाळकर आणि प्रा.श्री.द.महाजन यांनी शब्दसाजात वर्णिली आहे.त्यांच्या लेखाने या सफरीची हकीकत अधोरेखित आणि उठावदार केली आहे.

  घाटवाटा पालथ्या घालायला पायात ताकद आणि मनात जिद्द असायला पाहिजे.शारीरिक क्षमतेचा खरा कस चढाई -उतराई सह्याद्रीत करताना लागतो.वाटांचा चकवा,दिशा शोधण्याचे कसब आणि दुर्मिळ रानवा इथंच अनुभवता येतो.एक घाट चढावा अन् दुसरा घाट उतरावा यातूनच दमदार डोंगरयात्रांचा जन्म झाला. असं आवर्जून डोंगरयात्री तथा लेखक आनंद पाळंदे तिसऱ्या आवृत्तीच्या मनोगतात उल्लेखतात.

  या  पायी भटकंतीच्या डोंगरयात्रेचे ४३लेख असून आवश्यकतेनुसार चित्रकर्मी पल्लवी गोटखिंडीकर हिने रंगीत पेन्सिलने काढलेली सह्याद्रीची भासचित्रे वेगळाच अनुभव देतात. पर्वतरांगेतील दऱ्या,कडे, वळणे,दांड आणि धार यांचे विहंगम दर्शन घडविणारी ३६ स्केचेस आहेत.यापुर्वी केलेल्या भटकंतीच्या पाऊलखुणाही मनोगतात रेखाटल्या आहेत. सरशेवटी चार परिशिष्टात अतिशय मौलिक मार्गदर्शन आणि माहिती दिली आहे.एक ऐतिहासिक अवलोकन घाटवाटा आणि दुर्ग, सह्याद्री परिसंस्था आणि पुनरुज्जीवन, सह्याद्री पर्वतातील घाटवाटा -खिंडी/बारी/पाजा यांची यादी आणि सह्याद्री विश्व वंद्य वारसास्थळे आणि भासचित्रे आहेत.

अनवट घाटवाटांचा वेध प्रत्यक्ष अनुभूती घेतलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने घेतलेला आहे.असे डोंगरप्रेमी आणि डोंगरयात्रींनी केलेले शब्दांकन लेखमालिकेत छानच सजले आहे.अगदी बोट धरून केलेली भटकंती आहे.प्रत्यक्ष स्थळकाळांचा भास होतो इतकं जिवंत चित्रण शब्दवाऱ्यात डोंगरवेड्या फिरस्त्यां(गिर्यारोहकां)नी रेखाटलं आहे.

 सह्याद्रीच्या संस्कृतीने जपलेली वैशिष्ट्ये म्हणजे घनदाट अरण्ये,देवराई,नद्या, जलप्रपात, दऱ्याखोऱ्या आणि घाटवाटा.त्यातील देवराई तर उघड्या रानात ठळकपणे दिसणारे पाचूचे हिरवेगार बेटच.मनाला भुरळ घालते.या घाटवाटांना स्थानिकांनी आकारावरुन, देवदेवतांच्या नावावरुन आणि ऐतिहासिक घटनांना अनुसरून वेगवेगळी नावे घाटांना आढळतात.जसे की दारे,खिंड,बारी,नाळ, डाक आणि पाजा.घाटवाटांचा इतिहासही समर्पक आणि विश्लेषणात्मक पध्दतीने अवलोकन केले आहे. यातील बरीचशी भटकंती कोकण आणि देशावर दळणवळणासाठी असणाऱ्या घाटवाटांची झाली आहे.दुर्गदुर्गेश्वर रायगडावर येण्यासाठी तेरा घाट आहेत.याची ही भटकंती या लेखातून जाणून घेता येते. विशेषत: गुरांची वाट, माणसांनी ये-जा करण्यासाठी पायवाट आणि पटाईत माणसं जाऊ शकतील अशी माकडवाट. या अनवटवाटेने सतत भटकंती करणाऱ्या कातकरी,कोळी आणि धनगर लोकं दऱ्याखोऱ्यातून रफेट करतात. 

   धबधब्यांना सुंदर उपमा दिली आहे. कड्यातून ओघळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जलधारा आणि तुषार यांची रांगोळी क्षणात आकार बदलत कोसळत होती.तो नजारा सुरेख दिसत असतो. कडेकपाऱ्यांतून अवखळपणे प्रवाहित होणारे धबधबे पाहिलं की मनात आनंदाची उकळी फुटते. नीरव शांततेत फक्त पाण्याचा कोसळणारा धोधो आवाज अन् पक्ष्यांच्या ताना ऐकू येतात.वारा निपचित पडलेला असतो. तर काही वेळ झाडांची पानेही हलत नाहीत.

ग्रीष्माची दाहकता सह्याद्रीत सर्वत्र जाणवते. ओढे ओहळ आठतात.डोंगर तापतात.अशा काळात डोंगरयात्रा करताना शक्ती संधारणाचे तत्त्व अधिक जाणवते.अश्या वातावरणातील डोंगरयात्रा करणं म्हणजे फार दमझाक होतं.

 कोकण आणि देश जोडणाऱ्या संपर्क करु देणाऱ्या घाटवाटा.गावागावात भाषा बदलतं असते.तेच घाटवाटांबाबत आहे.नाशिक-ठाणे भागात ‘बारी’तर पुणे सातारा रायगड भागात ‘नाळ’कोल्हापूर रत्नागिरी भागात ‘पाज’ संबोधतात.

अशा २२३ अनवट घाटवाटा परिशिष्टात नमूद केलेल्या आहेत.त्या वाटा कमी कोकणात आणि घाटावरच्या कोणत्या गावात उतरतात चढतात याचाही उल्लेख केला आहे.एकंदर सुंदर शैलीत वास्तवपणे घडलेली भटकंती शब्दांत व्यक्त केली आहे.

निसर्गात भटकंती करणाऱ्या अवलिया डोंगरयात्रींनी अभ्यासावे असे मार्गदर्शक अनवाटांचा इतिहास अन् भूगोल अवलोकन केलेले अप्रतिम जंगलरानाची सह्यबोली आहे.


आस्वादक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा



Comments

Popular posts from this blog

काव्य पुष्प घटस्थापना १०९

धन्यवाद दैनिक सकाळ:पाटीपूजन लेख