पुस्तक परिचय क्रमांक:१५० रौंदाळा





वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१५०

पुस्तकाचे नांव-रौंदाळा

लेखकाचे नांव- कृष्णात खोत 

प्रकाशक-मौज प्रकाशन गृह, मुंबई  

प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०११ 

दुसरी आवृत्ती 

पृष्ठे संख्या–२९५

वाड़्मय प्रकार- कादंबरी 

किंमत /स्वागत मूल्य--२७५₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१५०||पुस्तक परिचय

         रिंगाण 

लेखक: कृष्णात खोत 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

ग्रामीण कादंबरी लेखक तथा प्राध्यापक कृष्णात खोत यांनी ग्राम्य संस्कृतीचे लेखन करुन साहित्य क्षेत्राला नवा आयाम देणारे रेखाटले आहे.ते साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेते लेखक आहेत.गावखेड्यातील राजकीय संस्कृतीचा साज ‘रौंदाळा’या कादंबरीतून पानोपानी वाचायला मिळतो…

  लेखक कृष्णात खोत लिखित ‘रौंदाळा’

ही अस्सल गावरान कादंबरी.खेडेगावातील माणसांचं रहाटगाडगं चालविताना राजकारणा शिवाय पान हालत नाही. प्रत्येक घटना राजकारणाच्या दृष्टीकोनातून बघितलं जातं.आपल्या पार्टीच्या माणसांच्या चुकांवर पांघरूण घालायचं आणि विरोधकांच्या करणीचा गावभर बोभाटा करायचा.एखाद्यावर वहीम घेऊन त्याला बदनाम करायचे. एकमेकांच्या कुरबुरी करत कुरघोड्या करायच्या.असा राजकारणाचा धुरळा उडत असतो. गावातल्या हरेक घटनेत राजकारणाचा वास दरवळणारच.चावडी,शिवार,पाणंद, रस्ता आणि ग्रामापंचायतीचं आॅफिस म्हणजे गावची खबरबात समजणारी ठिकाणं. "गाव तसं चांगलं पण् वेशीला टांगलं'' या म्हणीप्रमाणे एका गावाला नायक करून तीन मुख्य व्यक्तिरेखांभोवती ही कादंबरी रेखाटली आहे.एकहाती गावाचा कारभार सुरळीत पार पडत असताना;इर्ष्या आणि मीपणा पायी दोन पार्ट्या पडतात.आबा,आप्पा अन् पांडू पाटील.गावचा कारभार एकजुटीने चोख बजावणारे 'आबा' आपल्या कारकीर्दीनंतर गावच्या मताने बिनविरोध आपल्या मुलास 'आप्पा'स गावचा सरपंच करतात.त्यांचे विरोधक सोसायटीचे चेअरमन पांडू पाटील असतात.एकमताने नांदणारं गावं हातात खुळखुळणाऱ्या पैशांमुळे एकमेकांना कमी लेखतात.त्यातून घडलेली कथानक ‘रौंदाळा’कादंबरीत गावगुंडीतील, भावकीतील,घराघरातील चव्हाट्यावर अनेक प्रकरणे उलगडून दाखविली आहेत.

  “गावाचं गावपण हरवलं”असं वयस्कर व्यक्ती हळहळत असतात.शहाणीसुरती माणसं माणुसकी विसरून आपल्याच पायाखाली बघत असतात.गावचं भलं व्हावं असं कुणाला वाटत नाही.याचं सूक्ष्म रेखाटन माणसांच्या वागण्या-बोलण्यातून रसिक वाचकांना याची प्रचिती येते. बदलत्या गावाची वास्तव चित्रण वाचताना वाचक अस्वस्थ होतो.इतकं मनभावन लेखन केले आहे.चावडीवरचं गप्पांचं गुऱ्हाळ तर खास ग्रामीण ढंगात रेखाटले आहे.

‘खेड्याकडे चला’असा मानवतेचा संदेश देणारे महामानव महात्मा गांधी यांना हे पुस्तक अर्पण केले आहे.चौदा विभागात या कादंबरीचे लेखन समावेश केले आहे.

पाडव्याला पालखीतले देव पळविणारे एक आणि बोभाटा दुसऱ्यांचा.उरुस,बॅकेच्या मतदानासाठी सोसायटीचा ठराव. सोसायटीची निवडणूक,पांडू पाटलाची दुसऱ्या सोसायटीची स्थापना, ग्रामपंचायत निवडणूकीची धमाल आणि त्यापायी झालेली प्रकरणं आणि गावातील लोकांचा तंटाबखेडा, बाचाबाची, हाणामारी आणि अरेरावी आदी प्रसंग वाचताना घटना समोर घडतेय असं वाटते.

   ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या राजकारणापायी भावकीभावकीत भावाभावात विरोधाला विरोध कसा निर्माण होतो.त्याच इत्यंभूत वर्णन अनेक घटनाप्रसंगातून मांडले आहे.तीन पिढ्यांच्या काळात गाव अनुभवाला कसं मिळतेय यांचे विश्लेषण या कादंबरीत दिसून येते.आबांच्या बालपणाची पिढी,मुलाची पिढीत काय चाललंय आणि  नातवाची पिढी कशी असेल? माणूसपण जिवंत राहून गावचा वतनवारसा कसा असेल याने अस्वस्थ होणारे आबा. गावातील एखाद्याच्या तंटाबखेड्यात आप्पा सामंजस्याने तोडगा काढणार तर पांडू पाटील बेरकी आणि मतलबी राजकारण करणार.शह-काटशहाचं राजकारण करताना गरीबांच हकनाक हाल.आजच्या निवडणुकीत विरोधात असणारं काहीजण परिस्थिती नुसार पुढच्या निवडणुकीत पार्टी बदलतात.त्यांचं इत्यंभूत वर्णन या कादंबरीत चितारले आहे.घटनांनुसार व्यक्तीरेखांचे संवाद वाचताना सत्तर ते ऐंशीच्या दशकातील ग्रामीण मराठी चित्रपटाची पटकथेची आठवण येते.लेखक कृष्णात खोत यांनी अप्रतिम ग्राम्य शैलीत लेखन केले आहे.


परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई 

दिनांक:९मार्च २०२४


















Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी