पुस्तक परिचय क्रमांक:२६२ पाणपोई
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६२
पुस्तकाचे नांव-पाणपोई
लेखक: व. पु. काळे
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- सुधारित आवृत्ती ऑक्टोबर,२०१७
पृष्ठे संख्या–१२४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१३०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६२||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-पाणपोई
लेखक: व.पु. काळे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वैयक्तिक अनुभवांना सामाजिक आशयाचे कोंदण निर्माण करुन साठवून ठेवलेलं अक्षरधन ‘पाणपोई’तून मुक्तहस्ते अनेक कथासंग्रहातून वाचक रसिकांना बहाल करणारे, वाटणारे लोकप्रिय लेखक तथा कथाकथनकार व.पु.काळे यांची संचित शब्दांची ‘पाणपोई’.वाचनातून इतरांना आनंद वाटते.अनेक व्यक्तिंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू अधोरेखित करते.एक दमदार कथालेखक ज्याला सत्याची किनार आणि विचारांचे पैलू आहेत.त्यांच्या कथा म्हणजे हास्यमस्करी करत मनातलं शल्य व्यक्त करते.तेच वाचकांच्या काळजात घुसते आणि मनाला चटका लावून जाते.अन् असंच जीवन असतं हे नकळतपणे समजते.व्यक्तींच्या आचार विचारांच्या पध्दतीला व.पु.काळे ‘पॅटर्न’ म्हणतात.असे अनेक पॅटर्न विविधांगी कथांत गुंफून रसिकांना लेखणीने आणि वाणीने मंत्रमुग्ध केले आहे.
पाणपोई म्हणजे लेखक व.पु.काळे यांच्या संचित अक्षरसाहित्याचे भंडार.विचारांचे सौंदर्य,हकिगतींचे इमले,किस्स्यांच्या गप्पा,कवितांची मैफल आणि विनोदाची पखरण यात भरलेली आहे.जणू ही पाणपोई म्हणजे लेखकाचे ‘साहित्यिक मृतूपत्रच’ म्हणावे लागेल.हिरेमाणिक,चिल्लर ,मोहरा यासारखं हे चल संपत्ती नसून ही पाणपोई आहे विचारधनाची तहान क्षमवून आनंद पेरणारी.यातील एक विचार तमाम शिक्षकांच्या कर्तव्याला शाबासकीची थाप देणारा आहे.सुभाषचंद्र बोस ह्यांना एका मुलाखतीच्या वेळी ‘स्टेशनमास्तर व स्कूलमास्टर ह्यांच्यात काय फरक आहे?’-असा प्रश्न विचारला होता.तेंव्हा एका क्षणात त्यांनी उत्तर दिलं होतं , Schoolmastar trains the minds,Stationmastar minds the trains.’
व.पु.म्हणतात की,“ या पाणपोईतील काही गोष्टी यापुर्वी तुम्ही ऐकल्या असतील वाचल्या असतील.” त्यांच्या सहवासातील तसेच भेटलेल्या लोकांचे विलक्षण अनुभव व स्वभावगुण ठळकपणे त्यांनी मांडले आहेत.
लेखकांनी साहित्य प्रवासात भेटलेल्या सरस्वतीच्या प्रांगणात साहित्याचा शब्दगंध उधळणाऱ्या साहित्यिकांशी हितगूज साधताना घडलेल्या घटना प्रसंगाचा अमूल्य ठेवा शब्दांकित केला आहे.साहित्यिक य.गो.जोशी,प्र.के.अत्रे,स्वामीकार रणजित देसाई व यशवंतराव चव्हाण यांची भेट, ना.सी.फडके,पु.भा.भावे आणि प्रकाशक अनिल मेहता अश्या कितीतरी लेखक मंडळींचे किस्से या पाणपोईत आहेत.
रसिक वाचकांनो या दीर्घ लेखात त्यांनी आजवरच्या सहवासातील साहित्यकांच्या समवेत गप्पा मारताना घडलेले किस्से अलवार शब्दात उमटवले आहेत.ते वाचताना वाचक रसिकांना अनेक नव्या गोष्टींची माहिती मिळते.अन् त्या जेष्ठ प्रतिभावतांच्या स्वभावगुणांची ओळख होते.या पाणपोईतल्या शब्दथेंबाचे आचमन करायला अठरा कथांचे कलश भरलेले आहेत.जे रसिक वाचकांचे मनोरंजन करत ज्ञानाची तलपही भागवतात.जे आपणाला विचार करायला चालना देतात.एखाद्या गोष्टींचे समर्पक आणि यथार्थ वर्णन यथासांग करतात.
सभोवतीच्या घडलेल्या छोट्या छोट्या घटनांचे त्यांनी तपशीलवार वर्णन कथेमध्ये केलेले आहे.त्यातील गुणवैशिष्ट्ये आणि व्यक्तिंची वैशिष्ट्य अलवारपणे उघडलेली आहेत.तहान,डिसेंबर मासाची हकिकत, आजकालच्या लग्नातील रिसेप्शनचे वर्णन,जगात माणसांच्या अनेक जाती आहेत.तर ते म्हणतात की,जगात प्रश्न विचारणारे आणि उत्तर देणारे अशा दोनच जाती आहेत.हे उदाहरणं व दाखले देऊन स्पष्ट केले आहे.तर हाताचं ‘करभार-कारभार’या लेखात आख्यान सांगितलं आहे.व.पु.काळे यांच्या काव्याचे रसग्रहण करण्याची संधी ‘पाणपोईत’आहे.तुझ्या स्मृतींची सावली, आधार!,व.पु…एक कविता, साखर या
काव्यातून आपणास त्यांची रचनात्मक उंची समजते. उडतं संगीत,उडतं काव्य आणि उडती मनं यांना काही काळ उडू दे;परंतु पुन्हा त्यांना धरतीवर पाय रोवावेच लागतील;कारण ‘आधाराशिवाय’काहीच घडू शकत नाही.पुन्हा नव्याने परतून यावे लागेल ते निसर्गाच्या सहवासात…त्याच्या संगीतात आणि उमटणाऱ्या प्रत्येक अक्षरात…खरा श्रोता होऊन…वर्तुळ पूर्ण व्हायला हवंच! आधी शब्दांशी मैत्री करत मग सुरांकडे ध्यान देतदेत नदीओहळ पशुपक्षी, वृक्षवेली आवाजातील सप्तसूर ऐकून माणसाच्या अंतरंगाचा वेध घेता येईल.हीच सप्ताक्षरं सरळपणे वाचली,तर काहीही बोध होत नाही.पण या अक्षरांना स्वर जोडला तर सरगम.तरंग-ताल आणि आरोह-अवरोहासह तरंग निर्माण होतात.
मन आनंदाने वाहू लागले की,देवळात जाणं म्हणजे ईश्वराची निरपेक्ष भेट.शांत मन म्हणजे देऊळ अन् परमात्मा.किती सुंदर विवेचन व.पु.नी ‘देऊळ’कथेत केले आहे.खरं तर ही ज्ञानाची पाणपोई रसिकांना विचारांची प्रेरणा देत मंथन करायला भाग पाडते.स्वत:घ्या अंतरंगात तुलनेची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करून स्वभावांची सरासरी काढायला सांगते..
जीवनाच्या नाना तऱ्हांचा पॅटर्न व.पु.नी पार्टनर सारखा ‘पाणपोई’तून अमृतरुपी शब्दांचे सिंचन करत करत आहे.अप्रतिम लेखणी….
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २८डिसेंबर २०२५

Comments
Post a Comment