पुस्तक परिचय क्रमांक:२६१ खुर्द आणि बुद्रुक




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६१
पुस्तकाचे नांव-खुर्द आणि बुद्रुक 
लेखक: रवींद्र जोशी 
प्रकाशन-अनुबंध प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती ४डिसेंबर,२०११
पृष्ठे संख्या–२१२
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६१||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-खुर्द आणि बुद्रुक 
लेखक: रवींद्र जोशी 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
‘खुर्द आणि बुद्रुक’असं या पुस्तकाचे नाव वाचून आपणाला एखादं गाव वैशिष्ट्यपूर्ण कसं असतं? तसेच ग्रामीण भागातील जुळ्या गावांची माहिती देणारं पुस्तक असेल असं मुखपृष्ठावरुन वाटतं.पण मित्रहो,तसं नाही.शब्दश:अर्थ खुर्द म्हणजे गावकुसाबाहेरील वस्ती तर बुद्रुक म्हणजे मुख्य गावठाण.या पुस्तकाचे 
‘खुर्द आणि बुद्रुक’शीर्षक ख्यातनाम चित्रपट निर्माते व लेखक रवींद्र जोशी यांनी त्यांच्या सहवासातील माणसांची शब्दचित्रे रेखाटली आहेत.त्यांचे अनेक कथासंग्रह प्रकाशित असून दैनिके, दिवाळी अंक आणि नियतकालिकात संगीत विषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
  आजवर बऱ्याच दिग्गज साहित्यिकांनी अनेक कथासंग्रहात सहवासातील माणसांची व्यक्तींची व्यक्तिचित्रे, चरित्रे लेखणीतून साकारलेली आहेत. कोणतीही चित्रं असोत ती माणसांची ‘गोष्ट’असते. गोष्टींचं आकर्षक लहानथोरांनाही असते. अगदी शांतचित्ताने गोष्ट श्रवण करायला सगळ्यांनाच आवडतं.प्रत्येक माणसाची गोष्ट वेगळी असते.प्रत्येकाला ती लिहायला वाचायला किंबहुना पाहायला आवडते.मग त्या गोष्टीतली व्यक्ती नामवंत असो किंवा आपल्या सभोवती वावरणारी अगदी सर्वसामान्य व्यक्ती असो.
लेखक रवींद्र जोशी यांनी ‘खुर्द आणि बुद्रुक'या कथासंग्रहात शब्दबध्द केलेली माणसे नावलौकिक मिळविणारी नसली तरी प्रत्येकाचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. त्यांनी माणसाच्या आयुष्यातील ठळक घटनांचा लेखाजोखा समर्पक शब्दात टीपकागदाने टिपून उठावदार केला आहे.व्यंकटेश माडगूळकर, गदिमा,व.पु.काळे,शंकर पाटील,सुधा मूर्ती, द.मा. मिरासदार,महादेव मोरे आदी लेखक तथा कथाकारांनी आपोआपल्या सभोवती वावरणाऱ्या तसेच भेटलेल्या आणि घटनाप्रसंगाने ओळख झालेल्या माणसांच्या स्वभावगुणांचे रेखाटन सहजसुंदर शैलीत केले आहे.त्याच पठडीतले लेखक रवींद्र जोशी आहेत. त्यांनीही हरेक कथेतून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’,या उक्तीप्रमाणे स्वभावगुणांचे व्यक्तीपरिचयाचे तऱ्हेवाईक विविध नमुने व्यक्तिचित्रात रेखाटताना ते मनोगतात सांगतात की,“यातली माणसं मला जशी भावली तशी शब्दबध्द केली आहेत.” माणसामाणसातही काही चिल्लर तर काही डॉलर असणात.पण त्यांच्या जगण्याची रीत इतरांना प्रेरणादायी अथवा अनुकरणीय ठरत असते.तर काही रोखठोकपणे आयुष्य वर्तमानाकाळातच जगत असतात.काही व्यक्तीचित्रे विचारांचे सौंदर्य पेरणारी आहेत तर काही स्वभावगुण ठळकपणे व्यक्त करणारी आहेत.यामध्ये लेखकाच्या बालपणीचे सवंगडी,शाळकरी मित्र, नोकरीतील सहकारी यांच्या स्वभाव गुणांची तसेच व्यक्तिमत्वाची ओळख होते.काळाचा महिमा आणि माणसामाणसातले संबंध कधीकधी नियती दुरावत नेते.बालपणीच्या मित्र तीसपस्तीस वर्षांनी अचानक भेटल्यावर प्रथमदर्शनी लगेच ओळख पटत नाही.पण ओळख पटली की  गळाभेटीच्या स्पर्शाने तेच अंतर पुसट होत जाते.अन् मग गप्पांचे भरतं येतं.अन् निरोपासमयी भावनेनं ओथंबलेला बांध रिता होत जातो.याची आठवण करून देणारे लेखक रवींद्र जोशी यांची ‘खुर्द आणि बुद्रुक’पुस्तकातील लेखमालिका आहे.
   शहाणे,फक्कडशेठ, नामदेव पांडुरंग पंढरपूरकर, मनवलीकर मास्तर,म्हादबा भावसार,मकरंद ढालगावकर,मधु चिरोलीकर, सुनील फणसळकर, पांडोबा भिसकुटे आणि अभय पेंडसे या दशक व्यक्तीच्या गोष्टी‘खुर्दआणि बुद्रुक’पुस्तकात 
आहेत.लेखक रवींद्र जोशी यांना जशी भावली तशी त्यांनी शब्दबध्द केली आहेत.
बालपणीचा सहवासातील गमतीजमती सांगत तीसचाळीस वर्षानंतर भेट झाल्यावर कार्य कर्तृत्वाच्या घडामोडी तसेच त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंटने आयुष्य कसं बदललं याची ओळख लेखक रवींद्र जोशी यांनी सहज सुंदर सोप्या भाषेत आणि रसाळ शैलीत करून दिली आहे.रसिक वाचकांना निश्चितच या व्यक्तिंची शब्दचित्रे रसग्रहण करायला निश्चितच आवडतील.
परिचयक– श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- ३जानेवारी २०२६

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी