पुस्तक परिचय क्रमांक:२६३ थैलीभर गोष्टी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६३
पुस्तकाचे नांव-थैलीभर गोष्टी
लेखक: सुधा मूर्ती
अनुवाद: लीना सोहोनी
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जून,२०१७
पृष्ठे संख्या–१८२
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१७०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६३||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-थैलीभर गोष्टी
लेखक: सुधा मूर्ती
अनुवाद: लीना सोहोनी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
“लहान मुलांचं मन हे ओल्या मातीच्या भिंतीसारखं असतं.या लहान वयात त्यांना काहीही शिकवणं म्हणजे धारदार काचेच्या तुकड्याने त्या भिंतीवर नक्षीकाम करण्यासारखं असतं.मुलं मोठी झाली तरी,या वयात त्यांच्या मनावर जे काही बिंबवण्यात आलेलं असतं.ते तसंच कायम राहतं.त्यामुळे मुलांवर योग्य वयात योग्य त्या नितीमूल्यांचे संस्कार करणं फार महत्त्वाचं असतं.ह्या संस्काराची शिदोरी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडते.”
—सुधा मूर्ती
बाळगोपाळांचे विश्व समृद्ध करणारे ‘थैलीभर गोष्टी’हे लोकप्रिय लेखिका सुधा मूर्ती यांच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद लीना सोहोनी यांनी अतिशय समर्पक आणि यथार्थ शब्दात केला आहे.यातील किशोरावस्थेत पदार्पण केलेल्या मुलामुलींसाठी त्यांनी कथालेखनाचा सारीपाट मांडला आहे.या कथा सुधा मूर्ती यांनी बालपणी आजी-आजोबांकडून श्रवण केलेल्या, देशभ्रमंती करताना विविध देशांतील नागरिकांकडून ऐकलेल्या तर काही स्व: कल्पनेतून रेखाटलेल्या आहेत.
लोककथा,जातककथा आणि बोधकथांतून
मुलामुलींचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या सुरस आणि कालातीत कथा आहेत. वेळोवेळी सहवासात आलेल्या मुलांना, बाळगोपाळांना त्यांनी या कथा ऐकवल्या आहेत.
यातील हरेक शब्द कथा वाचताना हृदय जिंकत जातो.अश्या प्रशंसेची मुद्रा दैनिक पुढारीने उठवली आहे.मुलामुलींना संस्कारक्षम करणाऱ्या कथांची मेजवानी ‘थैलीभर गोष्टी'या पुस्तकात आहेत.
इतिहासाचा धांडोळा घेताना आपणाला इतिहासाच्या साधनांचा संदर्भासाठी उपयोग करावा लागतो.लिखित , भौतिक साधनांपेक्षा मौखिक लोकगीते, लोककथा, पोवाडे,ओवी ,भारुडे आणि आख्यायिका या मौखिक साधनांपैकी जगभरात मौखिक परंपरेने लोककथा सादरीकरण करणाऱ्या कथाकथनकारांना हे पुस्तक
कृतज्ञतापूर्वक समर्पित केले आहे.
थैलीभर गोष्टी या कथासंग्रहात आटपाट नगरातील राजाराणीच्या कथांच्या सोबतच प्राणी,पक्षी आणि मानवी भावभावनांच्या वृत्तीचे दर्शन घडविणाऱ्या व संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या आजीआजोबांच्या गोष्टी तर आहेतच;पण बुध्दिचातुर्याची हजरजबाबीपणाची आणि विनाभांडण तंटे मिटविण्यासाठी कृतीयुक्त न्यायनिवाडा कसा करतात.तसेच तर्कशुध्द विचार कसा करावा.हे ही कथा वाचताना उमगतं जाते. देशोदेशींच्या बालसाहित्याची माहिती होतं. कथेतील बोधातून वैचारिकता समजते.
अनुवादक लीना सोहोनी यांनी अतिशय समर्पक आणि यथार्थ शब्दात गोष्टींचा अनुवाद केला आहे.मूळ लेखिका सुधा मूर्ती यांचे मन आणि भावभावना गोष्टींचे वाचन करताना समजतात.बेचाळीस गोष्टींची मेजवानी ‘थैलीभर गोष्टी’ या कथासंग्रहात आहे.इसापनिती जातककथा आणि लोककथा यांचे संमिश्र लेखन या गोष्टीतून मांडले आहे.मुलामुलींनी कोणत्या संस्काराचे धडे घेऊन आचरण करावे.हे पटवून देणाऱ्या या प्रेरक आणि मार्गदर्शक कथांचा पेटी म्हणजे ‘थैलीभर गोष्टी.’
अलकावतीचा सम्राट,एक रुपयासाठी झगडा,सत्याची ताकद, न्यायप्रिय हरिपंत यांच्या सर्वच कथा वाचनीय अणि हजरजबाबी कसं असावं हे अधोरेखित करतात.आळशी माणसाला कष्टाची कामे करायला लावणारी ‘पहाटेचं दव’कथा,तरं कोणतही फळ खाण्यापुर्वी ते कसं खावं? याची माहिती सांगणारी ‘फणसाची’ गोष्ट
एखादी घटना तिखटमीठ लावून गावभर पसरवणाऱ्या पत्नीला अद्दल घडविणारी ‘पांढऱ्या कावळ्याची’कथा. एकसोएक रसग्रहण करायला आवडतील अशा आहेत.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ५ जानेवारी २०२६

Comments
Post a Comment