पुस्तक परिचय क्रमांक:२०७ समतेचा ध्वज



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२०७
पुस्तकाचे नांव-समतेचा ध्वज 
संपादक: डॉ.संभाजी मलघे 
प्रकाशन-कॉन्टिनेंटल प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २७ फेब्रुवारी २०२२
तृतीयावृत्ती 
पृष्ठे संख्या–२४६
वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-३००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२०७||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-समतेचा ध्वज 
संपादक: डॉ.संभाजी मलघे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
 वेदनेचा हुंकार, व्यथा अन् अश्रुंच्या अक्षरांनी श्रमिकांचे जिणे प्रतिबिंबीत होणाऱ्या उध्दव कानडे यांच्या चिंतनशील कविता …. श्रमाची प्रतिष्ठा हे जीवनमूल्ये काव्यातून मांडणारे कवी.
 घामाचे धनी असलेले साहित्यिक उध्दव कानडे यांच्या प्रसिद्ध झालेल्या कविता संग्रहातील निवडक कवितांचे संकलन व संपादन लेखक डॉ संभाजी मलघे यांनी ‘समतेचा ध्वज’या काव्यग्रंथात केले आहे. 
  उन्हातान्हात राबणाऱ्या कष्टकरी मातेच्या जित्याजागत्या जीवनाचे विदारक अनुभव साहित्यिक उध्दव कानडे यांनी कवितेत रेखाटले आहेत.मातृत्वाचे हृदयस्पर्शी , भावस्पर्शी घामाचेधन केशरमाती, अस्वस्थायन, मानवदरा या कवितासंग्रहात गुंफलेले आहेत.त्यातील कवितांबद्दल जेष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘कवी उध्दव कानडे यांच्या कविता हे तर घामाचे देणे| घामाचे देणे|हे घामाचे गाणे|सत्यमेव जयते हे ज्याला कळते त्यालाच सत्याची अशोकमुद्रा सापडते.
समता हे मूल्य शाश्वत आहे.काळ,प्रदेश, धर्म, जात, भाषा आणि वर्ण यांच्या पलीकडे जाऊन साऱ्या मानवतेशी  ‘समता’जोडली जाते.समतेच्या पवित्र धाग्यांनी माणसं बांधली जावीत.माणूसधर्म हीच खरी सुंदरता होय.
‘समतेचा ध्वज’श्रमिकांची काव्यगाथ अनेक नामवंत प्रतिभावंतांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी, समिक्षकांनी लोकप्रिय लेखक उध्दव कानडे यांच्या कवितेवर,साहित्यावर अभिप्रायाची मुद्रा उठवून वाहव्वा करून सन्मानित केले आहे.जेष्ठ समीक्षक डॉ.निर्मलकुमार फडकुले लिहितात,‘जेंव्हा आयुष्याची माती निढळाच्या घामाने आणि  डोळ्यांतल्या अश्रुंनी भिजते, तेव्हाच तिची ‘केशरमाती’होते.त्यांच्या कविता अशा सुगंधी मातीतूनच अंकुरल्या आहेत.’
कष्टकरी लोकांच्या घामाचे हुंदके कवितेतून व्यक्त केले आहेत.त्या कविता म्हणजे श्रमिकांची मानपत्रंच आहेत असे नमूद करावेसे वाटते.असे जेष्ठ सामाजिक विचारवंत भाई जगताप यांचे परखड मत होय.
 बऱ्याच काळानंतर एक सकस दर्जेदार साहित्य वाचनाची संधी वाचनश्री पुरस्कारात भेट मिळालेल्या ‘समतेच्या ध्वज’या ग्रंथामुळे लाभली.
सो जाते है फूटपाथ पर
अखबार बिछा कर
मजदूर कभी नींद की 
गोली नहीं खाते …..
दु:खी अन् कष्टाचं जगणं जगणारी साधीसुधी माणसं त्यांच्या कवितेचे नायक आहेत.
संपादक डॉ. संभाजी मलघे यांचा माणूस धर्माची सुंदरता हा साहित्यिक उध्दव कानडे यांच्या काव्याची आणि समतेची ओळख करून देणारा लेख काव्याचा आशय स्पष्टपणे सांगणारा असून.या ग्रंथाला प्रा.विश्वास वसेकर यांची प्रस्तावना सकस व दर्जेदार असून काव्यसंग्रहातील कवितांचे नेमकं मर्म समजून देणारी आहे.अनेक नामवंत प्रतिभावंत साहित्यिकांचे अभिप्राय आहेत.त्यातून कवितांची आशयघनता अधोरेखित होतेय.त्यांच्या कवितेच्या प्रवासातील माईलस्टोनची ओळख करून दिली आहे.
‘समतेचे ध्वज’ या काव्यग्रंथात मानवदरा, आम्ही घामाचे धनी, अस्वस्थायन आणि केशरमाती या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे भावविश्व समाविष्ट केले आहे.
अंधारातल्या मुसळधार पावसात कवीचा जन्म.त्यांनी मराठवाड्यातील १९७२ च्या दुष्काळाचे चटके सोसलेले आहेत.
माती एक रांगोळी या कवितेतील ओळी चिंतन करायला उद्युक्त करतात..
 मातीसाठीच जगावे 
मातीसाठीच मरावे
मातीचे अनेक रंग असतात 
ते एकमेकांत मिसळून जातात 
माती अनेक ठिपक्यांची रांगोळी 
एकतेच्या दोरीनं बांधलेली
समतेच्या सावलीत विसावलेली 
घामाच्या पाण्यानं भिजलेली…
मानवतावादाची प्रकर्षाने जाणीव करून देणारी रचना
पाण्याला कुठे असते जात
झाडांना कुठे असतो धर्म 
माझ्या आत रंग आहेत,ध्वज नाहीत
मी प्रत्येक चेहऱ्याला आवाज देतोय
थोडी समतेची सावली मागतोय..
 
फुकट मिळतंं पाणी हवा फुकट मिळती
जेवढं मोठं आकाश तेवढीच मोठी माती
डोळ्यांमध्ये नभ ठेवू मातीला भिजवत जाऊ
वारा बनता आले नाही नदी बनून वाहू
चला आपण समानतेच्या शाळेत जाऊ…
 आईचं काबाडकष्ट डोळ्यातील अश्रूंसारखं व्यक्त होणारी कविता 'माझी आई'अंतकरण गहिवरते.अन् आपण निश्चल होतो.इतकी ताकद या रचनेत आहे.
   माझी आई
माझी आई कुणाची?
धनाची की सणांची 
धनाची ना सणांची
जगासाठी राबणाऱ्या काळ्याभोर मातीची  
माझी आई कुणाची?
चांदीची की सोन्याची
चांदीची ना सोन्याची
विठूमय झालेल्या त्या
 देहूमधल्या तुकोबाची
निर्मळ सुंदर घामाची ?
का कष्टणाऱ्या हातांची?
चोखोबांच्या मतांची
चोखोबांच्या मतांची अन् 
सावित्रीच्या पोताची
दुधावरल्या सायीची का
गोठ्यामधल्या गायीची
गोठ्यामधल्या गायीची 
गोठ्यामधल्या गायीची 
अन् तव्यावरल्या लाहीची …. 
मातृत्वाचा पाझर या काव्यातून ओसंडून वाहत आहे…

कवितेच्या पानोपानी,नक्षत्रांचे थेंब असतात
आशयाच्या पावसामध्ये गहिवरणारे मोर असतात
जेव्हा शब्दांचा पाऊस पडतो,
 वेड्या कविता ओलावतात 
वणव्यामधल्या पाखरांना,
 पुन्हा जवळ बोलावतात…
किती सार्थ सुंदर विचार व्यक्त करणाऱ्या ओळी कवितेच्या आहेत.
         आम्ही घामाचे धनी 
माय म्हणायची मला,घाम जगात सुंदर 
घामासारखा नाही रं,जगी दुजा अलंकार 
माय सांगायची मला,रोज घामानं भिजावं 
घामाघूम झाल्यावर देव गाळितो आसवं

कष्टकरी लोकांच्या दररोजच्या दैनंदिनीचे
वास्तव रेखाटन करणाऱ्या ओळी मनाला अस्वस्थ करणाऱ्या कविता अतिशय आर्ततेने वेदना सलत ठेवणाऱ्या या सर्व रचना आहेत.
आमचं नशीबच फुटकं
त्याला करायचं काय
पाऊस उघडत नाही म्हणून 
तसंच मरायचं काय 
          आमचं आयुष्य 
आमचं आयुष्य गळकं ते गळकंच 
एखाद्या पाचटाच्या छपरासारखं 
माणुसकीच्या सुई-दोऱ्याने
एकेक नातं जोडता जोडता 
आमचं आयुष्य फाटून गेलंय…
खूप छान शब्दात कष्टकरी श्रमिकांची आर्तता व्यक्त करणारा काव्यग्रंथ ‘समतेचा ध्वज'आहे.
परिचयक: श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक ४एप्रिल २०२५



Comments

Popular posts from this blog

काव्य पुष्प घटस्थापना १०९

पुस्तक परिचय क्रमांक:१५२ चढाई-उतराई

धन्यवाद दैनिक सकाळ:पाटीपूजन लेख