पुस्तक परिचय क्रमांक:२०९ आदिवासी लोककथा


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२०९
पुस्तकाचे नांव-आदिवासी लोककथा 
लेखक:चंद्रकांत घाटाळ 
प्रकाशन- समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- नोव्हेंबर २०२३
प्रथमावृत्ती 
पृष्ठे संख्या–८०
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२०९||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-आदिवासी लोककथा 
लेखक: चंद्रकांत घाटाळ 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
आदीम काळापासून माऊथ पब्लिसिटी द्वारे मौखिक परंपरेने चालत आलेले अनुभवांचे गाठोडे लोककथेतून लेखक चंद्रकांत घाटाळ यांनी रसिक वाचकांना उपलब्ध करून दिले आहे.आजोबांनी ऐकविलेल्या गोष्टी रंजक आणि कुतूहल वाढविणाऱ्या असतात.गावात एखादा तरी माणूस गोष्टीवेल्हाळ असतो.त्याची कथा कथनाची पध्दत ऐकणाऱ्याला गुंगवून ठेवणारी शब्दफेक असते.
अश्याच आदिवासी लोकांच्या कथा संत्या आबा मुलांना गोष्टींच्या आटपाटनगरात सफर करायला घेऊन जातोय.या पुस्तकाचे मुखपृष्ठ आदिम संस्कृतीचा सांस्कृतिक कलाविष्कार असणारं ‘वारली चित्रांगण’आहे.ते आपली नजर खिळवून ठेवते इतकं आकर्षक आहे.तर मलपृष्ठावर सूरज वावरे यांचे लेखन लेखकाचा साहित्यिक परिचय आणि अवकाशिय ज्ञानाचा परीघ उलगडून दाखविणारे आहे.
त्यांच्या कर्तृत्वाचा आरसा म्हणजे मलपृष्ठ होय.
लेखक चंद्रकांत घाटाळ यांनी मार्गदर्शक सन्मित्र अर्जुन वाजे यांना हा कथासंग्रह कृतज्ञतेने अर्पण केला आहे.यातील कथा त्यांनी यापूर्वी ऐकलेल्या आहेत.त्यातच शब्दांची रंगावली भरून त्या मनोरंजक व कुतूहल वाढविणाऱ्या केल्या आहेत. बालपणी त्यांनी संत्या पाटलाकडून ऐकलेल्या गोष्टींचा खजिना रेखाटला आहे.
या कथासंग्रहात दहा गोष्टी साध्यासोप्या रसाळ शब्दात गुंफलेल्या असून त्या कथांचे शिर्षक वाचले की,कथेचा नायक आणि आशय वाचण्याची उत्सुकता निर्माण होते.प्रत्यक्ष गोष्ट घडलेल्या ठिकाणी आपली सफर होतेय असं प्रवाही लेखन केलेले आहे.
गोष्टी सांगणाऱ्या संत्या आबांचे शब्दचित्र वाचूनच मजेशीर,मिश्लिली आणि जिज्ञासा वाढवणाऱ्या कथा आहेत याची प्रचिती येते.संत्या आबा पाटीलांची ओळख अधोरेखित करणारी ‘संत्या आबा’,यापासून गोष्टीला प्रारंभ होतो.
मनाला भावणारी आणि भावावर निरागस प्रेम करणाऱ्या बहिणीच्या वेडी माया ‘लाल गोंडा’या कथेतून समजते.तसेच नवऱ्याचे बायकोवर किती उत्कट प्रेम आहे ते व्यक्त करणारी ही कथा.सगळ्या कथांतील उत्कृष्ट भावस्पर्शी कथेचा एक सुंदर प्रकार वाचायला मिळाला.
माझा भरतार सावित्री झाला 
जीव माझा बाहेर आणला 
असा धनी मिले जगाला
असा धनी मिले जगाला…..
ऐषोरामी विलासी राजा इंद्रवर्मा आणि राजपुत्र क्रूरसेन यांना आपल्या सौंदर्याने घायाळ करून त्यांच्यात कलह निर्माण करून आपल्या वडिलांचा बदला घेते आणि गेलेलं राज्य परत मिळवते ती कथा’राणीचं गुपीत’.
कोल्हिनचा प्रसुती काळ जवळ आलेला असतो.अन् कोल्हा तिला वाघाच्या गुहेत प्रसुतीसाठी घेऊन जातो.स्वता:चा अन् पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी कोल्हा काय युक्ती करतो.ती मनोरंजन
इसापनीती कथा ‘सोंड्या वाघ’.
   जावई नावामुळे सासुरवाडीला काय खेळखंडोबा होतो.सासरेजावई शेरास सव्वाशेर कसे होतात? त्याची कथा’जावई’.अरण्ययात्री असणाऱ्या आदिवासी बहुल भागात ताडी कशी काढली जाते? याची माहिती देणारी ‘चांद्या-गोंद्या’या दोन भावांची कथा..
एखाद्या सिनेमाच्या स्टोरीच आपण ऐकतोय असा आभास निर्माण करणारी दीर्घ कथा म्हणजे ‘जनार्दन’. ग्रहपरग्रह, सागरी बेट आणि हिऱ्यांच्या खाणीची सफर करून देणारी प्रवासवर्णनपर कालकी राजा आणि राजकुमारी कालिंदी यांची सुरस कथा तर साहसी जनार्दन, महाराज दुष्यंत आणि वरदान देणाऱ्या अग्नी ऋषींची कथा आहे.
 आदिवासींना खगोलीय ज्ञान आदिम काळापासून कसं माहित आहे.याचं आकलन करून देणारी गोष्ट फारच नव्या माहितीचा खजिना रिकामा करणारी आहे.
शीर्षक नावाप्रमाणेच जिज्ञासू कथा आहे.
जंगलात लाकडं आणायला गेलेल्या पेंद्याला खायला फळंही पोटभर मिळत नाहीत.जीव भुकूने कासावीस होतो. खायला मिळावे म्हणून तो जंगलाच्या वाटेवर असणाऱ्या बनी आजीच्या झोपडीत जाऊन तो काय उपाय योजतो? ती कथा ‘पेंद्या’.फारच कुतूहल निर्माण करणारी अन् हसवणारी आहे.
दोन मित्रांना मालामाल करणारी रहस्यमय कथा ‘खंडरा वाघ’.केस कर्तनकाराचा दर्पण,कात्री अन् वस्तारा म्हणजे त्याच्या व्यवसायाची आयुधे होत.यातील आरश्याने जंगलातील वाघाला समयसूचकतेने घाबरून त्यांच्याकडील धनसंपत्ती मिळवतो.हे त्याच्या मित्राला बायकोकडून समजतं.मग दोघे जंगलात जाऊन,खंडऱ्या वाघाला कसं गंडवतात.त्याची धमाल हास्यमस्करी करायला लावणारी कथा.
अतिशय समर्पक शब्दात आणि मजेशीर आणि प्रवाही शैलीत यातील कथांचे लेखन केले आहे. मनोरंजक कथांचा खजिना वाचकांना ‘आदिवासी लोककथा’या कथासंग्रहात लेखक चंद्रकांत घाटाळ यांनी उपलब्ध करून दिला आहे.
परिचयक- श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक-६ एप्रिल २०२५


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड