पुस्तक परिचय क्रमांक:२०६ रानवसा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२०६
पुस्तकाचे नांव-रानवसा
एक मुक्त चिंतन
लेखिका: डॉ.अश्विनी देहाडराय
प्रकाशन-ATM पब्लिकेशन,कर्जत अहमदनगर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०२३
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–७०
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-७५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२०६||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-रानवसा,एक मुक्त चिंतन
लेखिका: डॉ.अश्विनी देहाडराय
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
‘रानवसा’एक मुक्त चिंतन या निसर्गाच्या सहवासात आनंदमयी ऊर्जा कशी मिळत राहते.त्या निसर्गाच्या अरण्यलिपीचे ममत्व आणि महत्व निसर्गप्रेमी लेखिका डॉक्टर अश्विनी प्रवीण देहाडराय यांनी आपल्या चिंतनपर वैचारिक लेखांतून समजावून देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. लेखिका उपक्रमशील शिक्षिका असून त्यांना अक्षरधनाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.विशेषत: विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय रिसर्च जर्नल्समधून त्यांनी सादर केलेले ‘शोधनिबंध’प्रकाशित
झालेले आहेत.आज प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे.वनसंपदा नष्ट होईल का काय?असा प्रश्न निसर्गप्रेमींना भेडसावत आहे.यास्तव वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन कृतीतून राबविणे गरजेचे झाले आहे.कारण अनेक दुर्मिळ वृक्ष आधुनिकतेच्या विकास या नावाखाली नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.आपल्या पृथ्वीला हरीत ठेवणं आवश्यक आहे.
अरण्यालाच आपलं सर्वस्व अर्पण करणारे
जीवनाच्या रुळलेल्या वाटा सोडून स्वतःची वेगळी तेजस्वी पायवाट निर्माण करणारे वनाधिकारी. निसर्गसृष्टीत आयुष्य खुलवलेले भटकंतीकार अरण्ययात्री तथा निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊन मनातलं लेखणीतून उतरवणारे लेखक मारुती चितमपल्ली म्हणतात की, “जंगलं कशी निर्माण झाली असावीत ?वाऱ्या वादळानं वृक्षाचे बीज जिकडेतिकडे विखुरलं, पाण्याने ते वाहून आलं. तर कुठे पाखरांनी आणून टाकलं.जमिनीच्या पोताप्रमाणे कुठे ते वाया गेलं, तर कुठे ते रुजलं, उगवलं, वाढलं.जनावरांपासून वाचलं तेवढं
फोफावलं.त्याची झाडं झाली. कुठे एकट दुखटं कुठे समूहानं.अशी जंगलं महत्प्रयासाने निर्माण होतात.”किती मौलिक विचार वनसंपदेविषयी या पुस्तकात समाविष्ट केले आहेत ते आपणास मंथन करायला उद्युक्त करतात.
‘रानवसा’ या शब्दातून आपणास उमजते,की निसर्ग आणि वनांचे मानवाशी काय नातं आहे?आणि मानव नेमका काय करतोय? याचं वास्तव उत्तर देण्याचा प्रयत्न लेखिका डॉक्टर अश्विनी देहाडराय यांनी या पुस्तकात केला आहे. पुस्तकात
एकूण नऊ लेख आहेत.प्रत्येक लेखाच्या आशयाची अचूक माहिती स्पष्टीकरण करणासह देऊन अनेक उदाहरणे दाखले दिले आहेत.त्यामुळे त्या लेख दर्जेदार असून त्यातील आशय मनाला पटतो.अन् विचारचक्र सुरू होते.प्रत्येक लेखाचे बीज हे निसर्ग आणि वनांचे आहे.परमात्म्याचे चैतन्य -निसर्ग, मराठी भाषा गौरव दिन, निसर्गातील अद्भुत किमया,ईश्वरनिर्मित गुरू,सौंदर्य आकाशाचे, कथेतील तहान लाडू व भूकलाडू ,पवित्र जागा, नेमेचि येतो मग पावसाळा, भारतीय संस्कृती आणि कोरोना असे विश्लेषणात्मक लेखन केले आहे. अरण्ययात्री मारुती चितमपल्ली यांची या लेखातील निरीक्षणं वनातील लिपीचे कुतूहल आणि नवनवीन गोष्टी लक्षात आणून देतात.पहिल्या लेखातून अरण्य भटकंतीकार मारुती चितमपल्ली यांच्या अरण्यातील अनुभवचित्रे वाचायला मिळतात. निसर्गाचा आनंद घेतला मनात नेहमी ‘ऋतू हिरवा’असणं महत्त्वाचे आहे.
आजीआजोबांनी किंवा वाचलेल्या गोष्टीतील तहानलाडू भूकलाडू म्हणजे नेमकं काय याचा उलगडा म्हणजे नवलाईच वाटते.जंगलातील प्राणीपक्षी आपल्या पिल्लांना भविष्यात खाण्यासाठी उपलब्ध असावे म्हणून त्यांनीच केलेले तयार झालेले पदार्थ म्हणजे ‘भूकलाडू तहान लाडू’होय.हे वनअभ्यासक वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी प्रत्यक्ष निबिड अरण्यात झाडावर, पाणवठ्यावर आणि मचाणावर तासनतास बसून निरीक्षण करून नोंदविलेल्या नोंदी पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत.
‘पवित्र जागा’ या लेखातून पक्षी आणि प्राण्यांचे समागम (प्रणय)कसं होतं? यांचं वर्णन मोरनाची, सारसनाची आणि सांबराच्या खुदानी या शब्दांची ठिकाणं जंगलात कुठं असतात आणि ते प्रणयक्रीडा कशी करतात.याची सविस्तर माहिती वाचनीय आहे.
यातील लेखांचे रसग्रहण करताना आपणास लेखिकेने केलेल्या संशोधनपर अभ्यासाचा व्यासंग लक्षात येतो. आशयाशी निगडीत कवींची कविता आणि त्या कवितेचा समर्पक शब्दात यथार्थ अर्थ समजून दिला आहे.तसेच लेखातून मार्मिकपणे चिंतन माणसांनी का केले पाहिजे याची जाणीव करून दिली आहे.
निवेदन आणि सूत्रसंचालन करणाऱ्या
सकल संवादकास हे पुस्तक म्हणजे अक्षरशः संत,लेखक आणि कवी यांचे लोकप्रिय श्लोक, कविता,कोटेशन आणि परिच्छेद यांचे संकलित शब्दधनच सापडले असे वाटते.निसर्गातील घटकांचे निरीक्षण करून शब्दातून अमृतकण वेचणारे लेखक आणि कवी यांच्या साहित्याच्या कुंभातील अक्षरधन या लेखातून पाझरत पाझरत रसिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य लेखिका डॉक्टर अश्विनी देहाडराय यांनी केले आहे.
निसर्गाच्या लेखा सोबत मराठी भाषा गौरव दिन हा लेख म्हणजे व्याख्यान देण्यासाठी चिंतन करायला उद्युक्त करणारा लेख! अप्रतिम शब्दसुमनात अलंकारीक साजात गुंफलेला सखोलपणे व्यक्त केलेला लेख.यातून अनेक नवीन शब्दांची ओळख करून दिली आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. औचित्यपूर्ण आशय सादर करणाऱ्या ओळी.माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगे जागतिल
मायदेशातील शिळा….मराठीची भौगोलिक परिसरानुसार असणारी नांव या लेखात आहेत.विशेष म्हणजे स्वित्झर्लंड येथील ‘इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री’या संस्थेने एका ताऱ्याला २७फेब्रुवारी १९९६ रोजी ‘कुसुमाग्रज तारा’हे नाव देऊन आकाशातल्या ग्रहताऱ्यांच्या पंगतीत सर्वोच्च स्थान बहाल केले आहे.
शिवाराशी भावनिक नातं जोपासणारे मातीतले कवी ना.धों.महानोर यांची लोकप्रियता लाभलेली रचना..
ह्या या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे ….
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांची खेळणी मांडून गावे…
तर बालकवी ‘आनंदपक्षी’या कवितेत भरारी घेणाऱ्या पक्षाचे शब्दचित्र नजरेत भरते..
केव्हा मारून उंच भरारी,
नभात जातो हा दूरवरी,
आनंदाची सृष्टी सारी, आनंदे भरली.
उंच भराऱ्या मारीत जाणे,
रूप तुझे ते गोजिरवाणे!
गुंगुन जाईल चित्त ज्याने, दे,दे ते गाणे!
तसेच समारोपाच्या लेखात कोरोना काळात आपण कुटूंबाची घेतलेल्या काळजीच्या साठवणी डोळ्यासमोर येतात.तन सुदृढ मन विशाल होई
इथे रुजवणूक या तत्वांची…कवी किशोर बळी यांची रचना आपणास भारतीय संस्कृतीचा विचार समजून देतात.अतिशय वैचारिक चिंतन करायला उद्युक्त करणारा ‘रानवसा’आहे.अभिजात मराठी
वाचक आणि संकलक यांच्या वाचनालयात निसर्गाची शिदोरी साहित्यिकांनी शब्दबध्द केलेली ‘रानवसा’असणं रसिक वाचकांना गरजेचे आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
दिनांक:१५ मार्च २०२५
Comments
Post a Comment