पुस्तक परिचय क्रमांक:१४८ शिवनेत्र बहिर्जी
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-१४८
पुस्तकाचे नांव--शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड-२
लेखकाचे नांव--प्रेम धांडे
प्रकाशक-रुद्र एंटरप्रायझेस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सप्टेंबर २०२३/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-३२८
वाड्मय प्रकार--ऐतिहासिक कादंबरी
मूल्य--४४९₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚१४८||पुस्तक परिचय
शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड-२
लेखक-प्रेम धांडे
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
शिवबाच्या खडतर वाटेवरले,पायघड जे जाहले;
एक जन्मी हजार रुपांचे, भाग्य तयांना लाभले|
वैराग्याचा शोक न केला,लालसा ना कीर्तीची;
रहस्य हेच जयांचे लौकिक,ऐसे ते शिवनेत्र बहिर्जी||
युगप्रवर्तक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य अलौकिकअसणारा शिवइतिहास अथांग खोल असून त्यात अनेक शौर्यगाथेचा खजिना लपलेला आहे. अनेक शिलेदारांच्या शौर्यगाथा आहेत.या शिवसागरात रक्ताच्या अभिषेकाने आणि महापराक्रमाने स्वराज्य निर्माण करण्यात अनेक दुर्मिळरत्नांनी मुर्दुमूकीने रणांगणे गाजविली आहेत. त्याच शिवकाळातील आपल्या बुध्दीचातुर्याने, चाणाक्षपणे आणि समयसूचकतेने शत्रूच्या गोटातील बित्तंम बातमी खबरबात महाराजांपर्यंत वाऱ्याच्या वेगाने पोहचविणारे गुप्तहेर बहिर्जी नाईक. त्यांच्या महान व असामान्य कार्याचा वेध घेणारी कादंबरी इतिहासप्रेमी लेखक प्रेम धांडे यांनी'शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड-२' या गौरव गाथेत लिहिली आहे.
उत्कंठावर्धक आणि कुतूहल वाढवित ऐतिहासिक वातावरणात घेऊन जाणारी अप्रतिम ऐतिहासिक कादंबरी ‘शिवनेत्र बहिर्जी नाईक:खंड-२’आहे.अगदी अलवार आणि ओजस्वी शैलीत लखोट्यातील रेखीव शब्दाकारात आणि जिंदा दिल नजरवेधक अंदाजात वीररसातील शाहिरी शब्दसाज चढवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनमोल घटनाप्रसंगाचे लेखन केले आहे.या कादंबरीतील कथाबीज कायम अज्ञात राहून शत्रूच्या गोटातील खबरा,हालचाली, मसलती वाऱ्याच्या वेगाने बाज(संदेश वाहक) नाईकांकडे आणि महाराजांकडे कसे पोहचवितात.महाराजांसमवेत गुप्त खलबते कशी घडतात.महाराज चर्चा करून मोहीम कशी आखतात.यांचा घटकांचा सुंदर मिलाफ करून घडवलेली अस्सल आणि अप्रतिम ऐतिहासिक कादंबरी आहे.अफाट कल्पना शक्तीच्या जोरावर अन् अभ्यासपूर्ण मांडणीवर ही कादंबरी सर्जनशीलतातेने रेखाटली आहे.यातील बरेचसे प्रसंग वाचताना आपल्या डोळ्यासमोरच घटना घडतेय आणि बहिर्जी त्याचे धावते वर्णन करतायत असं वाचताना आपल्या मनाला भुरळ घालते.
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अदृश्य शक्ती बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण आयुष्याचा जीवनपट, स्वराज्याच्या बांधणीत पावलोपावली शिवप्रेमी बहिर्जी नाईक यांच्या अमूल्य योगदानाचा प्रवास घडविणारी ही कादंबरी.
भावना,समर्पण,त्याग आणि आकांक्षा तिलांजली देऊन स्वराज्याचे संवर्धन आणि रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाज्ञा शिरसावंद्य मानून गुप्तहेरांना, नजरबाजांना
किती त्याग आणि संघर्ष करावा लागतो.याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ही कादंबरी आहे. स्वराज्याचे बाज होण्यासाठी काय दिव्य करावे लागते.कार्यप्रणालीसाठी काय काय गुण असावे लागतात याचे वर्णन वाचताना मन मंत्रमुग्ध होते.
शिव हर शंकर, नमामि शिवशंकर शंभो||
हे गिरीजापती, भवानी शिव शंकर शंभो||
या कादंबरीची प्रस्तावना श्रीमान नवनाथ जगताप यांनी देऊन या कादंबरीचा प्रवास करताना विविध स्टेशनवरील ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.कथेचा ओघ तसाच ठेवत त्या काळातील ठिकाणांचे वास्तव रुप जपत कल्पनाशक्तीच्या जोरावर महामेरू छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय पराक्रमाने विजय मिळवलेल्या अनमोल घटनांची रणनिती आणि शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर पथकाने मिळवलेल्या खबरा महाराजांना देऊन मंत्रणाकक्षात विचारविनिमय करून ठरविलेली खलबते आणि त्यावरुन ठरविलेल्या मोहिमा, यातील गुढता आणि कुतूहलता या कादंबरीचा आत्मा आहे.
या कादंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील मोहीमा यशस्वीपणे कार्य साफल्य करण्यासाठी बहिर्जी नाईक गुप्तहेर पथकाच्या नजरबंद बाजांनी केलेल्या फत्ते कामगिरीचे वर्णन अप्रतिम शैलीत केले आहे.वाचताना लेखन आपणाला गारुड करते. कुतूहलता गुढता उत्कंटावर्धन करते.या कादंबरीत महाराजांच्या जंजिऱ्याच्या सिद्दीवरची जरब,मुघल दरबारातील घडामोडी, विजापूरच्या दरबारातील हालचाली ते किल्ले प्रतापगडचा रणसंग्राम,महामोहिमेची खबर, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्तेखानाची फजिती आदी घटनांची ठळकपणे आणि सविस्तरपणे वर्णन या कादंबरीत लेखक प्रेम धांडे यांनी केले आहे.
बहिर्जी नाईक पथकाच्या इतिहासाची जाज्वल्यपूर्ण गौरव गाथा; शत्रुच्या गोटातील घडामोडींची हेरगिरी करताना अनुभवलेल्या चित्तथरारक अनुभवांची गुंफण केलेली ऐतिहासिक कादंबरी वाचताना प्रत्यक्ष शिव काळाची स्वराज्याची महती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वांगीण रणनितीची कार्यतत्परता मनावर उमटते.अप्रतिम कल्पनाशक्तीची शैली वापरून कादंबरी रसिकांना मंत्रमुग्धतेने गारुड करते.
परिचयक :श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
अप्रतिम शब्दरचना👌🚩
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete