वनराई बंधाऱ्याची मोहीम फत्ते..
मोहीम फत्ते
शाळेत शिकलेल्या कार्यानुभवाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केला वनराई बंधारा बांधून ….अशा विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो..
जिल्हाधिकारी सातारा आणि कृषी विभागाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोंढावळे येथील बावीच्या ओढ्यावर शेतकरी, ग्रामस्थ, शिक्षक, ग्रामसेवक, कृषीसेवक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी आणि महिलांचे मदतीने ३०फुट लांबीचा वनराई बंधारा ऑक्टोबर २०२३मध्ये उभारला होता.त्यावेळी हा बंधारा उभारण्याचा हेतू मुख्याध्यापक आणि कृषीसेवक यांनी सांगितला होता.आपणही आपल्या शेताजवळ घराजवळील वहाळी नाल्यांवर दगडमातीचे ढीग रचून वनराई बंधारे शिवारात उभारुन शकता….
मुले अनुकरणीय असतात.हेच प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.जिल्हा परिषदेच्या कोंढावळे प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सिध्देश, विघ्नेश आणि श्रेया या तीन मुलांनी. सुट्टीच्या दिवशी घरची जनावरं चारायला घेऊन जाण्याचं काम मुलांना करावं लागायचं. गुरांना चरायला लावून काहीतरी खेळ खेळायची संधी सोडतील ती मुलं कुठची? असाच खेळ खेळून झाल्यावर एक दिवशी त्यांनी घळवीच्या वहाळीला छोटासा बंधारा घालायचं ठरवलं.अन् लागले सहा हात कामाला. जवळच इकडेतिकडे पडलेले व वहाळीतील दगडगोटे जमवून गरजेप्रमाणे रचून आणि मातीची भर घालून त्यांनी झिरपणाऱ्या वहाळीला दोनतीन ठिकाणी बांध घालून पाणी तुंबवायला सुरुवात केली. पाचसहा दिवसात त्यांनी मोहिम फत्ते केली.पाचसहा फुट लांबीचा अन् दीड एक फुट उंचीच्या बंधाऱ्यात पाणी वाढायला सुरुवात झाली.मग काय? चरायला आलेली गुरंढोरांना,शेरडा करडांना प्यायला पाणी उपलब्ध झालं. रानातल्या पाखरांनीही आपली तहान बंधाऱ्यातल्या पाण्यात भागवली असेल तर काहींनी मनसोक्त डुंबकी मारली असेल.
मात्र उन्हाळ्यात कोरडी ठणठणीत पडलेली वहाळ जुनजुलैच्या पावसाने तुडुंब भरून वाहू लागली.मुलांनी रचून ठेवलेल्या बांधाऱ्यावरून, व मधून पाणी भुंग्यागत पळतयं…पण गुडघाभर साठा मात्रा तिथं दिसतोय.हे प्रत्यक्ष आज योगायोगाने पावसाळ्यातील घळवीचं रुपडं मोबाईलमध्ये चित्रित करायला गेलो होतो तेव्हा कारागिर सिध्देशने सगळा वृत्तांत ऐकविला आणि प्रत्यक्ष तिथंच छोटा बंधारा बघायला मिळाल्यावर फारच आनंद झाला अन् समाधान वाटलं. मुलांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष कृतीतून जीवनव्यवहारात करून,खारीचा वाटा उचलून“जलयुक्त शिवार” करण्याचा
प्रामाणिक प्रयत्न केला आहे.इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या कामसू आणि कष्टाळू वृत्तीला सलाम!!!
Comments
Post a Comment