आपुलकीची नाती वाढवतेय वाचन साखळी
📓📚📖📓📚📖📓📚📖📓📚📖
आपुलकीची नाती वाढवतेय वाचन साखळी
मित्रहो नमस्कार,
आमच्या समूहातील आदरणीय संयोजक, सदस्य आणि मार्गदर्शक स्वत:च्या पदप्रतिष्ठेचा कोणताही अभिनिवेश न बाळगता दिसेल ते, पडेल ते,सुचवेल ते आणि सांगेल ते काम करत ‘कमी तिथं आम्ही ‘या उक्तीने कामं करणारे समस्तजण वाचन साखळी समूहाच्या वाचनरथाचे सारथी.....
त्यांच्या मदतीला सहकार्याला सलाम! निमित्त होते वाचनयात्री पुरस्कार प्रदान आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे.खरोखरच पुस्तकांच्या सान्निध्यात रममाण होणारे रसिक वाचक आणि शब्दप्रभूंची उपस्थिती वाचन साखळीच्या संयोजिका प्रतिभाताईंनी एका पुस्तकाच्या पानात स्नेहबंधांनी बांधलीय.कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी,उत्कृष्ट परिचयक आणि वाचनयात्री असे सगळेच साहित्ययात्री; कारण त्यांनी आपल्या विचारांचे सौंदर्य अनेक साहित्य कृतीतून व्यक्त केलेय. परिसरातील घडामोडीवर आपल्या लेखन शैलीने सदर लेखन करुन ते दैनिकातून प्रसिद्ध करत करत पुस्तक रुपाने सर्जनशील साहित्य प्रकाशित केले आहे. काहींचे एखादं, दुसरं, तिसरं पुस्तक प्रकाशित झाले आहे तर काहींनी पुस्तकांची पंचविशी साजरी केली असेल असा माझा अंदाज आहे.लेखणी अन् वाणीवर श्रध्दा ठेवून आपल्या सेवेसोबत लेखन-वाचनाचा व्यासंग जोपासत कवी, लेखक, संवादक, सूत्रसंचालक आणि कलाकारी आदी कलांच्या क्षितीजावर आपला वेगळा ठसा समूह सदस्य उमटवित आहेत.
अतिशय आनंदमयी मंगलमयी सोहळ्यात रममाण होताना अतिशय आनंद मिळत गेला.आपलं समजून काम करत राहिलं की कामाचा आनंद मिळत असतो. छोट्या छोट्या प्रसंगांतून बरंच काही शिकायला मिळतं तर काही वेळेला तो प्रसंग आपणाला नकळत शिकवून जातो.खरचं सगळे पुस्तकांवर प्रेम करणारे सरस्वतीच्या प्रांगणातील अक्षरांचे पूजक.आपल्या मनातील भावनांना सर्जनशीलतेने कवितेतून अथवा लेखातून व्यक्त होणारे शब्दप्रभू.पुस्तक परिचयातून एकमेकांशी आभासी पटलावर संवाद साधणारे संवादक जर प्रत्यक्ष भेटले तर किती आनंद होतो.बालपणीचा शाळकरी मित्र भेटल्यावर होतो तसा आनंद होतो. गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी करत हास्याची लकेर उमटवत आनंदाची उधळण होते. तसं आज आनंदाला उधाण आले होते.
स्नेहाचे मित्रत्वाचे नाते दृढमूल होते.आपले पणाने परिचय करून घेतो.विचारांचे आदानप्रदान करत एकमेकांच्या विचारांचा प्रभाव पडत जातो. आपलेपणाची भावना निर्माण होते.
वाचनसाखळी समूहाचा गेल्या साडेतीन वर्षांपासून मी सदस्य असून १०० पुस्तकांचा परिचय सादर केल्या नंतर डिसेंबर २०२१ ला मला वाचनयात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तदनंतर या समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांनी वाचनसाखळी समूहाच्या कार्यकारिणी मंडळात सहसंयोजकपदी एप्रिल २०२२ ला नियुक्ती केली.पुस्तक परिचय आणि पुस्तक परिचय लेखावर अभिप्राय(कमेंट) शेअर करतोय.तर १६ ऑगस्ट२०२१ पासून आजपर्यंत प्रत्येक महिन्याला एकेक अनमोल नवोदित लेखकाचे पुस्तक बक्षिसरुपाने भेट घरपोच मिळतेय. किती अभिनंदनीय कार्य वाचन साखळी करतेय.माझं पुस्तकालय अक्षरसाहित्याने वाढत जातेय.ही सकारात्मक ऊर्जा वैचारिक खाद्य देणाऱ्या व्यक्तींच्या सान्निध्याचा नव्हे काय? खरं तर कार्यकारिणीत असूनही उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल बक्षिस मिळतेय. वाई, बारामती सारख्या तालुक्याच्या गावात वाचनयात्री पुरस्काराचे समारंभ नियोजनबद्ध पद्धतीने साजरा झाले.आजचा पुणे येथील सोहळा तर दिमाखदार अन् मंत्रमुग्ध वातावरणात साजरा झाला.हे उपस्थितांनी आवर्जून सांगितलेल्या अभिमताने लक्षात आले. एका दिमाखदार सोहळ्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली.एकाच कार्यक्रमात स्थळ शोधक,स्टेज डेकोरेटर ,वाटाड्या, निवेदक, स्वयंसेवक, स्वागतक, सेलिब्रिटी आणि निमंत्रक आदी रोल करायला मिळाले …….सद्भाग्य लाभले.एखाद्या कार्यक्रमाचे (इव्हेंन्ट) मॅनेजमेंट कसे करावे याचं प्रात्यक्षिक सादर झाले. म्हणूनच म्हणावे वाटते “सुसंगती सदा घडो,सूजन वाक्य कानी पडो|’.
श्री रविंद्र लटिंगे वाई
अप्रतिम लेखन शैली,
ReplyDeleteअप्रतिम👌👌
ReplyDeleteखूप सुंदर लिहिलेत सर
ReplyDeleteधन्यवाद मित्रहो
ReplyDeleteखूप सुंदर व सविस्तर
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete