निसर्गाच्या सान्निध्यात आनंदीआनंद
निसर्गाच्या सान्निध्यात आनंदी आनंद
कोंढावळे शाळेतील खेळाडूंनी तालुका स्तरावर स्व.यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावली.
*कु.तृप्ती नारायण सावंत १०० मी.धावणे द्वितीय
*विघ्नेश मधूकर कोंढाळकर १००मी.धावणे द्वितीय
*अवधूत लक्ष्मण कोंढाळकर योगासने तृतीय क्रमांक
*१००*४ रिले उपविजेतेपद कर्णधार सिध्देश मधूकर कोंढाळकर आणि कबड्डी,लंगडी,धावणे या स्पर्धेत सहभागी झालेबद्दल या खेळाडूंचे कौतुक शाळेतील सर्व मुलांना सामिष भोजनाची मेजवानी देऊन सेलिब्रेशन केले.यावेळी मुलांनी लोकगीतावर ठेका धरत बहारदार समूह नृत्य सादर करुन धमाल उडवून दिली.त्या परिसर भेटीचे वर्णन....
####################
यावर्षी पाऊसपाणी कमी झाल्याने ओढ्यानाल्यात वाहून गेलेल्या पाण्याच्या धारांचे वण कातळावर ठळक दिसत होते. शिवारात ज्यांच्याकडे पाण्याची सोय त्यांनी खाचरं वलवून गहू,हरभरा हिसकडला होता.कुठं कुठं जमीनीच्यावर डोकं काढलेली रोपं दिसत होती.तर कुठं चार बोटं , वीतभर उंचावलेली रोपं नजरेत भरत होती. काहीच न केलेल्या खाचरात मात्र रान गवतानी हिरवी पिवळीकाळी रंगावली रेखाटली होती.चिबडाची खाचरं येणाऱ्या जाणाऱ्यांना क्षणभर त्याच्याकडे बघायला भाग पाडत होती. इतकी मनमोहक जांभळेहिरवे तुरे मनाला भुरळ घालत होते.जांभळ्या मंजिरीच्या दाट ताटव्यांचे तुरे वाऱ्यावर झोके घेत होते. तुऱ्याचा वरती हिरवा आणि सभोवती जांभळ्या फुलांचा रंग शोभिवंत दिसत होता.त्या फुलांचे फुललेले ताटवे छबीत बध्द करायला हात आसुललेले होते.मस्तपैकी फोटोग्राफी करुन पुढे निघालो.
तांबड्या वाटेने चालताना मुले गप्प बसतील तर शपथ.मुलांचं हसणं खिदळणं चालूच होतं. आपल्या अवतीभोवती काय काय दिसतंय हे बघत पुढे चालत होती. तेवढ्यात एका मुलास एक छोटीशी काडी दिसली. त्यावर आदित्यने लगेच प्रतिक्रिया दिली.”सर,हा सायळीचा चास(काटा) आहे.”मला पहिल्यांदाच बघायला मिळाल्याने मी बारकाईने त्याचे निरीक्षण केले.तर एक बाजू दाभणाएवढी जाड तर दुसरीकडे अणकुचीदार टोक होतं.साधारणपणे अर्ध्या फुटापेक्षा जास्त लांबी होती.काळसर रंग असून त्यावर जवळजवळ दोन पांढरे पट्टे होते.तिथल्याच वाटेत बारकाईने खाली बघितल्यावर आणखी सुईच्या लांबीचे दोनतीन काटे मिळाले.आजच्या देवरुखवाडी शिवार परिसर भेटीत मला नवीन वस्तू बघायला मिळाली. मग आमचा घोळका पुढे सरसावला. चालताना दोन्ही बाजूंच्या झाडोऱ्यातील वाढलेलं गवत लोंबकळून त्याची कमान झाली होती.पण त्याची कुसळं कडेने चालणाऱ्या मुलांच्या कपड्याला चिकटत होती.थोडसं चढून गेल्यावर आमराईतली हिरवीगार आंब्याची झाडं दिसू लागली.मग आमचा मोर्चा तिकडं वळला. अधिरतेनं मुलं झाडाजवळ जाऊन बघत होती. काहीजण शेंड्यापासून खोडापर्यंत झाडं न्याहळत होती.काहीजण ठिबकची माहिती घेत होते.तर काहीजण तिथं पडलेल्या सिमेंट पाईपावर चढले होते तर कुणी आतून येजा करत होते.सर्वांचे एकत्र फोटो काढले.मग बागेविषयी चर्चा केली.जवळच गुराखी जित्राबं चारत होता.एकट्याला कंटाळा येऊ नये. डोंगरदरीत एकट्याला करमून जावं म्हणून छोट्याश्या टेपवरील गाणी ऐकीत चरणाऱ्या गुरांची राखोळी करत होते. तो माझ्या ओळखीचा चेहरा असल्याने त्यांच्याकडून टेप मागून घेतला आणि गाणं लावलं.’बाय नाचती नाचती नाचती मल्हारीसाठी’ मग नाचण्याची आज्ञा करताच सिध्देश ,विघ्नेश या जोडीने आणि अवधूतने ठेका धरुन नाचायला लागली.आणि धमाल उडवून दिली. जिल्ह्याला खेळायला जाणाऱ्या खेळाडूंनी सुरुवात केल्यावर मग इतरांनी आडवे तिडवे हातपाय मारत लोकगीतावर नाचण्याची हौस भागवून घेतली.
तदनंतर पायवाटेवरील वाढलेलं गवत नुकतंच कापून काढलेले दिसत होतं. त्याच गवताच्या वाटेने आमचा चमू डगर चढून शेततळ्याजवळ आला.अर्ध्या भरलेल्या तळ्यातील छोटे मासे बघून हरकली.मग आणखी काय काय तळ्यात असेल हे एकमेकांना सांगू लागली.कुणी खेकडे,तर कुणी कासव, तर कुणी साप असतील असं म्हणू लागले.मग आम्ही तिथून जवळच असणाऱ्या ओढ्यात गेलो.पाण्याची नुसतीच झिरप दिसत होती; पाणी आटायला सुरुवात झाली होती. पण ओबडधोबड दगड मात्र नजरेला पडत होते.तर एखाद्या खोलगट भागात पाण्याने तळ गाठलेला दिसत होता.
तदनंतर आल्यावाटेने आम्ही वनभोजन करायला जेवण बनविलेल्या ठिकाणी निघालो. मुलं तर भरभर धावत सुटली होती.आमच्या अगोदर मुलांची पंगत बसली होती.खास चुलीवर शिजवलेला भात,चवदार रस्सा(चिकन करी), सुक्कं(चिकनमसाला )घरुन आणलेली भाकरी किंवा चपाती आणि शाकाहारी मुलांसाठी श्रीखंड आणि भाजी बेत केला होता.मुलांनी छानपैकी स्वादिष्ट जेवणावर ताव मारला…
अशी आमची परिसर भेट,वनभोजन आणि खेळाडूंच्या विजयाचे सेलिब्रेशन साजरे झाले…
श्री रवींद्रकुमार लटिंगे
Comments
Post a Comment