पुस्तक परिचय क्रमांक: १२८ सत्तांतर
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे
ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१२८
पुस्तकाचे नांव-सत्तांतर
लेखकाचे नांव- व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण जुलै २०२०
पृष्ठे संख्या–६२
वाड़्मय प्रकार-लघु कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--९०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१२८||पुस्तक परिचय
सत्तांतर
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
कथामहर्षी जेष्ठ कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांची 'साहित्य अकादमी'चे पारितोषिक प्राप्त 'सत्तांतर'कादंबरी वेगळ्या धर्तीची आहे.
'संघटित राहण्यासाठी खऱ्या व काल्पनिक अशा शक्तीची धास्ती असावीच लागते.या बीज विचारांचा गाभा असलेली सत्तांतर कादंबरी आहे.'
पक्षी-प्राणी शास्त्रज्ञ तथा अभ्यासक निरीक्षणे नोंदवत असतात. हे अवलिया संवेदना आणि ध्यास जपणारे असतात. रानावनात तासनतास एकाच जागी बसून ते टेहळणी वजा निरीक्षणे करत असतात. कित्येक मैल जंगलातील अनवट वाटा तुडवत निरीक्षणे नोंदवत असतात.त्याच निरीक्षणाचा अभ्यासपूर्ण लेख 'सत्तांतर' या कादंबरीतून आपणास लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी अतिशय बहारदार व यथार्थ शब्दात उलगडून दाखविला आहे.
सत्तांतर कादंबरीत हनुमान लंगूर या वानर जातीतील टोळ्यांचा सत्ता काबीज करण्यासाठीचा संघर्ष मांडलेला आहे.मुडा ,मोगा आणि लालबुड्या हे प्रत्येकजण शेजाशेजारी असून आपोआपल्या टोळीचे नायक आहेत. थोटी, लेकुरवाळी, लांडी, तरणी ,लाजरी, बोकांडी, काणी, जाडी, उनाडी आणि बोथरी अशी वानरींची नांवे आपल्या लक्षात राहतात.अतिशय चपखल शब्दात वानरींचे स्वभाव आणि दिसण्याचे वर्णन नावाप्रमाणेच केले आहे. वाचनाचा आस्वाद घेताना लक्षात राहते. प्रत्येकाचा जंगलातील प्रदेशपट्टा म्हणजे वानर राज्य.त्याभोवतीच्या सीमा,ओढे, फळाफुलांची झाडं, पाणवठे,झोपायची झाडं,ज्याच्या त्याच्या पोरांना लोळण्यासाठीची हिरवळ, चाटण्याची खारमाती….हे त्याचं सर्वस्व होय.
भूपकार करून सतत युद्ध मग्न राहून टोळीतील वानरी, पोरं,तरुण वानरे आणि सगळ्यांच्यावर स्वामीत्व गाजवणारे टोळीचे नायक मुडा,मोगा आणि लालबुड्या.त्यांच्यात वर्चस्वासाठी सतत संघर्ष होतात.'सत्तांतर' मध्ये आरंभापासून अखेरपर्यंत वानरांच्या टोळयांचे सूक्ष्म आणि मार्मिक चित्रण आहे.प्रत्येक टोळीचे जंगलातील क्षेत्र, टोळयांची परस्परांच्या हद्दीत चालणारी घुसखोरी,नरांनरांतले, माद्यामाद्यांतले संघर्ष, सर्व वानरांची जंगलातील हिस्त्र प्राण्यांपासून आणि शिकाऱ्यांपासून स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची धडपड,टोळीचे नायकत्व आणि टोळीतील माद्या मिळविण्यासाठी वानरांना कराव्या लागणाऱ्या हाणामाऱ्या ह्याचे विलक्षण परिणामकारक दर्शन 'सत्तांतर' छोट्याशा कादंबरीत वाचकांना खिळवून ठेवते. उत्कंठावर्धक आणि रोचक कथासूत्र आहे.विशेष म्हणजे या कादंबरीत एकही संवाद नाही. या कादंबरीत लेखकांनी जंगल आणि वानर साम्राज्याचे वर्णनात्मक कथामालिका प्रस्तुती केली आहे.
या कादंबरीच्या मनोगतात शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांनी केलेल्या नोंदीची माहिती दिली आहे.तीचे रसग्रहण करताना आपले कुतूहल आणि उत्सुकता वाढत जाते.प्राणी आणि पक्ष्यांची दुनिया अतिशय सुक्ष्मपणे ओघवत्या शैलीत मांडली आहे.भंडारा जिल्ह्यातील 'नागझिरा'व 'ताडोबा ' अभयारण्यात त्यांनी भटकंती केली आहे. तिथं वास्तव्य करून वानरांबद्दल विस्तृत निरीक्षण लेखकांनी केलेले आहे.पक्षीमित्र व अभ्यासक श्री.मारुती चितमपल्ली यांच्या संगतीने जंगलातील वाटा तुडवत हिंडत फिरणं करत, निरीक्षणे नोंदविली आहेत.माहितीची देवाणघेवाण केली आहे. परदेशी पुस्तके खरेदी करून, वाचून संदर्भ घेऊन सुक्ष्मपणे अभ्यास करून कथेची लेखमालिका तयार केली.
केवळ प्राणिकथा, पंचतंत्र व इसापनीतीकथा न करता वानर जातीतील सत्ता संघर्षाचे रहाटगाडगे हजारो वर्षे फिरत आलेले आहे.हे रसिक वाचकांना माहीत होते.काळाप्रमाणे संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला त्याला खंड असा नसतोच. असलीस; तर भरती असते' पूर असतो. जेव्हा-जेव्हा खाणारी तोंड भरमसाठ वाढतात.गर्दी होते, तेव्हा-तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते,एखादी प्राणीजात धोक्यात येते, बाहेरून परक कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं, तेव्हा संघर्ष उतू जातो.उफाळून येतो. ज्यांना बोलता येतं; ते हा राग, उद्दामपणा, 'संघर्ष' शब्दातून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ, प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला की, शस्त्रास्त्रं वापरली जातात. ज्यांना शस्त्रास्त्रं माहीतच नसतात, ते सुळे, नखं वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.वानर साम्राज्याच्या टोळीच्या नायककत्वाचा सत्तासंघर्ष या कादंबरीत चितारला आहे.
''-आणि आला,आला म्हणेपर्यंत पहिला भीजपाऊस आला. मोठमोठ्या थेंबांनी आभाळातून खाली तिरकस उड्या घेतल्या. झाडांवर,पानांवर,पाचोळ्यावर,पाण्यावर तडातडा थेंब वाजले आणि भराभर त्यांची संख्या वाढत गेली. निवाऱ्याला जाण्याची चालढकल करणारी पाखरं चिवचिवाट करीत झाडाकडं पळाली.तळ्याच्या पाण्यावर पांढऱ्या लाह्या फुटू लागल्या. पावसाच्या धारांनी, तुषारांनी वातावरण धुरकटून गेलं.तहानलेल्या जमिनीनं आकंठ पाणी घेतलं आणि मग पाट वाहू लागले.'
पहिल्या पावसाचं तडाखेबंद वर्णन गारांच्या वर्षावासारखे . जवळ जवळ पंधरा-वीस मिनिटंच असा जोरदार पाऊस कोसळला. झाडंझुडं धुऊन निघाली. जागोजागी खोलगट भागांतून गढूळ पाण्याचे पाट खळाळले, उघडीप झाली. भिजलेल्या पाखरांनी पंख फडफडवून भराऱ्या घेतल्या.'' असं बहारदार वर्णन जंगलातील पावसाचं केले आहे.नेमक्या शब्दांची योजना,वाक्यांची विशिष्ट रचना, गरजेप्रमाणे चित्र रेखाटन आणि पर्यायी पक्ष्यांची विशेषणांची उपमा लावून केलेली वर्णने अफलातून आहेत.जंगलातील वानरटोळींच्या कुटूंबातील वानरी,पोरं आणि नर वानरांच्या घटनाप्रसंगातील करामतींचे अफलातून वर्णन केले आहे. या कादंबरीतील शब्दरचना खरोखरीच रसिक वाचकांना आस्वाद घेताना गारुड करते.
पुस्तक परिचयक: श्री.रविंद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment