कोंढावळे शाळा वर्धापनदिन
कोंढावळे शाळेचा आज ६९वा वर्धापनदिन त्यानिमित्ताने…
१९५४ पासून आजपर्यंत जीवन शिक्षण विद्यामंदिरात शिक्षण घेऊन जीवनात भरारी घेवून संसारात रमलेल्या विद्यार्थी पालकांना आणि ज्ञानकण वेचणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना……आपल्या प्राथमिक शाळेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!🌹
केवढा भाग्यवान सुदिन.आजोबा, मुलगा आणि नातू असं तिनं पिढ्यांचे शैक्षणिक नातं जपणारी आपली प्राथमिक शाळा. आज शाळा ६९ वर्ष पूर्ण करून ७०व्या वर्षात पदार्पण करतेय.
सह्याद्रीच्या महाबळेश्वर आणि रायरेश्वर डोंगररांगेच्या मधोमध असलेल्या कोळेश्वर डोंगररांगेच्या पायथ्याला निसर्ग सौंदर्याने नटलेलं कोंढावळे गाव. तिन्ही बाजूंनी डोंगराचा वळसा तर एका दिशेला साखरनळीचाओढा. शूरवीर संभाजी कावजी कोंढाळकर यांचे ऐतिहासिक गांव.गावचं ग्रामदैवत श्री सालपाई देवी. गावचा प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा आपणाला तिथं दिसणारे वीरगळ,नंदी, पिंड आणि अनेक जुन्या मुर्तींवरुन उमजते. देवालयाच्या सान्निध्यातच गावचे प्राथमिक विद्यालय. शक्तीभक्तीच्या उपासनेचे देवालय तर ज्ञानोपसानेचे विद्यालय. दोन्ही मंदिरे गावच्या संस्कृतीक ऐश्वर्याचे प्रतिबिंब अधोरेखित करतात..
१३ऑक्टोंबर १९५४ साली या शाळेची स्थापना झाली.एकशिक्षकी असणारी शाळा आज बहुशिक्षिकी असून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत आहे.या शाळेतील अनेक विद्यार्थी प्रथितयश व्यावसायिक, व्यापारी , माथाडी कामगार, टॅक्सीचालक, रिक्षाचालक,ट्रक चालक.तसेच विविध कंपनी, कारखाने आणि फर्ममध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. तर काहीजण सेवा देणाऱ्या व्यवसायात नोकरी करत आहेत. चरितार्थासाठी बहुसंख्य नागरिक मुंबई, नवीमुंबई, महाबळेश्वर आणि पुणे येथे उदरनिर्वाहास्तव स्थलांतरित झाले आहेत.पण गावाशी ऋणानुबंध टिकवून आहेत.काहीजण शेतीही पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून करतात.तसं कोंढावळे हे गाव हरिभक्त परायण करणारं गावं.भजनकिर्तनात रममाण होणारं धार्मिक संप्रदायाचे गावं.त्यामुळे या शाळेचे बरेच विद्यार्थी पंचक्रोशीत कीर्तनकार, गायनाचार्य, आणि मृदंगमणी म्हणून लोकप्रिय आहेत. बरेच माळकरी असून पंढरीच्या वारीला नित्यनेमाने जातात.माझे विद्यार्थी गावचे सरपंच होणं; ही तर भाग्याची गोष्ट.विद्यार्थीनी महिला सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस झालेल्या आहेत. कित्येकांनी पदवीधर पर्यंत शिक्षण घेतले असून जीवनरुपी रथाचे सारथ्य यशस्वीपणे करतायत.
मी यापूर्वी १९८९ते १९९९ स्कूलमास्तर ते मुख्याध्यापक आणि २०१८पासून पुन्हा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. १६ वर्ष एकाच गावात सेवा करण्याची संधी साधली.माझ्या विद्यार्थ्यांची मुलं आज माझे विद्यार्थी आहेत.पालकांना आणि त्यांच्या मुलांना अध्ययन अनुभव देण्याची संधी मला मिळाली हे माझे सद्भाग्य. "विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच शैक्षणिक मालमत्ता "याच ध्येय मंत्राने प्रेरणा घेऊन शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सतत आशावादी राहून प्रयत्न करीत आहे.
विद्यार्थीना नवनवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळतेय.शैक्षणिक उपक्रमात अभिव्यक्त होण्याची संधी मिळावी यासाठी अनेक दर्जेदार उपक्रमांची राबवणूक केली जातेय.या शाळेने क्रीडास्पर्धेने तालुका स्तरावर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजेते होऊन जिल्हास्तरावर खेळण्याची संधी मिळाली.तंबाखूमुक्त शाळेचे मानांकन प्राप्त शाळा,बाल आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन, शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात वापर करून अध्ययन अनुभव, ईलर्निंग स्कूल, मुलांच्या शारीरिक विकासासाठी विविध खेळांचे आयोजन, परिसर भेटी, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत तालुकास्तरावर झालेली निवड, प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आदी विविध उपक्रम राबविले जातात.शिष्यवृत्ती स्पर्धात्मक परीक्षात उत्कृष्ट निकालासाठी परिश्रम घेतले जातात… गावच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमात सहभाग घेऊन गावपण जपणारी प्राथमिक शाळा…
आज आपल्या शाळेस ६९वर्षे पुर्ण होतायत या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थ्यांना विनम्र आवाहन करण्यात येते की ,ज्ञान देणाऱ्या तुमच्या विद्यालयास विसरू नका.तिच्या जडणघडणीत आपण तनमनधनाने सहकार्य करावे.आपल्या शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी लोकसहभागातून शाळेचा विकास करण्यासाठी हातभार लावावा….हीच खरी गुरू दक्षिणा असेल.
पुनश्च सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वर्धापनदिना निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!🌹
श्री.रविंद्रकुमार लटिंगे
मुख्याध्यापक कोंढावळे
अप्रतिम शब्दांकन👌👌👍🙏
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete