पुस्तक परिचय क्रमांक:१२६चेस युअर ड्रीम्स




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१२६

पुस्तकाचे नांव-चेस युअर ड्रीम्स 

लेखकाचे नांव- सचिन तेंडुलकर

सहलेखक::बोरिआ मजुमदार

अनुवाद –दीपक कुलकर्णी 

प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०१८/ प्रथमावृत्ती

पृष्ठे संख्या–२३०

वाड़्मय प्रकार- आत्मकथन 

किंमत /स्वागत मूल्य--२९५₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१२६||पुस्तक परिचय

         चेस युअर ड्रीम्स 

लेखक: सचिन तेंडुलकर 

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾


भारतीय क्रिकेट जगताचा दैवत महानायक विक्रमादित्य भारतरत्न सचिन तेंडुलकर,स्वतःच्या क्रिडा जीवनाचं अंतरंग निर्भिडपणे व प्रामाणिकपणे उलगडून दाखविणारा क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू 

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

प्लेईंग इट माय वे या इंग्रजी आवृत्तीची 'चेस युअर ड्रीम्स'मराठीत अनुवादित आवृत्ती.

मास्टर ब्लास्टरच्या आयुष्यातील विलक्षण क्षण खास कॉमिक स्वरुपात तर सचिनचा खास संदेश तुमच्यासाठी!

"तू स्वतःच्या हिमतीवर तुझी स्वप्नं साकार केली पाहिजेस, पण त्यासाठी कोणताही शॉर्टकट वापरु नकोस" पिताश्रींचे विचार आजन्म लक्षात ठेवून सचिन तेंडुलकरने क्रिकेटविश्वात ऐतिहासिक विक्रमशाली निर्विवाद कारकिर्द कशी रचली.आपणास जीवनकहाणी वाचताना पानोपानी दिसून येते.भारताच्या प्रत्येक सामन्यातील सचिनची खेळी म्हणजे जल्लोष ! बहारदार आणि रोमांचकारी कहाणीच वाटावी असा तो ऑल राउंडर कामगिरी बजावणारा महान खेळाडू आहे.  

   वयाच्या सोळाव्या वर्षी,१९८९ साली भारतीय क्रिकेट संघात सचिनची निवड झाली. तब्बल २४ वर्षे २२ यार्डच्या खेळपट्टीशी नातं जोडलं गेलं.जगातील सर्वंच ठिकाणी लाखो चाहत्यांच्या हृदयसिंहासनवर विराजमान होत अनेक अविस्मरणीय खेळी करून संघाला विजय मिळवून दिले. भारताचे नाव रोषण झाले.क्रिकेट जगतात विश्वविख्यात अनभिषिक्त सम्राटपद आपल्या खेळीने मिळविले.अशा महान क्रिकेटरची यशस्वी गौरवगाथा खास त्याच्यात शब्दात रसिक चाहत्यांना आणि क्रिकेटवर मनस्वी प्रेम करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ''प्लेईंग इट माय वे"या इंग्रजी आत्मचरित्राचे मराठी भाषेत अनुवादित सचिन तेंडुलकर ''चेस युअर ड्रीम्स'' यात त्यांची आयुष्यातील क्रिकेट सफर शब्दबध्द व चित्रबद्ध केली आहे.

आपल्या संदेशीय लेखात प्रस्तुत करताना ते म्हणतात की,"क्रिकेटपटू म्हणून मला अतिशय समाधानी व समृद्ध आयुष्य लाभले.माझ्या संघातील खेळाडूंमध्ये व जगभर केलेल्या प्रवासातील विविध अनुभवांमुळे तर ते अधिकच जोशपूर्ण बनलं.

 माझ्या लहानपणापासून ते थेट क्रिकेटमधून निवृत्त होतानाच्या त्या भावपूर्ण दिवसांपर्यंतची माझी सारी जीवनकहाणी उलगडणार आहे. माझ्याआयुष्यात घडलेले चित्तथरारक आणि निराशाजनक प्रसंग,आनंददायक व वेदनादायक घटना आणि विजयाचे व वैफल्याचे क्षण तुम्ही रसग्रहण करताना अनुभवू शकता." मनात बाळगलेली स्वप्नं प्रत्यक्षात साकार होऊ शकतात याचा प्रत्यय मला माझ्या आयुष्यात आलेला आहे.स्वप्नावर श्रध्दा आणि निष्ठा ठेवून त्या स्वप्नाशी असे काही एकरुप होऊन जा,की कोणीही तुम्हाला त्या स्वप्नापासून अलग करु शकणार नाही." इति सचिन तेंडुलकर 

    सचिनचा प्रेरक विचार संदेश,''तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग म्हणजे जणू गोलंदाजाने टाकलेला चेंडू आहे असं समजून त्याला सामोरे जा.काही चेंडू तुम्हाला चालतील,पण बरेचसे चेंडू तुम्ही निश्चितपणे मैदानाबाहेर फटकवाल."माझ्यातील चमक हेरुन मला क्रिकेटपटू म्हणून घडवलं.त्या माझ्या मोठ्या भावाचे अजितचेही प्रामाणिकपणे आभार मानावेसे वाटतात: केवढा हा बंधूप्रति विनम्रपणा आपणास यातून दिसून येतो….

"मी झाडावरुन थेट क्रिकेटच्या मैदानात उतरलो."विक्रमादित्य भारतरत्न महान खेळाडू एकमेवाद्वितीय क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जीवनावरील 'चेस युअर ड्रीम्स' या आत्मकहाणीतील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणारे विधान आहे.क्रिकेट कारकिर्दीत आणि जीवनातील प्रसंगी पाठीशी कायम उभ्या राहिलेल्या लक्षावधी चाहत्यांचे आभार मानणारा कृतज्ञ व विनयशील सचिन. क्रिकेटचा सामना सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजू लागलं की माझ्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहायचे व शरीरात एक विलक्षण चैतन्य सळसळू लागायचं. हाच अनुभव प्रत्येक सामन्याला यायचा. कोट्यावधी चाहत्यांनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.याचे भान मला प्रत्येक वेळी मैदानात पाऊल ठेवताना असायचं.

जाज्वल्य देशप्रेमाचे उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर होय.वरील हृदयस्पर्शी विचार आपल्याला ज्वलंत देशभक्तीची प्रेरणा देतात .क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून ते वयाच्या सोळाव्या वर्षी पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करेपर्यंत फक्त एकाच ध्येयाची आस बाळगून होता.ती म्हणजे भारतीय संघातून मला क्रिकेट खेळायचे आहे. 

     या आत्मकथेत बालपणाचे क्रिकेटच्या सरावाचे किस्से समर्पक शब्दात मांडलेले आहेत.त्यातून युवा खेळाडूंना मोलाचा सल्ला मिळतोय. क्लबच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित झाला.तरीही निराश न होता,तो सातत्याने क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होता.तर शारदाश्रम शाळेतर्फे खेळलेल्या पहिल्या मॅचमध्ये २४धावा काढून तो सामना जिंकला होता.यातूनच नवा धडा गिरवायला मिळाला. "कोणत्याही अनैतिक व अवैध मार्गाचा अवलंब न करता खेळ हा अतिशय प्रामाणिकपणे व निष्ठेने खेळला पाहिजे.'' 

एक संधी म्हणून स्पर्धेचे स्वागत करा. कारण आव्हानात्मक परिस्थितीतच तुम्ही नवनवे प्रयोग करत स्वतःमध्ये सुधारणा करायला शिकता व स्वतःला एका नव्या उंचीवर घेऊन जाता.किती मौलिक सल्ला सचिनने नवखेळाडुंसाठी दिला आहे.

        उन्हाळी सुट्टीच्या सराव शिबीरातील वेळापत्रकानुसार ते सराव करीत असतं. त्यातील फलंदाजीत मनाची एकाग्रता येण्यासाठी एका स्टंपवर १ रुपयाचे नाणे ठेवलेले असायचे. शिबीरातील प्रत्येक गोलंदाज मला चेंडू टाकीत असे.आणि पंधरा मिनिटे झेलबाद अथवा त्रिफळाचित न होता,तो किल्ला जर लढविला तर ते नाणं माझे होत असे.त्यामुळे हीच माझी पहिली कमाई होती.त्यामुळे हे सत्र मला फार आवडायचे.बसमधून किटबॅग घेऊन घरी जाताना होणाऱ्या केविलवाण्या प्रसंगाचे वर्णन वाचताना महान खेळाडू होण्यासाठी अवहेलना सहन करण्याची संवेदना कशी जपावी लागते याचा आदर्श वस्तुपाठ या व्यक्ततेतून समजत जातो. या क्रिकेटच्या कहाणीचा रसास्वाद घेताना घरातील आई वडील भाऊ पत्नी मुले यांचे अनेक किस्से, घटना प्रसंग अतिशय अलवारपणे समर्पक शब्दात मांडलेले आहेत. त्यातून आपणाला मैदानाबाहेरील सचिन तेंडुलकर उमजतात. 

 या क्रिकेटच्या कहाणीत ४१ लेखांमधून त्यांची कारकीर्द रेखाटली आहे.त्यामध्ये चार ठिकाणी सचित्र पृष्ठे कॉमिक्स गोष्टीसारखी कहाणी रेखाटली आहे.समर्पक चित्रांचा समावेश केला आहे.जो क्रिकेट मधील अविस्मरणीय क्षणांची आठवण करून देतात.लेखातील माहितीचे उपप्रकार करून आशयघन उपशीर्षक दिलेली आहेत.

अचूक ठिकाणी समर्पक वेचक वेधक शब्दात सचिनचा मोलाचा सल्ला अधोरेखित केला आहे.तर प्रत्येक लेखाच्या समारोपात ठळकपणे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या विक्रमाची नोंद अधोरेखित केली आहे.प्रत्येक लेखातून सामन्याचा थरार आणि सामन्याचा रिपोर्ताज समजतो. सामना विनिंगसाठीचे नियोजन कसे असते. तसेच सामन्यातील गमतीदार किस्से,खेळीचे योगदान, चाहत्यांचा जल्लोषी सपोर्ट, सामन्याचे गुणात्मक विश्लेषण आणि खेळताना उद्भवलेले आजार आदींची माहिती ही कहाणी वाचताना समजत जाते.

 रमाकांत आचरेकर सरांच्या सराव शिबीरातील किस्से वाचताना तर यातील घटना प्रसंग कधी खट्याळपणा तर कधी हळवेपण दाखवितात. सरांची शिस्तप्रियता सूचित करतात.पुस्तकातील लेखांचे रसग्रहण करताना सचिनने अनेक सामन्यातील खेळीच्या वैशिष्टयपूर्ण घडामोडी, खव्वयेगिरीची तसेच खेळताना त्यांना उद्भवलेल्या शरीराच्या दुखापती आणि त्यावर केलेल्या उपचार पद्धतींची माहिती मिळते.क्रिकेटचे परदेशीय दौरे,कसोटी आणि एकदिवसीय व 20-ट्वेंटी सामने,आयपीएल व विश्वचषक स्पर्धांची संक्षेपाने माहिती रेखाटली आहे.त्यांनी मोडलेली आणि केलेल्या सर्वांगिण रेकॉर्ड ब्रेक कामगिरीची माहिती आपणाला मिळते.सहा विश्वचषक स्पर्धा खेळलेला एकमेव अष्टपैलू खेळाडू.त्यांचे समारोपाचे भाषण तर विनम्रतेने, कृतज्ञतेने भावुक होऊन चाहत्यांनी केलेले हितगुज आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके, वनडे सामन्यात द्विशतक झळकावलेले आहे. "२०० वा कसोटी सामना मी ज्या मुंबईत क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली तिथं व्हावा.अशी माझी इच्छा (एका खेळाडूची) बीसीसीआयने मान्य केली. कारण अतिशय हृदयस्पर्शी आणि गौरवशाली बाब होती.कारण माझी आई  तो सामना बघायला वानखेडे स्टेडियमवर  आली होती."असं प्रतिपादन करणारे सचिन तेंडुलकर.त्यांचं निरोपाचे भाषण तर विनयशीलता आणि कृतज्ञतेने भावुक झालेलं हृदयस्पर्शी भावव्यक्तता होय. 'सचिन ऽऽ सचिन ऽऽ' हा क्रिकेटवेड्या चाहत्यांचा जयघोष कायम माझ्या कानात घुमत राहील.मला यश मिळावं म्हणून प्रार्थना उपवास आणि बरंच काही करणाऱ्या चाहत्यांचा अंत:करणपूर्वक ऋणी राहीन.सचिनच्या सामन्यातील खेळी सारखंच ही युवकांना मौलिक संदेश देणारी,क्रिकेटची जीवन कहाणी उलगडणारी गौरव गाथा आहे.







परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा






Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड