आई माझे दैवत
आई माझं दैवत!
साठवणींचा झोका…..आठवणींचा झरोका… तुझं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं.ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं.आज सर्व काही असण्याची जाणीव आहे.पण आई तू नसणे हीच मोठी उणीव आहे.
माझी आई सौ.यमुनाबाई गणपत लटिंगे. कृष्णा-कोयनेच्या प्रिती संगमावर वसलेल्या कराड नगरीची माहेरवाशीण. सौ. शकुंतला आणि श्री.बापूजी मारुती जठार यांची जेष्ठ कन्या. सन १९६६ साली हायवेपासून तीन किमीवर असलेल्या ओझर्डे गावातील तुकाराम बाळा लटिंगेंची सून झाली.रहातं घर,हातमाग,पानाचीगादी (पानपट्टीचे दुकान) आणि सायकल ही त्यांची त्यावेळची स्थावर व जंगम मालमत्ता.आजोबा दररोज गावोगावी साडीधोतर विक्रीसाठी फिरायचे आणि वडील भुईंज येथील धान्य मार्केटला कामाला जायचे.तर आईकडं घराची जबाबदारी असायची .
आमच्या घरी हातमागाचा सांगाडा होता. त्याचे दसरादिवाळीला पूजन केले जायचे. आजोबा आणि वडिल आम्हाला सांगायचे की,''आपला पारंपरिक व्यवसाय हातमागावर साड्या धोतरं कापड विणणे आणि बाजारच्या गावी जाऊन विक्री करणे."नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करता न आल्याने उद्योग धंदे, व्यापारात मंदी आल्यामुळे वडीलांचे व्यवसाया ऐवजी नोकरी करण्याकडे पावले वळली.
काहीवेळा वडिलांना इतरांच्या शेतातही मोलमजुरी करावी लागली.पाचवड येथील तेलगिरणी, भुईंज येथील धान्य मार्केट व शेवटी वाई मार्केटयार्डवर दिवाणजी म्हणून वयाच्या सत्तर वर्षांपर्यंत खाजगी नोकरी केली.संसाराचा गाडा चालवित राहिले. त्यावेळी आमच्या आजोबांची पानाची गादी सडकेला होती.त्या पानपट्टीत सिगारेटी,बिडीकाडी, तंबाखूच्या पुड्या, चणेफुटाणे गोळ्याबिस्किटे, शेंगदाणे, चिक्की,पानपट्टी आदी मालाची विक्री होई.तुटपुंज्या उत्पन्नाची मदत आणि वडिलांचे मजुरीचे अथवा नोकरीचे पैसे संसाराच्या रहाटगाडग्याला पुरत नसत. शेतकऱ्यांसारखं खातंपोतं सारखंच होत असे.त्यात खाणारी तोंडही वाढत होती. आमची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. गावात आमचं फक्त रहाते घर होतं.वडिलोपार्जित गुंठाभरही शेतीभाती नव्हती.त्यामुळे मुलांना शिक्षण देवून कमविते करणं हेच स्वप्न उराशी बाळगून दोघेजण झटत होते.
मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून आईने कंबर कसली.स्वतःच्या विळ्याखुरप्यावर विश्वास ठेवत दुसऱ्यांच्या शेतात अभिमानाने काबाडकष्ट करत करत आम्हाला लहानाचं मोठं केलं.घरासाठी वडिलांच्या खांद्याला खांदा लावून सतत कष्ट उपसत राहिली.अन् संसारवेल वाढवायला हातभार लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहिली. विशेषत: बाळासाहेब कदमांच्या शेतात तिने सगळ्यात जास्त काम केलं.काही वेळा गावात घरोघरी फिरून कांदेबटाटे व भाजी विकली; शेळी पालन केले.जमाखर्चाचा ताळमेळ बसवून घरखर्च भागविण्यासाठी घरगुती खानावळ सुरू केली.ज्या शिक्षकांची जेवणाची सोय गावात होत नाही अशांसाठी आईने घरगुती खानावळ सुरू केली.ती मी नोकरीला लागून माझा विवाह झाला तरी आईने सुरूच ठेवली होती. चवदार, स्वादिष्ट आणि रुचकर जेवण बनविण्यात तिची खासियत होती.साधेच पण चवदार पदार्थ जेवणात असायचे. त्यामुळे शिक्षकवृंद खुश असायचे.कराडचे सुर्वे सर,मणेराजुरीचे चव्हाण सर,माने सर, पुसेगावचे पैलवान माने सर,आवटे सर अश्या कितीतरी सरांची नावे आईच्या तोंडी सतत येत असत.
तिच्या इतरांना गरजानुरुप मदतीच्या स्वभावगुणामुळेच आमच्या आळीतील आणि नातेवाईकांच्या घरातील लहान- मोठ्या सुखदुःखाच्या कार्यावेळी जेवण बनविण्यासाठी आचाऱ्याला मदत करीत असे.आचारी उपलब्ध झाल्या नसल्यास वेळप्रसंगी स्वत:जेवण बनविण्याचे काम करायची.अन् तेही विनामोबदला.
माहेरच्या माणसांच्या गोतावळ्यात तिला रहायला मनापासून आवडायचे.तिला नेहमी भनीभावंडांच्या संसाराची काळजी वाटायची.दोन बहिणींची लग्नं तर आमच्या दारातच झाली होती.त्यामुळे मीना आणि मालन मावशीवर आईचा फार जीव होता. त्यांच्या मुलामुलींच्या लग्नातही पुढे होऊन कार्य साफल्य केले.सदा गोतावळ्यात रमणारी,पैपाहुण्यांचीओळख असणारी माझी आई होती.एखाद्या सामाजिक समारंभात आमच्या समाजातील अनोळखी माणूस भेटला तरी त्याच्याशी गप्पागोष्टी करुन त्या गावात कोणकोण पाहुणे आहेत.त्यांचे तिच्याशी काय नातं आहे हे ती उलगडून सांगायची.अन् पाहुण्यांना आपलसं करायची.आपल्या सवंग लोकप्रियतेने, बोलक्या स्वभावाने अनेक नातीगोती निर्माण करून ती शेवटपर्यंत जपली होती.
'जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याला द्यावे',या उक्तीप्रमाणे तिने अनेक गोष्टी स्वत:तयार करून इतर अनेक महिलांना त्या शिकवण्यात कधीही हात आखडता घेतला नाही.दोन्ही सुनांना आणि बहिणींना उन्हाळी पदार्थ बनवण्याची रीत मनापासून सांगून तिने तिच्या निग्रहाणीखालीअनेकदा करून घेतली त्यामुळेच सुगरणीचा हा वसा सुना आणि बहिणींनी घरप्रपंच्याला हातभार लावत जपलेला आहे.
ज्या संस्कारक्षम हातांनी बनविलेल्या सकस जेवणाने तृप्तीचा ढेकर मिळून समाधानाचा आत्मनंद होतो.त्या माझ्या माऊलीच्या हाताला अन्नपुर्णा देवीचा वरदहस्त होता का ? असे मला नेहमी वाटायचे.घरातील सगळ्यांनी मसाल्याची वडी(बाकरवडी) आवडीने मनसोक्त खावी तर आईच्याच हातची! इतकी जिभेवर रेंगाळत राहणारी ती अस्सल चव.इतर कोणीही बनवली तरी 'ती' स्वादिष्ट चव जमणारच नाही.
घरगुती तिखट मसाला तयार करून विक्री करणे हा तिचा जनमानसात माऊथ पब्लिसिटीद्वारे लोकप्रिय झालेला तिचा उद्योगधंदा होता.आमच्या घरी साधारणपणे वीस ते पंचवीस वर्ष झाली असतील, ओझर्डे गावातील शेतमजुरी करणाऱ्या अनेक कुटूंबातील लोकं चटणी(तिखट मसाला)विकत घ्यायला येत होती.
ती शेतीत काम करत करत, कितीतरी वेगवेगळी कामे हंगामाप्रमाणे करीत होती. उन्हाळ्याच्या दिवसात कुरडया,खरावडं, पापड,लोणची,शेवया आणि नकुलं तयार करण्याची तिची खासियत होती.ती शेवया पाटीवर वळताना आम्ही त्या ताटात गोलगोल चाळत असू.काही वर्षं तिनं आणि आण्णांनी पानपट्टीही चालविली. त्यामुळेच अन् पान खाण्याच्या सवयीमुळे कदम दादांच्या घरातील लहानगी मुलं पानवाल्या मामी नाहीतर वहिनी म्हणत असत.
रतिबाच्या दुधापासून घरगुती तूप बनवून इतरांना विकणे.अनारसे पीठ बनवणे. अनारसे तयार करणे.लग्नातील रुखवत तयार करणे गौराई पूजनाला विविध पदार्थ घरीच बनविणे.कणकीच्या चिमण्या तर हुबेहूब बनवायची. दिवाळीचा फराळ घरीच बनवायची.आणि इतरांना बनवायला मदत करायची.पुडाची करंजी बनविण्यात तिची वेगळीच खासियत होती.अगदी आजच्या घडीला 'सिग्निचर मेनू' म्हणूया. आमच्या घरी सगळ्यांचा खास प्रिय पदार्थ म्हणजे पुडाची करंजी.खुसखुशीत, खमंग आणि लज्जतदार असायचा.
काळ आणि वेळ कुणासाठी कधी थांबत नाही.कोरोनाने अवघ्या जगाची चाकं वाळूत रुतून बसली.सगळीकडे भयावह परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे आपलं घरटं सोडायचं नाही अशी विपरीत परिस्थिती निर्माण झाली.दोन वर्षाच्या या कोरोनाच्या आपत्तीने अनेक दुर्दैवी रंग दाखविले.हा हा म्हणता जवळची माणसं दूर गेली.लाॅकडाऊनमुळे मानसिक आघात कित्येकांना झाले त्यातच अनेकांचे निधन झाले.अनेकांचा छोटामोठा आजार डोकं वर काढू लागला.अशातच आमच्या मातोश्रीला नागिण हा त्वचारोग झाला.
गावठी,देशी उपचार,आयुर्वेदिक, होमोपॅथिक आणि अॅलोपॅथिक असे सगळे उपचार केले. लवकर बरे वाटत नव्हते.त्यामुळे तिचा पार गळाटा झाला.हाताला सतत दाह होत असल्याने तिनं हात अजिबात हालवला नाही. त्यामुळे हातातील शिरा आखडल्या होत्या. खाणं कमी झालं त्यामुळं अशक्तपणा वाढू लागला, चालण्याचे बळ कमी होत होतं.दोन वर्ष ती अंथरुणाला खिळून राहिली.हळूहळू तिची गंभीर आजाराकडे वाटचाल सुरू असतानाच ती आम्हाला पोरकं करून निघून गेली.आई कुणा म्हणू मी…..
माय म्हणताना होते.नेत्री आसवांची दाटी..
कशी भाकर होऊन.रोज येते माझ्या ताटी...
चरण आईचे हीच पंढरी,हवी कशाला वारी
इथेच माझा विठ्ठल अन् तुच माझी गं रखूमाई
हृदयाच्या मखमली कप्प्यातील अवर्णनीय शब्द 'आई'
जगण्यासाठी दोनहात करण्याचे बाळकडू देणारी'आई'
|||भावपूर्ण शब्दसुमनांजली|||
श्री रविंद्रकुमार गणपत लटिंगे
कृतज्ञतापूर्वक धन्यवाद! दैनिक सकाळ वृत्तसेवा सातारा आणि पत्रकार शिक्षक मित्रवर्य सुनील शेडगे सर.आपण आजच्या साप्ताहिक शब्दांकुर पुरवणीत 'आई माझे दैवत'हा लेख प्रसिद्ध केलात.आदरपुर्वक धन्यवाद!संपादक व संपादन समन्वयक सुनील शेडगे,प्रशांत घाडगे आणि नितीन सोनावणे...
Comments
Post a Comment