गुरुपौर्णिमा उत्सव
गुरुपौर्णिमा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः||
भारतीय संस्कृतीचं देणं आणि श्रद्धेच्या माणुसकीचं देणं म्हणजे गुरुपौर्णिमा.गुरुशिष्य परंपरेचा ऋणानुबंध दृढमूल करणारा अलौकिक उत्सव.सद्गुरु प्रति आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तोच हा दिवस.आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.भारतीय गुरुपरंपरेत गुरु- शिष्यांचा महिमा अगाध आहे. कृष्ण-सुदामा, द्रोणाचार्य- अर्जुन,संत सोपानदेव- संत ज्ञानेश्वर,रमाकांत आचरेकर-सचिन तेंडुलकर अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की,सर्वांचा माथा विनम्र झाल्याशिवाय राहत नाही. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय व वंदनीय मानले आहे. तसेच आपले कर्म करीत असताना आपले कामही कामाचा गुरु असते. सकस विचारांचे समृद्ध भांडार असणारे ग्रंथही आपले गुरू असतात. संत ज्ञानेश्वरांच्या शब्दात ग्रंथ म्हणजे वाग्यज्ञ होय.वैचारिक बळ व विवेकाचा आधार देतात. ग्रंथ हे ज्ञानदाते तपस्वी आहेत याचा अनुभव ग्रंथालयात ग्रंथांचे पारायण करताना येतो.ग्रंथ मानवी मनाला उन्नत करतात, अंतःकरण विशाल करतात, अनुभवाचे अमृत देतात, ज्ञानसंपदा देतात आणि व्यक्तीला आणि समाजालाही निरोगी बनवतात. म्हणूनच ग्रंथकारांकरिता विशेष पसायदान मागतांना संत ज्ञानेश्वर म्हणतात….
"आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये।
दृष्टादृष्टविजये। होआवे जी"।।
“पुस्तकं नसलेलं घर खिडक्या नसलेल्या खोलीप्रमाणे असतं'' असं प्रसिद्ध विचारवंत जॉन रस्किन यांनी म्हटले आहे. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथप्रेम विश्वविख्यात आहे.'समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला या थोर ग्रंथांनीच जवळ केले.मला जगात त्यांच्याइतका परमस्नेही दुसरा कोणीही नाही' या त्यांच्या शब्दातून त्यांचे ग्रंथप्रेम व्यक्त होते. त्यांनी आपल्या ग्रंथासाठी 'राजगृह' या घरातच ग्रंथालय उभारले होते. "जीवनाच्या अभ्यासातूनच ग्रंथ निर्माण होतात" असे साने गुरूजी म्हणत…
"वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शील रक्षकम्।
वार्धक दुःखहरणं हितं सद्ग्रंथ वाचनम्।।
सदासर्वदा ग्रंथ आपणाला मित्रांसारखे गुरुपदी असतात..
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही पुढे चालवू वतन वारसा! जीवन जगण्याचा व्यवहारी मंत्र देणारे गुरु…प्रत्येकाच्या अंगी ललांभूत कलेचे विश्व दडलेले असते.त्या कलांचा आस्वाद घेत व्यासंग करायला लावण्यासाठी कलातपस्वी समुपदेशकाची मार्गदर्शकाची गरज भासते. असा गुरु आपल्याला कलेतील सर्वोच्च कौशल्य आत्मसात करायला शिकवितो. अनेकजण आयुष्यातील दैवत्वाचा प्रसाद लाभावा म्हणून गुरु करतात.गुरुच्या चरणी लीन होऊन, त्यांच्या कृपेने जीवनाचे रहस्य जाणतात.विशेषत: आध्यात्मिक समृद्धीसाठी आणि जीवनात सुखसमाधान लाभावे म्हणून गुरु करतात.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर असतो. त्यांनी दाखविलेला सोपान आपण समजून घेऊन आपली मार्गक्रमणा करत राहतो."आई माझा गुरु, आई कल्पतरू" असे म्हणताना अतिशय आनंद होतो.आपल्या जीवनातील पहिला गुरु म्हणजे आपली आई!!!आई असते श्रावण मासागत सदैव रिमझिमवणारी बरसात करत तप्त जीवनाची दाहकता क्षमवणारी…
पितृ देवो भव: या श्लोकाप्रमाणे आपले पिताश्री आपले गुरू होतात.जीवनाचे तत्त्वज्ञान अनेक घटना प्रसंगांतून आपणाला 'कसे जगावे 'हे पटवून देत असतात.त्यांचे कष्टप्रद जीवनच आपणाला शिकवण देत असते.
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा:||
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः||
गुरुपौर्णिमा
आयुष्याच्या वळणावर
ज्यांनी आम्हा ज्ञान दिले
मनाच्या सद्चिंतनासाठी
सद्गुणांचे विचार पेरले||
विश्वास अन् उमेदीनं
आकांक्षांना बळ दिलं
पाठीवरती थाप टाकून
आम्हां लढायला शिकवलं ||
अनुभवाची शिदोरी देवून
कलाविष्काराची संधी दिली
विश्वासाने आत्मप्रेरणा देवून
नवनिर्मितीची प्रशंसा केली||
निसर्ग आई-वडिल गुरुजी ग्रंथ
सखा,वेळ अन् कामच महागुरु
हेची आपले पथदर्शक सद्गुरु
तयाला मनोभावे वंदन करु||
सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
✍🏻गुरूपौर्णिमा
गुरूविन कोण दाखविल वाट..।
जीवनपट...अवघट हा घाट.।।
आई माझा गुरू .......।
जो जो जयाचा घेतला गुण
तया मी गुरु केले जाण......
जीवनाच्या प्रवासात खडतर प्रसंगी वळणा वळणावर अनेक मार्ग दाखविणारे,प्रेरणा देणारे गुरू भेटतात.
खेळ,क्रीडा,संगीत आदी कला क्षेत्रातील नैपुण्य अनुभव रूपाने देणारे गुरू...।
माझ्या जीवनप्रवासात मला नेहमी अडीअडचणीच्या वेळी मार्गदर्शन करणारे अनेक शिक्षकमित्र, बालमित्र, शिक्षक सहकारी,सवंगडी,अध्यापक,गुरूबंधू, गुरुभगिनी, समवयस्क,आईवडिल,पत्नी आणि माझे बालवाडी ते अध्यापक विद्यालयातील शिक्षक गुरूजी,बाई ,सर या सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा......... साष्टांग नमस्कार व त्रिवार दंडवत.....!!!
ज्ञानकुंभ रिता करुनी अनमोल , प्रेरक ज्ञान दिले.
बोधामृत पाजुनी ज्ञानाचे,आम्हा उपकृत केले
तुम्ही पाठीराखे आमचे सदा तुमचाच आधार
मार्गदशन असू द्यावे नित्य
स्विकारुनी हे...आभार !!!
गुरूने दिला ज्ञानरुपी वसा......
आम्ही चालवू हा पुढे वारसा....
श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई
समर्पक आशय मांडणी👌🙏
ReplyDelete