सृष्टीचे मनभावन सौंदर्य
सृष्टीचे अप्रतिम सौंदर्य.... हिरव्या कोंदणात सजलंय.
चला मनसोक्त झिम्मड पाऊसात ओलंचिंब होऊया..
सह्याद्रीच्या कुशीत अवतीभवतीच्या गडदुर्ग, डोंगरदऱ्या, टेकड्या, प्राचीनतम मंदिरे, घाटमाथे, झरे,धबधबे,ओहळ, ओढे,नद्या, शेतशिवार, घनश्यामल ढगांचे बरसणं, धुक्याचे डोंगराला धूसर करणं आणि हिरव्यागार झाडीवेलीतून डोकावणारी कौलारू घरांची वाडी यांनी मिळून तयार झालेला कॅनव्हास तनमनाला मनमोहित करून अमाप ऊर्जेचा उत्साह निर्माण करतो.हिरव्याच रंगाच्या गडद फिक्कट छटा आणि दरीतून खळखळ वाहणारे शुभ्र दुधाळ जलधारा पाहताना मनस्वी आनंद ओसंडून वाहत जातो.हेच सृष्टीचे साजिरे रुप प्रत्यक्ष पाहताना आनंद गगनात मावेनासा होतो.निसर्गाच्या सहवासात लय भारीच वाटते.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारे गडकिल्ले असोत नाहीतर तृणवेली आणि झाडाझुडुपांनी संभारलेली टेकडी असो अथवा खळखळ वाहणारा पांढरेशुभ्र जलप्रवाह असो. नाहीतर गावाजवळील माळरानं गायरानं अथवा शिवार असो.अशा नयनरम्य स्थळी आपली पाऊलं आपोआप अनवट वाटेने फिरायला उत्सुक होतात.कधी एकदा धबधब्याखाली मनसोक्त शीतल जलधारेत ओलेचिंब होवून गारव्याचा अनुभव घेतोय.ओढ्यातील पांढऱ्याशुभ्र दुधाळ पाण्यात पाय सोडून एखाद्या खडकावर बसून गप्पांची मैफिल रंगवतोय.नाहीतर लालभडक वाटेने वनराई किंवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मनमुराद भटकंती करताना परिसराचे अवलोकन करतोय.अशी उत्सुकतेची अधीरता मनात दाटते आणि मग अशा माहोलमध्ये भेटायला, मित्रांसोबत अथवा कुटूंबासोबत छोटीसी पाऊसात भिजत 'वर्षा सहली'ची आखणी होते.पण अशा सहलीला जाताना हवामानाचा अंदाज घेऊन आणि सर्वांची सुरक्षा सांभाळत आनंद द्विगुणित करणं महत्त्वाचं. कारण गडकिल्ले,धबधबे, घाटमाथे,वनराई आणि डोंगरदऱ्यात पाऊसवाऱ्याची गाणी ऐकायला पर्यटनस्थळी निसर्ग प्रेमी,पर्यटक, फिरस्तींची आणि विशेषतः अमाप उत्साही तरुणाईची गर्दी पाण्यासारखी ओसंडून वाहतेय.निसर्गाचा अनमोल ठेवा जपण्यासाठी सर्वांनी सजगता बाळगणे महत्त्वाचे आहे. निसर्गाचा स्वानंद घेताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणंही आवश्यक आहे.चला तर मग निसर्गातील अस्सल सौंदर्याचा आस्वाद घ्यायला एखाद्या मनपसंत स्थळी भटकंतीचं मनातील प्लॅनिंग प्रत्यक्ष भेटीतून साकारा… पण हवामानाचा अंदाज घेऊनच बरंका…..
Comments
Post a Comment