हसरा नाचरा जरासा लाजरा.....
बालपणीच्या आठवणी
हसऱ्या नाचऱ्या श्रावणी…...
श्रावणात निसर्गाचं हिरवंगार रुप दिसतं. जणू काही सृष्टीने हिरवा भरजरी शालू नेसून सजली आहे.ऊन पावसाचा खेळ अचानक दिसणारं
इंद्रधनुष्य.तसचं शेतशिवार अन् माळरानं हिरवाईने नटलेली असतात.ओहळ,ओढे नद्या तुडुंब भरून वाहत असतात.आमच्या गावच्या चंद्रभागेच्या ओढ्याला ही पूर आलेला असतो.पुलाखालील खडकावरुन दुधाळ पाणी खळाळत उड्या मारत वेगानं पुढं जातं.तोच पाहिलेला पहिला धबधबा…
ओढ्याच्या पुलावरून किंवा काठावरुन बघायला लय मजा वाटायची.अगदी धारेच्या जवळ जावून पांढरेशुभ्र तुषार अंगावर घ्यायला मन अधीर व्हायचं.यथेच्छ सर्वांग ओलंचिंब व्हायचं.शिवारात नवचैतन्य नांदत असतं.शिवारातली पीकं फुलोऱ्यात यायला सुरुवात झालेली असते.धार्मिक व्रतवैकल्ये करण्याचा अग्रणी मास.उपास करुन मन शुध्दीकरण करण्याचा महिना. सणांची नुसती रेलचेल असते.श्रावण महिन्यात बहुतांशी भाविक सोमवार किंवा शनिवार उपवास करतात. नागपंचमी, शिराळशेट,नारळी पौर्णिमा, दहिहंडी, गोपाळकाला,श्री भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव आणि बहिण भावाच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन सोहळा अशा सणउत्सवांची या महिन्यात रेलचेल असते.तर काहींच्या घरी,मंदिरी अथवा वस्तीतील समाजमंदिरात धार्मिक ग्रंथांचे वाचन व निरुपण कार्यक्रम सुरू असत. बालपणी नागपंचमी,श्रावणी अमावस्या ,जिव्हेश्वर जन्मोत्सव आणि दहिहंडी या सणांना लय मजा वाटायची.महत्त्वाचे म्हणजे यातील काही सणांना शाळेला सुट्टी मिळायची. सोनेश्वरला नदीला फिरायला जायला आणि श्री सोनेश्वरी देवाला जायला मिळायचं.
कृष्णा नदीचा खळाळत्या प्रवाहात मनसोक्त पोहायला मिळायचं.तर डोहात चंबू टाकायला मजा यायची.मस्तपैकी मनसोक्त डुंबायचो. दररोज किंवा दर सोमवारी श्री सोनेश्वरला देवदर्शनाला जायचं आणि अमावस्येला भरणाऱ्या छोटेखानी यात्रेचा आनंदानुभव घ्यायचा.
शाळेच्या सहलीसोबत अथवा आळीतल्या सवंगड्यांसोबत तिकडं भटकायची संधी मिळायची..नागपंचमी सण तर समस्त महिलांचा आनंदाचाउत्सव,निसर्गाची पूजा करणारा उत्सव. आदल्या दिवशी मेहंदीची पान वाटून त्यात कायबाय घालून मेंदी तयार केली जायची.काहीजण तर बाजारातील पावडर आणून त्याची मेंदी तयार करायचे आणि तीच रात्री सगळेजण हाताला काडीने लावायचे.ज्यांच्याकडे मेहंदीच्या कोन असायचे ते छानपैकी डिझाईन रेखाटायचे.महिला आणि मुलींची हौसमौज व्हायची त्यांना बांगड्या ,कानातलं,साड्या आणि ड्रेस मिळायचे.मातीच्या नागाची घरोघरी पूजा केली जायची.पूरणाचं किंवा गूळनारळाचे सारण घालून दिंड करत. पूरण पोळीचा बेत घरोघरी असे. गोडधोड खायला मिळायचे..
चल गं सखे वारुळाला, नागोबाला पूजायला, अशी गाणी गात फेर धरून नाचणे आणि झिम्माफुगड्याचा खेळ खेळताना बघायला खूप मजा वाटायची.आळीतल्या सर्व आयाबाया आणि मुलींनी फेर धरलेला असायचा. तर जाणत्या स्त्रिया एकमेकींच्या साथीनं गाणी गायची, तर काहीजणी तालावर फेर धरून नाचायच्या.आम्ही ते बघत बसायचो.
आम्ही मुलं त्या दिवशी मोठ्या दोस्तांच्या संगतीने घराजवळच्या नाहीतर, ओढ्यातल्या झाडांना झोके बांधून आळीपाळीने झोके घ्यायचो. काही वेळा दोघंदोघं झोक्यावर बसून उंच नेण्याचा प्रयत्न करायचे..काही वेळा भीती वाटायची,थरथराट व्हायचा,मग वेग कमी करुन झोके घेत बसायचे. मजाच मजा यायची.मध्येच ऊनपावसाचा खेळ सुरू व्हायचा तर कधी इंद्रधनु पडायचा; अद्भुत अन् कुतूहल वाढविणारे दृश्य असायचे.ते बघत बघत त्यातील रंगछटेची नांव भरभर घ्यायचो.भुकेची आठवण झाली किंवा घरचं कोणीतरी बोलवायला आलं की मग जेवायला घरी पळत सुटायचं पुरणपोळी आणि दिड्यांवर ताव मारत,आमटीचा फुरका मारत भरपेट हादडायचं…. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...
श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा


Comments
Post a Comment