पंगत जेवणाची गंमत मेजवानीची सामिष भोजनाची पंगत
पंगत जेवणाची गंमत मेजवानीची
कंदुरी,जागरण,गोंधळ,देवादिकांच्या जत्रा आणि जावाळ वाढवायचा (काढणे) वेळी सामिष जेवणाची पंगत असायची.बकऱ्याचे उक्कड सुक्के मटण, तर्रीबाज लालभडक पातळ रस्सा,भात आणि शाळूची चुलीवर केलेली कडक पापुड्याची खरपूस भाजलेली भाकरी असा झणझणीत आणि चमचमीत बेत असायचा.जेवताना हमखास कपाळावर घाम यायचाच. पुर्वी तालमीच्या परिसरात सामिष जेवणाच्या पंगती व्हायचा.त्याचीच ही झलक:
तालमीच्या बाहेर अंधुकश्या लाईटच्या बलाच्या नाहीतर गॅसबत्तीच्या उजेडात दोन-तीन ओळींची शंभरसाठ माणसांची पंगत मातीतच धरलेली असायची.जेवायला जाताना पितळी (खोलगट ताट),भाकरी आणि कांदे घेऊन जायला लागायचे.रस्सा वाढणारा बादलीतून आणलेला पातळसर रस्सा ढवळून बास म्हणस्तवर पितळीत दांड्याच्या पातेल्याने ओतायचा. रस्स्याने पार पितळी अर्धी भरायची.मग पितळीला खाली दगडाचं वटकावून लावायचं.त्यानं खाली रस्सा निम्म्या पितळीत अन् वरच्या मोकळ्या जागेत भाकरी ठेवायची.रस्स्यात एकदा दुसरा मटणाचा नळीपुंगळीसारखा मऊ तुकडा घावायचं.तेवढ्यात प्रसाद म्हणून खोबरं आणि शिजलेल्या मटणातील काळीज अन् फुफ्फुसाचे बारीकबारीक केलेलं चिमूटभर तुकडं ताटात टेकवलं जायचं.मग लालभडक तर्री (कट)छोट्या चमच्याने ज्याला पाहिजे त्याला वाढली जायची.त्यामुळे रस्सा लालभडक दिसायचा. तदनंतर मुरब्बी आणि सगळ्यांना ओळखणारा आपला माणुस सुक्कं मटण वाढायला असायचा.तो दोनतीनच तुकडे सारख्याच मापाने प्रत्येकाच्या ताटात टाकायचा. कुणी जादा मागितलं तर, सगळ्यांना पुरवायचं असं म्हणून लगेच पुढं सरकायचा.सगळ्यांना वाढून झाल्यावर मग जेवायला बसायचं.
घरुन नेलेला कांदा बुक्कीने फोडून चारपाच फाकळ्या करायच्या.अर्ध्या लिंबाची फोड कालवणात पिळायची. मग कालवणात थोडी थोडी भाकरी कुस्करून खायची. अधुन मधून पितळी तोंडाला लावून गरमगरम रस्सा फुरकायचा. सुक्क्या मटणाचा आस्वाद घेत खायचं. नळी मिळाली तर तोंडाचा चंबू करून चोखून खायची नाहीतर वढायची. यावेळी नळीतला मगज बाहेर येण्यासाठी काही जण तिला पितळीवर आपटायचे. तेंव्हा आपटताना चुकून निसटून ती खाली नाहीतर शेजाऱ्याच्या ताटात पडायची.चमचमीत रस्सा मात्र सगळे आवडीने घोट घेत प्यायचे. चवदार रस्सा लागायचा.भातवाला कुणाला हवा असल्यास ईचारुन भात वाढायचा.असं मस्तपैकी जेवण व्हायचे.त्या जेवणाची सर आज कितीही स्वादिष्ट मसाले घालून केलेल्या मटणाच्या रस्स्याला येत नाही.गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी…..
क्रमशः भाग-५
फोटो सौजन्य गुगल
Comments
Post a Comment