पंगत जेवणाची गंमत मेजवानीची, हरिनाम सप्ताहातील महाप्रसाद
पंगत जेवणाची गंमत मेजवानीची
हरिनाम सप्ताहातील महाप्रसादाची पंगत…..
पारायण सोहळ्यातील पंगत ही तर महाप्रासादिक पंगत म्हणून भाविकांच्यात अग्रमानांकित आहे. पंचक्रोशीतील भाविक अवघा जनसमुदाय हरिनाम सप्ताहाच्या समारोपाच्या काल्याच्याकिर्तनाला आणि महाप्रसादाला आवर्जून उपस्थित असतात.संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथराज पारायण सोहळ्याची सांगता महाप्रसादाने होते. काही ठिकाणी तर हजारो भाविक भक्तांची सोय केली जाते.काही ठिकाणी ही पंगत दुपारी किंवा रात्रीची आयोजित करतात.त्या भोजनाची गोडीच अवीट असते.
भली मोठी पंगत देवळाच्या पुढे टाकलेल्या मंडपात बसायची.एकाच वेळी चारशेपाचशे माणसं एकदम जेवायला बसलेली असतात. पिंपरणीच्या झाडाखाली शाळेच्या समोर चुलवान काढलेलं असायचं.(चुलवान म्हणजे दहा एक फुटाचा सरळ चर काढलेली जागा)त्यावर तांब्याच्या तपेल्यात भात शिजत असायचा तर दुसऱ्या तपेल्यात आमटी रटरट उकळत असायची.गावातीलच जाणती माणसं आचारी काम करायची.तेंव्हा आजच्या सारखे व्यावसायिक आचारी नव्हते. गावातल्या कार्यक्रमात जे जेवणं बनवायचे तीच दहाबाराजणं भट्टीवर राबायचे. त्यांच्या हाताखाली इतर माणसं कामं करायची.पंगतीत मात्र वाढप्यांची धांदल उडायची. पाचपन्नास वाढपी जेवण वाढायचे. नुसती वाढप्यांची धांदल उडायची..
फणसाची नाहीतर वडाच्या पानाची पत्रावळी(इस्तारी) आणि द्रोण नुकतेच बनविलेली असायची. डालात भरुन आणलेली असायची. तो डाल मध्यभागी ठेवून
पत्रावळ्या भरभर टाकत पोरं सुटायची. त्याच्या मागोमाग द्रोण हातात झेलायचा.मग पात्र स्वच्छ करायला पाणीवाला खाली वाकून ओंजळीने पाण्याचा शितुडा मारायचा.मग पात्र तिरकं करून पाणी निथळेपर्यंत भातवाला पुढ्यात हजर.तो मोठं वाढगं घेऊन एका हाताने कढी धरत दुसऱ्या हाताने बचाकभर भात दोनतीन वेळा सोडायचा.त्याचा ढीगच पत्रावळीवर व्हायचा.मग त्याच्या मागे बादली संभाळत आमटीवाला यायचा.तो झरकन द्रोणात वाढायचा.द्रोण भरुन आमटी खाली ओसंडायची.अन् द्रोण बटाटावांग्याच्या फोडी,मोडाची मटकी आणि चण्यांनी भरायचा.तर लालभडक कालवण(रस्सा) भातावर पसरायचे. मग,'ये, भातावरही घाल आमटी.' असं म्हणल्यावर तो ओगराळे (वाडगं) बादलीत ढवळून भातावर रितं करायचा.मीठ वाढणारं पोरगं कधी गेलं हे पत्रावळीच्या कोपऱ्यात दिसलेल्या पांढऱ्या रंगावरून ओळखायचं. माईकवरुन वाढप्यांनी कसं वाढावं हे पार माईक तोंडाला चिकटवूनच खड्या आवाजात सूचना द्यायचा."वाढप्यांनी एकच ओळ पूर्ण करा,बैजवार वाढा,घाई गडबड करू नका,पण भरभर वाढप उरका.'' चार नंबरला काहीजणांना डाळ मिळाली नाही ते बघा,काही जणांनी फिरतं रहा.आणि वाढणाऱ्यांना सूचना द्या."असं सारखं सांगत सुटायचा.ते कानाव आदळत असतानाच कळीवाला आलेला असायचा.तो पात्रावर जागा शोधूनच बुचूक भरुन कळ्या टाकायचा. कालवलेल्या भातावर त्यातल्या काही पडायच्या.तवर नाम ओढायला द्रोणातच कालवलेले कुंकू घेऊन त्याच्यामागे गंधवाला हजर.अंगठा गंधात बुडवून भरभर नाम ओठीत सुटायचा.तदनंतर सगळ्यांच्या पात्रात जेवण वाढल्याचे कळले की श्लोक म्हणून जेवायला बसायची परवानगी मिळायची.मग उदरभरण सुरू व्हायचं. हात आणि तोंडाची गडबड सुरू व्हायची.कारण सकाळ पासून काहीच खालेल्लं नसायचं. सगळे जेवणावर आडवा हात मारायचे. पुन्हा सगळे वाढपी,'भातऽऽऽ भात, आमटीऽऽऽ आमटी, कळीऽऽऽभाजीऽऽऽ असं म्हणत नेमून दिलेल्या पंगतभर फिरायचे. पाणीवाले हातातला जग आणि प्लॅस्टिकचे ग्लास सांभाळत पाणी वाढायला फिरायचे. ज्याला जे जे पाहिजे ते वाढप्याला हाळी मारुन मागुन घ्यायचे आणि पोटभरून खायचे.हरिनाम सप्ताहातील काल्याच्या किर्तनाचा प्रसाद म्हणून आवडीने खायचे.न्यारीच पंगत बसलेली असायची.
हल्ली काळानुरूप पत्रावळीपासून ते खाण्याच्या पदार्थापर्यंत रुचिनुसार बदल झाला.पत्रावळी आणि द्रोणाची जागा रेडीमेड प्रेस केलेल्या कागद आणि पानांच्या पात्राने घेतली.तर रंगीत प्लॅस्टिकचे ग्लास जावून त्या जागी पारदर्शक ग्लास आले.तसेच पदार्थांच्यातही आमुलाग्र बदल झाले. पनीरची भाजी,पुरी,मसालेदार भात, सांबार (रस्सा) लाडू, गुलाबजाम नाहीतर जिलेबी अश्या पाचीपक्वन्नाच्या मेजवानीचे आयोजन होतंय.तरीपण गावातल्या लोकांनी मनापासून बनविलेल्या जेवणाची सर तेलकट आणि मिठ्ठास जेवणास येत नाही.हल्ली तर एका ऐवजी सातही दिवशी हरिनाम सप्त्यात पंगती आयोजित केलेल्या असतात….
काही गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह मध्ये व्यासपीठ चालक,वाचक,गायक, वादक आणि संयोजक यांना दरदिवशी दुपारीआणि रात्री मान्यवर ग्रामस्थाच्या घरी भोजनाची व्यवस्था पंगतीसारखी केली जाते.
नारायणपूर येथील दत्त जयंतीच्या पंगतीला तोड नाही.हजारो भाविक पंगतीत बसून प्रसादाचा लाभ घेतात. सोनेश्वर ओझर्डे येथील दर सोमवारची अभिषेकानंतरची प्रसादी तर श्रावणी अमावास्येला सोनेश्वर यात्रेची महाप्रसादाची पंगत,भैरवनाथ जयंतीला देवळाच्या प्रांगणातील पंगत,पंढरीच्या वारीला दिंडीमार्गावरील गावोगावी वारकऱ्यांसाठी मांडलेली पंगत,धार्मिक तिर्थक्षेत्रीही मोफत किंवा नाममात्र शुल्कात पंगतीतल्या जेवणाचा आस्वाद घेता येतो..(शिर्डी, अक्कलकोट,गोंदावले) जमीनीवर बसून जेवणाची पंगत आता टेबलखुर्चीवर विराजमान झाली.हल्लीतर बरेचजण हातात प्लेट घेऊन उभ्यानेच गप्पा तोंडी लावत चमच्याने पदार्थांचा आस्वाद घेतात. बुफे स्टाईल जेवणाची पध्दत लोकांच्या अंगवळणी पडत चालली आहे.
क्रमशः ४
Comments
Post a Comment