पुस्तक परिचय क्रमांक:१२० काचवेल
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
१२०||पुस्तक परिचय
काचवेल
लेखक: आनंद यादव
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१२०
पुस्तकाचे नांव–काचवेल
लेखकाचे नांव- आनंद यादव
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण जानेवारी, २०१७
पृष्ठे संख्या--३२४
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र, चौथा खंड
किंमत /स्वागत मूल्य--३२० ₹
"""""""""""""""""""""""""""""""
काचवेल" हे विख्यात साहित्यिक आनंद यादव यांचे आत्मचरित्रात्मक चौथे चरण आहे.हा जीवनपट त्यांनी संत शिरोमणी कैवल्याची संजिवनी श्री ज्ञानदेवांच्या पवित्र चरणी अर्पण केला आहे.
नव्या घरातील सोप्याच्या भुईवर ग्रामीण भागात ' काचवेल'काढण्याची लोकप्रथा आहे.कांकणांच्या काचतुकड्यांनी ही वेल रेखाटली जाते.ही वेल वंशवेलीचंही प्रतीक असते.त्या घराची गृहिणी नकळत स्वत:ला वंशवेल मानते.तिची मुलंही त्या वेलीवरच्या कळ्या,फुलं असतात.जेवढी मुलं,तेवढे तागोरे ती काढते.आईची ही दैवी लोककला पहिल्यांदाच बघत होतो. यथाकाळ माझी सगळी भावंडं त्या वेलीवर रांगली.
विख्यात साहित्यिक प्रा.आनंद यादव यांच्या या आत्मचरित्राचा मुख्य ढाचा म्हणजे 'काचवेल' असल्याचा ते आवर्जून नमूद करतात. झोंबी, नांगरणी आणि घरभिंती या आत्मचरित्राच्या तीन खंडानंतरचा हा चौथा खंड'काचवेल' आहे. वाड्मयीन प्रेरणा, ग्रामीण साहित्य चळवळ आणि लेखनाचा आलेख या पुस्तकात सखोलपणे रेखाटला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि नागरी भागात राहणाऱ्या प्रत्येक जिज्ञासू स्त्रीपुरुषाने आवर्जून वाचून संग्रही ठेवावा.अशा दर्जाची आत्मचरित्राची महती आहे. साक्षीभावाने मूल्यविवेक बाळगून लिहिलेलं हे चरित्र आहे.ते या पुस्तकाविषयी व्यक्त होताना म्हणतात की "मी सोप्यात बसून अभ्यास केला; त्या अभ्यासालाही काचवेलीचा कशिदा मिळाला. पंधरा-सोळा वर्षे ही वेल तिथे पायघडी सारखी पहुडली. तेव्हापासून मी साठ वर्षाच्या आयुष्यात खूप काचा तुकड्या- तुकड्यांनी गोळा केल्या. मला आकर्षक वाटणारे रंगीत तुकडे जपून ठेवले. जागोजागी भेटलेल्या कसबी कासारांनी मला ते प्रेमाने देऊ केले.त्या तुकड्यांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाची वेल सिद्ध झाली.अंतिमतः ही 'काचवेल' आणि तिची भूमी ही मराठी समाजाचं आणि संस्कृतीचं प्रतीकही आहे, असं मला जाणवलं. मी फक्त भारवाही आहे.''
शब्द म्हणजे भावनेला मिळालेला चेहरा.या चौथ्या काचवेल या पुस्तकात १९७५ ते १९९५ या कालखंडातील सुमारे २० वर्षांचा काळ व्यापलेला आहे.लौकिक आणि साहित्यिक व्यक्तिमत्त्वात एकरुपता एकवटून उपजत प्रतिभेचा परमोच्च आविष्कार लिखाणाचे वाचन करताना रसिकांना मंत्रमुग्ध करत राहतो. त्यांची कृतीशील लेखणीतून बहुजन समाजाच्या ग्रामीण आणि नागरी जीवनातील सांस्कृतिक,शैक्षणिक व सामाजिक उत्थानाचा मार्ग अस्सल दस्तऐवज बनलेला आहे.
त्यांनी आपल्या जीवनातील अनुभवांची गाथा शब्दात व्यक्त केलीय.ज्या समाजात मी जन्मलो, ज्या समाजानं माझं संगोपन आणि शिक्षण केलं.नोकरी- भाकरी दिली, माझ्या जीवनाला प्रतिष्ठा दिली त्या समाजाचं ऋणही आपल्या कुवती नुसार फेडणं यास चरित्रकार कर्तव्य मानतात. जे जे अनुभवले.मनाची जी आंदोलनं झाली, व्यक्तिमत्त्वाची जी जडणघडण झाली, परिस्थितीने जी लहान- मोठी आव्हानं उभी केली,त्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे 'काचवेल.'
पंचवीस प्रकरणात २० वर्षाचा जीवनालेख मांडलेला आहे.प्रत्येक सुखदुःखाच्या घटना प्रसंग रसग्रहण करताना काळजाचा ठाव घेतात.इतकी हृदयस्पर्शी भावस्पर्शी भाषाशैली अलवारपणे गुंफलेली आहे. खरोखरीच रसिकांना गारुडी करणारी त्यांची लेखणी आहे.लेखन वास्तव आणि परखडपणे वस्तुस्थिती मांडली आहे. जीवनातील चढ-उतार सुखदुःखाच्या आठवणी वाचताना मन कैकदा विषण्ण होते. अंगावर आलेल्या वावटळांचा धिरोदत्तपणे सामना कसा करावा.या आत्मचरित्रातील बहुतांशी पाठ आपणाला विचारप्रवृत्त करतात.यातुनच त्यांची लेखणाची प्रगल्भता आपणाला दिसून येते.'गावची भाकरी ' हा पाठ तर माणसाने कसं जगावं यांचा वस्तुपाठ घालून देणारा अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे. खेडेगावातील एक प्रथा आहे.घरच्या भाकरीवर पोरं जगत नसली तर'गावची भाकरी'त्याला करुन घातली जाते.ही 'गावची भाकरी' म्हणजे नवस केलेल्या पोराच्या आईने गावातून पाच घरं हिंडून काही दिवस थोडं थोडं धान्य गोळा करून त्याची भाकरी करून त्या पोराला घालायची.घराचा वारसदार म्हणून आपल्या घरासाठी पोरगं जगत नसेल,तशी देवाचीच इच्छा असेल तर हे पोरगं गावासाठी वाढवण्याची जुनी समजूत किंवा रुढ होती.गावाचं अन्न खाऊन जगलेल्या त्या पोरावर गावाचा नैतिक अधिकार असे. गावासाठी त्यानं काही ना काही केलं की तो गावातून मुक्त झाला असं मानलं जातं. शिक्षक,प्राध्यापक,स्नेही, साहित्यिक, समीक्षक या सगळ्यांनी दिलेली गावची भाकरी खाऊन आज मी विश्वासानं उभा आहे.हे जन ऋण परत करण्यातच सार्थकता वाटावी अशी आत्मशक्तीकडं माझी प्रार्थना असते.असा आवर्जून उल्लेख या गोष्टीत अधोरेखित केला आहे.त्या़च्या घरी ज्ञानाचा वारसा नसतानाही 'घेत जाण्याची' वृत्ती जन्माला आली.मग प्रत्येकाकडून अधाशीपणे गोळा केली.आणि तीच सकस होत राहिली. अगदी मर्मबंधातली अनमोल ठेव कायम स्मृतीत रहावी; असं कसदार कथाबीज आहे.नव्या ग्रामीण साहित्यिकांची पिढी घडविण्यासाठी ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर करण्याची संकल्पना आकाराला येऊ लागली.नवेनवे विचार व योजना सुचल्यावर त्या कृतीशील करायला विविध ठिकाणी व्याख्याने द्यायला सुरुवात केली.
'जाणीव-विस्ताराचा काळ'या प्रकरणात ग्रामीण साहित्य चळवळ कशी पसरु लागली याची कहाणी उलगडत जाते.आत्मकथनातील शेवटचा घटक 'काचवेल'या शीर्षकाचा आहे.कागलच्या घराची ओळख अधोरेखित करणारा लेख आहे.
जगण्यासाठी या घराणं काय काय केलं, घरातल्या भावंडांनी खस्ता खाऊन शिक्षण कसं घेतलं. वडिल, आई आणि बहिणींनी अपार घेतलेल्या कष्टाची मेहनतीची आठव काढलेलं पहाताना काळजात घर करत राहते.
लोकप्रिय नामांकित लेखक प्राध्यापक आनंद यादव यांनी अतिशय भावस्पर्शी लेखन या आत्मचरित्रात प्रस्तुत केले आहे.संग्रही असावीत अशी झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल ही चारही पुस्तके मर्मबंधातली अक्षरधनांची अनमोल ठेव आहेत.नक्की आवर्जून वाचा.. शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या कास्तकऱ्याच्या मुलाचा जीवनपट..
सरस्वतीच्या प्रांगणातील विद्वत्तेचे प्रतिक म्हणजे 'काचवेल'आत्मकथन जेष्ठ साहित्यिक आदरणीय आनंद यादव यांच्या लेखणीस मानाचा सलाम!!!!
परिचयक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे वाई
Comments
Post a Comment