पुस्तक परिचय क्रमांक-१०६ आत्मचित्र
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,
वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१०६
पुस्तकाचे नांव--आत्मचित्रे
लेखिकेचे नांव--संजीवनी बोकील
प्रकाशक-सौर पब्लिकेशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती २०२१
वाड़्मय प्रकार--ललितलेख संग्रह
पृष्ठे संख्या-१६८
मूल्य/किंमत--२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚
१०६||पुस्तक परिचय
आत्मचित्रे
लेखिका: संजीवनी बोकील
💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆
आयुष्याच्या प्रवासात विविधांगी अनुभवायला आलेल्या घटना- प्रसंगाचे हृदयाच्या कप्प्यातील स्मरणगंधी आठवणींना लेखणी आणि कुंचल्यातून साकारलेली सशक्त 'आत्मचित्रे' आहेत.या अनुभवसिद्ध कथांत सुंदरशा शब्दात लेखिका व निवेदिका संजीवनी बोकील यांनी गुंफले आहे.हा सुखदुःखाच्या आठवणींचा दर्पण आहे.यातील अनेक अनवटपणे घडलेल्या कथा सहज सुंदर शब्दसाजात गुंफलेल्या आहेत. शाळा,काव्यमैफिल आणि सुत्रसंचलन अशा त्रिकोणी आविष्कारातील आयुष्य 'आत्मचित्र' या पुस्तकातून गुलदस्ता बहारदारपणे शब्दचित्रांनी सजविला आहे.
'आत्मचित्र' हे पुस्तक मला वाचन साखळी समुहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांनी पुस्तक परिचयाला दिलेल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल बक्षिस म्हणून सस्नेह भेट दिलेले आहे.त्यामुळे हे पुस्तक माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे.
या पुस्तकातील भाषाशैली अतिशय उत्युच्च्य दर्जाची असून अनेक नवनवीन शब्दांच्या नजाकतीची नक्षी यातील कथेचे रसग्रहण करताना दिसून येते.ललितरम्य लेख अलवार, सकवार आहेत.त्यांना लालित्याचा स्पर्श आहे. नावाप्रमाणे संजीवनी मंत्रासारखे शब्द एका सुत्रात बांधून शब्दसाजेने नटविलेले आहेत.संवेदनशील हृदयाने आणि वेधक नजरेने टिपलेले अनुभव सिध्दहस्त जादुई लेखणीतून उतरलेले आहेत.त्यातून त्यांचे अद्वितीय पैलू प्रत्येक कथेतून उलगडत जातात.
आत्मचित्राला प्रस्तावना डॉक्टर सिसिलिया कार्व्हालो यांची लाभली असून उत्तम शब्दात ते अनुभवी करांची उकल संक्षेपाने करून देतात.यातील वेचक-वेधक कोटेशनही सुत्रसंचालनासाठी उपयोगी ठरतील.त्यातील आशय मनाला भुरळ घालणारा आहे.
"अंधार भारित रात्रीनंतर येणाऱ्या उगवतीच्या रंगात संजीवनीचे 'आत्मचित्र' झळकत राहाते;आणि तिच्या आत्मरंगांची शिंपण आपल्यावर होत राहते. तिचे हे आत्मचरित्र उठावदार करणारे, अधिकाधिक ललितगद्य प्रतिबिंबित होत राहाते.''
लेखिका या आत्मचित्राचे मनोगत विविधांगी रुपक व प्रतिकांची पेरणी अतिशय प्रतिभावान आणि मार्मिक
शब्दशृंखलेत केली आहे.त्या म्हणतात की, 'माझ्या आतल्या सकार सूर्याला ज्यांनी ऊर्जा बहाल केली.त्या सगळ्यांना आज माझी श्रद्धा अर्पण करते.निबंधाच्या वहीत उत्साहवर्धक शेऱ्यांची मोरपिसे ठेवणारे शिक्षक,छापील शब्दांची मोहजादू दाखवणारे 'बालिकादर्श' ज्यांनी लेखणीत शाई भरली, लिखाणावर उत्कृष्टेचे शिक्के उठविले. त्यांच्यामुळेच मला सकार-आकार मिळाला.' पुढे त्या व्यक्त होतात की,'हे आत्मचरित्र नसून माझ्या आत सशक्त कुंचल्याने रेखाटलेली शब्द चित्रे आहेत.
या आत्मचित्रातील लेखांची आस्वाद घेताना यातील चित्रांच्या साथीने चालताना तुमच्या पदराला जर सोन्या-चांदीचा एखादा कण लागला तर धन्यता वाटेल!!!!
या पुस्तकाच्या अंतरंगात एकूण ३० कथांची पुष्पमालिका केशरी दोऱ्याने गुंफलेली आहे. फुलाप्रमाणेच त्यातील धाग्यालाही अनन्यसाधारण महत्त्व असते याची प्रचिती येते.जगरहाटीत,शाळेत मुलांशी अध्ययन अनुभव देताना नकळत घडलेल्या घटना आणि काव्यमैफिल,समारंभ-सोहळ्यातून, सभा संमेलनातून सुत्रसंचालनाचे महत्त्व यांच्या कथा बहारदारपणे रसदार वर्णनात आणि मौक्तिक शब्दभांडाराने मांडलेल्या आहेत.
मिठ्ठास,गोड, लाघवी आणि मधाळ वाणीने आणि आपल्या जवळील खायच्या मेणूने शत्रुलाही आपलेसे करता येतं. तर अनोळखी माणसाचं मन जिंकून घेता येते.याची उत्तम दाद देणारी कथा 'कोयल मीठे वचनते'आहे. वळणावरचे दिवे,जीवन जगत असताना मनातील व्यासंगांकडे काहीकाळ कानाडोळा करावा लागतो.आपल्या शाळाकरी सख्या करिअरच्या शिखरावर पोहोचलेल्या असताना आपणमात्र पायथ्याशी पोहोचलो नव्हतो.त्याच वेळी घेतलेल्या ध्यासाने आणि जिद्दीने लेखिका एम.ए.आणि बी.एड. परीक्षेच्या सुवर्णपदकावर नाव कोरतात.स्वत: नियोजन करून पहिलेच कविसंमेलन आयोजित करून गाजवून दाखवितात….
मॉडेल लेसनसाठी काय काय दिव्य केले.याची सुरस आणि मिश्किली 'गुरुजींचा हात…. देवाचा हात.'असं सांगणारी कथा आहे.तसेच पहिल्या सूत्रसंचालनाचा किस्सा 'पावनखिंड' अतिशय चपखल समयसूचकता साधून व्यक्त केलं आहे.रसिक श्रोत्यांना आपल्या शब्द आणि वाढीने मंत्रमुग्ध कसं करावं.याची ही उत्तम कथा होय.खरोखर सूत्रसंचालन करणाऱ्या निवेदकांना हे पुस्तक म्हणजे शब्दकुबेराचा खजिनाच होय.
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती!
आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतून निरोप समारंभ प्रसंगाची कथा 'झाले मोकळे आकाश' खरोखरीच अनेकदा वाचाविशी वाटते. आपलाच विद्यार्थी मोठा झाल्यावर आपणास भेटतो आणि आपल्या पायाशी लोळण घेतो. तेंव्हा खरा पुरस्कार प्रदान झाल्याचा आनंदी सुखदक्षण सगळं मळभ दूर करतो.असं सुंदर शब्दांकन या कथेत केलेलं आहे.
चिठ्ठी आई है…..सुंदरशी आठवण काळीज कप्प्यात ठेवण्यासारखी आहे.चिठ्ठ्या परत हाती येतात,तेव्हा त्या फक्त चिठ्ठ्या नसून .भिजलेली काळजे त्यात बांधलेली असतात. उघडताना नाजूक होतात अन्य घडी घालताना जड होतात...त्या चिठ्ठ्या!
ह्दयी येतात भरते रे
करु नये ते परतले रे
त्या भरतीवर धरते अत्तर
तेच युगांतरि तरते रे….
अशा अनेक सुरस, मिश्किली, बहारदार,नवा अनुभव सिध्द करणाऱ्या,इतरांना प्रेरणादायी व संस्कारी स्मरणगंध दरवळत ठेवणाऱ्या आत्मचित्रातील कथा आहेत.
रंगभान नावाची कथा रंगांचे अर्थ व वैशिष्ट्य उठावदार करणारी आहे.सप्तरंगी माहितीआणि ती रंगछटा उलगडून दाखविणारी काव्यमैफिल अप्रतिम कथा!, एकांतात आपलेपणा मिळाल्यावर स्व:ताचा विचार कसा होतो. आपल्याच कॅनव्हासवरील भूमिका कशी मांडलीय याची जाणीव होत रहाते.
जाता जाता पाणी घातलेले झाड,केशरी दाद,आषाढस्य प्रथम दिने...व.पुं.ची खूण,सा सावरणाऱ्या सासूचा, ज्योतीने ज्योत जागवा, अक्षरमैत्र,त्याचे साक्षात्कारी कवडसे आदी कथाचित्रेही रसग्रहणीय आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक धर्मेंद्रशी फोनवरून केलेल्या हितगुजाचा लेख आणि कथाकार वर्पुर्झाकार शब्दांचे जादुगार व.पु. काळे यांच्या समोर सादर केलेल्या कविता.हा क्षण म्हणजे आनंदानुभवच. त्यांच्या कवीता रेकॉर्डिग केल्या होत्या. कवयित्रीची वही घेऊन त्यावर साजेसे चित्र व.पुं.नी रेखाटले होते.अस्सल दाद देवून कलावंतांला श्रीमंत करून टाकणाऱ्या दिलदार व्यक्तिमत्त्वापुढे कविता सादरीकरणाचं परमभाग्य लेखिका संजीवनी बोकील यांना लाभलं होतं.अतिशय सुंदर कथा आहे.
'हे घड्याळ वाळूचे' या कथेत पहाट, सकाळ,दुपार , संध्याकाळ आणि रात्र यांचे वर्णन वाचताना आपण लेखणीला सलामी करतो.इतकं भावार्थ रसदार कसदार प्रतिकात्मक वर्णन केले आहे.
''ज्योत ज्योतीने जागवा
करा प्रकाश सोहळा
इवल्याश्या पणतीने
होई काळोख पांगळा''
या चारोळी ची प्रचिती देणारी जाज्ज्वल्य देशभक्ती आणि स्वकष्टातून खरी कमाई मिळविण्याऱ्या विद्यार्थ्यांचीही कथा परिपाठात मुलांना वाचून दाखविणाऱ्या सारखी आहे.परमवीर चक्र विजेते पै.अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी यांच्यासाठी कृतज्ञता निधी मुलांनी कसा उभारला, दैनिक सकाळ वृत्तसेवेने कशी मदत केली आणि प्रत्यक्ष उत्तरप्रदेशातील धामुपूर येथे निधी कसा सुपूर्द केला याचा प्रवास उलगडून दाखवला आहे.खरच ही कथा शाळकरी मुलांच्यात जाणीव जागृती निर्माण कशी करावी ही सांगणारी आहे. खऱ्या मनाने स्वकष्टाने मिळविलेल्या पैशाचे मूल्य सुर्यप्रकाशाइतकं लखलखीत असतं.
अतिशय उत्तम साहित्यकृतीचा आस्वाद या 'आत्मचित्र' मिळत जातो.शब्दांचे सामर्थ्य आणि खजिना ओथंबून कथांमधून भरलेला आहे.अनेक कथा संस्काराचे संस्करण कसे करावे याचे अनेक दाखले त्यांनी या कथांमधून पेरलेले आहेत. जीवनदृष्टीला बकुळीच्या फुलांचा गंध,अंतरंगात सहज मिसळून जाणारे आत्मरंग,आठवणींचा लख्खपणा अन्य पाण्यावर झळकणारा सूर्रकिरणांचा सोन्याचा वर्ख या आत्मचित्रातून दिसतो.संग्रही असावी अशी सुंदर साहित्यकृती आहे.लेखिका आणि प्रसिद्धी निवेदिका संजीवनी बोकील यांच्या लेखणी आणि वाणीस मनस्वी वंदन!!!!
@ श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक १४एप्रिल २०२२
Comments
Post a Comment