हिरवी पाती काव्यसंग्रह पुस्तक परिचय श्री गणेश तांबे






श्री गणेश तांबे सर फलटण यांनी केलेला पुस्तक परिच
पुस्तक क्रमांक -📗101..🖋️
पुस्तकाचे नाव-हिरवी पाती (कविता संग्रह)
लेखक- रवींद्रकुमार लटींगे
एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे परममित्र रवींद्रकुमार लटिंगे सर यांनी लिहिलेली दोन पुस्तके नुकतीच 13 ऑगस्ट 2021 रोजी प्रकाशित झाली.


त्यामध्ये "पाऊले चालती" हे प्रवास वर्णन हे एक पुस्तक व दुसरे म्हणजे, "हिरवी पाती" हा कवितासंग्रह निसर्गरम्य अशा वाई येथील "मधुरा गार्डन" मध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाला. मधुरा गार्डन म्हणजे अनेक हिरव्यागार वृक्षवेलींनी नटलेलली गर्द वनराईच...

रवींद्रकुमार सरांनी स्वतःच्या आई वडिलांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करणे हे खरोखरच अविस्मरणीय ,प्रेरणादायी कौतुकास्पद उदाहरण तर आहेच आणि असा खूप दुर्मिळ योग आहे,आणि या सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले,ही माझ्यासाठी एक वेगळी पर्वणीच होती. तसेच या काव्यसंग्रहाला माझा शुभ संदेशही आहे. त्यामुळे हा काव्यसंग्रह म्हणजे माझ्या हृदयातील एक कप्पाच असल्याचे मला भासते. तसेच या सुंदर अशा काव्यसंग्रहाला आदरणीय श्री.सुनील शेडगे सर(आप्पा) यांची सुंदर प्रस्तावना लाभलेली आहे. तसेच इतर शुभसंदेश दीपक चिकणे साहेब, सचिन गोसावी सर, दीपक भुजबळ सर, स्वाती पाखरे मॅडम, गणेश शेंडे इत्यादींचे अत्यंत सुंदर व समर्पक अशा शब्दात "हिरवी पाती" या काव्यसंग्रहाविषयी थोडक्यात व्यक्त  झालेचे दिसून येते.

मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ दोन्ही ही हिरवेगार निसर्गरम्य आणि कविता संग्रहाला साजेसे असे खूप आकर्षक आहेत.याची डिझाईन श्री.नितीन जठार यांनी सुंदर बनवली आहे.

 काव्यसंग्रहातील "अर्पण पत्रिका" ही मनाला खूप भावते.यामध्ये ज्यांनी पायात बळ, हातात कला, मनात जिद्द आणि हृदयात संवेदना संस्कारित करून आयुष्यात सुखासमाधानाने आनंदाने राहण्याची उभारी दिली. ते रवींद्रकुमार सरांची आई यमुना गणपत लटिंगे आणि पिताश्री श्री. गणपत तुकाराम लटिंगे यांच्या पवित्र चरणी त्यांनी तो कवितासंग्रह सस्नेह अर्पण केला आहे.

"हिरवी पाती" या काव्यसंग्रहा मध्ये एकूण 57 कविता आहेत. परंतु सरांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयावर 200 हून अधिक कविता लिहिलेल्या आहेत. कोणताही विषय, कोणतेही चित्र,प्रसंग  डोळ्यासमोर आले की अवघ्या काही मिनिटातच कविता निर्माण करण्याची हातोटी सरांना लाभलेली आहे.

"हिरवी पाती" या काव्यसंग्रहामध्ये निसर्गाचे आणि माणसाचे अतूट नातं कशाप्रकारचे असते.हे अत्यंत सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे.

"निसर्गातील रानमेवा"
या कवितांमध्ये आपण ज्याप्रमाणे मधमाशांनी बनवलेले मधाचे आयते पोळे आपण मनापासून खात असतो. तसेच या निसर्गामध्ये अनेक रानमेवा उपजत आपल्याला मिळत असल्याचे या ठिकाणी वर्णन केलेले आहे.

"पावसाळा"(कोंढावळे)
हि कविता त्यांच्या शालेय गावातील परिसरावर आधारित कविता आहे, योगायोगाने कालच त्या शाळेवर जाण्याचा योग आला. अतिशय सुंदर,निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली शाळा आणि त्या परिसराचे वर्णन खूप काही सांगून जाते.

नभी मेघ दाटून आले
       कुंद वातावरण दाटले 
रिमझिम बरसात सुरू झाली      
      निसर्गाची भुरळ पडू लागली.

"वासोटा"
वासोटा या किल्ल्याचे वर्णन या कवितेमध्ये अतिशय सुंदररित्या केले आहे. सह्याद्रीच्या उंच कड्या, डोंगररांगाच्या कुशीत, घनदाट वनात अनेक वृक्षांच्या सानिध्यात असलेला हा वासोटा किल्ला आणि निळाभोर नितळ शिवसागर. नावेतून होणारा प्रवास आणि त्यानंतर किल्ल्यावर जाणारी अवघड वाट हे सर्व वर्णन ऐकल्यानंतर प्रत्यक्ष किल्ल्यावर गेल्याचा भास होतो.

सह्याद्रीच्या उंच कड्यात 
         डोंगर रांगेच्या कुशीत
 घनदाट निभीड वनात 
       वृक्षवेलींच्या बाहुपाशात

"कास पठार"
या कवितेमध्ये सातारा जिल्ह्यातील असणारे हे 
"कास पठार" अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारे एक ठिकाण.हिरवेगार रम्य परिसर, असंख्य वेगवेगळ्या रूपाची फुले.जणू अवकाशातील स्वर्गच जमिनीवर उवतरला असल्याची अनुभूती या ठिकाणी मिळते.

हिरवाई शालू
    मखमली दुलई
 धवल गुलाबी
      नक्षी गोलाई
 कास पठार सौंदर्याची खाण 
फुला फुलांची दिमाखदार शान.

"आठवणीतील पाऊस"
ज्याप्रमाणे आठवणीतील प्रवास, आठवणीतील नौकाविहार, आठवणीतील सहल त्याचप्रमाणे आठवणीतील पाऊस हा त्यांच्या शालेय परिसरातील आकाशातून कशाप्रकारे कोसळत असतो आणि अवघी धरती हिरवीगार अन् ओलीचिंब करून जाते. याचे अतिशय मनमोहक आणि सुंदर असे वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. तसेच "प्रवासातला पाऊस"ही कविता अतिशय सुंदररित्या वर्णन केली आहे.

"मायेची बाग"
काव्यसंग्रहातील 53 नंबरची ही कविता आपल्या घरच्या रानातील डाळिंब बागेचे चित्र व त्यामध्ये असणारे माझ्या आईचे चित्र असा एक माझ्या व्हाट्सअप वर असणारा फोटो त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांच्यातील कवी मन जागे झाले.आणि सुंदर अशी काव्यरचना त्यांनी या ठिकाणी लिहिली त्यातील काही ओळी....

मायेची पाखरं
      कष्टाची भाकर 
घामानं शिंपले 
         बागेचे मखर 
हिरव्यागार छटेची 
         झाडं डवरली 
लालभडक रंगाची
           फळे बहरली.......

अशा अनेक सुंदर रचना आपणास प्रत्येक ठिकाणी या काव्यसंग्रहात आपणास दिसून येतात.

" हिरवी पाती" हा काव्यसंग्रह एक उत्तम कवितांचा संग्रह असल्याचे आपणास दिसून येते. ऐन उन्हाळ्यात ही मनामध्ये गारवा व ओलावा निर्माण करणाऱ्या या सर्व कविता आहेत.आणि या संपूर्ण कविता लॉकडाउनच्या काळात लिहीत असल्यामुळे व ते फेसबुकच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचल्यामुळे ऐन उन्हाळ्यातही सर्व वातावरण हिरवेगार होत असे.

मलपृष्ठावर असणारी आणि मनाला भुरळ घालणारी अन् निसर्गसौंदर्यची सुंदर अशी एक काव्यरचना आहे. ती अशी....
काजळी आकाश 
      विरळ प्रकाश
 निळसर पाणी 
          झाडोरा रानी l
 लाल माती
        हिरवी पाती 
फुलांच्या वाती
        निसर्ग नाती l
रिमझिम बरसती
      सरीवर नाचती 
भटकू धरणकाठी
          घुमूया रानवाटी l
सृष्टीने रूप धारीयले 
        ते नयनांनी हेरले 
मनमुरादपणे पाहिले 
           मनातन पाझरले l 
शब्दक्षरांनी रचले 
        कागदावर उमटले 
कडव्यात बद्ध झाले
        काव्य पुष्पात गुंफले l

अशाप्रकारे "हिरवी पाती" हा अतिशय सुंदर असा 
काव्य निर्मितीचा उत्तम आणि देखणा असा नमुना आहे.आपण सर्वांनी हा काव्यसंग्रह आवश्य वाचावा व आपल्या संग्रही ठेवावा. 
लेखक- श्री.रवींद्रकुमार लटिंगे 
प्राथमिक शिक्षक
 मु.पो.ओझर्डे ता- वाई जि-सातारा
 मो.नंबर 7083193411
             8605460207
पृष्ठसंख्या-72
 मूल्य-111 
अभिप्राय शब्दांकन-
           सिंधुसूत...🖋️
ganeshprem83@gmail.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड