पुस्तक परिचय क्रमांक:२९८ कर्माचा सिद्धांत
२९८ ||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -कर्माचा सिध्दांत
लेखक: हीराभाई ठाकूर
अनुवादक -बळवंत शंकर काशीकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२९८
पुस्तकाचे नांव-कर्माचा सिध्दांत
लेखक:हीराभाई ठाकूर
अनुवादक-बळवंत शंकर काशीकर
प्रकाशन-कुसुम प्रकाशन, अहमदाबाद
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मार्च२०१८
बेचाळीसावी आवृत्ती
पृष्ठे संख्या–१०२
वाड़्मय प्रकार-वैचारिक
किंमत /स्वागत मूल्य-८०₹
”””””””””””””””””””””””””””””””””””
सर्वेपि सुखिन:सन्तु|सर्वे संन्तु निरामया:||
सर्वे भद्राणि पश्यन्तु|मा कश्चित् दु:खमाप्नुयात्||
करण्यांत चि तुझा भाग तो फळांत नसों कधी
नको कर्म-फळीं हेतु अकर्मी वासना नको
Theory Of Karma
कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग ही भारतीय विचारदर्शनाची मोलाची देणगी भारताच्या प्राचीन काळापासून असंख्य विचारवंतांनी यावर अनेक ग्रंथ पुस्तके प्रकाशित केली आहेत.स्वामी विवेकानंदांची भाषणे तर विचारांची शिदोरी ज्ञानामृतासारखी आहेत. याचप्रमाणे सिद्धहस्त व्याख्यानकार ‘कर्माचा सिध्दांत’या पुस्तकाचे लेखक व निर्माते हीराभाई ठाकूर यांनी अतिशय सहज सुंदर शैलीत आणि छोट्या छोट्या उदाहरणे व दाखल्यातून समजावून दिला आहे.अतिशय अवघड तात्त्विक विषय सुलभतेने समजावून दिला आहे.या मूळ गुजराती पुस्तकाचा अनुवाद बळवंत शंकर काशीकर यांनी मराठीत ओजस्वी शैलीत मांडला आहे.
भारतीय संस्कृतीने वेद, उपनिषदे,पुराणे, भगवद्गीता, रामायण आणि महाभारत या ग्रंथातील गूढ तत्वज्ञान चिऊ-काऊच्या गोष्टी आजीआजोबा ज्याप्रमाणे आपल्या भाषेत ममत्वेने सांगतात त्याचप्रमाणे सोप्या भाषेत रसाळपणे प्रवचनातून सांगितलेल्या गोष्टींने अनुवादक प्रभावित झाले.आणि ही पुस्तकरुपी अनुवादाची नौका अतिशय समर्पक शब्दांत शब्दबध्द केली आहे.ती म्हणजे ‘कर्माचा सिद्धांत.’
या पुस्तकाच्या लक्षावधी प्रती वितरीत झाल्या आहेत.या पुस्तकाला पुरुषोत्तम गणेश मावळंकर यांची प्रस्तावना लाभली असून या लेखनाचा जीवनपट त्यांनी समर्पक शब्दात प्रस्तावित केला आहे. पुस्तकाचा महत्त्वाचा आशय अधोरेखित करणारी प्रस्तावना आहे.
‘कर्माचा सिध्दांत'या पुस्तकाचे मुख्य लेखक यांनी देशपरदेशात अनेक ठिकाणी अध्यात्मिक प्रवचनपर व्याख्याने दिली आहेत. विनोद प्रचुर शैली,रसाळ वाणीत सामान्य संसारी माणसांना कर्माचा सिद्धांत पटवून दिला आहे.या पुस्तकात एकंदर एक्केचाळीस लेख समाविष्ट केले आहेत.
त्यांच्या प्रवचनाचा मुख्य विषय “कर्म सिध्दांत” Theory Of Karma. समर्पक शब्दात त्यांचे छोटेखानी लेख अवघड व तात्त्विक जीवन कर्माचा आशय उलगडून दाखवतात.आपण दैनंदिन जीवना कसं जगावं?कसं रहावं?कोणते नित्यकर्म योग्य अयोग्य आहे याचे विवेचन आणि विश्लेषण निरुपमात केलेले आहे.धर्म आणि मोक्ष प्राप्तीसाठी माणसाने पुरुषार्थ (प्रयत्न)करावे.पण आपले प्रारब्ध सोडू नये.
सुख-दु:खाचा कोणी न दाता |
दुसरा देतो ही कुबुद्धि रेखा |
‘मी’करतो हा वृथाभिमान |
स्वकर्म -सूत्रे गुंफिले सर्व जन ||
या उक्तीप्रमाणे आपण विचार मंथन केले पाहिजे.कर्माचा सिध्दांत आपण आचरणात आणणे हेच सगळ्यात महत्वाचे आहे.कर्मानुबंध व ऋणानुबंध आपणास चिकटलेले आहेत.जीवनाच्या अखेरपर्यंत आपणास कार्यरत रहावे लागते.गीतेतील महत्त्वाच्या वचनाप्रमाणे
फळाची अपेक्षा न बाळगता कर्मे करत राहणे.वैचारिक तत्वज्ञान अतिशय सहज सुंदर शब्दात अनुवादित केलेले आहे. अध्यात्मिक वाचक रसिकांनी आवर्जून रसग्रहण करावे असे ‘कर्माचा सिध्दांत' हे पुस्तक आहे.माझे समाजशिक्षक मित्र श्री दीपक भुजबळ सरांनी सेवापुर्तीच्या समयी घरभेटीत हे पुस्तक दिले होते.
आस्वादक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक -११ नोव्हेंबर २०२६

Comments
Post a Comment