पुस्तक परिचय क्रमांक:२९७ डोळस भटकंती





२९७ ||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -डोळस भटकंती 
लेखक: प्र.के.घाणेकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२९७
पुस्तकाचे नांव-डोळस भटकंती 
लेखक:प्र.के.घाणेकर
प्रकाशन-स्नेहल प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२००८
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–२२३
वाड़्मय प्रकार-प्रवासवर्णन
किंमत /स्वागत मूल्य-२२५₹
”””””””””””””””””””””””””””””””””””
        डोळस भटकंती 
एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर त्या ठिकाणी काय बघावं, कसं पहावं?
हिंडायला- फिरायला आपण सगळेच जातो.पण अशा भटकंतीत नीट लक्ष देऊन बारकाईने पाहिले तर आपणाला वेगळीच अनुभूती घेता येते.
अनुभवांची गाठोडी बांधूनी|
काही कडू, काही गोड आठवणी||
जपल्या मी माझ्या मनी|
अशी ही भटकंतीची कहाणी||
-प्रा.प्र.के.घाणेकर
“उघडे डोळे आणि चालणारे पाय लाभलेल्या” प्रा.प्र.के.घाणेकर यांनी केलेल्या भ्रमंतीत पाहिलेल्या,बघितलेल्या, अनुभवलेल्या ठिकाणांची वैविध्यपूर्ण माहिती आपणा सर्वांसाठी ‘डोळस भटकंती’या अक्षरधनात शब्दबध्द केल्या आहेत.त्यांनी निसर्गसौंदर्याच्या नवलाईच्या अक्षरचित्रांचा सुवर्णमहोत्सव साजरा करुन हे अक्षरधन पर्यटकांसाठी खुले केले आहे.
 केल्याने देशाटन या उक्तीप्रमाणे आपण निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करणाना दृश्ये डोळे भरूनपाहून, दृश्याला छबीत बध्द केले पाहिजे.तेथील शिल्प,माहिती फलकांचे वाचन केले पाहिजे. म्हणजेच आपल्या भ्रमंतीची दर्शनाबरोबरच ज्ञानयात्रा झाली पाहिजे.
  आपल्या भटकंतीत आपण छंद लावून घेतला पाहिजे.डोंगर, समुद्र, नद्या,ओहळ, रानेवने,वृक्ष,वेली, झाडेझुडपे,रानफुले,कीटक,प्राणी,पक्षी,हवा,ढग,चांदण्या,खडक,माती अशा अनेक गोष्टी आपल्या भवताली आहेत.यांचा संशोधनपर अभ्यास त्या त्या अभ्यासकांनी केलेला असतो.नोंदी ठेवलेल्या असतात पण ही माहिती आपल्या मराठीत असणं आवश्यक आहे. कारण इतरांनाही भटकंती करताना या माहितीची शिदोरी उपयोगी पडेल.ज्ञानात आणखी भर पडेल.नवीन ठिकाणी भेट देऊन अनुभूती घेता येईल.समाधान आणि आनंद उपभोगत चाकोरीबद्ध आयुष्याच्या रहाटगाडग्यातून विरंगुळा मिळेल अन् तनमन प्रफुल्लित होईल.
 आकर्षक आणि देखण्या मुखपृष्ठाचे कव्हरपेज ‘रिपोर्ताज’सारखे पुस्तक चाळायला मोहिनी घातलं इतकं अप्रतिम आहे.तर मलपृष्ठावर प्रवासवर्णनाचा आशय अधोरेखित करणारा ‘ब्लर्ब’ वाचल्याशिवाय आपण पुस्तकाची पाने चाळायला सुरुवातच करत नाही.इतकं समर्पक आहे.
घरबसल्या आपणास एकशे बासष्ठ लेखातून भारतातील नवलाईने नटलेल्या निसर्गरम्य क्षेत्रांची भेट घडवून आणणारं हे पुस्तक आहे.तसेच आपण कोणतही पान उघडून वाचायला सुरुवात केली तर कंटाळा येणार नाही.‘वपुर्झा’सारखी या प्रवासवर्णनातील लेखांची खासियत आहे.
समर्पक ठिकाणी समर्पक शब्दपंक्ती, लेखकाच्या नजरेतून बघितलेलं अन् कॅमेऱ्याने टिपलेली कृष्णधवल व रंगीत प्रकाशचित्रे यातील लेखांचा वास्तवपणा आपल्या मनावर ठसवितात.सहज सुंदर आणि रसाळ लेखन शैली आपणास मंत्रमुग्ध करते.इतकं सुंदर वर्णन केले आहे. त्यांच्या लेखणीतून अनेक नवनव्या शब्दांची शिदोरी तर मिळतेच पण त्याचबरोबर त्या ठिकाणांची वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण ओळख अधोरेखित होते.आपणही अशा ठिकाणी भेट देण्यासाठी मनात नियोजन सुरू होतं. इतकं समर्पक शब्दात वर्णन केले आहे. भेटीला जाण्यासाठी पुर्वतयारी करायला हे पुस्तक वाटाड्या सारखं मार्ग दाखवायला आणि भटकंती करणाऱ्या पर्यटकांना दीपस्तंभ ठरेल असं मला वाटतं.तसेच लेखकांची अनुभवश्रीमंती हरेक लेखातून ओसंडून वाहत रहाते.कारण यातील आपणही स्थळे पाहिली असतील पण लेखकाच्या नजरेतून बघितलेलं ठिकाणं आपल्या ज्ञानात भर घालून अरेरे,आपलं हे तिथं बघायचं राहिलं.याची हुरहुर मनात निर्माण होते. भारतातील गडकिल्ले, गिरीपर्वत, डोंगरदऱ्या,सागरतट, नद्या ओहळ,प्रार्थनास्थळे आणि ऐतिहासिक वास्तू यांना भेटी देण्यापूर्वी ‘गाईड’ म्हणून अनमोल ठेवा आहे. भटकंती करणाऱ्या पर्यटकांनी आवर्जून वाचावे असे ‘डोळस भटकंती'हे प्रवासवर्णन आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई 
लेखन दिनांक-६नोव्हेंबर २०२६




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी-- सोंगे

कविता आनंदाची शाळा

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे