पुस्तक परिचय क्रमांक:१५९त्या तरुस्थळी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१५९
पुस्तकाचे नांव-त्या तरुतळी
लेखकाचे नांव-डॉ.अश्विनी देहाडराय
प्रकाशक-साहित्य प्रसार केंद्र, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- मे २०२० प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१३०
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य--१७५₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१५९||पुस्तक परिचय
त्या तरुतळी
लेखक: डॉ.अश्विनी देहाडराय
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचा आस्वाद “त्या तरुतळी”या पुस्तकात गुंफला आहे.
मराठी साहित्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारे वनभटकंतीकार तथा लेखक मारुती चितमपल्ली आहेत. अरण्यलिपीतील पशुपक्षी, वृक्षवेली,वने, कीटक,मधमाश्या,भुंगे,सर्पसृष्टीचे आणि अनवटवाटांची वर्णने अफलातून असतात. त्यांचे लेखन वाचताना वाचकाला जंगल सफारी घडते.जीवनाच्या रुळलेल्या वाटा सोडून स्वतःची वेगळी तेजस्वी पायवाट निर्माण करणारे वनाधिकारी. निसर्गसृष्टीत आयुष्य खुलवलेले भटकंतीकार आणि निसर्गसौंदर्याचा आस्वाद लेखणीतून उतरवणारे लेखक मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचा आस्वाद डॉ.तथा लेखिका अश्विनी देहाडराय यांनी या साहित्य कृतीत जंगलातल्या वृक्षाच्या सदाबहारित पानेफुले अन् फळांच्या रंगीबेरंगी रांगोळीतून साकारलेली शब्दाकृती आहे.
मुखपृष्ठावर अरण्ययात्री तथा लेखक मारुती चितमपल्ली यांच्या लोकप्रिय साहित्यकृतींची नांवे आणि निरीक्षण करतानाची छबी उठावदार दिसते.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्राचार्य विजय देशपांडे यांनी मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचा आस्वाद लेखिकेने स्वत:घ्या दृष्टिकोनातून घेतला आहे.हे नमूद केले आहे.वाचकाशी संवादसेतू समर्पक आणि यथार्थ शब्दांत साधला आहे.
मनोगतात लेखिका डॉ.अश्विनी देहाडराय यांनी या पुस्तकाचा उद्देश सांगितला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले जंगल त्याच्या दर्शनाने तनमनाला आनंद देते. मानव जंगलाच्या कुशीत रममाण होतो. भारतातील संतांनी,ऋषिमुनींनी आणि साहित्यिकांनी संकिर्तन,प्रवचन, कथा, काव्य गोष्टीतून निसर्गविचाराचे दर्शन घडविले आहे.
मारुती चितमपल्ली यांचे वाड्मयीन व्यक्तिमत्व, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, प्राणिजगत,पक्षी जाय…, सर्पसृष्टी आणि कृमी-कीटक, सहवास निसर्गाचा आणि समारोप असे अनुक्रमणनिय लेख आहेत.
लेखात प्रसंगानुरूप सुभाषिते,काव्ये आणि कोटस् यांच्या समावेश केल्याने लेखनाची अभिरुची वाढते.साधी सोपी लेखनशैली आणि उपमाप्रधान शब्दभांडार पेरल्याने लेख वाचनीय आहेत.
लेखकाचे बालपण ते वनाधिकारी प्रवास, साहित्य क्षेत्रात पडलेल्या पाऊलखुणांचाआलेख रेखाटला आहे.त्यांचे जंगल निरीक्षण करतानाचे स्वानुभव आणि अरण्यविद्या साध्य करताना भेटलेल्या अम्मा, आत्या, आणि लिंबामामाला त्यांनी गुरू मानले आहे.पक्षी निरीक्षक डॉ.सलीम अली यांच्या सोबतीने भटकंतीत केलेल्या निरीक्षणामुळे प्रगल्भता आल्याचे ते आवर्जून नमूद करतात.सबंध नोकरीच्या कार्यकाळात अरण्ययात्रा त्यांनी केल्यामुळे त्यांना वनमहर्षि,पक्षिवेडा,वनऋषी अशी बिरुदावली चिकटवून त्यांना सन्मानित केले आहे.पाहिलेले,अनुभवलेले प्रसंग, गोष्टी त्यांनी लेखात समाविष्ट करून साहित्यकृतीत गुंफले आहे.निसर्ग आणि मानवाचे नातं शब्दांकित केले आहे. निसर्गाची संवेदनशील भावना वाचकांच्या हृदयापर्यंत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीला लाभले आहे.
वृक्षवल्ली सोयरी वनचरे या लेखात ते वृक्षारोपण,संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी मानवाने काय केले पाहिजे यावर विचारमंथन करतात.वृक्षांचे जतन केले पाहिजे याचा विचार माणूस विसरून गेला आहे.अश्या निद्रिस्त समाजाला ते साहित्यातून जागृत करण्याचे कार्य करीत आहेत.जंगलातील वृक्षांना चित्ताकर्षक विशेषणांची बिरुदावली देऊन त्याचे रहस्य उलगडतात.तर प्राणिजगत या भागात वन्यप्राणी निरीक्षण रात्री कसं करतात.हिंस्त्र प्राण्यांचे जीवन कसं असतं.मार्मिक लक्षणांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती वाचताना आपल्या ज्ञानात मोलाची भर पडते. तर नवलाईच्या माहितीने कुतूहल निर्माण होते. प्राण्यांच्या माहितीचे पुरातन दाखल्यांचे नावानिशी स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
संगीतातील सप्तसुर पशुपक्ष्यांच्या कंठातून कसे निर्माण होतात.याची जिज्ञासा वृध्दिंगत करणारी माहिती नवलाईची विश्र्व उलगडणारी आहे. यावरुन त्यांचे सूक्ष्मदृष्टिने केलेले वर्णन आणि निसर्गवाचन संशोधनाच्या सीमा ओलांडून नवीन माहिती प्रदर्शित करणारी आहे. अभ्यासपूर्वक माहितीचे ते संश्लेषण आणि विश्लेषण करतात.वाचकांपर्यत समर्पक शब्दांत विविध लेखांद्वारे ते पोहोचवितात.
प्राण्यांच्या सवयी,आवाज,घरे आणि वर्णने नवीन प्राणी निरीक्षकांना ही माहिती मार्गदर्शन करणारी आहे.यामध्ये अनेक निरीक्षकांचे लेख, दाखले, सुभाषिते दिलेली असून त्याचे अर्थ प्राण्यांची महती उल्लेखनीय आहे.
'आनंद पक्षी' या कवितेत बालकवींनी भरारी घेणाऱ्या आणि आनंद वितरित करीत जाणाऱ्या पक्षाचे सुंदर चित्र रेखाटले आहे.पक्षी त्यांचा भूप्रदेश,रंग, घरटी,प्रियाराधन आणि गाण्याचा वेध यांचे विवेचन'पक्षी जाय…'या लेखात समाविष्ट केले आहे.मानवी जीवनाच्या भावभावनांचे दर्शन पक्षी जीवन या कवितेतून घडते.तर हेच कार्य मारुती चितमपल्ली गद्यलेखातून करतात त्याचे अनेक नवीन पैलू लक्षात येतात.काही पक्षी शेतकरी उपयोगी असतात तर काही संदेशवाहक असतात.तर काही पक्षी मानवी जीवन आणि वर्तन यांवर परिणाम करणारे असतात.मानवाने केलेली अस्वच्छता, स्वच्छ करण्याचे कार्यही पक्षीच करतात.
सर्पसृष्टी आणि कृमी-कीटक या भागात सापाचे विविध प्रकारची माहितीचे विवेचन केले आहे. त्याच्या आवाजाचे गूढ उलगडले आहे.पुराणातले ,चरकसंहितेतील दाखले आणि सुभाषिते यांची पुष्टी जोडलेली आहे. त्यामुळे अद्भुततेची विश्वासाहर्ता वाढते असं लिखाण लेखिकेने केले आहे.कीटकांचे विश्वही 'पाखरमाया' या पुस्तकातील विश्लेषण समर्पक आणि जिज्ञासू आहे.गूढरम्य निसर्गरम्य जगाची सफर त्यांच्या अनेक पुस्तकांतून घडेल.असं यातील लेखन वाचताना लक्षात येते.प्रत्येक ऋतूत निसर्गाचा वेगळा मनाला भुरळ घालणारा साज दिसत असतो. जणूकाही दिमाखदार पोशाखात हिरवाई, पिवळाई,निळाई,आणि कृष्णधवल रंगछटा उठावदार दिसतात.अन् विशेषतः पावसाळ्यात हिरवागार श्रृंगाराने सौंदर्याने सृष्टीच्या गाभाऱ्याचे दर्शन घडते.
मानवाला निसर्गाचा सहवास आवडतो. सहली भटकंती, फिरणं, ट्रेकिंग आणि पर्यटन आदी उपक्रमातून तो निसर्गाच्या कुशीत जात असतो.' सहवास निसर्गाचा'या लेखात लोकप्रिय साहित्यिकांच्या काव्यांची मेजवानी आपणास मिळते.
अतिशय सुंदर शैलीत लेखिका डॉक्टर अश्विनी देहाडराय यांनी साहित्यिक अरण्ययात्री मारुती चितमपल्ली यांच्या निसर्गाच्या सानिध्यातील निरीक्षणाने मिळविलेल्या अक्षरसंपदेचा गौरव या पुस्तकात केला आहे.निसर्गाची रम्यता अद्भुतता आणि नवनवीन माहिती या लेखातून समजून येते.
श्री.रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment