पुस्तक परिचय क्रमांक:१५८ वारी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१५८
पुस्तकाचे नांव-वारी
लेखकाचे नांव-डॉ.वसुधा वैद्य
प्रकाशक-कॉन्टिनेन्टल प्रकाशन , पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- एप्रिल २०२४ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–२६०
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--३५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१५८||पुस्तक परिचय
वारी
लेखक: डॉ. वसुधा वैद्य
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
विठू माझा लेकूरवाळा|संगे भक्तांचा मेळा||
गजर हरीनामाचा,गजर भक्तीचा,जय हरी विठ्ठल.माऊली माऊली….असा मुखाने नामोस्मरण करत दिंड्या पताका खांद्यावर घेत ,टाळमृदंगाचा गजर करीत अवघा जनसमुदाय आषाढी वारीला आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतो…त्या वारीचा आनंदाचा सोहळा! वारकरी परंपरा असलेल्या गोविंदपंतांच्या पंढरीच्या वारीच्या दिंडी सोहळ्याचे शब्दचित्र भावस्पर्शी शब्दात संतसाहित्याच्या व्याख्याता तथा लेखिका डॉ.वसुधा वैद्य यांनी रेखाटले आहे.लेखिकेच्या कुटूंबातच त्यांना वारीचे संस्कारित संचित लाभले आहे.त्यामुळे वारीचा भावार्थ आशय पंढरीची वारी,दिंडी आणि दिंडीप्रमुखाचे कुटुंब असा त्रिवेणी संगम साधत वारीचा महिमा अधोरेखित केला आहे.
सतरा दिवस विठूचे माऊलीचे नामस्मरण करत,पायी चालताना येणाऱ्या अनुभवांचे सुरेख चित्रण गुंफले आहे.
पंढरीच्या वारीची संस्कृती,भक्तीमय वातावरण ,विठूरायाच्या भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांची निरपेक्ष वृत्ती,अध्यात्म आणि भक्ती कशी अनुभवावी याचा आदर्श वास्तूपाठ म्हणजे ‘पंढरीची वारी.’ विलासी भोगवृत्तीच्या नास्तिकालाही वारीचे अनुभव अध्यात्माकडे कसे वळवितात यांचे चित्रण समर्पक आणि यथार्थ शब्दांत उभारले आहे.
वारीची परंपरा असलेल्या घरात जन्माला आलेला या कादंबरीचा नायकच वारीला नाकारुन,अपशब्द बोलून त्याचे अस्तित्वच वेळोवेळी धुडकावून लावत असतो.बुध्दीच्या जोरावर धनसंपत्ती कमावून अहंकारी होतो. आईबापांचा तिरस्कार करतो.पदोपदी अपमानित करतो.एकदा अचानक अघटितपणे घडलेल्या पंढरपूर येथील मठातील घटनेतून नात्यांच्या ऋणानुबंधाला तिलांजली देतो. शिक्षकी पेशा ते उद्योजक व्यवसाय करत आपल्या बुध्दीने भरपूर पैसा मिळवतो. अन् पैश्याने उन्मत्त होऊन व्यसनांच्या विळख्यात सापडतो.अहंकारी होऊन इतरांना तुच्छ लेखतो.
क्षेत्र पंढरपूर येथील हरि भक्त परायण श्री चैतन्यमहाराज भानुदासमहाराज देगलूरकर यांनी “वारी”या वैष्णव संप्रदायातील अध्यात्मिक मानदंडास प्रस्तावना लिहिली आहे.ते म्हणतात की,“भागवततत्त्वं नाकारणाऱ्या विचार आणि जीवनशैलीकडून ते भगवंताच्या अस्तित्वावरील सश्रद्ध विश्वास निर्माणाच्या अन् परिवर्तनाच्या आंतरक्रियेला आळंदी ते पंढरपूर ही वारी समृद्ध करत आहे.” कथा नायक मधुसूदनाच्या कुटुंबातील नातेवाईक त्याच्या मातेच्या अंतिम समयी एकदा तरी पाय वारी करण्याचे वचन घेतात.आणि दिलेले वचन पूर्णत्वाला नेण्यासाठी घरातल्या सगळ्यांना आणि दिंडीतील वारकरी भक्तांना काय काय दिव्य करावे लागते?यांची संवादातून अभिव्यक्ती सुंदर शब्दात मांडली आहे. व्यसनी आणि अहंकारी नायक वारीचं रुप बघत बघत ऋषी, बुवा आणि काकांचे अनुभूतीचे विचार ऐकत असतो. त्याच्यातील मीपणा अन् अहंकार गळून त्यांच्यात परिवर्तन कसे घडते?याची वाचताना पानोपानी प्रचिती येते.
मधुसूदनाच्या आयुष्यातील घटनाप्रसंगाची गुंफण कुटुंबातील सदस्यांची संवेदनशील भावना भावस्पर्शी शब्दात मांडली आहे. त्यामुळे पुढं काय घडतंय याची उत्सुकता आणि जिज्ञासा रसग्रहण करताना निर्माण होते.घरबसल्या वाचकांना वारीचे दर्शन घडतेय.इतकं सहजसुंदर अलवारपणे कादंबरीचे लेखन केले आहे.
भगवंताचे सगुण निर्गुण रुपाशी आपण एकरुप होऊन गेलो तर ‘अहम्’पासून सुरू झालेली स्थिती ‘सोऽहम्’च्या रुपात एक होते.स्वत्व विसरून अध्यात्माच्या समाधी अवस्थेत जाऊन अनुभूती घेतली की;माज ,वासना,विकार, मीपणा आणि अहंकार गळून पडतो.वारीची निर्मळता पावित्र्यता शुचिर्भूतता आपल्या अंतरंगात शिरते.असं वारीची संस्कृती आहे.’माऊली माऊली’ हा जीवनाचा मंत्र आहे.विभिन्न नात्यांचा आनंदानुभव देणारी वारी आहे.
“बोला पुंडलिक वरदा ,हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय||”या मंत्राच्या जयघोषात “राम कृष्ण हरी,जय जय राम कृष्ण हरी”या घोषात तल्लीन होत वारी पुढे पुढे मार्गस्थ होत असते. एक सुंदर भावस्पर्शी वारीचा वेगळाच अनुभव वाचताना येतो.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment