पुस्तक परिचय क्रमांक:१६०नि: शब्द
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६०
पुस्तकाचे नांव-नि: शब्द
लेखकाचे नांव- सप्तर्षी माळी
प्रकाशन -अक्षरबंध प्रकाशन, नाशिक
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- फेब्रुवारी २०२३ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–८८
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६०||पुस्तक परिचय
नि: शब्द
लेखक: सप्तर्षी माळी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
'नि:शब्द'कथासंग्रहातील कथा नावाप्रमाणेच रसिकांना नि:शब्द करतात. क्षणभर मनाला चटका लावून जातात. डोळे ओले करतात. अस का घडले असेल ?याचे चिंतन करायला लावतात. या कथा मानवी जीवनातील इंद्रधनू सारखे सप्तरंग घेऊन आकारास आलेल्या आहेत. वर्तमानपत्रात आलेल्या बातमी वरुन कथालेखकाने कथा गुंफली आहे. घटनेचे गांभीर्य वाचक मनाला हळवे करते. सभोवतालचा वर्तमान सजगतेने टिपणाऱ्या चिंतनशील कथा असतात. सामाजिक मूल्यावर विचार व्यक्त करणाऱ्या कथा आहेत
‘जीवन मूल्यांचा संस्कार देणाऱ्या या कथा आहेत.’संस्कार आणि मूल्यांचे बीज पेरणारे ‘नि:शब्द’कथासंग्रह वाचन साखळी समूहाच्या वाचनयात्री सन्मान सोहळ्यात उपस्थित सदस्या सौ.सरोजिनी देवरे यांनी आवर्जून भेट दिलेले मैत्रींचे कथापुस्तक. वाचन साखळी समूहातील सदस्य एकमेकांना भेटल्यावर स्वागतपर शुभेच्छा पुस्तक भेटीने देतात.या भेटीचा आनंद कायम स्मरणात राहणार.
या कथासंग्रहात कथालेखक सप्तर्षी माळी यांनी १२कथांचे बीजांकुरण मनभावन शब्दात केले आहे.मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूरचे अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर यांची ‘सभोवतालचा वर्तमान सजगतेने टिपणाऱ्या चिंतनशील कथा या शिर्षकाखाली प्रस्तावना केली आहे.बदलत्या जीवनातील हरवत चाललेली जीवनमूल्ये लोकांना कथेच्या माध्यमातून केलेली आहे.प्रस्तावनेत कथांचा संक्षिप्त चेहरा कथेचे सार ग्रहण करण्याची रुची वाढवतो.तर मनातलं या लेखातून लेखक सप्तर्षी माळी यांनी या पुस्तकाला मदतीला सहकार्य करणाऱ्या दातृत्वाचा वारसा जतन करून आचरणातून दाखविणाऱ्या व्यक्तींचा ऋणनिर्देश व्यक्त केलाय.
अंतरंगात डोकावून पाहिले की कथांची नावं नजरेने वाचून नि: शब्द होतो.कुतूहल निर्माण करत सरशेवटी कथा आपणास चिंतन करायला भाग पाडते. प्रारब्ध,जखम,नरक यातना, फेसबुक फ्रेंड,नियती,डिअर,परावलंबी,लाडका, गोंधळ, नशीब, गद्दार आणि नि: शब्द या नावाच्या बारा कथा.
या कथासंग्रहातील कथांचा सारांश नेमकेपणाने यथार्थ शब्दांत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्वर्य पाटेकर यांनी चितारला आहे.सामाजिक भानाचा दृष्टीकोन, वर्तमान जीवन व्यवहाराचा वेध,अंतरीक तळमळ आणि संवेदनशील मनाने लिहिते झालेने कथांचे रुप उठून दिसत आहे.खरं तर आपण नि:शब्द केंव्हा होतो.एखादी घटना अथवा प्रसंग आपल्या मनाला हृदयापासून भावला, आवडला, बिंबला असेल तर.काहीतरी वैचारिक शिदोरी मिळते.म्हणजेच व्याख्यात्याच्या वाणीचे आणि शब्दप्रभूंच्या लेखणीचे आपण गारुड होतो.तेंव्हा नकळतपणे आपल्या मुखातून एकच शब्द प्रकटतो मी ‘नि:शब्द’झालो.रसिक वाचकांना कथेचे सार उमजलं की तोही निःशब्द होईल इतकं निर्मळ,सहेतुक ,सहजसुंदर लेखन केले आहे.
कथासंग्रहाच्या शीर्षाकाला व्यापकता लाभलीय. कथा वाचकांच्या मनाची पकड घेत कथा वाचायला उद्युक्त करते.कथेचा समारोप मात्र कथा नायक किंवा नायिकेला चटका लावणारा आहे. यामुळे कथेच्या अंतरंगाचा उलगडा होतो.
ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याने मुलीची,
तिच्या आईवडिलांना काय अवस्थेत जगावं लागतं याचं चित्र ‘जखम’या कथेत मांडले आहे.तीच मुलगी पुढे नोकरी करत शिकून अधिकारी होते.आणि तिच्याच कडे नकार दिलेल्या मुलाची भ्रष्टाचार केल्याची सुनावणी असते.दया आणि माणूसकी शब्द पायदळी तुडविणाऱ्या कडून कसली अपेक्षा ..उलट तुमच्या मित्रांचे आणि तुमचे आभार मानते.कारण मला एका भ्रष्टाचारी आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या माणसाशी लग्न करण्यापासून परावृत्त केलेत.
लाईक आणि कमेंट करणारा फेसबुक फ्रेंड
आणि बालपणीचा मैतर यापैकी अपघात झाले नंतर कोण उपयोगी पडते याची चित्तर कथा ‘फेसबुक फ्रेंड’या कथेत भावस्पर्शी शब्दात रेखाटली आहे. वाचताना खऱ्या मित्रांचे मुखवट्या मागील चेहरे ओळखायला लावणारी कथा आहे…
खरे मित्रच जीवाला जीव देणारे असतात.
शासकीय रुग्णालयातील गलथान कारभारामुळे लोकांना कसे चटके बसतात तर काही प्रसंगी त्यांचा रुग्ण अथवा आप्त गलथानपणामुळे कसा दगावतो याची ‘नियती’कथा.वाचताना आपले मन हळवे होते.पहिल्या प्रेमाची ‘डियर’कथा खरचं आपलं मन अस्वस्थ करते.आपण ठरवतो एक आणि घडतं वेगळं.मैत्री,स्नेह आणि जिव्हाळा हेच जगण्याची संजीवनी आहे.
वर्तमानपत्रातील आईवडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर मुलगा अतिलाडानं कसा करतो.अन् संगतीने कसा बिघडतो.हे अधोरेखित करणारी कथा’लाडका’.खरं तर आपल्या मित्रांनी मुलांच्या बाबतीत दिलेला सल्ला पडताळणी करणं का गरजेचं आहे.ही पटवून देणारी कथा आहे.
स्वप्नातील सगळंच कधी साध्य होत नाही. काळ अघडितपणे बदलतो.त्याही काळात आपण बदलणं महत्त्वाचे असते.शहराच्या रहाणीमानात राहण्याचे ध्येय बाळगणाऱ्या गावच्या मुलीची कशी त्रेधातिरपीट उडते त्याची कथा ‘नशीब’तर घाणेरड्या राजकरणाची वेध घेणारी धन आणि पदाला चिकटण्यासाठी आपल्या पक्षाला नारळ देणारी माणसं.
कथासंग्रहाच्या नामशिर्षाची कथा ‘नि: शब्द ‘स्त्री आपलं दुःख विसरून घरातील सगळ्यांच्या गरजा भागविण्यासाठी अहोरात्र झटत असते.पण तिच्या आजारावेळी घरातील पती, मुलगा आणि मुलगीही स्व:ताच्याच परिघात असतात. पण आईचं मन ओळखत नाहीत. सगळे पैसा आणि प्रतिष्ठेपायी तिच्या दु:खाकडे कोणाचेही लक्ष जात नाही.
मनुष्याच्या स्वभावाचे चित्रण या कथांमधून डोकावते.प्रत्येक कथेचा समारोप कलाटणी देणारा अन् भावस्पर्शी केलाय.प्रत्येक कथा रसिक वाचकांच्या मनात भिडते.अन क्षणभर आपण ही निःशब्द होतो.लेखक सप्तर्षी माळी यांच्या लेखणीस सलाम.अप्रतिम कथासंग्रह आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment