पुस्तक परिचय क्रमांक:१६१ श्यामचा जीवन विकास
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६१
पुस्तकाचे नांव-श्यामचा जीवन विकास
लेखकाचे नांव- साने गुरुजी
प्रकाशन -रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- ऑगस्ट २०११ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१४४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६१||पुस्तक परिचय
श्यामचा जीवनविकास
लेखक: साने गुरुजी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
संवेदनशील मनाचे समाजशिक्षक साने गुरुजी यांच्या लिखाणात सद्विचारांचा आणि सद्भावनांचा वर्षाव असतो. संस्कारक्षम कथांची भेट रसिक वाचकांना गोष्टीतून मिळते.त्यांचे लिखाण साधे सोपे आणि सरळ असते.त्यामुळेच लिखाणात जिवंतपणा असतो.कथा वाचताना श्रावक मंत्रमुग्ध होऊन कथेचे श्रवण करीत असतात.
“श्यामचा जीवनविकास” हा कथासंग्रह पूर्वी मन्वंतर मासिकात प्रसिद्ध झालेल्या कथांचे पुस्तक आहे.यालाच खंड-३ संबोधित केले आहे. आनंद,सहकार्य, सेवा, बंधुभाव यांची वाढ करणारी चळवळ ज्ञानाच्या अमृतकुंभातून झाली पाहिजे.ज्ञानाचा नंदादीप प्रशांत प्रकाशात तेवत राहून सद्भावना आणि समता हाच मंत्र समजून समस्त कथा माणुसकीचा मार्ग दाखविणाऱ्या असाव्यात .साने गुरुजींचे हृदय भावनाप्रधान असून आपत्तीला ठोकरणारे कठोरही आहे.याचेच प्रतिबिंब या कथेतून प्रगटते. श्रीमान साने गुरुजी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगिकृत बाणूया.
श्यामचा जीवनविकास या कथासंग्रहात सतरा विचारांचे सौंदर्य पेरणाऱ्या संस्कृती जोपासणाऱ्या कथा आहेत.त्यांचे वाचन करायला हवे .
‘शाळेतील शेवटचे वर्ष’या लेखात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवेदनशीलता व्यक्तिपरत्वे कशी असते.ती गोष्टीतून व्यक्त केली आहे.विद्यार्थ्यांना दैनंदिन घडलेल्या राष्ट्रीय घटनांची तसेच आपल्या अवती भोवती घडलेल्या घटनांची माहिती असावी.महापुरुष कोण आहेत ते काय करतात याचीही माहिती शाळकरी वयात मुलांना असणे आवश्यक आहे.
संस्कृती म्हणजे काय या कथेत घरातील स्त्रीयांच्या कष्टाचे मूल्य अधोरेखित केले आहे.कोणत्याही घरातील स्त्री अपमान आणि छळ सहन स्वतःच्या भावनांचा कोंडमारा करत असते.पण याबद्दल पतिला जाब विचारु शकत नाही. सवंगडी रामच्या सहृदयी मातेच्या कष्टाळू जीवनाची व्यथा आणि तऱ्हेवाईक पुरुषवर्गाची दांभिकता मांडली आहे. घराचे गोकुळ असावे पण कोंडवाडा नसावा. संशयकल्लोळ नसावा.”संशयच सर्व सुखाचा नाश करणारा आहे.”हे ईश्वरी विचार या कथेतून व्यक्त होतात.
एखाद्याची कला आपणाला येत नाही असे वाटून ते खिन्न होतं असतं.परंतू एखादी गोष्ट शिकण्याची ऊर्मी बाळगून सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. अलौकिकता म्हणजे ९९टक्के प्रयत्न आणि एक टक्का ईश्वरी देणगी. प्रयत्नहीन इच्छा म्हणजे पंखहीन पाखरू.आनंद अपेक्षापूर्तीनंतर उरत नाही.सहानुभूती म्हणजे संगीताची जननी. दुसऱ्याच्या हृदयातील संगीत ऐकायचे असेल,सूर ऐकायची इच्छा असेल तर दुसऱ्यांच्या जीवन वेणूतून आनंदमयी गीत बाहेर पडायचे असेल तर सहानुभूती घेऊन जावा.सहानुभुती म्हणजे मोक्ष होय. वहिनी, आई,मावशी जर एकटीच जेवायला बसली असेल तर तिला एकटं वाटू नये म्हणून मी तिच्या बरोबर गप्पा मारत बसलोय. "दुसऱ्याच्या हृदयाची कल्पना करून घेण्याची नकळत मला सवय जडली होती."असं ते प्रांजळपणे "दादांचा संसार सुरू झाला."या कथेत कबुली देतात. सहानुभुती म्हणजे हिंदीत 'हमदर्दी' आम्हीही दु:खी आहोत. तुझ्यासारखे दु:ख माझ्याही सोबतीला नकळत घडतेय.अतिशय भावनिक कथांचा समावेश या पुस्तकात केला आहे.
स्वराज्याच्या मंत्राचे ऋषी या कथेत लोकमान्य आणि मतिलाल यांच्या भेटीचा प्रसंग शब्दबध्द केला आहे. संस्कारक्षम कथांचा खजिना अखंड ओसंडून वाहत आहे.श्यामची आई,श्याम यातील गोष्टीप्रमाणे या कथाही संस्कारक्षम आहेत. विशेषत:पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना घडलेल्या घटनांचे सुंदर अन् भावस्पर्शी शब्दचित्र गुंफलेले आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment