पुस्तक परिचय क्रमांक:१५७ संघर्षाची मशाल हाती
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१५७
पुस्तकाचे नांव-संघर्षाची मशाल हाती
लेखकाचे नांव-नरसय्या आडम
शब्दांकन: दत्ता थोरे व संतोष पवार
प्रकाशक-समकालीन प्रकाशन , पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०२३ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–३०४
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र
किंमत /स्वागत मूल्य--४००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१५७||पुस्तक परिचय
संघर्षाची मशाल हाती
लेखक: नरसय्या आडम
शब्दांकन: दत्ता थोरे व संतोष पवार
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
कामगारांसाठी दिवसातील बारा-चौदा तास काम करणारे आणि दरवाजे कोणासाठीही केंव्हाही उघडे ठेवणारे माकपचे लढवय्ये नेते म्हणून नरसय्या आडम मास्तर यांची जनसामान्यांत ओळख आहे.उभं आयुष्य कामगार चळवळीला वाहिलेला नेता.
कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढलेल्या झुंजार नेत्याची कहाणी संघर्षाची मशाल हाती.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे जोशपूर्ण आवेशात व्यासपीठ गाजविणारे क्रॉमेड नरसय्या आडम मास्तर; पोटतिडकीने आपले विचार शासन दरबारी आणि सभा संमेलनात अभ्यासपूर्णपणे मांडणारे बुलंद नेते “संघर्षाची मशाल हाती”ही संघर्ष गाथा दत्ता थोरे आणि संतोष पवार यांनी शब्दबध्द केली आहे.
आत्मशोधाची प्रेरणा देणाऱ्या बुलंद वादळाची ही आत्मकथा…ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता एकच ध्यास कामगारांचा विकास हेच स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र संघर्ष करणारे कामगार नेते.चाळीस हजार श्रमजीवी शोषितांना हक्काचे घरकुल मिळवून देणारे क्रॉमेड नरसय्या आडम मास्तर यांची ही आत्मकथा त्यांचा संघर्षमय जीवनपट उलगडणारी ही आत्मकथा शब्दबध्द केली आहे.
कामगारांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरून मोर्चा काढणे,निवेदन देणे,घेराव घालणे, जनआंदोलन करणे, कामगार न्यायालयात केस चालविणे,बेमुदत संप पुकारणे, बेमुदत उपोषण करणे आदी मागण्या करताना अनेकदा तुरुंगवास भोगलेले कामगार नेते. ‘सोलापूरचा रेड टायगर’ म्हणून त्यांची ओळख त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन कामगारांनी बहाल केली आहे.
मलपृष्ठावरील ब्लर्बमधील परिच्छेद वाचताना त्यांच्या अलौकिक संघर्षाची महती समजते.“सर्व प्रकारचे अत्याचार आणि शोषण कायमचे नष्ट करून मानवतेवर आधारित समाज घडवण्यासाठी जगभरातील कम्युनिस्ट आपल्या व्यक्तिमत्त्यातील पोलाद अथकपणे परजत आले आहेत. क्रॉमेड आडम मास्तर हे अशा लढवय्यापैकी एक आहेत.हे आत्मचरित्र वाचकांना आपल्या अंतरंगातील पोलाद परजण्याची स्फूर्ती देईल,याची मला खात्री आहे.” सीताराम येच्युरी, सरचिटणीस,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
राजकारणात असूनही नि:स्पृह, निष्कलंक आणि स्वच्छ ही प्रतिमा पन्नास वर्षांनंतरदेखील कायम ठेवणारे, श्रमिक, असंघटित, कष्टकरी वर्गासाठी अहोरात्र झटणारे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून जन आंदोलन करणारे,प्रसंगी अनेकदा तुरूंगवास भोगणारे,श्रमिकांचे कैवारी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर.
‘सोलापूरचा लाल वाघ’ म्हणून ओळख असणाऱ्या या नेत्याने चाळीस हजार असंघटित कामगारांचे घराचे स्वप्न साकार केले. देशातील सर्वात मोठे गृहप्रकल्प उभारुन ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.त्यांचे हे काम खरोखरीच जनसेवेचे आदर्शवादी आणि कौतुकास्पद तरच आहेच,शिवाय प्रेरणादायीसुद्धा आहे. हे काम करण्याचं भाग्य मला लाभलं. यालाच ते आयुष्याचे संचित समजतात.आयुष्यभर लाल झेंडा खांद्यावर ठेवून काम करणारे आडम मास्तर यांनी कृतिशीलतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.सत्ता असो व नसो, लोकांसाठी एखादी गोष्ट करायची असेल, तर काहीही अशक्य नाही, हेच त्यांनी दाखवून दिले.विडी,यंत्रमाग, मोलमजुरी,रिक्षाचालक, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, घरकाम करणाऱ्या असंघटित कष्टकरी कामगारांच्या आवाज महापालिकेपासून विधानसभेपर्यंत त्यांनी पोहोचविला.तीन वेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार म्हणून काम करताना; त्यांना उत्कृष्ट संसदपटू , कामगार महर्षी गं.द.आंबेकर जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत ज्योती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आईने त्यांच्याकडे विडी कामगारांना घरे मिळवून देण्याची मागणी केली.आईचा शब्द पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि प्रत्यक्ष चाळीस हजार श्रमजीवी कामगारांना हक्काचे डोक्यावर छत्र मिळवून दिले.
हे आत्मकथन त्यांनी वडील क्रॉमेड नारायणराव आडम,आई क्रॉमेड लक्ष्मीबाई आडम आणि जगभरातील तमाम संघटित -असंघटित कामगारांना अर्पण केली आहे.
या गाथेची प्रस्तावना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिटब्यरो सदस्य डॉ.अशोक ढवळे यांनी समर्थपणे समर्पक शब्दात वास्तवपणे मांडली आहे.एका बुलंद वादळाची आत्मकथा. त्यांच्या आत्मकथेतून दिसतो.तो एका राईतून पर्वत उभा करु पाहणारा. अणूच्या अंतरंगात शिरून आभाळ पाहण्याची दुर्दम्य आकांक्षा बाळगणारा लढवय्या नेता.जगण्याशी दोन हात करणाऱ्या फाटक्यातुटक्या माणसालाही चार हत्तींचं बळ जमवून विपरीत परिस्थितीत कसं झुंजता येतं याची प्रचिती देणारं हे आत्मकथन आहे. आईवडिल भाऊ भावजय आणि बहीण सगळेजण पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्याभर झुंजत राहिले.आडम मास्तर यांनीही बालपणी मजुरीचा अनुभव घेतला होता.
नरसय्या आडम मास्तर यांनी जगण्याची गोष्ट या आत्मचरित्रात उलगडून दाखविली आहे.कष्टकऱ्यांचं जिणं सुखकर व्हावे यासाठी हयातभर ते झिजले. याचं समाधान उरात भरलेलं आहे.याचा उल्लेख आवर्जून त्यांनी केला आहे.अशा लढवय्या नेत्याची आत्मकथा निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे.
ही संघर्षयात्रा अभ्यासताना आपणाला त्यांच्या आयुष्यातील चढउताराचे अनेक पैलू भावुक करतात, पेल्यातील वादळे निर्माण झाल्यावर उद्विग्न न होता सामोरं कसं जावं ?हे शिकविणारे अनेक अनुभव या जीवनपटात शब्दबध्द केले आहेत.आयुष्यातील टर्निंग पॉईंट वाचताना मनात रुंजी घालतात.कार्यकर्ते कसे जोडावेत आणि कसे जपावेत.हे त्यांच्या कृतीतून सिद्ध करणारे ते लोकसंग्राहक नेते. निवडणुकांचा चालत, सायकलवर तर रिक्षातून प्रचार करणारा नेता.लोकांनी स्वखुशीने दिलेल्या पैश्यावर निवडणूक लढणारा नेता. पहाडी आवाजाने सभा गाजवणारा नेता..
ही संघर्षयात्रा बावीस भागात समाविष्ट केली आहे.बालपणीचा कष्टाच्या स्मृती जागृत करत चळवळीत पदार्पण कसं घडलं?संपाचे निशाण फडकून कामगारांना एकीचा विजय कसा मिळवायचा हे कृतीतून दाखवून दिले.महानगरपालिका, विधानसभा निवडणुकीतील कार्यभानता. खणखणीत आवाजाने सभागृह दणाणून सोडत केलेली भाषणे.विक्रमी घरकुलं मिळविण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा. फिनिक्स पक्ष्यांसारखी गगनभरारी घेऊन हे संघर्षाचे आभाळ कसं पेललं ?त्याचा पदपथ उलगडून दाखविला आहे.साधी सोपी काळजाला भिडणारी भाषा.आणि आवश्यक तिथं कृष्णधवल छायाचित्रे त्यांच्या कार्याची महती उठावदार दिसते.शोषितांचे दु:खाश्रू आपल्या संघर्षाने पुसणारा लढवय्या नरसय्या आडम मास्तर…
खरोखरीच विस्तृतपणे आणि सर्वांगीण ही संघर्षयात्रा आहे.कामगारांच्या जीवनात हक्काची जाणीव जागृत करून ; आपण नियोजनबद्ध प्रयत्नशील राहिलो तर यशाला गवसणी घालता येते.याचा वास्तूपाठ अधोरेखित करणारा नेता.
‘घरकुल बिडी कामगारांचे’ या विषयावरील त्यांचं जोशपूर्ण भाषण ऐकण्याची संधी मला लोकमान्य टिळक ग्रंथसंग्रहालयाने आयोजित केलेल्या १०८ व्या ‘वसंत व्याख्यान’मालेत ऐकण्याची संधी मिळाली.हे माझं परमभाग्य.त्यांच्या लेखणीस,वाणीस आणि संघर्षमयी कार्यास लाल सलाम!
अतिशय परखड आणि वास्तव कहाणी वाचताना वाचक रसिक अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही.
परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई सातारा
Comments
Post a Comment