पुस्तक परिचय क्रमांक:१५६ वैशाख
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१५६
पुस्तकाचे नांव-वैशाख
लेखकाचे नांव-रणजित देसाई
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस , पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०१९पुनर्मुद्रणे
पृष्ठे संख्या–१२४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१५६||पुस्तक परिचय
वैशाख
लेखक: रणजित देसाई
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
उन्हाळ्यातील काहिली माणसांची तगमग वाढविते.तनमनाला चटका देते.त्यात वैशाख महिना असेलतर बोलायलाच नको? कारण वैशाखाचं ऊन गावाला तापवित असतं म्हणूनच त्या वातावरणाला 'वैशाख वणवा'असं संबोधित केले आहे. उन्हात होरपळत अख्खी गावं निपचित पडलेली असतात.त्यात वैशाख महिन्यातील ऊन्हाचा चटका गोष्टीतून देणारा कथासंग्रह'वैशाख'.
बहुआयामी साहित्यिक आणि स्वामीकार रणजित देसाई यांची ग्रामीण जीवनाचा वेध घेणाऱ्या कथांमध्ये माणसांच्या नात्यातील शुष्कता त्यांनी अचूकपणे टिपलाय. या कथा खरं तर वाचतानाच मनाला चटका देऊन जातात.
निसर्गरम्य ग्रामीण कथांचा सोनपिवळा अनुभव व्यतिरेखांचा नातेसंबंध छानपैकी त्यांनी गुंफलेला आहे.या कथासंग्रहात अठरा कथापुष्पे आपणाला रसग्रहण करायला समावेशित केली आहेत. यातील कथांची निवड जेष्ठ साहित्यिक आणि त्यांचे मित्रवर्य कमलाकर दीक्षित आणि डॉ.आनंद यादव यांनी केली आहे.यातील कथा सामाजिक आणि निसर्ग कथा आहेत.विशेषत:ग्रामीण भागातील घामगाळणाऱ्या शेतकरी आणि कष्टकरी श्रमिकांच्या घामाच्या अभिषेकाच्या कथा व्यक्तरेखेत गुंफूण रेखाटल्या आहेत.माणसांचा स्वभाव,इतरांशी वर्तन आणि नातेसंबंध उलगडून दाखविला आहे. सौदा,सुतक,साप, खड्डा,अपघात,खोट,रंगी,अड्डा,पूर,मरण,चमेली,झाड, शाळा, भोवरा, माणूस, रक्त,सुरुंग आणि सुटका या नावांच्या कथा आहेत.
लेखक रणजित देसाई यांच्या लेखणीत रसास्वादाचा उत्कट प्रत्यय येतो.त्यांच्या लेखणीत प्रसाद आहे. वाचकाला रम्य वातावरणात नेऊन व्यक्तिव्यक्तिंच्या वागण्यातील आणि स्वभावातील कोरडेपणा शुष्कता दाखविणाऱ्या कथा आहेत.
जनावरांच्या बाजारातून हेडगिरी करणाऱ्या आप्पाजीची कथा 'सौदा' आहे.आपल्याला व्यवहारात कमिशन मिळण्याशी मतलब.मग जनावरं कसं काय असेना.ते घेणाऱ्याच्या गळी कशी उतरावं .हे अशा व्यापारी हेडगिरी करणाऱ्या कडून शिकावं.एका गावातील सातुचा विठा हा भारा घेऊन बांधावरून जाताना पाय घसरून पडल्याने त्याच्या मानेवर बारा आदळतो.त्यामुळे तो जायबंदी होतो.त्या दवाखान्यातून नेहण्यासाठी त्रेधातिरपिट होताना तुकाला काय काय करावं लागतं याचं छान व्यक्ति चित्रण 'सुतक'कथेत रंगविले आहे. दवाखान्यात घेऊन जाताना
डॉक्टरलाच घेऊन यायचे कसं ठरतं.याची कथा छानच गुंफली आहे.
विठू आणि देवा या दोन भावांची घर आणि शेतीची वाटणी होते.एक गावी आणि दुसरा शहरात राहतो. कालांतराने शहरातून माघारी आल्यावर घरात वाटणी मागतो.खरं तर त्याचं घर मोडकळीस आलेलं असतं. त्यात भाऊ हिस्सा मागतो. त्यावेळी एका भिंतीत साप दिसतो. त्याला भिंतीतून बाहेर काढायच्या नादात घराची भिंत समस्त गावकरी कशी पोकळ करतात. त्याची कथा 'साप'.
भैसवाडी गावाची तहान भागवण्यासाठी 'खड्डा' नामक तिसरी विहीर खोदताना झालेलीफटफजिती अतिशय समर्पक आणि यथार्थ शब्दांत मांडली आहे.पुढं
लग्नासाठी सावकाराकडून व्याज घेणाऱ्या गोंद्याची कथा 'खोट'.आईविना पोरक्या झालेल्या तुकारामला तळहाताच्या फोडासारखं जपत मोठा करतो त्या पित्याची कथा 'रंगी'.
बापाचं न ऐकणारा मुलगा तीन पानी पत्त्या खेळत असतो.ते बापाला पटत नाही.म्हणून त्याचा बाप जिवबा गावासमक्ष आपल्या इस्टेटीचं इच्छापत्र गावातील धार्मिक कार्यक्रमास देतो.ती कथा 'रंगी.' शेताचं खंड वेळेत नदिल्याने नानांच्या कुटूंबाची कशी वाताहत होते.याची कहाणी सांगणारी कथा म्हणजे'मरण'होय.
फिरस्ती करत आयुष्याची गुजराण करणाऱ्या उपेक्षित समाजातील बायामाणसांची कशी फटफजिती गाव कारभारी करतात याचं चित्रण 'चमेली'कथेत गुंफले आहे.दोघा शेजारच्या बांधावरच्या आंब्याच्या झाडाची कथा ऋणानुबंध अधोरेखित करणारी आहे.आंबे येत नाही म्हणून गरजेला झाड तोडायला शेजारच्या मुलाला विचारणारा देवबा 'झाड'कथेतून शेजारधर्म अधोरेखित करतोय.
एखाद्या मुलाला पंतोजी काळातील शाळा मास्तरने पोराला शिक्षा केल्यावर त्याचे पालक शाळेत येऊन कसे दमबाजी करतात.याचं अफलातून वर्णनाचे शब्दचित्र 'शाळा' या कथेत रेखाटली आहे.भोवरा कथेत घरावर आलेल्या जप्तीच्या वेळेस कुटूंबाची काय अवस्था होते.तर एकुलता एक मुलगा आजारी पडल्यावर त्याला बरं करण्यासाठी घरावर कर्ज काढायची वेळ येते. ती द्विधा मनस्थिती 'भोवरा'कथेत गावरान ढंगातील संवादातून व्यक्त केली आहे.विवंचनेत असताना,भोवऱ्या सारखा माणूस सभोवती कश्या गिरक्या घेतो याची प्रचिती येते.
शेतजमिनीच्या वाटणीपायी सख्खे भाऊ वैरी होतात. अन् थोरला धाकल्यावर आई देखत विळ्याने वार करून पोबारा करतो.ती कथा 'रक्त' होय.खर तर धाकट्याला बापाच्या माघारी भावानेच हाडांची काडं करून शिक्षक बनविलेले असते.तुटपुंज्या जमीनीत तो राबत असतो.त्याला वाटतं नोकरी मिळालेला भाऊ हिस्सा मागायचा नाही.पण वैशाखातल्या कोरड्या ठणठणीत ऊन्हासारखा धाकटा नातेसंबंध विसरून उपकार विसरुन हिस्सा मागतो.म्हणून थोरला धाकल्यावर वार करतो.अशी नात्याला आई देखत काळीमा फासणारी कथा'रक्त'.रक्ताचं नातं हळवं न होता ते खूनशी होतं..
माणुसकीचा गहिवर घालणारी कथा 'सुरुंग'
गावची विहीर काढायला तमा वड्डर मारता घेतो.पण खाली काळा कातळ लागल्याने सुरुंग नीट उडत नाही.त्यामुळे पाटील त्यांच्या कष्टाचे पैसे देत नाही. त्यामुळे काफिल्याची उपासमारी होत असते.त्यामुळं तमा अस्वस्थ होतो.मग तो स्वत:सुरुंगाची नवी भोकं घेऊन वात पेटवून पायऱ्या चढताना त्याचा तोल जातो.पुन्हा वर येण्याचा प्रयत्न करताना वर उडालेल्या दगड त्याच्या पाठीवर आदळतो अन् तो विहीर पडतो.तमाच्या पाटीतून रक्ताची धार वाहते.तो बेहोश होतो.रक्तस्त्राव झाल्याने तो गतप्राण होतो.त्याच वेळी सुरंगाने फुटलेल्या कातळातून पाण्याची चिळकांडी उडते. विहीरीत झरे अन् नळ दिसतात;विहीरीला पाणी लागते.गावकऱ्यांना पाणी लागल्याचा आनंद तर वडारांच्या झोपड्यातून रडण्याचा कल्लोळ उसळतो. कोरड्या पाषाणासारख्या माणसाच्या स्वभावाची ओळख या कथेतून व्यक्त होते.वड्डरांच्या डोळ्यात अश्रू अन् गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाखविणारी कथा'सुरुंग'.सर्वात हृदयाला भिडणारीश्रमिकांची कहाणी वैशाख वणव्यासारखी.
शामू हरहुन्नरी आणि लुडबुड करणारा नाही माणूस.गावदरी अन् शेतशिवारातील जिन्नस बेमालूमपणे लंपास करण्यात हातखंडा असणारा पाताळयंत्री माणूस.मलकाप्पा सावकाराकडून त्याने घरावर कर्ज काढलेलं असतं.ते कसं फेडायचं याच्या विवंचनेत असताना त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते.अन् तो गवत कापताना नाग चावल्याचं नाटक करतो.सगळे अवाक होतात.मग जगत नाही म्हणून मालकाप्पा बोलावून घेतो.त्याची मरणासन्न अवस्था पाहून सगळ्यांच्या साक्षीने स्टॅपाचा कागद फाडून देणं घेणं काही सांगतो. ती रहस्यमय कथा 'सुटका'.
'वैशाख' कथासंग्रह वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य यांच्या पुस्तक परिचय उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल बक्षीस म्हणून मिळालेला आहे. साहित्यिक रणजित देसाई यांनी अतिशय सुंदर शैलीतगावखेड्यातील व्यक्तिरेखा या कथांमधून रेखाटल्या आहेत.त्यांच्या लेखणीस शतशः धन्यवाद!!!
परिचयक:श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई सातारा
Comments
Post a Comment