पुस्तक परिचय क्रमांक:१५४ रावण
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१५४
पुस्तकाचे नांव-रावण राजा राक्षसांचा
लेखकाचे नांव-शरद तांदळे
प्रकाशक-न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-
पृष्ठे संख्या–४३२
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--४५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१५४||पुस्तक परिचय
रावण राजा राक्षसांचा
लेखक: शरद तांदळे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
"मी खरोखरच खलनायक होतो,की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक!" इति…रावण राजा राक्षसांचा
लोकमान्य टिळक ग्रंथसंग्रहालय आयोजित तिसरे पंचक्रोशी साहित्य संमेलनात रावण कादंबरीचे लेखक श्री शरद तांदळे यांचे ‘रावण-राजा राक्षसांचा’ या कादंबरीचे लेखन कसे घडले.हे मनमोकळ्या शैलीत, गप्पांसारखे संभाषण ऐकल्यावर कादंबरी वाचनाची उत्सुकता निर्माण झाली.मग काय? लगेच ऑन लाईन बुकिंग केले.अन् हातात पडल्यावर कुतूहलाने वाचायला सुरुवात केली.
आत्तापर्यंत रामायणातील खलनायक व्यक्तिरेखा खरंच महानायक असेल काय? मलपृष्ठावरील ‘ब्लर्ब’ वाचताच ‘रावण’ कादंबरीची आशयगर्भिता आणि वेगळेपण लक्षात येते..
नवनिर्मिती ही आनंद देणारी अनुभूती असते.महादेव म्हणजे निसर्ग निर्माता आणि आदिशक्ती.निसर्गातील प्रत्येक जीवाची उत्पत्ती ही लिंगापासून होते. जीवनात संघर्ष करण्याचे धैर्य असावे लागते.महादेवावर श्रध्दा आणि विश्वास ठेवावा लागतो.
आयुष्याच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करणाऱ्या पिताश्रींना ही कादंबरी अर्पण केली आहे.प्रारंभीच रावणाची वंशावळ तीन विभागात समाविष्ट केली आहे.तर देव-दानव-दैत्य तक्ता आलेखित केला आहे.
लेखक आपल्या मनोगतात व्यक्त होताना अधोरेखित करतात की,"प्रदेश वारी करताना पहिल्यांदा विमानात बसलो;तेंव्हा रामायणातील रावणाची आठवण आली. पौराणिक कथेनुसार रावणाकडे विमान होतं.मग रावणाला जाणून घेण्याची उत्सुकता जागृत झाली.भारतात आल्यावर पुस्तके मिळवून संशोधन कार्याला वाहून घेतले.
शिवतांडव स्त्रोत्र ,रावणसंहिता,कुमारतंत्र लिहिणारा, बुध्दिबळ आणि रुद्रवीणा निर्मिती करणारा विद्वान रावण खलनायक कसा? या विचाराने गारुड केल्याने सुचेल तसं लिखाण करत गेलो.अन् कादंबरी आकारास आली."
सिनेमा अन् मालिकांतील कथा प्रसंगात रावणाची व्यक्तिरेखा रंगवून सांगितली आहे.या घटनांकडे कानाडोळा करुन संशोधनात्मक दृष्टीने कादंबरी मांडली आहे.
या कादंबरीत एकोणतीस प्रकरणात रावणाचा जीवनपट उलगडून दाखविला आहे.लेखकाने संदर्भ साहित्याचा सूक्ष्मपणे अभ्यास करून संशोधन पध्दतीने रावणाची दुसरी बाजू कादंबरीत मांडली आहे.मी पासून सुरू झालेली कादंबरी संपलो पर्यंत रेखाटली आहे.यातील प्रत्येक वळण माहित नसलेल्या घटनांची ओळख अनपेक्षित आलेल्या वायदुळी सारखी वाचकांना करून देतात. विवेचन वर्णन आपणाला वाचताना तहानभूक हरपवते. इतकी ताकद लेखन शैलीत आहे. लेखणी खरोखरीच मंत्रमुग्ध करते.तहानभूक हरवते
त्या काळातील ज्ञानसाधना,आश्रमपध्दत, मातेने सहन केलेल्या यातना ,उपभोगलेले आयुष्य यावर पेटत्या ज्वालेप्रमाने प्रसंगांचे वर्णन वाचताना मन हळवं होतं. आजोबांनी दशग्रीवाला सांगितलेली महादेवाची अलौकिक माहिती ऐकून महादेवाला भेटायची इच्छा निर्माण झाली.वेद हे सागराप्रमाणे विशाल असतील तर त्या विशाल ज्ञानाच्या सागरात पाठांतर करत किनाऱ्यावर बसायचं नसतं तर प्रत्येक लाटेच्या उगमावर स्वार होऊन त्याचा तळ अनुभवण्याची इच्छा होऊ लागली. 'ओम'म्हणजे अनंत शक्तींचा स्त्रोत असून विश्वनिर्मितीचे स्पंदन आहे.तर वातावरणातील सर्व कंपनांचा निर्माता आणि सूर्य किरणांचा नाद म्हणजे ओम्. ध्यानाची अनुभूती घेऊन ओम् च्या जवळ जाऊ लागलो.आजोबाच्या सहवासाने क्रोध आणि द्वेष कमी होऊ लागला.पण प्रतिशोधाचा अग्नि मनातून विझत नव्हता.
देव दैत्य आणि दानव यांच्यातील सत्ता संघर्षाचे विश्लेषण अप्रतिम केले आहे.निसर्ग,गाई,अन्नधान्य आणि कश्यपसागर यासाठी त्यांच्यात संघर्ष झाला होता. “शारीरिक संघर्षापेक्षा वैचारिक संघर्षातून मोठे यश मिळते’’हा आजोबांचा शुभाशीर्वाद घेऊन तिन्ही भावंडे ब्रम्हदेवाच्या आश्रमाकडे मार्गस्थ झाले.
या आश्रमाचे वर्णन वाचताना तर प्रत्यक्ष आपणच भेट दिल्याची अनुभूती येते.मनाची अस्वस्थता त्यांच्या लक्षात आल्यावर ब्रम्हदेव म्हणाले,“जो विचार चेहऱ्यावरील भाव बदलतो त्या विचाराला ताब्यात ठेवण्यासाठी ध्यान करणं गरजेचं असतं.”या विचारानेच आम्ही ज्ञानग्रहणास शुभारंभ केला. मूकसंवादाने प्रसन्न चेहऱ्याने स्मितहास्य करण्याची नारदमुनींची कला तर अप्रतिम!सगळेच त्यांचे आदर करायचे.
हृदयाची स्पंदने एखाद्या गोष्टीवर एकाग्र झाली की,त्यावर उमटणारे साचेबद्ध शब्द म्हणजे काव्य.महादेवाशी रावणाचं नातं हृदयाचं आहे.त्यामुळे रावणाच्या काव्यात फक्त महादेव हाच आशय आणि विषय.नदी सारखं शांत रहात मिळेल ते ज्ञान घ्यायचं. समाविष्ट झालेल्या घाणीचा विचार न करता उगमापासून मार्गक्रमण करत शांतपणे सागराला मिळते.
रावण म्हणतो की,“मी पंडित अथवा तत्ववेत्ता होण्यापेक्षा नवीन संस्कृतीचा संस्थापक होणार आहे.” असूरराजा होण्याचं त्याचे स्वप्न सुमाली आजोबा पूर्ण करतात.समानता ही माणसामाणसात असावी.राज्याची उभारणी करायला शौर्य,धन आणि आक्रमण वृत्ती लागते.तर संस्कृती टिकवायला ज्ञानी विचारवंतांची फौज लागते.आणि संस्कृती टिकवायला विशाल हृदयाचे राज्यकर्ते लागतात.आजोबाच्या मदतीने असुर,दानव, दैत्य आणि इतर जमाती एकत्र करून फौजेची उभारणी करायला सुरुवात केली.
शुक्राचार्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यास आजोबा आणि दशग्रीव जातो.त्यांना साम्राज्याचे मुख्य आचार्य होण्याची विनंती करतात.पण ते स्पष्ट नकार देतात.मुझरिस बंदरावर हल्ला करून बेचिराख करतात.या हल्ल्यात मोठा खजिना त्यांच्या हाती लागतो.आणि लंकेवर आक्रमणाचा मनोनिग्रह करतात.सैन्य तयार होऊ लागते.
लंकेवर आक्रमण..यक्षसेना आणि राक्षससेनेत घनघोर रणसंग्राम होतो.लंका ताब्यात घेतल्यावर कूबेराची ऐश्वर्यसंपन्नता पाहून दशग्रीवा आणि बंधुचे डोळे दिपून जातात.आजोबा त्यांना लंकाधिपती असे म्हणतात.मग दरबार भरवून राज्याची सूत्रे संचलित करतात.धनसंपदा वाढण्यासाठी करभार वाढविण्यासाठी प्रयत्न करतात.
असुर सेनेत नवीन भरतीसाठी दक्षिणेकडे मार्गस्थ होतात.दुर्गम भागातील जंगलात राहणाऱ्या जमातीतील युवक सैन्यात भरती करुन घेतात.साम्राज्य उभारायला शौर्य,धन आणि आक्रमक वृत्ती लागते.तर संस्कृती उभी करायला ज्ञानी विचारवंतांची फौज लागते. आणि ती टिकवण्यासाठी विशाल हृदयाचे राज्यकर्ते लागतात. असुर,दानव आणि दैत्यांनी कायम व्यक्ती पूजेला महत्त्व दिले आहे.
शुक्राचार्यांच्या आश्रमास भेट, तदनंतर लंकेवर आक्रमक करुन कुबेराचा प्रतिकार केला.आणि प्रतिशोध घेतला.पण राक्षसांचा राजा होण्यासाठी राज्याभिषेक करणेपूर्वी विवाह होणं महत्त्वाचं आहे हे आजोबा दशग्रीवास सांगतात. आजोबांनी सगळी लंका फेरफटका मारत दाखविली. तेंव्हा दशग्रीव उत्सुकतेने लंका बघत असतो.लंकापती दशग्रीवाचाऽ विजय असोऽऽ.या जयघोषाने रावणाचे अंग रोमांचित होते. समुद्रावर आपलंच राज्य असावे म्हणून रावण गलबत लुटारूला मृत्युदंडाची शिक्षा देतो. त्याचे एकेक अवयव पेटत्या अग्निकुंडात टाकले जातात.या कृत्यामुळे इतर लुटारू, व्यापारी आणि सैनिक हादरुन घामाघूम होतात.रावणाची जरब आणि दहशत निर्माण होते.त्याप्रसंगी राजा आवेशात बोलतो की, “त्रैलोक्यातील सर्वात क्रूर आणि निदर्यी राजा मी आहे. समुद्र माझ्या मालकीचा असून त्यातील एका जरी गलबतावर कोणी हल्ला तर त्याला आणि त्याच्या आप्तांना भाजून खाईन.समुद्र लंकाधिपतीचा आहे.त्यातील मासे सुध्दा मला विचारल्याशिवाय पकडायचे नाहीत.”
प्रत्यक्ष महादेवाची भेट झाल्यावर त्यांनी दिलेलं नाव लंकाधिपती रावण ,ज्यांनी ज्यांनी कपट कारस्थाने करून रावणाच्या मातेला छळले राक्षस परिवाराला छळले त्यांचा प्रतिशोध घेतलेला आहे.राजा रावणाच्या अंतरंगातील घटना या कादंबरीतून उलगडून दाखविल्या आहेत.मी पासून सुरु झालेलं लेख संपलो पर्यंत एकोणतीस लेख आहेत. मी, पौलस्त्य,इतिहास,नर्मदा परिक्रमा, ज्ञानार्जन, ब्रम्हदेव, बंडखोर,आई,मी मरणार नाही,क्रूरता, दक्षिणेकडे,राजा राक्षसांचा, शुक्राचार्य,लंका, विवाह,प्रतिशोधाचा शेवट, रावण,आर्यवर्त,यम आणि वरुण,मातृहत्या,लंकानिर्मिती, इंद्रजित, शूर्पणखा,सीता,स्त्री-मन,वालीहत्या, लंकादहन,
युध्द प्रारंभ आणि संपलो.या कादंबरीतून रावणाच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या व्यक्तिरेखा समजतात.युवा लेखक शरद तांदळे यांनी जिज्ञासेपोटी संशोधन करून अतिशय सुंदर शैलीत या कादंबरीचे लेखन केले आहे.
परिचयक :श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment