पुस्तक परिचय क्रमांक:१५५ गारंबीचा बापू
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१५५
पुस्तकाचे नांव-गारंबीचा बापू
लेखकाचे नांव-श्री.ना.पेंडसे
प्रकाशक-कॉन्टिनेन्टल प्रकाशन , पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०१८पुनर्मुद्रणे
पृष्ठे संख्या–२५६
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१५५||पुस्तक परिचय
गारंबीचा बापू
लेखक: श्री.ना.पेंडसे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ ही प्रादेशिक कादंबरी १९५२साली प्रकाशित झाली आहे.मराठी साहित्यात एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. अन् ते ही कोकणातील पारंपरिक, कर्मठ वातावरणात! यातल्या अफाट कर्तृत्वाच्या बापूमध्ये अनेकांनी स्वत:ला कल्पिले आणि राधासारखी विलक्षण प्रेयसी आपल्यालाही लाभावी असं चित्रही मनोमन रंगवलं. ‘गारंबीच्या बापू’ ची मोहिनी अनेक पिढ्या टिकली.नव्हे, आजही टिकून आहे! याच कादंबरीवरील ‘गारंबीचा बापू ‘मराठी सिनेमा लोकप्रिय झाला आहे.
प्रसिद्ध लेखक श्री.ना. पेंडसे यांची गारंबीचा बापू ही एक लोकप्रिय कादंबरी. हर्णे बंदराच्या परिसरातच वाढलेली ही कादंबरी. हर्णे,मुरुड,आंजर्ले, मुर्डी ही बंदरपट्ट्याची गावं. दापोली इथला रमणीय परिसर या निसर्ग आणि भावणारी माणसं. या कादंबरीतल्या सर्व व्यक्ती आणि प्रसंग काल्पनिक असले तरी लेखक श्री.ना.पेंडसे यांनी आपल्या शब्दशैलीने कादंबरीत जिवंतपणा आणलाय.'गारंबी' गावचे गावपन, वाडीवाडीचा संघर्ष मध्यवर्ती नायक असलेल्या बापूचे जीवनगाणे छानश्या शब्दसाजात रेखाटले आहे. स्थळकाळाचे वर्णन तर पर्यटनास उत्सुक करते.निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या दानाचे पण गारंबीकरांना चीज करता आले नाही.असे ते म्हणतात. लेखकाचे बालपण कोकणातील मुर्डी गावी गेलेलं आहे.
त्यामुळे कोकणातील गावं नद्या नाले साकव आंबा फणस सुपारी अननसाच्या बाग त्यांना पाणी देणारा पाट आणि बागा भिजवण्यापायी होणारी भांडणं छान शब्दात मांडली आहेत.
अण्णांचे जावईबापू ऐटबाज वागणारे.नाना व्यवसाय केले.पण त्याचा जम बसला नाही. त्यामुळे लाखांचे बारा हजार झाले.आणि मग अण्णांना निस्तरायला लागायचे.त्याच जावयाचे सपाट बापूचे पुलावर हॉटेल होते.त्याच्या उधळ्या स्वभावाने अण्णा खोत चिडत. जावयाचा मुख्य धंदा म्हणजे विठोबाच्या बापूविषयी काहीनाकाही कुभांड रचत राहणं हा त्याचा साईडबिझनेस झाला. तर अफाट बापू धडाकेबाज होता.सारंच अफाट. पैसा कसा मिळवावा आणि कुणावरही खर्च करताना हात आखडता न घेणारा… पुलावरल्या रावजीच्या हाॅटेलात सदापडिक असायचा..कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचं बाळकडू तो बापापासून शिकला होता.बापूची शक्ती आणि किर्ती हळूहळू वाढत होती.त्याची जानपहछान सगळ्यांशी होऊ लागली.अन् त्याने माणसं जोडायला सुरूवात केली.
खाऊन पिऊन सुखासमाधानाने जगणारं विठोबा सामलचं कुटुंब.साधाभोळा बापू,त्याची देखणी पण फटाकडी बायको एश्यी,त्यांचा मुलगा बापू,भूतवाडीची मावशी,राधा आणि अण्णा खोत.विठोबा अण्णाच्या घरचा पाणक्या अन् पडेल ते काम करणारा.वडिल बापूचा लाडलाड करणार तर आई तिटकारा करणारी. अश्याच वातावरणात तो लहानाचा मोठा झाला.त्याला अफाट बापू म्हणायचे ते उगीच नाही. तो बेडर होता.स्वतःच्या हिमतीवर जगला.योग्य अयोग्यतेच्या जगाच्या व्याख्या गुंडाळून ठेवल्या त्याने.आपल्या जीवनात गारंबीला चघळायला अनेक विषय त्याने दिले. त्याच्या संपूर्ण जीवनाचा आलेख शब्दबध्द केला आहे.आईने फटकारलेलं त्याला खपत नाही.गारंबीचा उभा दावा ज्या गुरवांशी होता त्यांच्याशी याची दोस्ती.केवळ बामणवाडीतील दिनकराशी दोस्ती.पण तोही इतरांदेखत बापूला भेटत नसे.निवांतपणे उठणे.मग नदीवरून जाऊन केतकीच्या जाळीत मस्तपैकी स्नान करणं. साकवावरुन पलिकडं व्याघ्रेश्वरला जाणं लहर आली तर कड्यावरील गणपतीला जाणं. मग गुरववाड्यात बैठक मांडणं.अन् संध्याकाळी पुलावर बसणं. बापूचं जीवन घडविण्याचं काम खरंतर पुलाने केले आहे.गारंबीच्या कुटाळकीचा विषय म्हणजे 'बापू'यमीवर कोणीतरी केलेल्या कर्माचा वहीम बापूवर येतो.सगळ्या गावात बोभाटा झाला. हे देवळात दिनकराकडून ऐकल्यावर त्याची बोबडीच वळली.सगळ्यांनी कट करून हे पाप माझ्या माथी चिकटविलं.हे सारं खोटं आहे असं तो बापाला आणि मित्राला सांगायचा. या भितीपोटी तो घरकोंबड्यासारखा घरातच राहायचा.अजिबात बाहेर पडला नाही.काही दिवसांनी अण्णांनी कोंडात दंड भरून यमीचे प्रकरण मिटवून टाकले.हे विठोबा आणि मावशी बापूला सांगतात.त्याच्यावरील आळ गेल्यावर तो घराबाहेर पडतो.पण बापू अण्णांच्या उपकाराचा तिरस्कार करतो.
रावजीच्या हॉटेलमध्ये बसून बापू त्रिकोणाशी बांधला गेला.मोटर ड्रायव्हर आणि क्लिनराशी त्याची दाट ओळख झाली.पुलावर आले की ते 'बाप्या' अशी हाळी मारल्याशिवाय पुढं जाणार नाही.बापू माणसं जोडून राहिल्याने रावजीच्या हॉटेलात गिऱ्हाईकांची वर्दळ वाढली. स्वच्छता ठेवायला लागली.मग रावजीच्या हॉटेलचा कायापालट बापूनेच केला.बापू जबानीचा आणि दिलाचा सच्चा होता.प्रामाणिक होता .तो पायगुणी होता असं रावजीला वाटायचं. काही दिवसांनी रावजीच्या ऐवजी बापूचे हॉटेल लोकं म्हणू लागली.अन् रावजी मोकाट सुटला. तो गांज्याच्या आहारी जाऊ लागला.अन् घरी बायकोकडं सारखा जाऊ लागला. अन् एक दिवस बापू चिलमीचा झुरका मारताना त्याला रावजीची बायको राधा नजरेस पडते.तिचं सौंदर्य पाहून तो शरमिंदा होतो.स्वत:च्या दळभद्री पणाला शिव्या मोजतो.
तीन दिवसांच्या तुफानी मुसळधार पावसाने सारे जलमय झाले. अन् साकव कोसळला.त्या पावसाने साकवाच्या सुरमाडावर विठोबाचा हातात घट्ट कळशी धरून पडलेला देह राधाला दिसला.त्याच्या मृत्यूचे रहस्य दिनकरने बापूला सांगितले.
पहाटेचं महाशिवरात्रीला व्याघ्रेश्वरला राधा बरोबर जाताना बोंडलीत विठोबा दिसल्याचा भास होतो.तर एकदा विठोबा बोंडलीजवळ दिसणं.विठोबाचं ऐकून तो मोठा माणूस होता होण्यासाठी आणि चिकार पैसा कमवायला तो साखर पेंडीच्या बाजारात मुसाशेठच्या वखारीत हमालीची नोकरी धरतो.
राधाशी प्रित जडल्याचं तिला सांगणं.हा संवाद
अतिशय परखडपणे मांडला आहे.राधा ही बापू वर कधी फिदा झाली.हे निःसंकोचपणे सांगते.तर इकडं रावजी अंत्यवस्थ असतो.अन् पहाटेचा काळाच्या पडद्याआड जातो.राधा एकटी पडते. मग बापू तिच्याजवळ राहतो.
आई आणि मावशीबर भांडण उकरतो.
तदनंतर गारंबीत बापू पर्व सुरू झाले. हॉटेल झिप्र्याच्या स्वाधीन करून सुपारीचा व्यवसाय सुरू केला.पूलाचे नवीन रुपडे पालटले.धंद्यात त्याचा जम बसतो.बक्कळ पैसा कमवतो.अन् राधाशी संसार थाटतो.बंगला बांधण्याचं मावशीला पत्राने कळवतो.पत्रआई आणि मावशीला देण्याचं काम दिनकरच करतो. गारंबीत टुमदार बंगला बांधला. त्याच्या बंगलीतल्या पडवीत गाडीवानांना मुक्तद्वार होती.तो आता गारंबीतला मोठा माणूस झाला होता.ऐश्वर्यता धनसंपदा आली.अडल्या नडलेल्यांना मदतीचा हात देऊ लागला. कामधंदा रोजगार देऊ लागला.तदनंतर राधेशी लग्न करतो. अपत्य प्राप्ती होते.बापू दिवसभर व्यवसायात गुंतून जातो.पैशाचा धबधबा निर्माण करतो.आता त्याच्या बंगल्यावर व्यापाऱ्यांची वर्दळ वाढलेली असते.बापू स्वत:च्या मोटारीने फिरतो.आता गारंबी बापूला सलाम करु लागली कारण त्यांच्याकडे श्रीमंतीचे वैभव दिसत होते.
किती सुंदर वर्णन केले आहे.मोरुभाऊच्या खड्डीत चिरेबंदी विहीर बांधून तिला 'विठोबाची'विहीर हे नामभिधान करणं. लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली.लोखंडी साकव उभारला.मराठी शाळेची इमारत बांधली.पाटाचे सिमेंटीकरण केले.पुलावर धर्मशाळा बांधली. आता त्याचं स्वप्न होतं गारंबीचा सरपंच होण्याचं. याला अण्णाही होकार देतात.अन् शेवटी बापूची आई जशी बापूंच्या बंगल्यात आसऱ्याला येते.अपेक्षाशून्य प्रेमाचा स्पर्श म्हणजे आई.
पुस्तक वाचून संपल्यावरही त्या काळातल्या कोकणातील गारंबीचे आणि बापूची कहाणी मनात रेंगाळत राहते.इतकं दर्जेदार लेखन लेखक श्री.ना.पेंडसे यांनी केले आहे.
परिचयक :श्री रविंद्र लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment