पुस्तक परिचय क्रमांक:१४६कळवंड



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१४६

पुस्तकाचे नांव-कळवंड 

लेखक- प्रा.आप्पासाहेब खोत 

प्रकाशक- अजब पब्लिकेशन्स, कोल्हापूर 

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २००९ आवृत्ती 

पृष्ठे संख्या–१३६

वाड़्मय प्रकार-कथासंग्रह

किंमत /स्वागत मूल्य--१३०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१४६||पुस्तक परिचय

        कळवंड

लेखक: प्रा.आप्पासाहेब खोत

☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

कृषी जीवनाचे चित्रण ग्रामीण बोलीत आणि गावरान ढंगात ग्राम्य संस्कृतीची ओळख अधोरेखित करणारे ग्रामीण साहित्यिक कथाकार आणि कथालेखक प्राध्यापक आप्पासाहेब खोत.यांचा ग्राम्य भाषेतील कथासंग्रह 'कळवंड'.पाळीव जनावरे आणि पक्ष्यांच्या सहवासात बालपण घालवलं.त्याची ही चित्तरकथा...

   यातील कथांचे बीज अवतीभोवतीच्या परिसराचे. काळीज कप्प्यातील नात्यांचे, शेतीभातीचे आणि शेरडंकरडांचे.शेती करत,शेरडकरडं सांभाळत शाळेची पाऊलवाटही चोखाळली. शेरडीची कोकरं,कोंबडीची पिल्ले , सबसिडीतून म्हैस खरेदी,चिमणीची पिल्लं, चिकण्या बैलाची शर्यत,यांचंही वर्णन वाचताना आपल्या डोळ्यासमोरच घटना घडतात. इतकं बारकाईने लेखन केले आहे.या पक्षी आणि प्राणी यांच्याशी राखोळी करताना त्यांना सतत आईची आठवणी मनात रुंजी घालत असतात. आईचं आभाळात न सामावणारं दु:ख या सगळ्या कथांतून व्यक्त होते.

 कळवंड कथेचे मुखपृष्ठ नावाप्रमाणेच बोलकं आहे.कथेतून खेडेगावातील जीवनाची अभिव्यक्ती संघर्ष,व्यथा आणि वेदना त्यांनी कथानकातून व्यक्त केलेल्या आहेत.बापू आणि बाबू म्हणजेच बापबेटा कष्टप्रद जीवन कसे व्यथीत केले याचे रेखाटन कथा वाचताना समजून येते.शेती आणि जित्राब यांचा शेतकऱ्यांशी असणारं अपार नात्याची माया ममता त्यांच्या कथेतून प्रकटते.या पुस्तकात बारा कथा समाविष्ट आहेत

  वडील बापूच्या संसाराला कर्जातून मुक्त करण्यासाठी ‘तानी’ शेळीने कसा हातभार लावला याची भावस्पर्शी कथा 'तानी' कथेत चितारली आहे.तर हातातोंडाशी आलेल्या जोंधळ्याच्या पीकाचं नुकसान हादग्याचा पाऊस चळकेवर पडून कसं होतंय ते लेखन मनाला भावतं. बापूंनी तानीची करडं विकून पैका जमवला. अन् त्यातून पत्नीच्या आजारपणापायी गहाण ठेवलेली पट्टी (शेतजमीन) सावकाराकडून सोडविलेली असते.शेतात घाम गाळून मशागत करून जोंधळा तरारुन सोन्यासारखी कणसं आलेली असतात. पण पाऊस सारखाच कोसळत राहून त्याने  हैदोस घातला तर भरल्याली कणसं काळी पडतील.तोंडचा खास पळवला जाईल.काय आणि कसं पाऊस करतोय या चिंतेने  व्याकुळता होतेय.त्यामुळे होणारी मनातली अस्वस्थता 'घालमेल' कथेत मांडलीय. 

बापलेकाचं मळेकरी होणं अलवारपणे ओजस्वी शब्दात शब्दबद्ध केले आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाचं पोट दुसऱ्यांच्या पोटावर असते.याची सत्यता ‘पोटावरचं पोट’कथेतून अधोरेखित करते.

शेतात उंदीर होणं.त्यांचं बीळ उकारल्यावर  भुईमुगाच्या शेंगातील उंदरांची पिल्लं बघितल्यावर मनात कालवाकालव होणं.त्या घटनेचं वर्णन वडिलांना सांगितल्यावर ते म्हणतात की,’उंदरांची पिल्लं तरी मारायचीस.तु मारली न्हाई म्हणुन ती कावळे त्यांना सोडतील व्हय.ती कधीच फडशा पाडतील. असं म्हणल्यावर लगेच जेवण तसंच ठेवून बीळाकडे लेखकाचे जाणं. अतिशय सुंदर चित्रण त्या प्रसंगाचे केले आहे.ते म्हणतात की,”मी गव्हाला पाणी पाजतो-पोटासाठी”

“उंदराने शेंगा गोळा केल्या -पोटासाठी”

“कावळ्याने उंदराची पिल्लं खाली -पोटासाठी”

“आणि सापाने उंदराला पकडले -पोटासाठी”

हे आठवून त्यांना गलबलून आलं.डोळं पाण्यानं भरून आले.आभाळात नजर गेली तर तिथे सापावर नजर ठेवून घार घिरट्या घालीत होती भुकेच्या नजरेने….

कोंबडीची रवणी तिची पिल्लं यांची छान कथा ‘गब्रु’रंगवली आहे.कोंबड्यांना अचानक महामारी आल्यावर अख्खं डालगं कसं मोकळं होतं.ती पिल्लं कशी काढते.आदी प्रसंग शब्दांच्या तुऱ्यात छान व्यक्त केलाय.

  बॅकेचे कर्ज प्रकरण म्हैस घेण्यासाठी काय यातना कराव्या लागल्या. कागदपत्रं गोळा करण्यापाई कुणाकुणाचं हात ओलं करावं लागलं.म्हैस खरेदी करताना व्यापाऱ्याने फसवणूक केल्यामुळे दहाहजाराच्या म्हशीचं पुन्हा विकताना पंधराशे रुपये येतात आणि बॅकेचे सबसिडी मंजूर झालेले पत्र येते.तर दुसरे पत्र शिल्लक रक्कमेचे हप्ता भरण्याची नोटीस आल्यावर बापलेकाची होणारी घुसमट ‘सबसिडी’ कथेत चितारली आहे.

 हायब्रीडची पाखरापासून राखण करायला शेतात माळा घालतात.लेखक रोज सकाळी सायंकाळी गोफणीने पाखरांना भिरकावून दगड मारत असतं.तेव्हा एका चिमणीला दगडाचा घाव वर्मी बसतो.तेंव्हा त्यांना गुरुजींनी शाळेत चिमणी विषयी आठवलं. नजरेसमोर आल्यावर मन उदास झाले.तो जखमी चिमणीचा प्रसंग ‘सुगरण’ या कथेत अलवार आणि हळव्या शैलीत मांडला आहे.पिलांची आई सुध्दा मातृहृदयी असते.ही कथा वाचताना समजते.

  बैलगाडी शर्यत म्हणजे थरार ,ग्रामीण भागाचा श्वास.रांगडा आणि मर्दुमकी गाजवणारा खेळ.जिगरबाजचं या खेळाचे धाडस करतात.असा खेळ गावच्या जत्रेत -ऊरसात आयोजित केला जातो.त्या खेळाचे बहारदार वर्णन खास ग्राम्य ढंगात ‘राऊंड’ कथेत रंगविले आहे.  

शेतकऱ्यांच्या सोबतीने शेतात राखणीला विश्वासू असणारं श्र्वान .त्याच्या जीवावरच शेताची राखण रातच्याला होणार.इतर कुणालाही काडी सुध्दा उचलण्याची मुभा न देणारा कुत्रा 'सर्जा ' तो पिसाळलेला आहे हे समजल्यावर त्याच्या पराक्रमाच्या करामती डोळ्यासमोर तराळतात. अतिशय भावस्पर्शी शब्दसाजात त्याने मळ्याच्या राखणीची कामगिरी वेळोवेळी कशी फत्ते केली.याची महती 'सर्जा' कथेतून घडते.

  वानरांचा कळप शेतात कसा धुमाकूळ घालत पीकाचा फडशा पाडतो .त्या उपल्याचा लळा लेखकाला मळ्यात काम करताना लागला होता. सकाळी उठल्यावर मसरांचा गोठा साफ कसा करायचा.शेरडीची धार कशी काढायची. चुलीवर च्या कसा बनवायचा यांचं छान वर्णन 'गवनेर'कथेत रेखाटले आहे.त्या वांडराच्या करामती आपणाला या कथेत वाचायला मिळतात. लेखकाचा जिगरी दोस्त गवनेर झाला होता.कारण पायाला इजा झालेल्या, तहानलेल्या या वांडराला बादलीभर पाणी पाजण्याचं काम लेखकाने केले होते.या मुळेच तो मळ्यात नासधूस करायचा नाही.तो आंब्याच्या शेंड्यात उंचावर बसायचा म्हणून त्यांचे नामकरण लेखकाने 'गवनेर' असं केले आहे. 

 कळपाचं नायकत्व सिध्दतेसाठी होणारी नर वानरांच्यातील हाणामारी म्हणजे ‘कळवंड’ कळपाचं स्वामित्व वरचढ होणाऱ्या,शिरजोरी करणाऱ्या वांडराला मिळते.ती मजेशीर कथा रेखाटली आहे. खर तर ‘कळवंड’हा चपखल शब्द प्रयोग माणसाचं जगणं सुध्दा सांगणारा आहे. अतिशय सूक्ष्मपणे वांडरांचं निरीक्षण आणि अभ्यास करून ही कथा खुलविली आहे.ही कथा वाचताना जेष्ठ साहित्यिक कथाकार व्यंकटेश माडगूळकर यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ‘सत्तांतर’कादंबरीची आठवण येते.

  पन्नाशीच्या दशकात पूर्ण नावाऐवजी शिक्षकांची नावे संक्षिप्तपणे वर्गात पाटीवर लिहलेली असत.खा.वा.चिरमुरे या प्रमाणे असतं.प्राथमिक शाळेतील दुपारच्या सुट्टीत मित्रांच्या बरोबर केलेल्या गमतीजमती अतिशय खास गावरान शैलीत ’आ.ना. घोळ’ या कथेत रेखाटल्या आहेत. आ.ना. घोळ म्हणजे आकाराम नारबा घोळ.

एके दिवशी शाळा तपासणीला आलेल्या साहेबांपुढे मुलांची कशी भंबेरी उडते.याच सुंदर शब्दांकन केले आहे.तर भाबडा असणारा आकाराम मनमोकळे करून उत्तर देण्याचा प्रयत्न करताना.अख्खा वर्ग हास्यात बुडतो.तदनंतर प्रत्येक वर्गातल्या गुरुजींच्या पाट्या वाचून त्यावर मिश्किल कोटी आकाराम करून सगळ्या मित्रांना हसवितो.ती कथा ‘आ.ना.घोळ’नावा सारखीच विनोदी घोळ घालतो. तोच आक्या म्हव काढताना जायबंदी होतो.त्याला लेखक बघायला जातात.तर कमरं घालून त्याचं शरीर लुळं पडलेलं असते.लेखकाचा हात हातात घेऊन तो म्हणतो,की “बापू!ह्यानंतर मी बघ आता जगत न्हाय रं!खरं तू हुषार हाईस, शीक.लई मोठा हो!माझी शपथ हाय तुला! ”

त्याच्या अकाली जाण्याने माझ्या कानात त्यांचे शब्द सतत घुमत असतं.

‘वाटा’अतिशय भावस्पर्शी कथा आहे.मळ्यात काम करणाऱ्या बापलेकाची कथा.मळा आपलाच होईल अशी आस लागलेली असताना.तात्या,काकाच्या मुलांना जादा पैसे देऊन मळा खरेदी करतो.जो कायम बापूचा दुस्वास करणारा असतो.मळा न मिळाल्याने बापूने हाय खाल्ली असते. त्यावेळी लेखकाचे चिरमुरे गुरुजी येऊन त्यांना समजावितात.आपण मातीवर प्रेम करणारी माणसं.तुझा या मळ्यातील वाटा सुटला म्हणून तुला  मी नवीन वाट दाखवतो! या तुझ्या बाबूला,मी ज्ञानाची वाट दाखवितो. ज्ञानाच्या मळ्याचा वाटा दुसऱ्या कोणालाही भागानं करता येत नाही.ज्यानं त्यानं स्वतःचा मळा फुलवायचा.जगात ज्ञान असं आहे की, एकदा मिळालेली शिदोरी आयुष्यभर पुरते. ”बापू तुझा मुलगा शिकून मोठा होईल.आणि शिक्षक म्हणून याच हायस्कूलवर काम करील…’वाटा’सुटला म्हणून बापलेकांना ‘वाटा’शोधण्याची वेळ आली.गुरुजींनी लेखकाला पुढील शिक्षणाची वाट दाखविली.गुरुजींच्या नजरेत न मावणारे आभाळ तर बापूच्या नजरेत न मावणारे दु:ख लेखकाला दिसले.

अतिशय सुंदर शब्दात शेतीचं अजोड नातं जोडत मळ्यातली कामं, वडिलांनी आईच्या मायेने केलेली जपणूक,जित्राबं, पाळीव पक्ष्यांच्या,सुगरणीच्या आणि वांडरांच्या संगतीने घडलेलं बालपण आणि शाळकरी वयातले शिक्षण संस्कार कसे घडत गेले. याची कथा ‘कळवंड’मध्ये गोष्टीरुपात रेखाटली आहे..लेखणीस सलाम!!!


परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 


Comments

  1. ग्रामीण जीवनशैली समर्पक शब्दात मांडली आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड