पुस्तक परिचय क्रमांक:१४९ रिंगाण
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१४९
पुस्तकाचे नांव-रिंगाण
लेखकाचे नांव- कृष्णात खोत
प्रकाशक-शब्द पब्लिकेशन, मुंबई
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- फेब्रुवारी २०२४
सहावी आवृत्ती
पृष्ठे संख्या–१६५
वाड़्मय प्रकार- कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--३९०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१४९||पुस्तक परिचय
रिंगाण
लेखक: कृष्णात खोत
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षणीय ठरावी अशी लोकप्रिय साहित्य अकादमी पुरस्कार विजेती 'रिंगाण' कादंबरी आहे. गावगाडा आणि गावगाड्यातील बदलती जीवनशैली आणि जगण्याचा संघर्ष हा लेखक कृष्णात खोत यांच्या लिखाणाचा मुख्य विषय आहे.
शिक्षणाचा गंध नसलेल्या आणि साहित्य विश्वाशी संबंध नसलेल्या घराण्यात जन्मलेले कृष्णात खोत यांना यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणे, ही एक महत्त्वपूर्ण घटना म्हणता येईल. रूढ अर्थाने लेखन-वाचन परंपरेशी संबंध नसलेले समाजघटक लिहिते होऊन बराच काळ लोटला असला, तरी या घटकांचे अनुभव, सुख-दु:ख, व्यथा-वेदना साहित्यात अधिक प्रमाणात उमटणे गरजेचे आहे.
खोत यांच्यासारखे संवेदनशील आणि गावगाड्याचा वेध घेणारे लेखक ही गरज पूर्ण करीत आहेत.ग्रामीण जीवन टिपणाऱ्या कादंबरीकारांमधील एक आश्वासक नाव असलेले खोत मूळ शेतकरी कुटुंबातील आणि पेशाने शिक्षक. त्यांची नाळ ग्रामसंस्कृतीशी किती घट्ट जुळलेली आहे,याची प्रचिती त्यांच्या ‘गावठाण’, ‘झडझिंबाड’, ‘धूळमाती’, ‘रौंदाळा’ अशा अनेक कादंबऱ्यांतून येते .त्यांनी या कादंबरीतून ग्रामसंघर्ष मांडला. बदलते खेडे,उद्ध्वस्त होणारी ग्रामसंस्कृती हे विषय त्यांच्या लेखनाच्या केंद्रबिंदु आहेत. ‘रिंगाण’मध्ये त्यांनी विस्थापितांचा संघर्ष मांडला. नव उत्क्रांतवादाची दिशा काय असेल, यावर भाष्य करत विस्थापित धरणग्रस्तांचा संघर्ष टिपलेल्या त्यांच्या ‘रिंगाण’वर मुद्रा उमटवून साहित्य अकादमीने त्यांना सन्मानित केले आहे. ग्रामसंघर्ष, धरणग्रस्तांच्या अनंत यातना, जगण्याची स्पर्धा या साऱ्यांचे खोत यांनी ज्या संवेदनशीलतेने चित्रण केले आहे, तितक्याच संवेदनशीलतेने त्यांना दाद मिळाली. इतरांच्या प्रगतीसाठी जेव्हा विस्थापित म्हणून आपल्या भूमीशी असलेली नाळ तुटते,तेव्हा धरणग्रस्तांची व्यथा आणि तेथील मुक्या जनावरांची अवस्था टिपणारी ही कादंबरी अस्वस्थ करते.गावगाड्यातील जीवनानुभव हे त्यांच्या कादंबरीचा मुख्यतः आशय आहे.वास्तव आणि जीवघेणे प्रश्न, निसर्ग आणि माणूस, डोंगरदऱ्या आणि जंगल,माणसाळलेली जित्राबं यांच्या संघर्षांचे चित्रण आपणाला पानोपानी वाचायला मिळते.ज्याप्रमाणे विस्थापितांचे जगणं उलगडून दाखविण्याचे धरणग्रस्तांचे चित्रण विश्वास पाटील यांनी 'झाडाझडतीत'केले आहे. त्याचप्रमाणे 'रिंगाण'वाचताना त्याच शैलीची आठवण येते.लेखक कृष्णात खोत निसर्ग,मानव आणि प्राणी यांच्यातील सहसंबंधाची दिशा आणि दशा दाखवितात.
सरकारने पुनर्वसन केलेल्या गावात वस्ती करून राहताना आणि शेती करताना गावातल्या लोकांचा हरेक घटकेला विरोध निर्माण होतो.त्यांना प्रतिउत्तर देताना देवाप्पाची काय अवस्था होते?याचं अस्सल चित्रण गावरान भाषेत मांडले आहे. विकासाच्या डांगोरा पिटत जंगलातील मायभूमीपासून गावपांढरीपासून विभक्त केल्यामुळे दिलेल्या गावठाणात अस्वस्थतेने जगावं लागतं.त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या झोळंबी गावची,देवाप्पाची,त्याच्या आईवडीलांची आणि त्यांच्या म्हशींची कथा म्हणजे'रिंगाण'..
आपल्या गावाला भेटायला,झाडपेरं, वडंओगळं, दऱ्याखोऱ्या भटकायला आणि म्हशींना शोधण्यासाठी आईच्या आग्रहाखातर देवाप्पा दोन साथीदारांना संगती घेऊन जंगलभूमीत जातो.प्राण्यांचा सहवास बदलल्याने म्हशी हिंस्र रुपात अवतरतात. दोघांच्यातील जीवघेण्या संघर्षाचा खेळ शब्दबध्द केला आहे. रक्तांचे चिंदके आणि मांसाच्या विखुरलेपणात म्हशींच्या रिंगणात देवाप्पाचा करुण अंत होतो. देवाप्पा अन् मुदीवाली म्हशीतील कडेलोटाच्या संघर्षात देवाप्पाचा ‘रक्तमांसाचं रिंगण’ होतं.हद्द गाठणं आणि हद्द सोडणं आणि परत हद्दीच्या शोधाची ही यात्रा आहे. आपल्या हद्दीचं रिंगण करून उभी असणारी म्हसरं आपली मुळं तुटू देत नाहीत. प्रक्षोभक आणि हिंस्त्र म्हशींच्या आक्रमणात विराट प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर माणूस किरटा, हतबल वाटायला लागतो.
वाघबीळावर जंगलातील सगळी जनावरं येतात.बालपणी याच शिळेवर बसून आम्ही पोरं वाघागत आवाज काढायचो. दगडीवाघ खेळायचो.याची आठवण देवाप्पाला वाघबीळ
पळणाऱ्या म्हशीला कधी दावं लावतोय यासाठी देवाप्पाचं चित्त उतावळं झालं होतं.गावदेवी,गावातली मोडकीपडकी घरंदारं,घरासभोवती वाढलेली काटेरी झुडपे.देवाप्पा कितीतरी वर्षांनी अंधारसावलीत सांडलेलं चांदणं गोळा करीत मनाला ताजेतवाने करण्याचा प्रयत्न करत होता.पण म्हशी नजरेला पडल्यावर जवळ न येता लांबच जात होत्या.
रानावनात फिरणाऱ्या म्हशी हिंस्र श्वापदांना तांगडत होत्या.मागं लागत होत्या.कान टवकारून नजर रोखून बघत होत्या.रिंगण काढून एकटक बघत होत्या. नंतर दिवस उगवता उगवता म्हशींनी चांगलाच तिघांना इंगा दाखविला.देवाप्पाने शिंगात टाकलेला दाव्याचा फास झुगारून देऊन तिघांनाही होलपाडलं. त्यांचाच डाव त्यांच्यावरच उलटवला. झुडूपाआड लपून मुदीवाली म्हशीच्या रेडकाला दावं लावलं.रागरंग बघून रेडकाला पाठकुळीवर घेऊन जंगलातून बाहेर पडणं.अन् म्हशींच्या रिंगणात देवाप्पा अडकणं...मुदीवाली आणि बाकीच्या म्हशींनी चवताळून देवाप्पावर हल्ला चढविला. सगळ्या म्हशींनी रिंगाण घालून त्याच्या प्रत्येक डावाला प्रतिडाव टाकून त्याला रक्त ओकायला लावलं.त्याचा तिथंच शेंदूर लावलेला दगड केला.आभाळाची भुई,भुईंचं आभाळ! देवाप्पाचा दगड,दगडच देवबाप्पा! कोडच कोडं,आडाम ढेंग… म्हसकट,मुतकट,शेणकट वासाचं रिंगण.. मराठी साहित्याला नवा आयाम देणारी कादंबरी..जंगलभूमीतून विस्थापित झालेल्या माणसांची अन् फिरुनी पुन्हा म्हशीला द्यावं लावायला गेलेल्या देवाप्पाची चित्तरकथा…अतिशय समर्पक आणि यथार्थ शब्दांत रेखाटली आहे. विस्थापित मानव आणि प्राणी जीवनाची दिशा आणि दशा शब्दबद्ध केली आहे.
अप्रतिम कादंबरी आहे..
परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
खूप सुंदर, समर्पक शब्दात आशय मांडणी
ReplyDeleteधन्यवाद दोस्त
ReplyDelete