पुस्तक परिचय क्रमांक:१४७मुंगी उडाली आकाशी



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१४७
पुस्तकाचे नांव-मुंगी उडाली आकाशी 
लेखकाचे नांव-  पद् माकर गोवईकर 
प्रकाशक- कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण २०१६ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१५३
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१४७||पुस्तक परिचय
         मुंगी उडाली आकाशी 
लेखक: पद् माकर गोवईकर 
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
महाराष्ट्राचे संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊली, सोपान आणि निवृत्तीनाथ या तीन भावंडांची एकुलती एक बहीण मुक्ताबाई प्रतिभावान, ज्ञानसंपन्न आणि असामान्य व्यक्तिमत्त्वाची होती.त्यांची आई रखूमाई आणि वडील विठ्ठलपंत यांच्या चरित्राचा वेध  'मुंगी उडाली आकाशी'या पुस्तकात अभिवाचक लेखक पद्माकर गोवईकरांनी घेतला आहे.एका वेगळ्याच अंगाने जाणारा हा रसाळ भावस्पर्शी चरित्रवेध मराठी वाचकाला खिळवून ठेवतो.लेखक पद्माकर गोवईकर यांनी १९७१ पासून या भावस्पर्शी कादंबरीचे अभिनव वाचनाचे जाहीर कार्यक्रम केलेले आहेत.
    संत ज्ञानेश्वर या अलौकिक पुरुषोत्तमाचे चरित्र उलगडून दाखवले आहे.या कादंबरीची भाषा विद्याप्रचूर असलीतरी तिला कारुण्य,ममता, वेदना आणि संवेदनाचा स्पर्श आहे.वाचताना आपलं मन हळवं होतं.या कादंबरीची सुरुवातच भावभक्तीचा संगम असलेल्या प्राचीन काळातील  इंद्रायणीच्या काठी वसलेल्या आळंदी तीर्थक्षेत्रातून होते. 
 संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्रातील घटनांचे भावविश्व उलगडून दाखवले आहे.या कादंबरीचे रसग्रहण करताना त्यातील पात्रे आणि घटना प्रसंग जीवंत वाटतात. धर्ममार्तंड आणि कर्मकांड यांचे स्तोम माजलेले असताना संन्याश्याची पोरं म्हणून हिणविणारे धर्माभिमानी ब्रह्मवृंद.आळंदी,पैठण,आपेगाव, नेवासा, त्र्यंबकेश्वर,पंढरपूर या तीर्थक्षेत्रांची विशेषता कादंबरीतून पानोपानी दिसून येते.समर्पक चित्रे,श्र्लोक, अभंगांचा आणि हरेक पानावर माऊलींच्या फोटोचा समावेश केला आहे.तर जीवनवाहिनी अमृतारुपी इंद्रायणी,गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचे वर्णन वाचतच रहावे असे लिहिले आहे. वडिलांच्या संन्यासाची शिक्षा निष्पाप मुलांना होऊ नये म्हणून धडपडणारे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि बळवंतशास्त्री, यांचे वर्णन मनभावन शब्दात चितारले आहे.
      पश्चिम क्षितिजावरची डोंगरमाथ्यावरील
चंद्रकोर पाहताना ज्ञानदेवांच्या भावना तरारल्या.आणि त्यांच्या मुखातून शब्दफुले उमलली, 
पाडव्याची चंद्रलेखा|
केतुली लोभसवाणे देखा| 
अमृताचिया अभिषेका |
ना फेडता म्हणावे| 
जरा चांदणं अंगावर माळून क्षणभर विसावतो.
' शिवाय नमःशिवाय नमः 'मंत्रघोष करत सर्वजण मार्गक्रमणा ब्रम्हगिरीकडे करत होते. विठ्ठलपंत,रखूमाई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई…तेंव्हा अचानक त्र्यंबकेश्वरच्या डोंगरात निवृत्ती हरवतो.त्या प्रसंगाचे वर्णन रसग्रहण करताना अक्षरशः अंगावर शहारे येतात.. अतिशय भावस्पर्शी घटना सुंदर शब्दात लेखक व अभिवाचक पद्माकर गोवईकर यांनी रेखाटली आहे.
संन्यासी आणि संन्याशाच्या मुलांवर उभ्या गावाने वैर मांडले होते.कुणाकडे काही मागायला जावे,तर तोंड मिटून माणसे पाठ फिरवत होती.कुणाकडे आशेने बघावं ,तर स्मृतीभ्रंश झाल्यासारखी माणसं ओळखच देत नव्हती.कुणी मदत देवू केली तर विसोबा सावकार राक्षसासारखे हातवारे करून धमकी देत.ज्ञानदेवांना इंद्रायणीच्या काठावर स्नानासाठी गेला होता.त्यावेळी मोरेश्वर शास्त्रींनी त्यांचा केलेला अपमान आणि नदीत पोहणाऱ्या मुलांनी बाहेर येऊन त्यांच्यावर चिखलफेक करून पळवून लावलेला प्रसंग वाचताना मन द्रवते. आपोआप नेत्रांत अश्रुंची गर्दी होते.अतिशय हृदयद्रावक घटना प्रसंग या कादंबरीतून उलगडून दाखवले आहेत. इंद्रायणी, गोदावरी आणि चंद्रभागा या जीवनवाहिनी अमृतमय नद्यांचे वर्णन तर वाचतच रहावे इतके अप्रतिम आहे.
विद्वत्तेच्या आभाळाखाली असणाऱ्या धर्मक्षेत्री पैठणला  शुद्धिपत्र घेण्यासाठी जाणं.तिथं धर्मसभेत देहान्त प्रायश्चित्त !!! घेण्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर आळंदीला आगमन होणं.हा प्रसंग तर फारच करुणाद्रावक आहे.देहान्त प्रायश्चित्त घेण्यासाठी पतीपत्नीचं इंद्रायणीच्या डोहात उडी घेऊन जीवनयात्रा मुलांच्या भविष्यासाठी संपवणं.निवृत्तीचे आळंदीला येणं, पैठणला बळवंतशास्त्रींना आधार सापडणं. चांगदेव व ज्ञानेश्वर भेट,ज्ञानेश्वर -नामदेव भेट या प्रसंगाचे वर्णन यथार्थ आणि समर्पक शब्दात मांडलेले आहे.
याज्ञवल्क्यस्मृतीवरील मिताक्षरी टीकेतील वचन त्यांनी शोधून काढल्यावर अत्यानंद होणं.,भावंडांचे पैठणला येणं,तिथं रेड्यामुखी वेद वदवून घेणं,ज्ञानदेवाचा ज्ञानेश्वर होणं."मानव जातीचं कल्याण तुलाच करायचे आहे.नियतीने दिलेलं कर्तव्य तुला केले पाहिजे.तू उपजत कवी तत्त्वज्ञ आहेस.खरा धर्म प्रस्थापित कर. तुझ्या हृदयी असलेला परमेश्वर सगळ्यांच्या ठायी आहे.ज्ञाना, ईश्वरी सत्तेचा गौरव होईल,असं तत्त्वज्ञान जगाला सांग.पूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली.तीच गीता तू पुन्हा सांग.''असं निवृत्ती म्हणतो आणि नव्या प्रेरणेने ज्ञानदेव निवृत्तीचा पायावर काव्यफुले वाहतोय,'ऐसी गुरुकृपा होये,तरी करिता काय आपु नोहे|
म्हणवुनी अपार माते आहे, ज्ञानदेव म्हणे|येणे कारण मी बोलेन,बोली अरुपाचे रुप दावीन| अतींद्रिये परी भोगवीन-इंद्रियाकरवु||'
ज्ञाना तुझ्या वाणीच्या उत्सवाला या पैठण पासून सुरुवात कर.भजन-निरुपणाचा श्रावण वर्षू दे.विठ्ठर नामाचा गजर आणि ज्ञानदेवांच्या भजन-किर्तनाचा पाऊस पेटतात पडू लागला.भगवद् गीतेचे निरुपण ऐकून पैठणकरांचा अहंकार अंगातील ताप उतरावा तसाच झरझर उतरु लागला.. ज्या धर्मपंडितांनी त्यांच्या आईवडिलांना देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली होती.तेच पैठणकर ज्ञानदेवा समोर 'जय जय विठोबा -रखुमाई!,जय जय विठोबा- रखुमाई!' आईवडिलांचं नांव भंडाऱ्यासारखं उधळत होते.जणू काही समस्तांकडून वदवून घेत होते.नेवासा तीर्थक्षेत्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली.तिचं वर्णन म्हणजे; मंत्रमुग्ध करणारी शब्दरचना आहे.ज्ञानदेव सांगत होते आणि सच्चिदानंद बाबा लिहीत होते.सरशेवटी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले…
'आता विश्वात्मके देवे|येणे वाग्-यज्ञे तोषावे||तोषोनि मज द्यावे|पसायदान हे||
गीतेचे तत्त्वज्ञान मायबोलीत सांगितले.
'सूर्याच्या उदयास्ताकडे, जन्माच्या पलीकडे.ईशकार्य संपले.समाधी घ्यावी ,असा मानस आहे.'असं ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांना सांगतात.हे ऐकून भावंडे थरारुन गेली.ज्ञानदेवाच्या एकेका शब्दातून त्यांच्यावर वीज कोसळत होती.काळजाचे लचके तुटत होते.ही कल्पनाच प्रसंगापेक्षा भयाण होती.सोपान मुक्ताबाई गलबलून गेली.वेद बोलणारा निवृत्तीनाथ वाचा हरवल्यासारखा झाला.काळजाला वेदनादायी घटना आहे.रसग्रहण करतानाच अंगावर शहारे आले…अप्रतिम शब्दांकन!
किती यथार्थ आणि समर्पक शब्दात शब्द बध्द केले आहे.
वैष्णवांच्या दिंड्या बाहेर निघाल्या. हरिनामाचा गजर करीत दिंड्यापताकांचे दळभार पुढे चालले.मृदुंग वाजत होते. टाळचिपळ्यांचा पाऊस वर्षावत होता.
'जय जय विठोबा -रखुमाई….
निवृत्ती-ज्ञानदेव- सोपान- मुक्ताबाई…' 
'जय जय विठोबा -रखुमाई….
निवृत्ती-ज्ञानदेव- सोपान- मुक्ताबाई…' 
संत ज्ञानेश्वर आळंदीत सिध्देश्वराच्या पुरातन स्थानी अजान वृक्षाच्या सावलीत समाधिस्त झाले.मोगरा फुलून आला,हार विठ्ठलाला गुंफला…कऱ्हातिरी सासवड तिर्थक्षेत्री सोपानदेव समाधिस्त झाले. ज्ञानाचा सोपान चढून गेलो, की मग मुक्ती….प्रलयींच्या विजा चमकू लागल्या.दुसऱ्याच क्षणी डोळे दीपवणारा वीजेचा लोळ धरतीवर कोसळला.अन् क्षणात वर गेला.आभाळाने आपल्या तेजस्वी हातांनी तिला उचलून नेली… निरांजनातील ज्योत आकाशाच्या विजात मिळून गेली.न संपणारे दु:ख उराशी धरून मृत्यू आणि दु:खाच्या पावलांनी त्र्यंबकेश्वरची वाट कापू लागला.वळचणीचे पाणी आढ्याला गेले.
माऊली माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली..
भावस्पर्शी रसाळ शैलीत लेखन केले आहे.

परिचयक:श्री.रवींद्रकुमार गणपत लटिंगे वाई सातारा

Comments

  1. राम कृष्ण हरि ,खूपच भावस्पर्शी लेखन🚩

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड