पुस्तक परिचय क्रमांक:१४४रुजवाई
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१४४
पुस्तकाचे नांव-रुजवाई
लेखिका- प्रा.मीनल येवले
प्रकाशक- गौरव साहित्यालय , सोलापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-ऑगस्ट २०२२ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१७६
वाड़्मय प्रकार-ललित कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--३५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१४४||पुस्तक परिचय
रुजवाई
लेखिका: प्रा.मीनल येवले
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
स्वता: जगलेलं-भोगलेलं मांडणं या अवघड कामाचे शिवधनुष्य मनभावन शब्दांतून लेखिकेने 'रुजवाई'त गद्याचा नवा आयाम ठसविला आहे.शब्दांची रचना अतिशय क्रमबध्द लयीत आशयगर्भित भावस्पर्शी शब्दसाजात चितारली आहे. प्रस्तावना ते लेख वाचताना मंत्रमुग्धता होते.इतकी भावस्पर्शी आणि अलवार लेखन शैली आहे.शब्दांचे बीज रुजून कथेची निर्मिती कशी होते ते उमगतं.
दुखरे सल उरात घेऊन आतली हिरवी गजबज शाबूत ठेवणं मोठं अवघड काम.दु:खाला कोंब फुटावेत आणि ते चहु अंगानी बहरुन यावं. याचवेळी आपण ओटी पसरून त्यालाच कवेत घ्यावं; हे अवघडंय. अवघड असतंच सत्याला सामोरं जाणं आणि त्याहून अवघड असतं सत्य ओटीत पेलणं.ललित गद्य म्हणजे हिंदोळयावर बसून आभाळभरचे लोभस हिरवे कोंब पकडून ठेवणं.आतली खळबळ- खळखळ चिमटीत पकडून ती वाहती ठेवायला समर्थ,अर्थगर्भार शब्दांची ठेव तुमच्यासंगे वाहती राहायला हवीय.तर आणि तरच आतलं उकलणं बाहेर येतं.
आभाळावरचा झिम्माड पाऊस डोळाभर झेलून अलगद निसटू देणं आणि निसटलेलं ओघळायच्या आत टिपून घेणं,ही ताकद लेखकाच्या चिंतनात आणि शब्दात असली की,पाण्यावरच्या लहरी,सुंदर तरंग पकडायला होतात,तेव्हा ललित गद्य जन्माला येतं. किंबहुना कोणतीही कलाकृती आपल्या भळभळण्याची तटस्थ साक्षीदार असते. कधी कधी असं होतं, भरुन आलेलं आभाळ दगा देऊन जातं आणि कधी मनीध्यानी नसतानाही आभाळानं धुंवाधार बरसावं तसंच काहीसं कलावंताच्या दारी टाकतं. म्हणून कलावंत मनातल्या घनाला एक जागा ठेवतो आणि ती जागा सातत्याने जागी असते.हुळहुळत्या कोपऱ्यात दडलेलं संचित त्याचं त्याचं भाग्य घेऊन अवतरायला होतं आणि एका सुंदर कथेचं स्वप्न साकारतं..
ओल्या मनानं ओल्या पावसाला आवातन दिलं की, तो पाऊस हाकेवर धावतो.तशी हाक कलावंताच्या काळजातून उमटली की, अंगण ओल्या कच्च गारांनी तुडुंब होतं तेव्हा गारा वेचता येणं आणि साठवायला लागलं हे काम कलावंत करतो.मग त्याच्या गर्भारशी मनाचा उत्सव होतो आणि बीज रुजायला घेते. प्राध्यापिका मीनल येवले यांच्या 'रुजवाई'मध्ये असंच काहीसं हळवं मन,जगलेलं-भोगलेलं मांडतं .ओलेत्यानं भेटतं आणि सांगायला घेतं. याचा प्रत्यय प्रत्येक पानापानावरती येतो.
'रुजवाई'कथासंग्रहातील प्रस्तावनेतील परिच्छेद...
शब्दांकन
-----माधव गरड, उस्मानाबाद.
मला भावलेलं कथेचं उपमाप्रधान कोटेशन,मनभावन जुन्या-नव्या कवितांनी कथालेखन करायला लिहिते केलं.चपळ,मधाळ,नितळ, ओढाळ आठवणींना कवेत घेऊन झिंगत राहिलं की काही अवतरतं. 'रुजवाई'हे शिल्प असंच अवतरलेलं, हवंहवंसं.अस्वस्थपण असलं तरच या झुल्यावर झुलायला येतं. लेखिका प्रा.मीनल येवले यांची शैली चांदणं वेचणारी.भावलेल्या,जगलेल्या घटना ललित बंध झाल्या.आयुष्यातील सुख-दु:खांना, अनुभवांना निसर्गायनाच्या रुपांना शब्दसाजात चितारले. शब्दांची शब्दांतून व्यक्त होताना,त्या म्हणतात की,"कलावंताला सर्जनाचे डोहाळे लागले की ते पुरवत जातानाचा
,नवनिर्मितीचे लोभस क्षण टिपतानाचा आनंद त्याचा तोच जाणो!मन एखाद्या विषयात गुंतलं की रात्रंदिवस त्याच त्या ध्यासात तरंगण्याचा मोहमयी अनुभव घेतला.मनासारखे उतरेपर्यंत संवेदनांच्या इंद्रधनुषी बेटावर किती काळ हिंदोळत राहिले, व्याकूळही झाले.ऋतुचक्राच्या गतीत, सृष्टीच्या नानाविध रंगरुपात एकजीव होताना स्वसामर्थ्य शोधत गेले." किती छान विचार सर्जनशील कथेचा नमूद केला आहे.
रुजवाईला हातभार लावलेल्या, शुभाषिस दिलेल्या ज्ञात -अज्ञात स्नेहीजणांविषयी ऋणनिर्देश व्यक्त केला आहे.कवितेची कथा कशी घडली याचीही कहाणी छान रेखाटली आहे.महाराष्ट्र टाईम्स या लोकप्रिय वृत्तपत्रात स्तंभलेखनाची संधी मिळाली.त्यात प्रसिध्द झालेले लेख रुजवाईत समाविष्ट केले आहेत.शब्दांची मशागत करून, उपमांचे वरखत घालत,अस्सल शब्दवाणांची निवड करुन अक्षरांच्या गोतावळ्यात एक्केचाळीस लेखांची मालिका 'रुजवाईत' पेरली आहे. मनाला हळवं करणाऱ्या, आवडणाऱ्या प्रातिनिधिक कथांची परिचयात्मक ओळख साठवणीतल्या आठवणींची कथा 'मातीच्या कुशीत' मातीच्या कुशीत धान आणि बाईच्या कुशीत जीव अनादिकाळापासून दोघींना गर्भात रुजवता येतं बीज.मातीच्या विविध रुपांचे शब्दचित्र अगदी सुंदरशा साजात चितारले आहे. मातीच्या मनानं सगळेजण मातीला अनुभवत असतात.पाऊस आणि मातीचं नातं बीजरोपणाला कसं ऋणानुबंध जपतं.तर जशी माती तशी दैवतं या उक्तीप्रमाणे मातीच्या रंगछटेची उकल सहजगत्या अलवारपणे व्यक्त केली आहे.
उन्हाच्या काहिलीत डोळ्यांना सुखद गारवा देणाऱ्या बहाव्याचे वसंत ऋतूतील फुलांचे सौंदर्य बहारदार शब्दसाजात रंगविले आहे. त्याचा गंध रसिक वाचकांना आस्वाद घेताना निश्र्चितच जाणवेल.असा शब्दफुलोरा' बहावा' बहरतोय.
बहाव्याचा फुलोरा बहारदार
झुंबरं दिसती दिमाखदार
वसंत ऋतूतील सोनेरी फुले
पाहूनी तयाला मन मोहरले....!!
रंगसौंदर्याचे बहारदार वर्णन…
स्त्रीच्या सहनशीलतेचे आणि तिच्या परिघाचे चिंतन 'चौकटीपलीकडचे'या लेखांत विषद केले आहे.बाईचं बाईपण चूल आणि मूल एवढंच नसून तिच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे तिला स्वातंत्र्य आहे काय? याचं मुक्त मंथन केले आहे.तर 'अनावर'या भावस्पर्शी लेखात मुलाच्या जन्माची कथा छान शब्दात व्यक्त केली आहे.भाताच्या लागणीची कथा समर्पक आणि यथार्थ शब्दांत खुलविली आहे. कथेचा आस्वाद घेताना खाचरात आपल्या समक्ष भाताची लावणी होतेय.तीच आपण शब्दांच्या रोपांतून अनुभवतोय.सुंदर मनस्पर्शी कथा'चला रोवणीला जाऊ'. निसर्गाचे लावण्य शब्दफुलांतून ओथंबून भरलं आहे.अप्रतिम कथेचा साज.
प्रवासवर्णनाची स्थळसंदर्भाची झलक आपणास ‘स्वप्न सजवताना’ या कथेतून समजते.सहल अविस्मरणीय क्षणांची आठवण कायम स्मृतीत कोरणारी आहे.ही कथा वाचताना वाचकाला स्थळदर्शन घडते.ज्यांनी ही ठिकाणं यापूर्वी बघितली आहेत.त्यावेळच्या घटनांचे माहोल डोळ्यासमोर तराळते.मनाला सुखद धक्का देते.इतकं सुंदर शब्दांकन कथेचं केले आहे.तर ‘सृजनगंध’कथेत स्वता:चा परिघ कसा रुंदावत गेला अन् शब्दांच्या देण्यांतून कथाकविता कश्या सुचत गेल्या आणि कागदावर उमटवून साहित्याचं लेणं कसं बनलं.याची प्रस्तुती अतिशय सुंदर शब्दात दरवळत राहते.
आयुष्यात सुख म्हणजे नक्की काय असतं?याच उत्तर ‘अशाश्वताचा झुला’या कथेचं कल्पना रम्य शब्दांचे बीज रुजून तयार केलेली अवतरणे आणि चारोळ्या वाचल्या की उमगते.
आपल्या आयुष्यात अनेक ऋतू येतात. जेव्हा आपले सुखानंदाच्या झुल्यावर झुलण्याचे दिवस असतात तेव्हा तो आपल्या वाट्याचा श्रावण असतो.सुप्रसिद्धी, अपेक्षापूर्ती,अर्थप्राप्ती,कर्तव्यपुर्ती,आरोग्यसंपन्नता,नवनिर्मिती, शाबासकी अशा विविध रंगातून आपल्या व्यक्तित्वाचं इंद्रधनू आपल्या कर्तव्याच्या अवकाशाला सुशोभित करू लागतं. श्रावणातलं इंद्रधनुष्य तयार व्हायला हवी असते हलकी रिमझिम आणि त्यामधून जाणारे सूर्यकिरण! निखळ,निरामय आनंदाची कोवळे किरण आणि सुसंवादी माणसांच्या सहवासाच्या सुखदसरी आपल्या आयुष्यात आल्या की;आपल्या अवकाशातील सुखाचे इंद्रधनुष्य आपलं आयुष्य समृद्ध करू लागतं.यापेक्षा वेगळे काय असू शकतं सुख!!!
नकळत कधीतरी मनातही शब्दपाखरं भिरभिरत येऊन कागदावर पसरत जातात नि जुने दिवस आठवांच्या काठावर येऊन तरंगत राहतात. तर 'घरासारखं घर' कथेतील अग!पायांनाच तर कायम बिलगून
आली ओली मऊशार माती
तिनेच शिकवलं निभवत जगणं
काळजात रुतलेली जीवट नाती
या ओळी जावाजावांचा ऋणानुबंध जपून ठेवतात.सरकत्या काळासह विश्वासाची जोड मिळाली की अशी नाती अधिक घट्ट होतात.
पहिल्या पावसाचं अंगणात बरसून झाडांना अभिषेक घालणं.अप्रतिम शब्दांच्यासरीत 'शाश्वताचा नाद'या कथेने चिंब भिजवलय.
तर एवढं फक्त ध्यानात ठेव या कथेतून कोरोना काळातील निसर्गाचा आणि माणुसकीचा आवेग शब्दबध्द केला आहे.आपल्या भोवताली घडलेल्या घटनाप्रसंगाचा मनावर ठसा उमटतो.मनाला भावल्यावर त्याचं आपल्या क्षमतेनुसार लेखन होते.तेच रसिकांच्या मनाला स्पर्शून जाते.आपल्या काळजाचे चरे इतरांचे होतात तेंव्हा लिहितं राहण्याचं बळ येतं.किती सुंदर व्यक्तता 'लिहितं राहताना.'या विचार पुष्पात गुंफलीय.
सर सांजेला बरसून गेली लख्ख चांदणे किती….
तृणपात्यावर जल थेंबाचे लक्ष चंद्र झळकती…..
किती मनभावन चारोळी वर्षाव करणाऱ्या पावसाची ‘व्याकूळ धरेच्या ओठी’लेखात आहे.तर मराठी सण उत्सवाचा आनंदोत्सव निसर्ग कसा साजरा करतो याची महती अनेक लेखातून उलगडत जाते.कुटूंबाचे भरणपोषण करणारी ‘चूल’ कथा वाचताना ग्राम्य संस्कृतीचे दर्शन देऊन जाते.प्रभाते प्रज्वलित झालेला हा यज्ञ अधूनमधून समिधा शिलगावत सारं उरकेपर्यंत धगधगत असायचा.बाईला निसर्गतः च असते मातीची ओढ.तिच्या मनात कायम ओल असते, तिच्यातल्या मातृत्वाचा पाझर घरादारात गोडवा कायम ठेवतो. तिच्या गर्भात नवचैतन्याचा अंकुर रुजवण्याचे सामर्थ्य असते.ताजेपण असते तिच्यात मातीचे अप्रतिम विचार माती आणि स्त्रियांचे ‘मातीची ओढ’या लेखात व्यक्त केले आहेत.
मायबोलीचा डंका व साहित्यिकांच्या अक्षरकृतीचीं ओळख’अंतरीचा धागा धागा मराठीने बांधू या.’ निबंधातून समजते.भाषेचे चैतन्य आणि गोडवा सामान्यांच्या मनात चेतवण्याचे जागवण्याचे कार्य करीत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव'ऊर्जेचा निर्मळ झरा’या लेखात केला आहे.शब्दांच्या कोंदणात सजलेल्या प्रतिमा म्हणजे कविता.
प्राध्यापिका मीनल येवले यांनी रुजवाई कथासंग्रहात निसर्ग आणि स्त्रीचे परोपकार आणि ऋणानुबंध अलवार,ओजस्वी आणि भावस्पर्शी शब्दात वाचक रसिकांच्या मनात रुजवण्याचा ध्यास पानोपानी दिसून येतो.आपल्या लेखणीस त्रिवार वंदन!!!!
आस्वादक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
भावस्पर्शी शब्दांकन👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete