पुस्तक परिचय क्रमांक:१४०मऱ्हाठी माती
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१४०
पुस्तकाचे नांव-मऱ्हाटी माती
लेखकाचे नांव- विजय देशमुख
प्रकाशक-पत्रभेट प्रकाशन, बंगलोर, कर्नाटक
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- एप्रिल २०२० पहिली
पृष्ठे संख्या–९२
वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१४०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१४०||पुस्तक परिचय
मऱ्हाटी माती
लेखक: विजय देशमुख
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
स्वराज्य प्रेरक शहाजीराजे स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्माभिमानी छत्रपती संभाजीराजे आणि स्वामिनिष्ठ शूरवीर यांच्या जीवनातील अनमोल घटनांचे चित्रण या ‘मऱ्हाटी माती’ कथांमध्ये रेखाटले आहे.
इतिहास हा मानवी मनावर संस्कार करणारा दीपस्तंभ असतो.
“शिवचरित्र अभ्यासक इतिहासकार, इतिहास संशोधक व साहित्यिक श्री विजयराव देशमुख यांनी निखळ ऐतिहासिक सत्याच्या वर्तुळातील धागेदोरे जपून पराक्रमाचे शौर्य गाजविणाऱ्या रणविरांची गाथा तरुणांना स्फूर्ती देणाऱ्या कथा मांडल्या आहेत.”
ऐतिहासिक ‘मऱ्हाटी माती’ही गौरव गाथा मनावर संस्कार करणाऱ्या बीजांची कथा आहेत.या गौरव ग्रंथास पुरस्कार रुपाचा साज जेष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी चढविला आहे. सुवर्णालंकारातील सौंदर्यवतीचा गळा ठसठशीत अलंकाराने शोभिवंत दिसतो. तशा कोल्हापुरी साजाप्रमाणे या शौर्याभिमानाच्या कथा इतिहासप्रेमी रसिकांना सादर केल्या आहेत. रसग्रहण करताना हरेक कथा आपल्याला मंत्रमुग्ध करते.यातील सर्व लेख प्रकाशनापुर्वी नागपुरच्या हिंदू धर्म संस्कृती मंदिराने इ.स.१९७१च्या जुलै महिन्यात प्रसिद्ध केल्या होत्या.तर काही कथा तरणभारतच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत.या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे अस्सल ऐतिहासिक शैलीची छाप या कथांमध्ये प्रकटते. यात नऊ कथांचा नजराणा रसिक वाचकांना शब्दांच्या सामर्थ्याने तळपत ठेवतो.सह्यगिरीच्या डोंगराळ दऱ्याखोऱ्यांतील पायथा ते माथ्यापर्यंतची माती मुळातच खडकाळ, पीळदार आणि ताठ मानेची! आणि,बाण आणि शान वाढविणारी.उसळत्या रक्ताची शौर्याभिमान आणि स्वामिनिष्ठेचे कोंदण मुद्रांकित करणारी ठसठशीत अन् उठावदार मोहर मना मनावर बिंबवणारी ‘मऱ्हाठी माती’.
शहाजीराजांनी जीवापाड परिश्रमाने ही भुई नांगरली.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे बीज या पवित्र भूमीत पेललं. “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा” या ईश्वरी कार्याचं खतपाणी घालून या भूमीवर श्रध्दापूर्वक सिंचन केलं.अन् या मऱ्हाटी रक्ताचा अभिषेक करुन या मातीचं रक्षण केलं.अन या मऱ्हाटी मातीत अमाप पीक आले ते बुध्दिमत्ता,असीम निर्धार, उज्ज्वल चारित्र्य, शौर्य, धैर्य, स्वामिनिष्ठा, जिद्द,त्याग, बलिदान यांसारख्या दाणेदार जोंधळ्यांचं!त्यातलेच काही नामांकित कसदार जोंधळे निवडून रसिकांना वाचन करायला ठेवलेत असं शिवचरित्र व्याख्याते विजयराव देशमुख यांनी आश्वासित केले आहे.
यातील पहिली कथा गजतुळा स्वराज्य प्रेरक शहाजीराजे यांच्या बुध्दिमत्तेचं वैशिष्ट्यं अधोरेखित करणारी आहे. शहाजीराजे परमशूर आणि योगवंत!राजे विजापूरच्या आदिलशहाचे नामधारी सरदार असले तरी,त्यांचा रुबाब एखाद्या सार्वभौम राजा सारखाच होता. स्वराज्य स्थापन करण्याची राजांची जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती.
शहाजीराजांचे जिगरी दोस्त मुरारपंत जगदेव यांची दातृत्वाची कथा 'गजतुळा'.पंत कुष्ठरोगाने ग्रासलेले असताना भीमा आणि इंद्रायणी संगमावरील पुण्यक्षेत्री नागरगांव येथे रुद्रनाथस्वामी यांच्या कृपेने व्याधी दूर होते अशी वंदता होती म्हणून ते तिर्थक्षेत्री आले.आणि स्वामींना आजारमुक्त करण्याची विनंती केली. त्यांनी चिंता न करता काही दिवस संगमावर स्नान करण्याचा उपाय सांगितला. तदनंतर ते खडखडीत बरे झाले. स्वामिंच्या उपकारामुळेच आपण बरे झालो.त्यांना काहीतरी देण्याविषयी विचारणा केली. तेथील शिवसंगमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे योजिले. त्यावेळी सुवर्णतुला,होमहवन, अन्नछत्र आणि गजतुळा करण्यात आली.गजतुळा करण्यासाठी हत्तीला मापणारे तराजू कोठून आणायचे अशा विचारात असताना शहाजीराजांनी आपल्या बुद्धीचातुर्याने गजतुळा केली. त्यासाठी एका नावेत हत्तीचे वजन करून नाव कुठपर्यंत पाण्यात बुडते तिथं खूण केली.मग तेवढं वजन होईल एवढे द्रव्य सोने नावेत ठेवण्याचे ठरवले.म्हणजे गजतुळा होईल असे राजांनी सांगितले. सर्वांनी शहाजीराजे यांची तारीफ केली. नागरगावात तुळा झाली म्हणून त्या गावाचे नामकरण ‘तुळापूर’ पडले.
दुसरी कथा आहे सागरातील कुरटे बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची आणि तिथं देवांचे उपाध्येपण करणाऱ्या ‘दादंभट बिन पिलंभट उपाध्ये’यांच्या जाज्वल्य स्वामिनिष्ठेची करुण कहाणी या कथेत आहे.धामधुमीच्या काळात किल्ल्यावरील रसद कमी होऊ लागली. खाण्यास अन्न नसल्याने सैनिकांना उपवास घडल्याने मृत्यूमुखी पडू लागले.जीव वाचवायला दूर जाऊ लागले. दादंभटासही उपवास घडू लागल्याने गडावरील मुद्राधिकारी त्यास म्हणू लागले.की दुर्गात अन्नाचे दुर्भिक्ष जाहले आहे. भाजीपाला खाऊन आम्ही धन्याची जागा जतन करतोय. आम्ही तुला निरोप देतो.तुम्ही सुखरूपपणे गड सोडून जावे.पण तत्काळ दादंभटासमोर शिवाजी महाराज उभे राहिले.अशक्य!स्वत:च्या क्षुद्र स्वार्थासाठी नाशीवंत देह वाचविण्यासाठी महाराजांना दिलेला शब्द सोडायचे महान पातक?हे होणे नाही.उदात्त विचाराने ते तिथं राहिले...अशी स्वामिनिष्ठ कथा आहे.
‘निवाडा’ या कथेत बेलवडीच्या मल्लमा देसाईणीचा रहस्यमय निवाडा आहे. तो निवाडा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकात दिग्विजय करत असताना घडलेली कथा आहे.प्रत्यक्ष न्याय दान करताना खरी खबर समजताच स्त्रीची अप्रतिष्ठा करणाऱ्या सेखोजीला गालात चपराक लगावतात.अन् या चांडाळाचे डोळे काढून पन्हाळ्याच्या अंधार कोठडीत डांबून ठेवायला आजच रवानगी करण्याचे फर्मान पंतांना सोडतात.तिचं वतन तिला देसगत करतात. महाराज स्वत:तान्हुल्या बाळास मांडीवर घेऊन चमच्याने दूध पाजतात.केवढं ही संवेदनशीलता आणि स्त्रीदाक्षिण्याचा गौरव. अक्षरश: महाराज आणि देसाईण यांच्यातील संवाद वाचताना प्रत्यक्ष दरबारातच निवाडा चालला आहे असंच वाटतं.प्रत्यक्ष देसाईणीच्या गढीत येऊन निवाडा करणारे छ्त्रपती शिवाजी महाराज जाणते राजे आहेत हे या कथेवरून समजते.
हिंदूधर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्याचा व्हाईसरॉय आल्व्होरा यांच्या तील रणांगणावरील युध्दकथा अतिशय सुरस शब्दशैलीत राजकीय रेखाटली आहे. शंभूराजांनी गोव्यावर आपली हुकूमत कशी बसविली याची 'शंभूराजे'कथा आहे.
बाळाजी आवजी चिटणीस आणि त्यांचा सुपुत्र खंडोजी यांच्या स्वामिनिष्ठेची ही'निष्ठा' कथा आहे.शिवाजी महाराजांनी बाळाजीचे लेखणीचे गुण हेरून त्यांना स्वराज्याचे चिटणीस बनविले आणि तहहयात अक्षय चिटणिसी त्यांच्या घरात देऊन दाभोळचे सरदेशमुखीचे वतन नावे करून दिले.संभाजी महाराजांच्या काळात हत्तीच्या पायी बाळाजीला दिल्याने येसूबाई राणी साहेबांनी त्यांची कान उघडणी केली. खंडोजीकडे बघत सत्य परिस्थिती विषद केली. तदनंतर त्याचे जीवाभावाचे आई- बाप झाले.खंडोजीस चिटणीशीची वस्त्रे दिली.याच खंडोजीने पुढे राजाराम महाराजांना जिंजीच्या किल्ल्यातून सुटका करून घेण्यासाठी मुघलांच्या सैन्यातील सरदार गणोजी शिर्के यांच्या कडे तह मसलत करण्यासाठी राजाराम महाराजांनी आज्ञा दिली होती. कारण खंडोजी चिटणीस लेखणी, वाणी आणि तलवार चालविण्यात वाकबगार होते.त्यांनी गणोजी शिर्क्यांच्या छावणीत मस्त करून त्यांचे मन वळविले होते. ततप्रसंगी भरल्यावर घाव घालावा म्हणून गणोजी अभिनिवेशात बोलले,
"तुम्हांस दाभोळचे वतन महाराजांनी दिले.तेवढे आम्हास द्यावे.म्हणजं…"."स्वामीकार्याहून वतन आणि जीवित्व आम्हास अधिक नाही.सर्व अर्थ आमचे स्वामींचे पाय आहेत."खंडोजीला पूर्ण बोलून द्यायच्या आत वतनावर पाणी सोडले...अशी ही मऱ्हाटी माणसं स्वामिनिष्ठेचे दर्शन प्रत्यक्ष आचरणातून दिसणारं.
'गनिमी कावा' ही कथा मुघल फौजेला सळो की पळो करणाऱ्या सेनापती संताजी घोरपडे...मऱ्हाटी मातीचा एक घडीव अलंकार स्वराज्याच्या रक्षणासाठी मावळखोऱ्यात घोडदौड करीत गर्जत होता.संताजी घोरपडे त्याच्या पराक्रमाची शर्थ करणारी ही कथा छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील घडामोडींची दखलपात्र कथा.
'किल्ले सातारा' अजिंक्यतारा कसा झाला ही तर नवनवीन घडामोडींची ओळख करून देणारी ऐतिहासिक कथा आहे.शत्रूने वेढा घातलेल्या किल्ल्यावरील दाणागोटा कमी पडायला लागल्यावर किल्लेदार किल्ला ताब्यात कसा देतो.अन् पुन्हा कसा स्वराज्यात घेतो याची सुरस कथा छान रेखाटली आहे.
पानिपतच्या लढाईत पराक्रम गाजविताना होतात्म्य लाभलेल्या शूर एकनिष्ठ शिलेदारांनी कथा अब्दालीच्या प्रचंड फौजेबरोबर झुंजणाऱ्या रणमर्द सेनानी बळवंतराव मेहेंदळ्यांची कथा.समशेरीचं कौतुक समस्त जगाला दाखवलं.ती "आमचे अगत्य असो द्यावे" समरकथा पानिपतच्या रणभूमीवरील युध्दाचे दृश्य
जिवंत करते.अप्रतिम शब्दांचे आविष्कार ढाल तलवारी आणि बाणासारखे पुढे काय घडतंय याचं कुतूहल वाढवतात.
शेवटची 'जीवित तृणवत मानावे'ही कथा नऊ वर्षाच्या कोवळ्या मुलाची.ढमढेरे तळेगाव या घराण्यातील जयसिंगराव यांनी गाजविलेल्या स्वराज्याची अस्मिता असणाऱ्या 'जरिपटक्या'ची कथा…. गोदातिरावरील धोंडराई गावात श्रीमंत दादासाहेब पेशवे आणि निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर यांच्या तील युध्द चालू असताना जयसिंगराव ढमढेरे याने जरिपटका फडकवत ठेवण्यासाठी केलेल्या पराक्रमाची यशोगाथा..
या ऐतिहासिक कथा आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाच्या, स्वामिनिष्ठेच्या कथा रास्त अभिमान तरुण पिढीत निर्माण करणाऱ्या आहेत.अतिशय सहजसुंदर आशयघन शब्दसाजात ऐतिहासिक कथांचे लेखन शिवचरित्रकार विजय देशमुख यांनी केले आहे. त्यांच्या लेखणीस आणि वाणीस त्रिवार मुजरा……
आस्वादक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment