पुस्तक परिचय क्रमांक:१४१ सरसेनापती संताजीराव घोरपडे
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१४१
पुस्तकाचे नांव-नरवीर सरसेनापती संताजी राव घोरपडे
लेखकाचे नांव- श्री शशिकांत पाटील
प्रकाशक-कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर, कोल्हापूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- मार्च २०१५ पहिली
पृष्ठे संख्या–१४४
वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ
किंमत /स्वागत मूल्य--२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१४१||पुस्तक परिचय
नरवीर सरसेनापती संताजीराव घोरपडे
लेखक: श्री शशिकांत पाटील
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
श्री क्षेत्र कुरुंदवाड मधील श्री सुब्रम्हणेश्वर महादेव व देव सेनापती कार्तिकेय स्वामी मंदिर आणि हिंदवी स्वराज्याचे प्रति शिवाजी नरवीर सरसेनापती संताजीराव घोरपडे ममलकत मदार ; कृष्णा प्रयागतिर्थ प्रयागघाट, कुरुंदवाड कोटी तिर्थ या ऐतिहासिक गौरव ग्रंथाचे प्रकाशन भूमि अभिलेख सहाय्यक संचालक इतिहास संशोधक श्री.शशिकांत पाटील यांनी केले आहे.पूर्व इतिहासाचा मागोवा घेताना पौराणिक ते अर्वाचीन काळाचा कालखंड विशद केला आहे. युगपुरुष स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्प्रयासाने स्थापलेले स्वराज्य बलशाली करताना एकीने शौर्याने आणि स्वामिनिष्ठेने जोपासले.त्यासाठी समशेरीचे योगदान दिलेल्या म्हाळोजीराजे, संताजीराव, बहिर्जी आणि मालोजीराजे या पिता-पुत्रांची गाथा लिहिली आहे.असा अभिप्राय घोरपडे घराण्याचे वंशज श्रीमंत राणोजीराव घोरपडे यांनी दिला आहे.
इतिहासाच्या पाऊलखुणा अधोरेखित करणारा संगम घाट, महादेवाचे मंदिर आणि सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची समाधी पाहून आपण नतमस्तक होतो.विनम्र अभिवादन करायला हात जोडले जातात.आणि सेनापतींचे स्वाभिमानी कार्यकर्तृत्व नजरेसमोर तराळते.स्वराज्य जपण्यासाठी मुघल फौजेची धुळवड साजरी करणाऱ्या संताजी घोरपडे यांचे महनिय कार्याचे स्मरण होते.
या गौरवग्रंथाचे लेखन करण्यासाठी धुंडाळलेल्या ऐतिहासिक दाखले, संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आहे.लेखकांनी मनोगतात या लेखनाची प्रेरणा कशी मिळाली याचे विवेचन केले आहे. कुरुंदवाडच्या मातीशी नाळ जुळलेल्या कृष्णातटाची महती व्यक्त केली आहे.
पराक्रमी गाथेचे चार भागात विवेचन केले असून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांचा कालपट तसेच भोसले आणि घोरपडे घराण्याची वंशावळ रेखाटली आहे. तिर्थक्षेत्री आणि पावन समाधी स्थळी आपण कसे पोहचावे याचीही माहिती दिली आहे.
पहिल्या भागात भारतातील धर्म आणि स्थळे यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी तर दुसऱ्या भागात घोरपडे घराण्याचा पूर्व इतिहास आणि सुब्रम्हणेश्वर मंदिर तिसऱ्या भागात स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या फतेह केलेल्या पराक्रमी कामगिरीचा आलेख विस्तारला आहे.आणि चौथ्या भागात सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या वधाची कारणमीमांसा मांडली आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे यांचे पिताश्री म्हाळोजीराजे यांची मुलूखगिरी नमूद केली आहे. स्वराज्य प्रेरक शहाजीराजे भोसले यांच्या पदरी ते शिलेदार होते.त्यांच्या गुणांची पारख करून त्यांना पाचशे स्वारांची मनसबदारी मिळवून दिली.ते स्वाभिमानी व सुसंस्कृत होते.आदिलशहाने काढलेले फर्मान त्यांच्या मनाला पटले नाही म्हणून त्यांचे आदिलशहाशी वितुष्ट आले. मनसबदारीवर पाणी सोडून ते पुन्हा त्यांनी शिवाजी राजेंचे थोरले बंधू संभाजी
यांची चाकरी स्वीकारली. पन्हाळा प्रांताचे सुभेदार असताना त्यांना पाटीलकी दिली होती. तदनंतर ते शिवाजी महाराजांच्या पदरी होते. त्यांची उठावदार कामगिरी छत्रपती संभाजीराजे पन्हाळ्यावर नजरबंद असताना त्यांच्या देखरेखीसाठी म्हाळोजींना ठेवले होते.वाईच्या युध्दप्रसंगी सरसेनापती हंबीरराव मोहिते कामयाबी झाल्यावर त्यांचे सेनापती पद म्हाळोजी यांच्या कडे सुपूर्त केले होते.
छत्रपती संभाजीराज्यांना दगाबाजीने पकडल्यावर त्यांना सोडविण्यासाठी मुघल काफीरांबरोबर झालेल्या चकमकीत ते कामी आले.छत्रपती संभाजीराज्यांना वाचविण्यासाठी त्यांनी आपल्या देहाचे बलिदान दिले.
सरसेनापती संताजी घोरपडे यांची पहिली मोहीम छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वाखाली कर्नाटक स्वारी होय.कोप्पल प्रदेशात राज्यांच्या मदतीला घोंगावणाऱ्या वादळासारखी फौज गदगला पोहोचली होती.तिथं गनिमीकावा तंत्राचा वापर करून शत्रूस कोंडीत पकडून वाताहात केली.तीन महिने युध्दाचा संग्राम सुरू होता. स्व: कर्तृत्वावर विजय मिळविलेली ही मोहीम होती.या मर्दुमकीवर खुश होऊन संभाजीराजे यांनी राज्यातला चौथाई मुलूख संताजीला इनाम दिला.याची १६८२च्या सनदेत नोंद आहे.
छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात त्याने एका-एका शत्रूला खिंडीत गाठून आपला इंगा दाखवायला सुरुवात केली होती. अडचणीत सापडलेल्या स्वराज्याला शूरवीर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे योध्दे म्हणजे स्वराज्याचा कलाटणी देणारा 'टर्निंग पॉइंट' होता.संभाजीराज्यांना पकडून कैद करणाऱ्या शेख निजामाच्या फौजेचा धुव्वा उडविला होता.यावेळी जीव मुठीत धरून शेख निजाम पळाला होता.सूडाच्या भावनेने संताजी आणि धनाजी आपल्या दहा हजारांच्या फौजेसह वाघसिंहासारखे डरकाळ्या फोडत मुघलांची अंतःकरणे पोखरून काढीत होते. मराठ्यांची पडती बाजू सावरत स्वराज्याला नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी गादीशी इमान राखत मोगली सत्तेला शह देण्यासाठी मांडीखाली घोडा आणि हातात तळपती तलवार घेऊन सारा प्रदेश पिंजून काढत होता.संताजीने आपल्या दोन्ही बंधूंच्या साथीने औरंगजेब बादशहाच्या शाही तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले होते.
छत्रपती राजाराम महाराज व सेनापती घोरपडे यांची जिंजीचे राजमहालातील राजकीय भेट गुप्त बैठक असते.त्या बैठकीचा संदर्भ नागोजीराव व सुभानराव माने यांच्या विषयी आहे.महाराज संताजीची समजूत काढतात.कारण त्यांचा आत्मसन्मान दुखावलेला असतो. फर्मानाचा कागद काढून महाराजांना जाब विचारतो.श्री राजाराम चरणी तत्पर! संताजी घोरपडे निरंतर! बसवपट्टणचा विजय म्हणजे गनिमी काव्याचा आदर्श नमुना होय. सरसेनापतीचा कस “रणांगणावर मर्दुमकी गाजवत असतो.जो रणांगण जिंकतो तोच खरा स्वराज्याचा सरसेनापती!आता आपण आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागतो!”असे नम्रपणे नमूद करणारे संताजी.कारण संशयास्पद गैरसमजातून झालेल्या हालचालींमुळे त्याने राजाराम महाराजांनाही एक दिवस कैद केले होते.या लढाईचे जेधे शकावलीत वर्णन केले आहे.संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव एकमेकांना पाण्यात बघू लागले.वैमनस्य वाढत चालले होते. संताजीचा पाडाव करण्यासाठी धनाजी पाठलाग करत होता.गाजीउद्दीन फिरोजजंगने कोंडी केली होती.तर हणमंतराव निंबाळकरांच्या फौजा महादेवाच्या डोंगराला विळखा घालून अख्खा डोंगर पिंजून काढीत होत्या. नागोजी माने ही वचपा काढण्यासाठी संधी शोधत होता.कारखेलच्या परिसरात तो दडलेला होता.ओढ्याच्या काठावर प्रांत:काळी स्नान व सूर्याला आर्या देऊन ध्यानस्थ बसलेला असताना नागोजीराव डाव साधून संताजीचे शीर धडावेगळे केलं.
स्वराज्यासाठी जीवनमरण वाहणारा स्वयंप्रकाशित चमचमता तारा अनेकांना स्फूर्ती व प्रेरणा देऊन गेला.सुंदर शब्दांकनात या गौरवगाथेचे लेखन केले आहे.
परिचयकर्ते:श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment