पुस्तक परिचय क्रमांक:१४३ अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१४३
पुस्तकाचे नांव-अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान
लेखकाचे नांव- विश्वास पाटील
प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०२१ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–३७१
वाड़्मय प्रकार-संशोधनात्मक ग्रंथ
किंमत /स्वागत मूल्य--४८०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१४३||पुस्तक परिचय
अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान
लेखक: विश्वास पाटील
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
शब्दांची पाठच धरुन अण्णा आणि शंकर हे दोन्ही बंधू मुळाक्षरे शिकली.तर कधी रस्त्याने जातायेता दुकानांच्या पाट्या वाचत. वर्तमानपत्रांचे कपटे,रद्दीच्या चिटोऱ्या आणि सिनेमाची मासिके पुनः पुन्हा डोळ्यासमोर धरुनच ते वाचायला शिकले.कापडगिरणीच्या साच्यावर काम करताना अण्णांना खरेतर काव्यलेखनाची स्फुर्ती होऊ लागली होती. तदनंतर ते गीते आणि पोवाडे लिहू लागले. मराठी भाषा अण्णांनी एकलव्यासारखी आत्मसात केली.
लोकशाहिर साहित्यसम्राट अण्णाभाऊं सारख्या प्रतिभावंताने आपणास त्यांना भेटलेल्या अनुभवांना प्रतिभेची वीट दिली. म्हणून तर इतकी विशाल शब्दपंढरी उभी राहिली अन् ती चिरंतन ठरतेय.जीवन हे सुख दुःखांचे काटे आणि फुले तुडवत मनुष्य चालत राहतो.अशा भेटणाऱ्या व्यक्ती आणि घडणारे प्रसंग लेखक मनाला अनोख्या विश्वात घेऊन जातात.
अण्णा भाऊ साठे….
गरीब,दलित, शोषित या सर्वांच्या वेदनेचा उद्गार अन् पिळवणूक झालेल्या स्त्रियांच्या आक्रोशाचा हुंकार…
आयुष्यभर काटे-निखारे तुडवत वंचितांच्या जागृतीची मशाल चेतवणारे खंदे लेखक…
मायमराठी साठी डफावर थाप मारुन संयुक्त महाराष्ट्राची रणलावणी गात दिल्लीपर्यंत धडक मारणारे शाहीर…
डॉ.होमी भाभा, नर्गिस, बलराज सहानी, शैलेंद्र, आचार्य अत्रे,काॅम्रेड डांगे अशा राष्ट्रीय दिग्गजांना प्रभावित करणारे लोककलावंत…
अण्णा भाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा दशदिशा धुंडाळून, दुर्मीळ कागदपत्रं शोधून,अण्णांचं जीवन व साहित्य समृद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा खास शोध घेऊन; कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेली वाड्.मयीन चरित्रगाथा 'अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान '...
या दास्तानमध्ये लेखक विश्वास पाटील यांनी अण्णांच्या कथांची विशेष दखल घेऊन त्या कथानकातील नायकपात्र नेमकं रंगविण्यासाठी त्या कथेतली गावं,तो भाग आणि पात्रांचा इतिहास अधोरेखित केला आहे.त्याविषयीची माहिती संशोधन करून पुराव्यानिशी सिद्ध केली आहे. वारणेच्या खोऱ्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगा,जंगलं, टेकड्या,अनवटवाटा आणि त्या तुडवत फिरणारे, भटकंती करणारे मुशाफिर यांचे अस्सल व वास्तव वर्णन समर्पक शब्दात पानोपानी उत्कटतेने व्यक्त होताना दिसते.अगदी खास ग्रामीण ढंग व बाजेतील इरसाल शब्दांचा चपखलपणे अंगठीतल्या हिऱ्यासारखा शब्दसाजात बसविला आहे.
'अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान ' लोकप्रिय पानिपत आणि झाडाझडती कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी सूक्ष्मपणे कागदपत्रे, मुलाखत आणि प्रत्यक्ष भेट घेऊन संशोधनपर विश्लेषण चिकित्सकपणे विस्तृतपणे प्रस्तुत केले आहे.
अनेक कथातील विविध भूमिकांतून अण्णा झाडापहाडातील कष्टकऱ्यांच्या निकटतम जाऊन पोचले आहेत.त्यांच्या जंगल भटकंतीमुळेच चित्रमय व अचूक वर्णने आपणाला वाचायला मिळतात. ती वाचताना आपण तहानभूक विसरून कुतूहलाने कथावाचन पूर्ण करत राहतो. कथाबीजाची वर्णने वाचताना ती चित्ताला निर्मळ आनंद देतात.रसग्रहणाची क्षुधा शांत करतात. इतिहास आणि संघर्षाची जाणीव असलेला हा नव्या युगाचा खंदा भाष्यकार होता,हे रशिया व जर्मनी युध्दाच्या पोवाड्यावरुन याची प्रचिती दिसून येते.
ते शाहिरी पोवाडे लिहित होते.लेखक विश्वास पाटलांनी अतिशय समर्पक शब्दात मांडलय.ते म्हणतात की,' ''माणुसकीचा लळा आणि दीनदुबळ्यांबद्दल कळवळा हे त्यांच्या भाषेचे वैशिष्ट्य होते.त्यांची प्रतिभा ही अनुभवाच्या भट्टीतून आणि मानवतेच्या श्रद्धेतूनच खऱ्या अर्थाने आकाराला आली आहे.''
अण्णांच्या स्त्रीव्यक्तिचित्रणाचा हा कथांचा परीघ अचाट आणि अफाट होता. अण्णा भाऊंनी एकशे सत्तर पैकी पंचावन्न कथा स्त्रीविश्वाचा धांडोळा घेणाऱ्या अतिशय समृद्ध कथा आहेत.महानगरीच्या बकाल वस्तीपासून ते खेड्यातील शेताबांधापर्यंतच्या दऱ्याखोऱ्यातील अण्णांना भेटलेल्या बायाबापड्यांचे अनोखे जग शब्दफुलोऱ्यात व्यक्त केले आहे.ते ही वास्तवाची दाहकता जळजळीतपणे तळपताना दिसून येते.
अण्णा भाऊंच्या मौल्यवान निवडक कथा परिशिष्ट:२मध्ये स्वतंत्र पानावर नोंदलेल्या आहेत.प्रायश्चित्त,आबी, डोळे, बरबाद्या कंजारी, स्मशानातील सोनं,सूड,फरारी, रानगा, अब्रू, सोन्याचा मणी,निखारा,मीरा कोकिळा, कोंबडी चोर,इरेनं गाढव खाल्लं.आवश्यकतेनुसार दुर्मिळ कृष्णधवल चित्रांची मांडणी अस्सल पुराव्याची मुद्रा उठावदार करतात. प्रत्येक प्रकरणाच्या समारोपात दस्तऐवज पुरावे दाखले यांची यादी दिलेली आहे.ती अस्सल व वास्तव घटनांची ओळख करून देते.पवळा लघुकथेतील पवळा स्त्रीचे वर्णन रसग्रहण करताना खरंच अण्णा शब्दांचे जादूगार होते.हेच लक्षात येते.केवड्याच्या सुगंधाने घमघमाट सुटलेले रान त्यांनी समर्पक आणि चपखल शब्दात व्यक्त केलंय.विश्वास पाटील म्हणतात की,"अण्णा भाऊं म्हणजे, कोंडलेल्या दु:खांचा, सांडलेल्या रक्ताचा आणि आटलेल्या अश्रूंचा साक्षीदार बनलेला होता. उत्कटतेच्या आणि माणुसकीच्या गहिवराचा पदर इतर साहित्यिकांना का उलगडा नाही."
'पेटलेला पदर' या कथामालिकेत त्यांनी आपल्या गावच्या पंचक्रोशीतील आणि वारणेच्या खोऱ्यातील बहादुर आणि बेडर स्त्रियांच्या मोरपंखी पदराचा तांबूस वर्ख अण्णा भाऊंनी आपल्या कथासागरात कायमचा अमर करून ठेवला आहे.
महाराष्ट्र कथाभूषण लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊंच्या कथासागर समजून घेण्यासाठी वाचकांनी शरदचंद्रांच्या आणि प्रेमचंदांच्या कथासरितेची परिक्रमा केली तर या तिन्ही लेखकांच्या लेखणीची ताकद महिलांच्या अन्याय आणि अत्याचाराच्या वास्तवाची दाहकता जळजळीतपणे तळपते हे आपल्या लक्षात येते.त्यांची कैफियत अण्णाभाऊ मांडतात.जीवनाच्या धकाधकीच्या प्रवासात अण्णा भाऊंसारख्या लेखकाला अनेकदा कथा कादंबरीतल्या नायिका भेटलेल्या आहेत.
अनेकांच्या जीवनाचे उभेआडवे धागेदोरे, हर्षखेदाचे प्रसंगही माहीत असतात. वर्षानुवर्षे त्या आठवणी ते मनाच्या कुपीत अत्तरासारख्या जपून ठेवतात.मनात रुजलेल्या त्या बिजाची योग्य वळणावर तरारुन वेल बनते अन् ठसठशीत स्त्री व्यक्तिरेखांचे पुढे गारवेलाचे मांडव तयार होतात.'वारणेचे खोरे'मधील मंगला ही व्यक्तीरेखा एका बंडखोर मुलीच्या जीवनातून उचलली आहे.
कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या लिहित्या हातांना मानाचा मुजरा आणि अण्णा भाऊंच्या समकालीन व्यक्तींच्या मुलाखती घेऊन आणि कागदपत्रांचे धांडोळे चिकित्सपणे उलगडून त्यांच्या कथांचे 'कथासार' समर्पकशब्दसाजात
गुंफलेले आहेत.रसिक वाचनप्रेमींच्या भंडारात असे अक्षरधन संग्रहित असावे.
दलित आणि कष्टकऱ्यांचा उद्रेक अनेक कथामधून घामासारखा कासावीस करतो.पोटाचे गाणे किती जीवघेणे बनते.हे 'थडग्यातली हाडं'कथा वाचल्यावर उमजते.गावच्या भंडाऱ्यात पंगतीवर पंगती झोडल्या जातायत.पण गावकुसाबाहेरच्या वंचितांची पंगत शेवटी.त्यामुळे ही मंडळी
चिंतातूर कारण जेवायला मिळतंय का नाही? गावासाठी लढलेल्या रायनाकचे गौरवाप्रित्यर्थ स्मारक उभारलेले आहे.पण कालौघात सगळेच त्याचे बलिदान विसरतात.''त्यावर गोळी कुणाला आणि पोळी कुणाला''असा खडा सवालअण्णांची लेखणी उभी करते.अत्यंत मोजक्या, धारदार शब्दांत आणि अभिजात शैलीत अण्णा भाऊ ही तहानभुकेच्या विवंचनेने ग्रासलेल्या वंचित समूहाची कथा लिहितात अन् एका विदारक सत्याचे स्मारक वाचक
रसिकांच्या डोळ्यांसमोर उभे करतात.
अण्णा भाऊ साठे नावाच्या मुसाफिराच्या अनुभवाचा परीघ खूपच दांडगा आहे. गावाकडच्या रानामाळापासून ते महानगरातील बकाल वस्त्यांपर्यंतचे जीवनाचे सारे भोग,पाठी आणि पोटावर उमटलेल्या गुलामीच्या आसुडांचे चरे आणि पोटातील भोकाड पसरून रडणारी भूक या साऱ्याबद्दल या महान लेखकाने बक्कळ लिहून ठेवले आहे.सकस आणि अभिजात कथा साधारणपणे एकशे सत्तर असेल.त्यांची कथा सर्व सामान्य बायका माणसांच्या काळजात घर करणारी आहे.कारण ती लेखन शैली साधीसोपी, आशयसंपन्न आणि वाहत्या झऱ्यासारखी वाटते.
माकडीचा माळ कादंबरी म्हणजे वाड् मय क्षेत्रातील वेरूळची लेणी!असं वर्णन लेखक विश्वास पाटील यांनी केला आहे.
सुगीच्या आशेने वर्षांची धान्यकमाई करायला आलेली बारा गावच्या बारा वाटांनी आलेली कुटुंबे.सुखवस्तू गावाच्या माळावर अशी अजब दुनिया शेतीच्या सराईला महाकाय वृक्षावर जसा पाखरांचा थवा उतरावा, तसाच माळावर पालं ठोकून उतरलेला असायचा.१९६३मध्ये प्रकाशित झालेली 'माकडीचा माळ'या कादंबरीने भारतीय साहित्यात उपऱ्या आणि फिरस्त्यांच्या जीवनाच्या गाभ्यालाच हात घातला होता.भटक्यांच्या जीवनाचा सखोल धांडोळा घेऊन वास्तव चित्र रेखाटलेली जबरदस्त कादंबरी आहे. १९८०च्या दशकात तदनंतर उपेक्षितांचे प्रतिबिंब ठरलेल्या बलुतं, आठवणींचेपक्षी,उपरा,उचल्या,आभरान,अक्करमाशी, कोल्हाट्याचं पोरं आदी आत्मचरित्रात्मक अक्षरवाड़्मयाने मराठी साहित्य विश्वात खळबळ उडाली होती. माकडीचा माळ ही कादंबरी काळगावच्या फोंड्या माळावर उतरलेल्या भटक्यांची गजाली आहे. सुगी आणि पोटाची ओढ हाच त्यांचा एकोप्याने बांधणारा खरा देव आहे. भटक्या विमुक्तांच्या आभाळाचा, जंगलाचा भूक व शिकारीचा दस्ताऐवज आपल्या कवेत घेऊन सर्जनशील प्रतिभेने कवेत घेऊन शब्दबध्द केलेला आहे.
मनातला उमाळा कागदावर उतरतच राहतो. एके ठिकाणी अण्णांनी लिहून ठेवले आहे की,''आपण गिरणीच्या साच्यावरुन लेखनाच्या मेजावर आलो."कंदिलाच्या प्रकाशात आणि रॉकेलच्या चिमणीच्या उजेडातसुध्दा उदंड लिहिले. रेशनिंग भरुन ठेवलेल्या पिंपांची खुर्ची आणि त्यावर दुमडून ठेवलेली गोधडी हेच त्यांचे लेखनाचे आसन. अखंडपणे तासनतास ते लिहीत राहत.म्हणूनच त्यांना 'कलमवीर' साहित्य सम्राट ही बिरुदावली शोभून दिसते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी अण्णा भाऊंनी पेटत्या शब्दांची आणि उसळत्या सुरांची,माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहीली.ही छक्कड लिहिली. ही रणलावणी क्रांतिकारक कवीच्या मुखातून जन्म घेत होती. बलिदानाची आणि हौतात्म्याची महती गाणारी ही लावणी. क्रांतिकारक अण्णा भाऊंनी आपल्या मस्तकात घुसलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमा शब्दांच्या मशालींनी चांगल्याच डागूनकाढल्या. साथीला डफ, हलगी,ढोलकी, मंजिरी आणि तुणतुण्यांचा नुसता घायटा उडाला होता.
फकिरा चित्रपटाच्या निमित्ताने घडलेल्या गमतीजमती सुंदर शब्दांत मांडलेल्या आहेत. सर्वच स्वरांचे लेखन अभ्यासपूर्ण समिक्षण केले आहे.अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकून नेमकेपणाने साहित्य सम्राट शब्दाकार अण्णाभाऊंच्या कथांचा सागर वास्तवपणे मांडला आहे.अप्रतिम लेखन शैलीत कथांचा आशय आणि अभिव्यक्ती गुंफलेली आहे.लेखनीस सलाम!!!
परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई सातारा
Comments
Post a Comment