पुस्तक परिचय क्रमांक:१४२ श्यामची आई
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१४२
पुस्तकाचे नांव-श्यामची आई
लेखकाचे नांव-साने गुरूजी
प्रकाशक-द निर्मिती पब्लिकेशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०२३ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–२१६
वाड़्मय प्रकार- आत्मकथा
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१४२||पुस्तक परिचय
श्यामची आई
लेखक: साने गुरुजी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र! शाश्वत मूल्ये आणि संस्कार संस्कृती कशी जोपासावी.हे अधोरेखित करणारी गाथा!
गेल्या ऐंशी वर्षात जनसामान्यांच्या हृदयात कोरलेली मातृत्वाची विलक्षणी संस्कारक्षम कथा.'श्यामची आई'. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीमुळे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे करूण व गोड कथात्मक चित्र भारताचे थोर समाजसेवक साने गुरुजी यांनी रसाळ शब्दसाजात रेखाटले आहे.
आपण सगळे गोष्टीवेल्हाळ आहोत.आपणास गोष्टी श्रवणास फार आवडतात.मी शाळकरी वयापासून आजतागायत या पुस्तकाचे वाचन कारणपरत्वे अनेकदा केलेले आहे. शाळेतल्या मुलांची तर पारायणे केली होती.अनेकदा व्याख्यानातून या पुस्तकाचा अलौकिक महिमा प्रसंगानुरूप शेअर केला होता.परिपाठात या पुस्तकातील गोष्टींची चर्चा केली आहे.या संस्कारक्षम पुस्तकाचे वाचन करणं म्हणजे मूल्याधिष्ठित संस्कृती कशी आहे?ती आचरणातून कशी जोपासावी याचे शिक्षण देणारं संस्कारपीठ आहे.
कस्तुरीचा वास की कुठेही असली तरी सांगावा लागत नाही.सरोवरातील उन्मादाने दरवळणारा कमलवृंद आपल्या श्वासाची जाहिरात कधीच करत नाही. रसिक वाचकांच्या त्यांच्या लिखाणावर ज्या कसोशीने उड्यावर उड्या पडत आहेत त्यांनेच “श्यामची आई”पुस्तकाची मौलिकता उंचावली आहे.
'हे विश्वची माझे घर' अशी सर्वव्यापी सानेगुरुजींची दृष्टी असल्याने त्यांचे साहित्य सध्या प्रस्तुत झाले आहे. हे त्याचे विश्वरूप दर्शनच आहे.’श्यामने' म्हणजेच साने गुरुजींनी पालगड येथील बालपणी मातापिता,बंधूबहिण, आजी यांच्या संगतीतल्या घटनाप्रसंग,शालेय जीवनातील पालगड, दापोली,औंध येथील घटनाप्रसंग हदयाच्या कुपीत जतन करून ठेवले होते.आश्रमात गोष्ट सांगून त्या अनुभवांचे मित्रांना शिंपण केले आहे.त्या गोष्टीरुप आत्मकथा 'श्यामची आई!' 'श्याम'म्हणजे साने गुरुजीच.श्याम म्हणजे मूर्तिमंत प्रयत्न,पवित्र त्याग,निखळ प्रेम आणि सौंदर्य होय.विद्यार्थी जीवनात श्यामने खरोखरच क्रांती केली होती. सगळ्या गोष्टीतून प्रेमाची गंगा दुथडी भरून ओसंडून सोडली आहे. आणि मुलांच्या मानवी मनावर भुरळ पडली आहे.
निर्मळ, सुंदर आणि पवित्र वस्तूला खरं तर प्रस्तावनेची जरुरी वाटत नाही.असं विधान गुरुजी करतात.इतकं अंतर्यामी मातृत्वाला त्रिवार वंदन करणारं लेखन गुरुजींच्या हातून स्फुरलं आहे.ते म्हणतात की,"प्रेम,भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना या मंगल ग्रंथांतील वाचून जर रसिक वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील.तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल.
थोर समाजसेवक लोकप्रिय साहित्यिक साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात असताना ९फेब्रुवारी १९३३ ते १३फेब्रुवारी १९३३ या पाच दिवसांत दिवसा काम करुन उरलेल्या वेळात रात्री आणि पहाटे हे पुस्तक लिहिले आहे.ह्दयात भरलेल्या शब्दांना रक्ताची शाई करून, आसवांच्या झरणीनं झरझर कागदावर लिहून काढलं.अन् त्यांच्या आत्मकथा वाचायला मिळाल्या. मातेचा महिमा कसा आहे?हे या पुस्तकाचे मुख्य बीज आहे. सुसंस्कृत आणि बालबोध घराण्यातील साध्या सोप्या सरळ आणि रम्य संस्कृतिचे शब्दचित्र गोष्टीरुपात व्यक्त केले आहे.
"आईची बद्दलची भक्ती आणि प्रिती हे हस्तलिखित वाचून शतपट वाढली."असं ते प्रांजळपणे प्रस्तावनेत सांगतात. मातेची प्रेममय शिकवण गोष्टीतून संस्कारी विचारांचे सौंदर्य पेरत आहे.अश्या भावस्पर्शी रसाळ कथा थेट हृदयाला भिडतात. या कथा ऐकण्याचं भाग्य आश्रमातील सोबत्यांना लाभलं.ते किती भाग्यवान! मातृपितृ प्रेम, निसर्गप्रेम, सजीवसृष्टी,मन शरीर बुद्धीचा विकास, सत्य बोलणं.मनाची श्रीमंती, काबाडकष्ट आणि मनाचं समाधान व्यक्त करायला लावणाऱ्या गोष्टी. रसग्रहण करताना काळीजकप्प्यात संवेदना जागृती करून डोळ्यात आसवे ओघळायला लावणाऱ्या कथा आहेत.
या पुस्तकात साने गुरूजींचा जीवन परिचय संक्षेपाने करण्यात आला असून त्याचे घराणे, मातापिता आणि गुरुजींचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी केलेली शिकस्त,कष्टाची कामे आणि हालअपेष्टा यांचे धावते वर्णन केले आहे.
अंमळनेर येथील शाळेचे शिक्षक,स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग,तुरुंगवास, साधना साप्ताहिकाचा शुभारंभ आणि गुरुजींचे वाड्मय यांचा समावेश केला आहे.
या महामंगल मातृत्वाच्या कथेच्या स्तोत्राचे जेष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे यांचे रसग्रहण वाचताना या पुस्तकातील कथांची ओजस्वीता वाढवते.अतिशय सुंदर शैलीत विवेचन केले आहे.ज्ञानेश्वरी सारखेच अलौकिक'श्यामची आई'हे मराठी भाषेचं भूषण आहे. जनसामान्यांच्या मनावर बिंबलेली लोकप्रिय साहित्यकृती आहे.मातृप्रेमाचा गौरव करणारा हा मंगलमय निर्मळ ग्रंथ आहे.भारतीय संस्कृतीची शिकवण देणारे प्रेम त्याग आणि सेवा व्रताचे स्तन्य गुरुजींच्या मुखात घालून आईनेच त्यांना लहानाचे मोठे केले.
साने गुरुजींच्या मुखातून श्रवण करायला मिळालेल्या बेचाळीस कथांचा खजिना या पुस्तकात आहे.आश्रमात दररोज रात्री एकेक कथा गुरुजींनी आपल्या भावस्पर्शी रसाळ वाणीत गोष्ट ऐकविली आहे.सगळ्या कथा श्यामला आचरणात आणायला लावणाऱ्या कथा आहेत.प्रत्येक कथेत एक संस्काराचा विचारवारसा आहे.प्रेमाची धुळाक्षरे साने गुरुजींनी आईच्या सभोवताली रांगतारांगता आणि खेळता खेळता गिरविली.मातेच्या ममतेचे तत्त्वज्ञान हरेक कथांमधून आळविले आहे.किती सुंदर विचारपुष्प आचार्य अत्रे यांनी या पुस्तकाचे महत्त्व वर्णिलेआहे. “मानवी जीवनातील सर्व सद्गुणांची, सौंदर्याची अन् मांगल्याची जणू काही धार काढूनच ती ह्या चांदीच्या कासंडीत भरून गुरुजींनी तरुण पिढीच्या हाती दिली आहे.”‘श्यामची आई’ मुलाबाळांची आणि तरुणांची ‘अमर गीताई’आहे.
या पुस्तकातील बेचाळीस कथा आश्रमात रात्रीची प्रार्थना झालेनंतर श्यामने मातेच्या स्मृतीकथा कथन केल्या आहेत.त्याचा प्रारंभ या लेखानेच केला आहे. माझ्यात जे जे चांगले आहे ते मला आईने दिले आहे. “आई माझा गुरु,आई माझी कल्पतरू|”तिनेच मला सर्वांवर प्रेम करायला शिकविले. “खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे|” माझ्या मनोभूमित बीज फुगत आहे.त्यातून भरदार जोमदार अंकुर केंव्हा बाहेर येईल,तो येवो. माझ्या आईने अत्तर ओतून माझे जीवन सुगंधित केले आहे.आई माझी माऊली.तिचे गुणगान करुन श्यामने आपले ओठ पवित्र केले आहेत. जसं जसं आपण गोष्टीतील मतीतार्थ समजून घेतो. तशी आपल्या मनाची मशागत होते.
पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज वाटू नये! हे विचार सांगणारी पहिल्या रात्रीची पहिली गोष्ट ‘सावित्री व्रत.' आई हिवतापाने आजारी असताना गुरुजींनी स्वता:वडाला प्रदक्षिणा घालून आईचे व्रत पूर्ण केले.आपल्या जवळ जे आहे ते दुसऱ्यास देऊन त्यांना सुख समाधान द्यावे.ही व्यक्त करणारी भावस्पर्शी गोष्ट ‘अक्काचे लग्न’.
वृक्षांच्या कळ्यांनाही संवेदना असते.पूर्ण उमललेलं घ्यावं पण कळ्या तोडू नयेत.त्या वृक्षवलींच्या मांडीवच चांगल्या फुलतात. त्यांना फुलायची संधी देणं.ही फुलांचा अध्याय अधोरेखित करणारी ‘मुकी फुल ’ कथा.बंधू यशवंत नालगुंदाने आजारी असताना देवाघरी जातो.ती आई आणि लेकाची ‘पुण्यात्मा यशवंत’गोष्ट आपण वाचताना फारच हळवे होतो.इतकं भावस्पर्शी शब्दात ही कथा गुरुजींनी लिहिली आहे.तर काबाडकष्ट करणाऱ्या मथुरी कांडपीण हिची चितरं कथा ‘मथुरी’कथा श्रमप्रतिष्ठेला वंदन करायला लावणारी कथा आहे.कारण श्यामची आई तिला आजारी असताना काम न लावता. ती आजारी असताना तिला अन्नपाणी अन् काढा देणारी प्रेमळ आणि दयाळू माऊली. “श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतो! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो!देवाला सांग शुध्द बुध्दी दे.”मन निर्मळ करायला लावणारी आचरणातून अनुभूती देणारी संस्कार कथा ‘थोर अश्रू’.अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयात भक्तीच्या कमळाचा जन्म होतो.
स्वयं शिक्षण आणि श्रमाची प्रतिष्ठा वाढविणारी कथा ‘पत्रावळ'.असत्य बोललं तर ते लपविण्यासाठी अनेकदा धादांत खोटे बोलावे लागते आणि मग आपली फसगत होते.हे पटवून देणारी मूल्याधिष्ठित गोष्ट ‘क्षमेविषयी प्रार्थना’.साक्षात देवता,कल्पवृक्ष आणि परोपकारी गायीची कथा ‘मोरी गाय’ची कथा.आपणाला प्राणीमात्रांवर दया प्रेम करायला शिकविते.
कर्जकाढून बांधलेल्या रंगमहालापेक्षा स्वता:च्या हक्काच्या चंद्रमौळी गवताच्या झोपडीत सुध्दा आपण आनंदाने नांदतो.याची शिकवण देणारी ‘पर्णकुटी’कथा म्हणजे आपलं हक्काचं घर स्वर्गापेक्षाही प्राणप्रिय असते. गुरुजींनी पाखराच्या पिल्लाचं सुतक कसं पाळलं.त्याची ही संवेदनशील मूल्य अधोरेखित करणारी ‘भूतदया’कथा. आपल्या मुलाला पोहायला यावे.त्याने धीट व्हावे.यासाठी प्रसंगी कठोर होऊन त्याला महत्त्व पटवून देणारी संस्कारी ‘श्यामचे पोहणे.’स्वाभीमानाने जगावे कसे?याचा वास्तूपाठ मनावर बिंबवणारी गोष्ट ‘स्वाभिमान रक्षण’.श्रमात आत्मोध्दार तर फुकट घेण्यात पतन आहे.स्वता: आजारी असताना अआदी दुसऱ्याला दिलेला शब्द न मोडणाऱ्या माऊलीची गोष्ट ‘श्रीखंडाच्या वड्या’.श्यामची आई म्हणजे साक्षात अन्नपुर्णा होती.तिला अनेकदा वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवायला शेजारी बोलवायचे.माणसांचे सद्गुण सदैव चमकतात. विचाराप्रमाणे वागणं हे भूषण असतं. बालपणीच्या भजनाची कथा ‘रघुपती राघव राजाराम’ बालपणीचे मित्र भजन कसं करतात.त्याचा मोठ्यांना कसा त्रास होतो. हे पटवून देणारी गोष्ट आहे.
तीर्थाटन करण्यासाठी वाईला चालत जाण्याची गोष्ट ‘तीर्थयात्रार्थ पलायन’. छानच भटकंतीची कथा रेखाटली आहे. “देवासाठी पलायन कर.पण चोरीसाठी, वाईट संगतीसाठी पळून जाऊ नकोस.’’ असा विचार पेरणारी श्यामची माऊली.मनावर घेतले तर इप्सित साध्य होते. त्यासाठी मनाची तयारी असावी लागते. रामरक्षा पाठ करायला काय दिव्य केले. त्याचे उदाहरण म्हणजे ‘स्वावलंबनाची शिकवण’गोष्ट होय.ताटातील अन्नाला नांवे ठेवू नये.अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.आपण जर स्वयंपाक बेचव झाला असे म्हटले तर करणाऱ्याला किती वाईट वाटेल.याची प्रचिती ‘अळणी भाजी’कथा वाचताना येते.चांगलं होण्यासाठी काय दिव्य करावे लागते.आई अहोरात्र कुटूंबासाठी कष्ट उपसत असते.आपल्या मुलांनी कामात मदतीला धावून यावे असे तिला वाटणारच. सोशिकपणा आणि क्षमेला मर्यादा असतात. पण सीमा ओलांडून गेली की आई दु:ख संतापाने बोलल्याचे श्यामच्या मर्मी लागते. त्याला रडू कोसळते. मग तो त्या दिवसापासून चांगला होण्याचा देवाकडे प्रार्थना करुन ठरवतो.ती गोष्ट ‘पुनर्जन्म’.घरातली सगळे माझी खाण्याची आवड जपताना केलेल्या कामाची गोष्ट ‘सात्विक प्रेमाची भूक’.
दूर्वाची आजीच्या कामाची खासियत आणि आई बरोबरचा कलह छानच शब्दात व्यक्त केला आहे.चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण आहे.हे पटवून देणारी ‘दुर्वांची आजी’कथा.दिवाळी सणाला आईला मामाने दिलेल्या भाऊबीजेच्या ओवाळणीतून श्यामची आई वडिलांना धोतर घेते.ही कथा वाचताना खरंच गरिबांच्या घरातही त्याग कसा करावा.हे आचरणातून दृष्टीकोन देणारी ‘आनंदाची दिवाळी.स्त्रीपुरुषांनी एकमेकांची कामे केली पाहिजेत हे समजावून देणारी ‘अर्ध नटेश्वरची’ कथा.तर सोमवती अमावास्येला देवाला १०८वस्तू अर्पण करायची ध्येयवादी कथा ‘सोमवती अवस’.
गावकुसाबाहेर हरिजन म्हातारी मदत केली तर लोकं नावं ठेवतील अन् हसतील.तरीपण तिला मदत करायचा आई अट्टाहास धरते.सारी देवाचीच लेकरं आपण आहोत.पण लोकं भेदभाव करतात.लोकांना शिवले तर विटाळ होतो.पण त्यांनी केलेली कामे आपणाला चालतात.हा किती विरोधाभास आहे.हे पटवून देणारी मूल्याधिष्ठित गोष्ट म्हणजे ‘देवाला सारी प्रिय असतात’.बंधुप्रेमाची शिकवण देणारी गोष्ट नातेसंबंध दृढ करणारी भावस्पर्शी गोष्ट आहे. दापोलीला इंग्रजी शाळेत असताना श्यामला गाईचा खरवस आवडतो म्हणून सहाकोस पायपीट करत; खरवस घेऊन येणारे वडील. यांचे अनंत ऋण मी कसे फेडू शकेन. प्रेमळपणाचे बीज त्यांनीच पेरले आहे.अशी पितृत्वाची महती उठावदार करणारी गोष्ट ‘उदार पितृहृदय.’ समाज्यासाठी सामुदायिक काम कसं करावं याची जाणीव करून देणारी कथा ‘सांब सदाशिव पाऊस दे|’
आपण‘ चोरी करु नये’हे वाक्य वाचतो.पण शिकत नाही आणि त्याप्रमाणे वागत नाही. सत्य हा एवढासा शब्द पण अनुभूती यायला शेकडो जन्मही पुरणार नाहीत. हृदयपरिवर्तन करायला लावणारी ही कथा.’मोठा होण्यासाठी चोरी’.वडिलांनी गुखाऊला दिलेलं पैसे साठवून आपल्या भावासाठी (पुरुषोत्तमला) गुरुजी कोट शिवून घेतात.अन् भर पावसात तुडुंब भरलेल्या पऱ्हातून वाट काढीत घरी पोहोचतात.ही हकीकत ऐकून आईला गहिवरुन येते.अन् ती म्हणते.’तू वयाने मोठा नाहीस मनाने.’भावाला सहकार्य कसं करावं याची प्रेरणा देणारी कथा.
आईसोबत नवस फेडण्यासाठी सागराला भेटायला येणाऱ्या मायलेकाची कथा.धर्म आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी ‘लाडघरचे तामस्तीर्थ’कथा.’बोलणे सोपे करणे अवघड आहे.’हे संबोधित करणारी भावस्पर्शी कथा ‘कर्ज म्हणजे जिवंतपणी नरक’ही कथा.अभद्र आणि अपमानित बोलणं काळजाला घरं करतं.कर्ज उरावर बसलं की अब्रुचे धिंडवडे निघतात.
शिकण्यासाठी औंधला जाताना घरच्यांची झालेली अवस्था ‘गरिबांचे मनोरथ’या गोष्टीत मांडलेले आहे.लवकर नोकरी करायला लागलो तर मी खूप शिकणार कधी.साऱ्या आशांवर पाणी ओतून घ्यावे का आई.मुलाने मोठे व्हावे पण पित्याला दु:ख आणि चिंता देऊन होवू नये.वडील कर्जबाजारी झाल्यामुळे नाना आजोबा भाऊंना जमीन विकून कर्ज फेडण्याचे समजावून देण्यासाठी आलेले असतात. त्यावेळी त्यांच्यात घडलेलं बोलणं ‘वित्तहीनाची हेटाळणी’या कथेत मांडले आहे.‘आईचे चिंतामय जीवन’या गोष्टीत श्यामची औंधला प्लेग आल्याने पालगडला माघारी येणं.त्यावर वडिलांचे टोमणं मारणं.त्यांना खोटे वाटतंय म्हणून आईची परवानगी घेऊन वडिलांवर रागावून परत जाणं शब्दबध्द केले आहे.
तर पुढील गोष्टीत माऊलीला संसार चालविताना आलेल्या हालअपेष्टा, दुसऱ्याचं घरकाम करावं लागणं आणि आजारीपणा यांच दर्शन घडतं.वाचताना अंगावर शहारे येतात नेत्रातून आसवं गळतात इतकं भावस्पर्शी लेखन गुरुजींनी ‘तेल आहे ,तर मीठ नाही.’अन् ‘आईचा शेवटचा आजार’सारी प्रेमाने नांदा, शेवटची निरवानिरव आदी कथांतून व्यक्त केली आहे.घराच्या जप्तीची कथा ‘अब्रुचे धिंडवडे’ वाचताना मनाची अस्वस्थता निर्माण होते. आपण हळहळतो.
‘भस्ममय मुर्ती’या गोष्टीत माऊलीच्या स्मृतीने श्यामची झालेली रडवेली अवस्था आणि प्रेमाच्या आठवणी प्रवासात येत असताना होणारी घालमेल व्यक्त केली आहे.फारच दु:खद प्रसंग आहे.शेवटची बेचाळिसावी रात्र ‘आईचे स्मृतीश्राध्द’ कथा.माझ्या आईनेच मला सारे दिले. भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली.प्रेम, कृतज्ञता, कर्तव्यबुध्दी, मधुरता ,सोशिकता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो. आणि भारतमातेची सेवा करता करता माझेही मथीमाऊप्रमाणे सोने होवो.या मातृत्वाच्या निर्मळ गोष्टींच्या आगारात कोकणात बोलण्यात येणारे शब्द आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत.अतिशय मूल्यसंस्कारीत नैतिक मूल्यांचे आचरण कसे असावे? याचा परमोच्च आविष्कार म्हणजे ‘श्यामची आई’. संस्कारक्षम कथांचा खजिना अखंड ओसंडून वाहत रहातो.स्वयंशिक्षण आणि श्रमप्रतिष्ठा जोपासणारी कहाणी म्हणजे ‘श्यामची आई’ गुरुजींच्या वाणीला आणि लेखणीला त्रिवार वंदन अन् सलाम…
हल्लीच्या युगात प्रत्येकाच्या घरीदारी या पुस्तकाचे पारायण करणं.पालकांनी मुलांना गोष्टी सांगणे.मुलांना पुस्तके वाचण्याची आवड निर्माण करणं आवश्यक व गरजेचं आहे…
स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन…
परिचयक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे
लेखन दिनांक: ११जून २०२४
समर्पक शब्दबध्द मांडणी👌👍
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete