पुस्तक परिचय क्रमांक:१३९ स्वप्नांचे शिलेदार
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१३९
पुस्तकाचे नांव- स्वप्नांचे शिलेदार
लेखकाचे नांव- रेणू गावस्कर
प्रकाशक-सकाळ प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- एप्रिल २०१९ पहिली
पृष्ठे संख्या–१४३
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--१८०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१३९||पुस्तक परिचय
स्वप्नांचे शिलेदार
लेखक: रेणू गावस्कर ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
भोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेत, शिक्षणातून उजळलेली आयुष्याची वाटचाल अधोरेखित करणारा हा कथासंग्रह….
"अभावाच्या जगातील मुलांचे प्रतिकूल परिस्थितीच्या विरुध्द संघर्ष करीत जगणाऱ्या आणि होरपळणाऱ्या बाल्यांच्या या उत्तरांवर सोडाच;पण त्यांचे प्रश्नसुध्दा आपल्यापर्यंत नीटपणे पोहोचले नाहीत. सामाजिक लेखिका रेणू गावस्कर यांच्या 'स्वप्नांचे शिलेदार'या पुस्तकाने हे अभावाचे जग, अस्वस्थ करणारे जग आपल्या संकुचित झालेल्या अवकाशाला आणून बिंबवले आहे. समाजमन म्हणून आपल्याला डोळे उघडायला लावणारे काम त्यांनी या पुस्तकात केले आहे. "असा अभिप्राय हेरंब कुलकर्णी यांनी 'हरणाऱ्या न-नायकांच्या विजयकथा'या प्रस्तावनेत व्यक्त केलाय.
वंचित मुलांच्या जीवनाची ही शब्दचित्रे केवळ रंजनासाठी नसून किंवा केवळ करुणा निर्माण व्हावी म्हणूनही नाहीत. वाचकांच्या मनात या मुलांच्या प्रातिनिधिक रुपाने घर करावे आणि एका बालकेंद्रित युगाची पहाट व्हावी, म्हणून सर्वांनीच समविचारांचे-कृतिशीलतेचे रिंगण धरावे,अशी अपेक्षा आणि आशा रेणू गावस्कर व्यक्त करतायत.
'बालके या पृथ्वीवर जन्म घेत आहेत तोपर्यंत ईश्वराचा माणसांवर विश्वास आहे, असं नि:शंकपणे मानावं.'असे रवींद्रनाथ टागोर म्हणत असत.पण ज्यांच्यासाठी जगाचे दरवाजे आनंदी आनंद उपभोगायला बंद आहेत.संघर्ष करून रोजीरोटी मिळवायला लागती तर त्यांच्या शिक्षणाचे काय?असा यक्ष प्रश्न आपणासमोर उभा टाकतो.अशा मुलांनी दारिद्र्याचे चटके सहन करत शिक्षण पूर्ण करून आयुष्यात उभे राहून आपलं आभाळ सक्षम केलं अश्या ३७मुलांच्या आयुष्याचा गौरवपट 'स्वप्नांचे शिलेदार'या गाथेत लेखणीबध्द केला आहे.
परिस्थितीचा विचार करता त्यांनी लेखणीतून जाणिवांचे परीघ विस्तारले आहे.त्यांना भेटलेले प्रत्येक मूल वेगळं तर खंबीर,जिद्दी,हताश अशी अनेक रुपे असणारी मुले.एकटेपणाला घाबरलेली मुले हळूहळू उठून उभी राहिली आणि शिकली.आपल्या जगात हिकमती होऊन स्वकष्टावर उभी राहिली.अशा मुलांची ही गोष्ट आहे..स्वप्नांचे शिलेदार…
गरिबी, बेरोजगारी, दुष्काळ अशा अनेक कारणांमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी लोंढा कुटुंब काफिल्यासह शहरांकडे स्थलांतरित झाला.त्यामुळे शहरं बकाल झाली. झोपडपट्ट्यांची वाढ झाली. शहराच्या महाकाय गर्दीत पालकांमधील बेबनाव,भिती, आईवडिलांचे निधन,आई किंवा वडीलांनी दुसरा घरोबा करणं, वडिलांचे व्यसन अशा अनेक कारणांमुळे कुटुंबापासून दूर झालेली मूलं एकाकी पडली.प्रवाह वाहील तिकडं वाहत गेली. निरागस बाल्य भाकरीचा तुकडा शोधण्यात हरवलं.अशा अंधारलेल्या परिस्थितीत स्वता:ची छोटी छोटी शिक्षणस्वप्ने जपणाऱ्या मुलांची कौतुकास्पद धडपड रेणू गावस्कर यांनी या पुस्तकात मांडली आहे.सतत वेदनांच्या छायेत असलेली ही सर्वांर्थाने कुपोषित बालके आशेने शिक्षणाकडे पाहतात.
त्यांची स्वप्ने पुरी करण्यासाठी असलेला तो एकमेव मार्ग आहे.असे या शिलेदारांना वाटते. या धडपडीत त्यांच्यापैकी कोणी यशस्वी होते, कोणी या परिस्थितीच्या रेट्यापुढे तग धरू शकत नाहीत. संस्काराच्या वयातील बाल शिलेदारांच्या संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण: स्वप्नांचे शिलेदार वंचित लेकरांचे जग आपल्याला या पुस्तकात समजावून दिले आहे.
“लेखिका म्हणून रेणू गावस्कर यांची प्रतिभा, भाषेतील उत्कटता, लेखनातील प्रवाहीपणा खिळवून ठेवतो.ती मुले आपल्या समोर उभी राहतात.भेटल्याचा भास होतो.या मुलांबरोबर गेली ४०वर्षे काम करत आहेत.त्यांना जीवन व्यवहाराची शिदोरी देत आहेत.त्यांच्या सुखदुःखात त्याही सहभागी झालेल्या आहेत.त्यामुळे अतिशय. बारकाईने त्यांनी सारे तपशील मांडले आहेत.त्यामुळे हे पुस्तक जिवंत झाले आहे.”असे संवेदनशील मनाचे शिक्षणतज्ज्ञ लेखक हेरंब कुलकर्णी अभिप्राय देतात.वेदनेची छाया संपूर्ण पुस्तकभर पसरली आहे.
घर हरवलेल्या मुलांना मायेची ऊब दिली. या मुलांचे जग मराठी बालसाहित्यात आणून आपले साहित्य समृद्ध केले आहे.२९मुलांची कथा या संग्रहात गुंफली आहे.गेल्या सात पिढ्यांत आमच्यात काॅलेजात जाणारी पहिली पोरगी…सुनीता.तर जिद्दीने अभ्यास करून सनदी अधिकारी बनलेला विकास असेल.प्रतिकूलतेचे आघात सोसणारे मूल हे समाजाच्या अनेक धाग्यांनी आणि रंगांनी नटलेल्या वस्त्राचंच एक नाजूक सूत असतं.त्याला बळकटी देण्यासाठी अगणित हात आणि त्या हातामागची प्रबळ प्रेरणा असावी लागते.
तळागाळातील मुलांना समजावून सांगितल्यावर होणारे अपेक्षित बदल मुलांच्यात दिसतात.अशा सापेक्ष बदलातून
यशस्वीपणे जीवन जगणाऱ्या मुलांची ही कहाणी आलेल्या अनुभवावरून मांडलीय ; सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रेणू गावस्कर यांनी…. सुंदर शब्दांकन आपल्या सिध्दहस्त लेखणीस त्रिवार वंदन….
पुस्तक परिचयक:श्री. रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई
समर्पक शब्द मांडणी👌👍
ReplyDeleteधन्यवाद दोस्त
ReplyDelete