पुस्तक परिचय क्रमांक:१३८ लाकूड कोरताना
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१३८
पुस्तकाचे नांव- लाकूड कोरताना
लेखकाचे नांव- अनिल अवचट
प्रकाशक-समकालीन प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- ऑगस्ट २०१५ पहिली
पृष्ठे संख्या–१०४
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य--२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१३८||पुस्तक परिचय
लाकूड कोरताना
लेखक: अनिल अवचट ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
काष्ठशिल्पकार संवेदनशील मनाचे लेखक अनिल अवचट यांचे कलाकुसरीच्या अंतरंगातील कौशल्य 'लाकूड कोरताना' या पुस्तकातून उलगडते. स्वत:पटाशीचे घाव सोसून,हातोडीचे कित्येक दणके सहन करुन मला भरभरून सौंदर्यानंद देणाऱ्या माझ्या सर्व लाकडांना ….ही काष्ठशिल्पाची किमया अर्पित केली आहे. सुतारकामातील कारागिरीचे आणि हत्यारांचे (वाकस,पटाशी,रंधा,हातोडी,सामता,किक्र आणि करवत) सूक्ष्मपणे वर्णन केले आहे.ते वाचताना प्रत्यक्ष सुतार लाकडावर कोरीवकाम कसं करतोय याची अनुभूती येते.इतकं अलवारपणे भुश्याच्या रंगावली सारखं लेखन केले आहे.
बालपणी लाकूडाचे फर्निचर आणि अवजारे सुतार मंडळी कशी बनवतात याचं कुतूहल वाटायचे. यातूनच मी लाकडाकडे कसा वळलो. याचं बहारदार शब्दात वर्णन केले आहे.
शिल्प बघायची दृष्टी मला शिल्पकार वामनराव पानगंटी यांच्यामुळे आली. भटकंती करताना डोंगर पर्वत नदी जंगलातील वृक्षं आदीत शिल्पाचे आकार दिसत.ते स्पष्ट करतात की," मला लहानपणापासून रचण्यापेक्षा कोरणं आवडायचं." सहा इंच उंचीचा पीओपीचा दंडगोल सुईने टोकरुन त्याची कलाकृती बनवली.ते शिल्पं म्हणजे गुडघ्यात मान घालून बसलेली व्यक्ती.
पुस्तकातील छायाचित्रे पाहून आपणाला त्या कलेचा दर्जा लक्षात येतो.हे शिल्प कवी ग्रेस यांनी पाहिल्यावर चार ओळी लफ्फेदार अक्षरात लिहिल्या होत्या. त्या अशा: 'गुडघ्यात मान घालून बसलात का मुलींनो,पाने गळून गेली थांबा जरा फुलांनो.'
शिल्पकार शिल्प कोरत नाही ते दगडात असतं.तो फक्त त्यातला नको असलेला भाग काढतो.लेखकाची लाकडाच्या राज्यात सेंटरिंगला लागणाऱ्या फळीतून कलाकुसरीला सुरुवात झाली.
ते म्हणतात की,"माझा स्वभाव नादिष्टच, अनेक गोष्टी करुन पहायचा नाद.त्यात लाकूड हाती लागलं आणि कोरत बसलो ते आजपावेतो.हत्यार कसं धरायचं तेही सुरुवातीला माहीत नव्हतं. त्यामुळे भरपूर चुका केल्या.हाताला, मांडीला जखमा झाल्या.कधी हत्याराला हातोडीचा ठोका जोरात बसला; लाकूड चिरफाळत गेलं. केलेलं काम वाया गेलं. पण त्यातून लाकडाचा स्वभाव कळला. आपलं आपण शिकत गेलो.हळूहळू लाकडातून शिल्पं आकारत गेली. शिल्प पुरं झाल्यावर काय बरं वाटतं! शिखरावर पोहचल्यावर थकवा घालवणारा वाऱ्याचा थंडगार झोत यावा तसं. कोणालाही हा आनंद घेणं शक्य आहे,कुणी शिकवायला असो किंवा नसो…"
माणूस आणि झाडाचं शिल्पं,म्हातारा,तीन चेहऱ्यांची माणसं,धावता घोडा,हत्ती, स्कूटरवरील कुटुंब,छत्रीतील कुटुंब, नाचणाऱ्या व्यक्ती,बाकावर बसलेले म्हातारे, योगासनातील व्यक्ती आणि मुखवटे कोरले आहेत. लेखक कारागीर अनिल अवचट यांनी बर्मा सागवानी लाकडात ‘छत्रीतील कुटुंब ‘थ्रीडी कोरलेले आहे.ते करताना आलेले अनुभव त्यांनी शब्दात रेखाटले आहेत.म्हणजे लेखणीच्या रेखाटनातून आपण लाकडावरचे पटाशीचे अलवार ठोके अनुभवतो.
चांगली कलाकृती म्हणजे करताना मजा येणं,साफ करताना आश्र्चर्य आणि आनंद वाटणं.यातील दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण काष्ठशिल्पाची छायाचित्रेही आपणाला मोहीत करतात.शिल्प करण्यापूर्वी ते त्यांचे चित्र रेखाटन करतात.ते म्हणतात की,”लाकडाच्या गर आणि सालीचं हे काय नातं आहे.गराचं रक्षण करण्यासाठी साल जिवाचं रान करते;ऊन, पाऊस, थंडी सोसते.स्वत:ला चिरा पडल्या तरी गराचं नुकसान होऊ देत नाही.आणि गर खाणारा मात्र साल कचऱ्यात फेकून देतो.माझ्या वडिलांचा भेगा पडलेला आणि आईचा सुरकुतलेला चेहरा डोळ्यासमोर आला.ते आईवडील आम्हा सगळ्यांची सालच जशी!”
सातव्या भागात शिसम लाकडाचे गुणधर्म आणि फर्निचर यांचा उलगडा होतो.तसेच त्या लाकडापासून बनवलेल्या स्त्रीपुरुष काष्ठशिल्पाची कहाणी आहे.तर आठव्या भागात भारवाहक हमालाचे (पाठीवरून पोतं वाहणारे) आणि हातगाडी ओढणाऱ्या हमालाचे शिल्प कोरलेले आहे.नवव्या भागात आई तान्ह्या बाळाला अंघोळ घालतानाचे कोरले आहे.
त्यांनी अवतीभवती पाहिलेल्या जिवंत दृश्यांचीच शिल्पे लाकडात कोरलेली आहेत.विशेषत: श्रमजीवी वर्गातील आहेत.गडचिरोलीच्या जंगलातील आदिवासी बायकांचे डोक्यावर घागरी घेऊन पाणी आणणं;एका हातात तान्हं मूल तर दुसरा हात घागरीला.
लाकडाच्या शिल्पाविषयी ते म्हणतात की, "लाकडाची कुवत आणि कारागिरीची कल्पना यावरच शिल्प घडत असतं."
एकूण १२भाग असून शेवटी समारोप प्रकरण लाकडाचे आहे.लाकूड कोरता कोरता ते वृक्षाच्या अंतरंगापर्यत घेऊन जातात.झाड म्हणजे हिरवागार पर्णसंभार आणि ओबडधोबड सालीच्या आतलं विश्व उलगडून दाखविणारे आहेत.ही कला खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांची आहे.ठोकळा अथवा फळी पाहून मनातल्या मनात संवाद साधावा लागतो. लाकडाशी बोलत शिल्प घडवावे लागते.अशी ही काष्ठशिल्पाची कहाणी लेखक अन् अवलिया कलाकार अनिल अवचट यांनी अप्रतिम शब्दचित्रात कोरलेली आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
अप्रतिम शब्द गुंफण👌
ReplyDeleteधन्यवाद दोस्त
ReplyDelete