पुस्तक परिचय क्रमांक:१३६ सखी
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१३६
पुस्तकाचे नांव-सखी
लेखकाचे नांव- व.पु.काळे
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण : जून २०२२
पृष्ठे संख्या–२०२
वाड़्मय प्रकार- कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--२२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१३६||पुस्तक परिचय
सखी
लेखक: व.पु.काळे ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾
स्त्रीच्या विविध रुपांतून सर्वात हवंहवंसं वाटणारं कुठलं रुप असेल, तर ते असतं 'सखी'चं.वेगवेगळ्या कोनातून वपुंना भेटलेली सखी. देहातीत आनंदाच्या विश्वात घेऊन जाणारी ही सखी…कथा रसग्रहण करताना तुम्हाला आम्हाला भेटेल.अन् क्षणभर का होईना काळजात तिच्या जीवनपटाचा रंगमंच उभा राहिल…
व्यक्तींचे अंतरंग कथानकातून उलगडून दाखविणारे लेखक कथाकथनकार व.पु.काळे यांचा 'सखी'हा कथासंग्रह वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांनी माझ्या वाढदिवशी हा अनमोल नजराणा डाकेद्वारा पेश केला.अन् माझ्या ग्रंथालयात एका सुंदर अक्षरकृतिचा समावेश झाला.. त्यामुळे वाचन करून पुस्तक परिचय समूहावर प्रसिद्ध करणे हे माझे कर्तव्य…
सदाबहार कथांचे रसग्रहण करायला लावणारी वपुंची जादूई लेखणी…
या लेखणीतून उतरलेल्या कथा म्हणजे वाचक रसिकांना मंत्रमुग्ध करणारा खजिना.
स्त्रीयांच्या मनांचे आविष्कार अधोरेखित करणारा 'सखी'हा कथासंग्रह आहे.
सखी कथा संग्रहात सखी,गार्गी, नम्रता,बाप, शांतिदूत, आकाश, उर्मिला, दखल, झकासराव ,ती आणि तिची स्वतः अशा दहा कथांचा संग्रह आहे.
'हसरा चेहरा हाच एकमेव दागिना' स्त्रियांना खुलून दिसतो.सखी म्हणजे आपल्याच अस्तित्वाचा एक भाग.व्यक्तीचं नाव काहीही असलं तरी जिच्याशी 'सख्य'जमते ती सखी.इंद्रधनूत सातच रंग असतात पण मनाच्या आकाशात किती रंग असतात ते रंग प्रकटीकरण झाल्यावर समजतं.प्रत्येक छटा म्हणजे एकेक कंपन. आशा म्हणजे कोसळणारा जलप्रपात अन् संथ जलाशय.
ते म्हणतात की ,“ प्रवास करताना,मी एकटा नसून माझ्या सोबतीला निसर्ग असतो.ओळखीची झाडं स्वागताच्या कमानी उभारून स्वागत करतात.अवीट गाणी असतात .प्रवासात काचेतून समोरचं किंवा बाजूला पहाताना प्रत्येक क्षणी लॅण्डस्केप बदलत जाते.एकदा बघितलेला देखावा पुन्हा नाही.आलेला दृश्य बघत बघतच क्षणात मागे पडते अन् क्षणात दुसरे रोमहर्षक दृश्य दिसते.हे चक्र सतत कार्यरत असते. प्रवासात डोंगराएवढे उंच, आकाशाइतके विशाल,वृक्षांना रोखे सावली देणारे सवंगडी, खळखळाट करीत झेपावणारे प्रपात पाहिले म्हणजे मला पैसा, प्रतिष्ठा, पद ह्यामागे धावणारा माणूस केविलवाणा वाटतो."इतकं बोलकं वर्णन त्यांनी केले आहे.
सखीच्या नाना छटा शोधक,शांत,मग्न.अनेक अधोरेखित करावे असे पॉईंटर कोटस् आहेत.''उत्कटतेला फक्त रंग असतो.संगती नसते."
वाणी मधुर असावी ह्यात निखळ माधुर्याचं जतन असतं.
चहाचं आधण आणि भावनांना उधाण येऊ लागलं.गाजलेली गाणी फेर धरू लागली.एक गाण्याचा झोका पारंबीवरुन फिरु लागला.अगदी ऊंच माझा झोका होवू लागला.सगळी भूतकाळातील ध्वनिमुद्रिकेच्या तारांगणात नजरा फिरु लागल्या.असं मत गाण्याविषयी ‘नम्रता’ या कथेतील गतकाळातील पार्श्वगायिका गिरीजाबाई आणि कवयित्री नम्रता यांची कथा चित्रित केली आहे.
बापाची खासियत परखडपणे व्यक्त केली आहे बाप कथेत.बापाचं असणं हर घडीला महत्त्वाचे असते.तर शांतिदूत कथेत माणसाच्या जीवनाचे संतुलन उलगडते. बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या विषयी बोलताना, ते म्हणतात की,”हट्ट स्वतःचा आणि तो पुरवायचा हक्क इतरांजवळ मागणे म्हणजे बालपण. हट्ट- अट्टाहास आणि शक्ती ह्या दोन्ही गोष्टी मालकीच्या म्हणजे तारुण्य आणि ताकद संपून परस्वाधीनता येणं आणि अट्टाहास तसाच रेंगाळणं म्हणजे वार्धक्य.” म्हातारपणी आपल्या हक्काचं माणूस म्हणजे पतीपत्नी असतात.ते एकमेकांचा भक्कम आधार असतात.अशातच एकटं पडलं तर उणीव भरून काढण्यासाठी पुन्हा लग्नाचा विचार येणाऱ्या बंडोपंतांना
त्यांचा मित्र नाना यांच्यातील हितगुज शांतिदूत कथेत मांडले आहे.
अनेक कथांचा आस्वाद घेताना रसग्रहण करताना विचारांचे आचारांचे वैभव मंथन करायला लावणारा आहे..
अप्रतिम कथासंग्रह आहे.
आस्वादक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
Comments
Post a Comment