पुस्तक परिचय क्रमांक:१३७ का रे भुललासी




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई

पुस्तक परिचय क्रमांक-१३७

पुस्तकाचे नांव-का रे भुललासी 

लेखकाचे नांव- व.पु.काळे

प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 

प्रकाशन वर्ष व आवृत्ती- पुनर्मुद्रण : सप्टेंबर २०२२ 

पृष्ठे संख्या–१५८

वाड़्मय प्रकार- कथासंग्रह 

किंमत /स्वागत मूल्य--१७०₹

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚

१३७||पुस्तक परिचय 

             का रे भुललासी 

         लेखक: व.पु.काळे ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾

उपेक्षितांच्या अंतरंगाची भैरवी आळवणारा भावस्पर्शी कथासंग्रह. दिसणाऱ्या  रंगांचा भेद करून माणसाच्या खऱ्या रंगांचे दर्शन घडवितो.

वाचन साखळीचे प्रसिध्दी प्रमुख श्रीमान कचरु चांभारे सर,बीड यांनी प्रायोजित केलेलेपुस्तक मला बक्षिसरुपाने भेट मिळाले आहे.

  मुखवटे घालून वावरणारी अगणित माणसं समाजात असतात.बोलणं एक अन् दुसरं असं तिसऱ्याशी बोलताना व्यक्त होतात. माणसाच्या अंतरंगाचा ठाव त्याच्या सान्निध्यात राहिलेल्यांना अवगत असतो. तोच त्यांच्याविषयी निर्भिडपणे सांगू शकतो. माणसाच्या स्वभावाच्या छटा उलगडून  दाखविणारे पुस्तक म्हणजे 'का रे भुललासी' हा कथाकार व.पु.काळे यांचा कथासंग्रह होय. मुखवट्यामागील वास्तव चेहऱ्याच्या अंतरंगाचे दर्शन घडविणारा कथासंग्रह अफलातून आहे.काही व्यक्तिंच्या विचारांचे सौंदर्य नकळत उमजते.माणसाला जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागते.जसा प्रस़ग तसा मुखवटा.त्यात माणूस आपले अंतरंग, सुखदुःखे,प्रेम,प्रतारणा,उपेक्षितपणा, सूड,हताशपणा आणि भ्याडपणा लपवत जगत असतो. मुखवटे आणि बुरखे माणसं परिस्थितीनुसार परिधान करतात.

लेखक व.पु.काळे म्हणतात की,"ह्या वरवरच्या भुलण्यामध्ये आपल्याला माणसाचे, जगाचे, निसर्गाचे खरे रंग कधी सापडतच नाहीत."

  हा कथासंग्रह अकरा बहारदार कथांनी सजविला आहे.बी.एम.पी.बेचाळीस बेचाळीस,मुखवटे,तिची समजूत घालताना, थ्रिल,वर्तुळातील त्रिकोण,सोयरीक, उपेक्षित, पान,सतीचं वाण आणि का रे भुललासी.

प्रत्येकाचा जगाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन असतो.आपण आपल्याच रंगांनी माणसं,प्रसंग रंगवून पाहतो.खुल्या मनाने आणि दिलाने विचार करीत नाही.दुसऱ्यावर आपले विचार लादू पाहतो.हे ही एक प्रकारचे मुखवटेच की!

   ही चौथी आवृत्ती संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना समर्पित केली आहे.कारण संगीताच्या प्रांतात स्वतः चं दालन निर्माण करणारी माणसं दुर्मीळ झाली आहेत. मनानं निर्लेप, बुध्दिवादी आणि संगीतातील गाण्यांच्या चालीप्रमाणेच वृत्तीही गूढ, विचारशील असे तीन तपं रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे हृदयनाथ मंगेशकर.

या कथासंग्रहाची खासियत म्हणजे या लेखक कथाकार वपुंना जिंदादिल वाचकांचे आभार मानलेत.अनेक कादंबरी आणि कथासंग्रहाचे रसग्रहण (वाचन) कसेही करून पुस्तक उपलब्ध करून केले आहे.यातील महत्त्वाचे वाचन.तसेच जेष्ठ साहित्यिक शंकर वैद्य यांनी वपुंच्या अंतरंग उलगडून दाखविणारा लेख वाचताना मर्म बंधातील ठेवा वाटतो.

पहिल्याच कथेत बी.एम.पी.बेचाळीस बेचाळीस मध्ये मुंबईच्या प्राणप्रिय टॅक्सीची कहाणी आहे.

वर्तुळातील त्रिकोण कथेत आवडता छंद जोपासायला काय काय दिव्य केले त्याचा माहितीपट चितारला आहे.हल्ली दातृत्वाचा महिमा गरजवंतापेक्षा देणारेच स्वाभिमानाचा गवगवा करतात.समाजात श्रध्दावान व्यक्तीपेक्षा दुस्वास करणाऱ्यांची संख्याही विपुल आहे.

सोयरीक कथेत विवाह स्थळांची जुळवाजुळव मध्यस्त छोट्याशा डायरीतून कसा करतो.याची माहिती उलगडते.ती वही पंतांना बसमध्ये बसल्यावर सीटखाली दिसते मग ते तिच्यावर पाय ठेवतात अन् हळूच  ढापतात,तदनंतर ती इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी घेताना मनात येणाऱ्या भावनांचा तपशील छान मांडला आहे. पत्रिका,अपेक्षा,पत्ते, गोतावळा आणि त्यापुढील शेरेबाजी चेहऱ्यावर हास्य फुलविते.लग्न जुळवण्याचा उद्योग कसा आहे याचे मार्मिकपणे टिपण डायरीत आढळते.पंत महाशय त्यातीलच एक स्थळ मुलीला पक्कं करतात.अन् ऐन लग्नाच्या प्रसंगी ज्याची डायरी आहे.तेच अप्पा दांडेकर मित्रांसमवेत लग्नात हजर राहतात.आणि याच मुलाच्या स्थळाविषयी शेरा का मारला नाही.याचा उल्लेख हळू आवाजात ऐकताना पंतांना मांडवाच्या खांबाचा आधार घ्यावा लागतो. 

'पान' खाणावळीत आणि घरी जेवण करताना भोजन मेनूतील खमंगपणा आणि तिखटपणा शब्दांच्या तवंगातून चमकत राहतोय.अन् आस्वाद घेताना जर त्यात गुंतावळ, खडा लागलं तर पारा चढल्यावर काय अवस्था होते.याचं सुंदर शब्दचित्र सजविला आहे .कुणाच्या पानात खडे आहेत, कुणाला पानच मिळत नाही, कुणाला दुसऱ्याचं पानच चांगलं वाटतं, कुणी भरल्या पानावरून उठतो,स्वत:चं पान पान लपवण्याचा प्रयत्न आहे. तर कुणाला पानासाठी पंगतीत जेवणाऱ्याच्या मागं आशाळभूतपणे वाट बघत उभं रहावं लागतं.खाणावळीत जेवायला येणाऱ्या माणसांच्या स्वभावाच्या छटा छानच शब्दात उलगडल्या आहेत.

पुस्तकाच्या नावाची कथा'का रे भुललासी 'माणसाच्या अंतरंगाचा ठाव वेधणारी कथा आहे. अप्रतिम कथासंग्रह आहे.


श्री.रविंद्रकुमार लटिंगे वाई

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड